तक्रारदार : वकील श्री.रुपेश हुकेरी यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे इच्छुक प्रवाशांना विमान सेवा पुरविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 कंपनीचे कार्यकारी संचालक आहे. यापुढे दोन्ही सा.वाले यांना एकत्रितपणे केवळ सा.वाले असे संबोधीले जाईल. तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांची आई आहे. यापुढे दोन्ही तक्रारदारांना एकत्रितपणे केवळ सा.वाले असे संबोधीले जार्इल.
2. तक्रारदारांनी दिनांक 29.4.2009 रोजी सा.वाले यांची विमान सेवा क्रमांक एसजी 118 या विमानाने मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. व तक्रारदारांनी मुंबई विमानतळावर त्यांचेकडील 3 बॅगा सा.वाले यांचे कर्मचा-याकडे विमानात वाहून नेणेकामी (Luggage ) सुपुर्द केले. तक्रारदार हे दिल्ली विमानतळावर रात्री 11.40 वाजता पोहचल्यावर त्यांना असे दिसून आले की, 3 बॅगापैकी 1 बॅग गहाळ झाली असून तक्रारदारांना फक्त दोनच बॅगा परत मिळाल्या. तक्रारदारांनी दिल्ली विमानतळावर एक बॅग गहाळ झाल्याबद्दलचा अहवाल विमानतळावर सा.वाले यांचे अधिकारी यांचेकडे नोंदविला. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे गहाळ झालेल्या बॅगेमध्ये किंमती साडया ब्लाऊसह, सलवार कमीज, प्रसाधनाचे साहित्य ई. वस्तु होत्या. त्या सर्व वस्तुंची किंमत रु.1 लाख होती.
3. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे दुस-या दिवशी सा.वाले यांचे कर्मचारी श्री.लॉरेन्स यांनी तक्रारदार जेथे थांबले होते त्या ठिकाणी एक गहाळ झालेली बॅग तक्रारदारांना सुपुर्द केली. तक्रारदारांनी बॅगेची तपासणी केली असतांना असे दिसून आले की, बॅग उघडण्यात आली असून बॅगेचे कुलुप तोडण्यात आलेले आहे व आतील चिज वस्तु गहाळ झालेल्या आहेत. या बाबी बद्दल श्री.लॉरेन्स यांनी काहीच खुलासा केलेला नाही व तक्रारदारांना असे उत्तर दिले की, त्यांच्य वरिष्ठांनी लॉरेन्स यांना केवळ बॅग सुपुर्द करण्यास सांगीतले. त्यानंतर तक्रारदारांनी मुंबईमध्ये ते परत आल्यानंतर दिनांक 3.5.2009 रोजी सा.वाले यांचे अधिका-यांकडे बॅग मधील चिज वस्तु गहाळ झाल्याबद्दल तक्रार नोंदविली व नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारदारांनी बराच पाठपूरावा केल्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना केवळ रु.2500/- नुकसान भरपाईकामी देऊ केले व मुंबई ते दिल्ली असे विमान प्रवासाचे एक मोफत तिकिट देऊ केले. तक्रारदारांचे रु.1 लाख येवढया किंमतीच्या वस्तुंचे नुकसान झाल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून प्राप्त झालेला तो देकार स्विकारला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 2.3.2010 रोजी सा.वाले यांना कायदेशीर नोटीस दिली व रु.10 लाखाची नुकसान भरपाईची मागणी केली. त्या मागणीची पुर्तता सा.वाले यांचेकडून झालेली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 25.6.2010 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासा दरम्यान सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व गहाळ झालेल्या वस्तुंची किंमत, मानसीक त्रास, कुचंबणा व गैरसोय या बद्दल नुकसान भरपाई रु.10 लाख असे एकत्रित रु.11 लाख व्याजासह वसुल होऊन मिळावेत अशी दाद मागीतली.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांच्या विमानाने मुंबई ते दिल्ली प्रवास केला व तक्रारदारांनी तिन बॅगा सा.वाले यांचेकडे सुपुर्द केल्या होत्या व त्यापैकी एक बॅग गहाळ झाली होती ही बाब मान्य केली. तथापी सा.वाले यांनी कॅरेज बाय एअर अॅक्ट ( Carriage by Air Act ) नियम परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 नियम 22 या मधील तरतुदींचा संदर्भ दिला. व तक्रारदार हे केवळ प्रतिकिलो 20 डॉलर किंवा जास्तीत जास्त रु.3,000/- येवढी रक्कम नुकसान भरपाई दाखल मिळण्यास पात्र आहेत असे कथन केले. सा.वाले यांनी असेही कथन केले की, लॉरेन्स यांनी तक्रारदारांकडे गहाळ झालेली बॅग दुस-या दिवशी त्यांचे मुक्कामाचे ठिकाणी सुपुर्द केल्यानंतर तक्रारदारांनी श्री.लारेन्स यांना काही वेळ प्रतिक्षा करण्यास सांगीतले व 20 ते 25 मिनिटानंतर तक्रारदारांनी त्यांना परत बोलाविले व त्यामधील वैयक्तिक वस्तु गहाळ झालेल्या आहेत असे त्यांना सांगीतले. या प्रकारे वस्तु गहाळ झालेल्या नसताना देखील त्या गहाळ झालेल्या आहेत असे बनावट कथानक तक्रारदारांनी रचले असे सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये कथन केले व तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार दिला.
5. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आपले पुराव्याचे कागदपत्र दाखल केले. तसेच कागदपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी विजय रॉय, सुमन रावतेला व रितेश दुबे यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी त्यानंतर तक्रारदार क्र.1 यांचे मुखत्यार श्री.अजित कुमार
माथूर यांच्या पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे दरम्यान द्यावयाचे एका बँगचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार तक्रारीत मागीतल्याप्रमाणे नुकसान भरपाई सा.वाले यांचेकडून वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय- परंतु .50,000/- एकत्रित. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी सा.वाले यांचे विमानाने मुंबई ते दिल्ली हा विमान प्रवास दिनांक 29.4.2009 रोजी केला व दिल्ली विमानतळावर तक्रारदारांच्या तिन बॅगापैकी एक बॅग गहाळ झाली व ती तक्रारदारांना दुस-या दिवशी सा.वाले यांच्या कर्मचा-यांनी सुपुर्द केली ही बाब उभयपक्षी मान्य आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांचे कर्मचारी श्री.लॉरेन्स यांनी दुस-या दिवशी म्हणजे दिनांक 30.4.2009 रोजी तक्रारदारांना गहाळ झालेली बॅग सुपुर्द केली, तेव्हा त्या बॅगची मोडतोड झालेली होती व कुलुप तोडण्यात आलेले होते व बॅगेतील पुढील वस्तु गहाळ झालेल्या होत्या.
1) 6 डिझायनर साडया ब्लाऊजसह.
2) 2 सलवार कमीज.
3) प्रसादनाची बॅग, त्यामध्ये सुगंधी द्रव्याच्या दोन बाटल्या.
4) रात्री घालावयाचे दोन पोशाख.
5) दोन तांब्याचे मग.
एकूण किंमती रुपये 1 लाख.
8. वरील वस्तुंच्या किंमती किंवा त्या वस्तु मौल्यवान नसल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांना बॅग सुपुर्द करण्यापूर्वी लेखी सूचना देण्याची आवश्यकता नव्हती. या प्रकारे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे विनालेखी सूचना त्या बँगा सुपुर्द केल्या, त्यामध्ये तक्रारदारांची चूक झाली असे म्हणता येत नाही.
9. तक्रारदारांची दिल्ली विमानतळावर दिनांक 29.4.2009 रोजी रात्री बॅग गहाळ झाल्या बद्दल जो तक्रार अर्ज दिला त्याची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रेारी सोबत दाखल केलेली आहे. त्यामध्ये देखील बॅगेमध्ये वर नमुद केलेल्या 6 डिझायनर साडया ब्लाऊजसह, 2 सलवार कमीज इत्यादी वस्तु त्या बॅगेमध्ये होत्या असे नमुद केलेले होते.
दुस-या दिवशी म्हणजे दिनांक 30.4.2009 रोजी सा.वाले यांचा लोडर श्री.लॉरेन्स यांनी तक्रारदारांकडे बॅग सुपुर्द केल्यानंतर ज्या वस्तु गहाळ झालेल्या होत्या त्याचा अहवाल तक्रारदारांनी तंयार केला व त्या अहवालाची छायाप्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. ती निशाणी सी-2 येथे दाखली केलेली आहे. त्यामध्ये देखील बॅग उघडल्यानंतर बॅगेमध्ये काय वस्तु दिसून आल्या व कुठल्या वस्तु गहाळ झालेल्या होत्या याच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. त्यावर तक्रारदार क्र.2 कनीका माथुर यांची स्वाक्षरी आहे. तसेच सा.वाले यांचे कर्मचारी श्री.लॉरेन्स यांची देखील सही आहे व दिनांक आहे. या वरुन सा.वाले यांनी मुंबई विमानतळावर तक्रारदारांच्या तिन्ही बॅगा वाहतुककामी स्विकारल्या व दिल्ली विमानतळावर तिनपैकी केवळ दोन बॅगा तक्रारदारांना परत केल्या व दुस-या दिवशी म्हणजे दिनांक 30.4.2009 रोजी एक बॅग सुपुर्द केली ही बाब सिध्द होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास श्री.लॉरेन्स यांचे समक्ष तक्रारदारांनी तंयार केलेला अहवाल निशाणी सी-2 यामधून पुष्टी मिळते. व बॅग देण्यापूर्वी ती बॅग उघडण्यात आली होती, त्या बॅगेचे कुलुप तोडण्यात आलेले होते ही बाब सिध्द होते.
10. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या या कथनास नकार दिलेला आहे व कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, श्री.लॉरेन्स हे तक्रारदारांकडे गहाळ झालेली बॅग घेऊन गेले असताना तक्रारदारांनी बॅग स्विकारल्यानंतर तक्रारदारांनी त्यांना बाहेर काही वेळ प्रतिक्षा करण्यास सांगीतले व त्यानंतर 20,25 मिनिटांनी तक्रारदारांनी लॉरेन्स यांना बोलाविले व बॅगेमधील वस्तु गहाळ झाल्याचे तक्रारदारांनी सांगीतले असे कथन सा.वाले यांनी केलेले आहे. या कथनाचे पृष्टयर्थ सा.वाले यांनी श्री.लॉरेन्स यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही, या उलट अन्य तिन कर्मचा-यांची शपथपत्रे दाखल केलेली आहेत. परंतु तक्रारीत नमुद बॅग उघडण्याची घटना त्यांचे समक्ष झाली नसल्याने त्यांच्या शपथ पत्रातील कथनास विशेष महत्व देता येत नाही. या वरुन सा.वाले यांचे कर्मचा-यांनी मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासाचे दरम्यान तक्रारदारांची बॅग उघडली, त्याकामी कुलुप तोडले, व बँगेतील महत्वाच्या चिजवस्तु नंतर गहाळ केल्या हे सिध्द होते.
11. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीच्या शपथपत्रामध्ये असे कथन केलेले आहे की, Carriage by Air Act 1972 चे परिशिष्ट क्र.1 व 2 यामध्ये वारसा करार 1929 व हेग करार या संदर्भात प्रस्तुत मंचाने Carriage by Air Act 1972 चे परिशिष्ट क्र.1 व 2 यातील तरतुदी तसेच नियम 22 व नियम 25 याचे वाचन केलेले आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत प्रवासी व विमान सेवा कंपनी यांचे दरम्यानच्या शर्ती व अटी ठरविण्यात आलेल्या आहेत. त्याची प्रत सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत दाखल केलेली आहे. त्यामध्ये विमान प्रवासाचे दरम्यान बॅग गहाळ झाल्याने रु.200/- प्रतिकिलो जास्तीत जास्त रु.3000/- ही नुकसान भरपाई विमान सेवा कंपनी तक्रारदारांना देऊ करेल असे नमुद आहे. Carriage by Air Act 1972 मधील तरतुदी, शर्ती व अटी मधील तरतुदी याचा संदर्भ देऊन सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.3000/- नुकसान भरपाई देऊ केली जी तक्रारदारांनी नाकारली. सा.वाले यांच्या कैफीयतीमध्ये व लेखी युक्तीवादामध्ये असे कथन आहे की, रु.3000/- पेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यास सा.वाले जबाबदार नाहीत.
12. Carriage by Air Act चे परिशिष्ट 2 मध्ये नियम देण्यात आलेले आहेत व प्रकरण 3 नियम 22 यामध्ये नुकसान भरपाईची मर्यादा प्रती किलोच्या प्रमाणात नमुद केलेली आहे. त्या प्रकरणातील नियम 25 असे नमुद करतो की, जर विमानसेवा पुरविणारी कंपनी त्यांचे प्रतिनिधी अथवा कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक नुकसान पोहचविले असेल तर नियम 22 लागू होणार नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा वॉरसा करारास मान्यता देतो व वॉरसा करारातील तरतुदी हया हेग करार 1995 यामध्ये सुधारीत करण्यात आलेल्या आहेत. हे दोन्ही करार विमान सेवा
पुरविणा-या कंपनीच्या नुकसान भरपाईच्या जबाबदारीच्या संदर्भात आहेत. वॉरसा करारातील नियम 22 प्रमाणे विमान सेवा पुरविणा-या कंपनीची जबाबदारी विशिष्ट मर्यादे पर्यतच असते. ही तरतुद विमान सेवा कंपनीकडे विमान प्रवाशाने विमान प्रवास दरम्यान सुपुर्द केलेले लगेज अथवा चिज वस्तु यांना लागू होतील. तथापी वॉरसा कराराचे नियम 25 व हेग कराराचे सुधारीत नियम 25 यामध्ये असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, विमान सेवा पुरविणा-या कंपनीच्या कर्मचा-यांनी जाणीवपूर्वक नुकसान पोहचविले असेल तर नियम 22 मधील तरतुदी लागू होणार नाही. नियम 25 मध्ये Will full misconduct असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. वरील शब्दाचा अर्थ व व्यप्ती व एकूणच नियम 22 व नियम 25 याचे विश्लेषण मा.राष्ट्रीय आयोगाने AIR INDIA LTD V/S INDIA AVERBRIPHT SHIPPING & TRADING COMPANY 2001 (II) CPJ 32 NCया प्रकरणामध्ये केलेला आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये देखील या प्रकारणाचा संदर्भ दिलेला आहे. त्या न्याय निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन केले असतांना असे दिसून येते की, विमानसेवा पुरविणा-या कंपनीच्या कर्मचा-यांचे अथवा एजंटचे वर्तन जाणीपूर्वक नुकसान पोहचविण्याचे हेतुने चुक या स्वरुपाचे असेल तर नियम 22 लागू होणार नाही. जिथे नियम 22 लागू होत नाही त्या प्रकरणामध्ये विशिष्ट दराने व महत्तम मर्यादेत ( Maximum liability ) नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्या स्वरुपाच्या प्रकरणामध्ये नियम 25 लागू होतो व न्यायालयास योग्य व न्याय्य नुकसान भरपाई ठरविण्याचा अधिकार प्राप्त होतो.
13. प्रस्तुत प्रकरणामध्ये उपलब्ध पुराव्यावरुन तसे सिध्द झाले आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे सुपुर्द केलेली बॅग जेव्हा सा.वाले यांच्या कर्मचा-यांनी दुसरे दिवशी परत केली त्यावेळेस ती बॅग पूर्वीच उघडण्यात आलेली Tampered होती. त्या बॅगेचे कुलुप तोडण्यात आलेले होते. या स्वरुपाच्या पुराव्यावरुन असा निष्कर्ष काढता येतो की, सा.वाले यांच्या कर्मचा-यांनी चोरी करण्याचे उद्देशाने ती विशिष्ट बॅग उघडली व आतील महत्वाच्या वस्तु लंपास केल्या. या स्वरुपाचे वर्तन नजरचुकीने अथवा निष्काळजीपणाने झाले असे म्हणता येणार नाही. तर ती जाणीपूर्वक केलेली चूक ठरते. सबब प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये नियम 25 लागू होतो. त्यामुळे नियम 22 लागू होत नाही व सहाजिकच तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून बॅगेतील वस्तु गहाळ झाल्याबद्दल योग्य व न्याय्य नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र ठरतात.
14. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये तसेच पुराव्याचे शपथपत्रात व दिल्ली विमान तळावर नोंदविलेल्या तक्रारीमध्ये असे कथन केलेले आहे की, त्या विशिष्ट बॅगेमध्ये तक्रारदारांच्या 6 भारी साडया ब्लाऊजसह, तसेच दोन सलवार कमीज, इतर किरकोळ कपडे व प्रसादनाची साधने होती, या सर्व वस्तु गहाळ झाल्या. तक्रारदारांनी त्या वस्तुंची किंमत विमानतळावर दिलेल्या तक्रारीमध्ये व प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये रु.1 लाख रमुद केलेले आहे. तथापी तक्रारदारांनी गहाळ झालेल्या साडयांच्या पावत्या अथवा देयके हजर केलेली नाहीत. तरी देखील वर्ष 2009 मधील भारीच्या साडयांचा विचार करता व इतर वस्तुंच्या दराचा विचार करता नुकसान भरपाई ठरविणे अवघड होऊ नये.
15. वरील घटना घडल्यानंतर तक्रारदारांना सा.वाले यांचेकडे पत्रव्यवहार करावा लागला. तसेच स्मरणपत्रे पाठवावी लागली. तक्रारदारांना त्याकामी मानसीक त्रास, कुचंबणा, व गैरसोय झाली. त्यानंतर तक्रारदारांना वकील नेमून तक्रार दाखल करावी लागली. या सर्व बाबींचा विचार करता एकत्रित नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च या बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.50,000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
16. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 375/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे दरम्यान बॅगेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना बॅगेतील भारीचे कपडे इत्यादी वस्तु गहाळ झाल्याबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकत्रित रु.50,000/- अदा करावेत असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून सदरहू रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.