( आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक– 28 सप्टेबर 2016 ) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
- तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की,तक्रारकर्त्याने त्याचे मालकीच्या ट्रकचा विरुध्द पक्षाकडुन विमा काढला होता. सदर विमा पॉलीसीचा कालावधी दि. 30.4.4012 ते 29.4.2013 पर्यत होता. सदर ट्रकची किंमत रुपये 6,00,000/- होती. दिनांक 28.4.2012 रोजी तक्रारकर्त्याचा ट्रक चोरी गेला त्याबाबत प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला. तसेच गुन्हा क्रमांक 188/13 असा दाखल करण्यात आला होता. त्याबाबतची माहिती विरुध्द पक्ष कंपनीला देण्यात आली होती व चोरीबाबत विमा दावा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर विमा दावा विरुध्द पक्षाने नाकारला. सबब तक्रारकर्त्याचे सदर प्रकरण लोक अदालत मधे ठेवण्यात आले परंतु तिथेही काही समझोता झाला नसल्याने सदर तक्रार तक्रारकर्त्याने या मंचात दाखल केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला रुपये 7,05,000/-, द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह द्यावे व योग्य ते आदेश विरुध्द पक्षाविरुध्द करावे अशी विनंती केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष नोटीस मिळून हजर झाले व नि.क्रं.13 वर त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्ष आपले लेखी उत्तरात असे नमुद करतात की, तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असल्याने नाकारले आहेत. तक्रारकर्ता हा ग्राहक व्याख्येत येत नाही कारण तक्रारकर्त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने सदरचा ट्रकचा ते व्यवसायाकरिता वापरतात. विरुध्द पक्षाने पुढे असे कथन केलेले आहे की तक्रारकर्त्याने विमा दावा दाखल केल्यानंतर त्यांनी दस्तऐवजांची पुर्तता न केल्यामूळे विमा दावा नस्तीबध्द करण्यात आला. त्यात विरुध्द पक्षाची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही यास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
- तकारकर्त्याची तक्रार, शपथपत्र तसेच विरुध्द पक्षाचे लेखी जवाब, दस्तऐवज, शपथपत्र, दोन्ही पक्षांचे वकीलांचे तोंडी युक्तीवादावरुन मंचाची त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे.
कारणमिमांसा - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडुन त्यांचे मालकीच्या ट्रक करिता विरुध्द पक्ष विमा कंपनीकडुन विमा पॉलीसी घेतली याबद्दल कोणताही वाद नाही. तसेच त्या विमा पॉलीसीकरिता तक्रारकर्त्याने मोबदला ही विरुध्द पक्षाकडे जमा केला होता याबाबतही वाद नाही. तक्रारकर्ता हा चोरी गेलेल्या ट्रकचा वापर व्यापाराकरिता वापरीत होता यात वाद नाही तरी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे विमा पॉलीसीकरिता झालेला करार नुसार व्यापारी कारणा करता येत नाही म्हणुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्द होते.
- विरुध्द पक्षाने त्यांचे जवाबात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला पाठविलेले दस्तऐवज प्राप्त झालेले नाही. विरुध्द पक्षाने नि.क्रं.15 वर दाखल केलेले दस्तवेज, पत्र व त्यासोबत लावलेली पोचपावती वरुन असे सिध्द होते की विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दस्तऐवजांची मागणी केलेली होती. तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरात असे कथन केलेले आहे की, त्यांनी त्या दस्तऐवजांची पुर्तता दावा दाखल करतेवेळी केली होती. परंतु त्याकरिता तक्रारकर्त्याने कोणताही साक्षीपुरावा किंवा दस्तऐवजाची पुर्तता केली नाही व त्याबाबत कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दस्तऐवजांची पुर्तता केलेली नाही. परंतु याचा अर्थ असा निघत नाही की, तक्रारकर्ता त्याच्या चोरी गेलेल्या ट्रकच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यास अप्रात्र आहे. सबब मंचाचे मते खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
अं ती म आ दे श 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने मागणी केलेल्या दस्तऐवजांची पुर्तता करावीव. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन दस्तऐवज प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याचे विमा दाव्याचा योग्य रितीने निर्णय करावा. 3. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 4. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी. 6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |