द्वारा श्री. आर.बी. सोमानी - मा.अध्यक्ष
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
1. तक्रारदार सामनेवाले रिलायन्स कम्युनिकेशन लि.चा भ्रमणध्वनी ग्राहक आहे. तो व्यवसायाने वकील आहेत. तक्रारदाराचा प्रिपेड क्र. 9324101781 CDMA मागील 4-5 वर्षांपासून होता.
2. सामनेवाले क्र. 2 यांचेकडे तक्रारदाराने दि. 1/6/2011 ला CDMA सेवा GSM सेवेकडे बदलून मिळणेसाठी अर्ज केला. योग्य माहिती दिली. त्याला सांगण्यात आले की, 4-5 दिवसांत ही सेवा GSM मध्ये रुपांतरीत होईल व त्याकरीता रु.1/- भरला. परंतु सेवा वर्ग झाली नाही. त्याबद्दल विचारले असता सामनेवाले क्र. 2 ने योग्य माहिती दिली नाही. तक्रारदार व्यवसायाने वकील आहेत. सिमकार्ड 20-25 दिवस अॅक्टीव्हेट झाले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे रु. 1,00,000/- ते रु.1,50,000/- चे नुकसान झाले. अशिल सोडून गेले आणि संजय चौहाण नांवाचे अशिल यांना पोलिसांनी पकडून आणल्यावर तक्रारदाराचा फोन चालू नसल्याने संपर्क होऊ शकला नाही व त्यास जेलमध्ये जावे लागले. सामनेवाले यांनी योग्य सेवा दिली नाही. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारदाराने नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी खोटे उत्तर दिले. तक्रारदारास झालेल्या नुकसानीपोटी रु. 1,50,000/- तसेच रु. 3,500/- नोटीसचा खर्च, रु. 15,000/- तक्रारीचा खर्च मिळावा अशी प्रार्थना केलेली आहे.
तक्रारीसोबत प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. तसेच दस्तऐवजांमध्ये तक्रारदाराने दिलेली नोटीस, आलेले उत्तर व इतर दस्तऐवज दाखल आहेत.
3. सामनेवालेस नोटीस लागून दोन्ही सामनेवाले गैरहजर राहिले. तक्रारदाराने पुन्हा मंचाचे परवानगीने दि. 21/3/2012 ला सदर आरोपी संजय चौहाण यांचेबद्दल फौजदारी कोर्टातील दस्तऐवज दाखल केले आणि युक्तीवाद केला की तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी सामनेवाले यांनी नुकसान भरपाई दयावी व तक्रार मंजूर करावी.
4. सामनेवाले यांना लेखी जबाबासाठी भरपूर मुदत देऊनही त्यांचेवतीने कुणीही हजर झाले नाही व आपले लेखी जबाब दाखल केले नाही म्हणून प्रकरण एकतर्फा निकालाकरीता घेण्यात आले.
5. मंचाने तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला व उपलब्ध दस्तऐवजांवरुन तसेच शपथेवरील लेखी बयाणावरुन मंच खालील निष्कर्षाप्रत पोहोचला आहे.
6. तक्रारदाराने योग्य सेवेची मागणी केली व त्याकरीता सामनेवालेकडे विनंती केली आणि त्यानुसार सेवा मिळणेस तो पात्र आहे.
7. सामनेवाले यांनी दिलेल्या नोटीस उत्तरावरुन मंचासमोर स्पष्ट होते की, तक्रारदाराला सामनेवाले यांनी काही विशिष्ट बाबतीत माहिती मागितलेली होती. त्यात असे नमूद केले की, MDN तक्रारदाराने त्यांना पुरविलेले नाही परंतु झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. परंतु मंचासमोर त्यांनी काहीही म्हणणे सादर केलेले नाही. प्रस्तुत प्रकरणी दस्तऐवजांवरुन तसेच शपथपत्रावरुन आणि सामनेवाले यांचे गैरहजेरीवरुन मंचासमोर सिध्द होते की, सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
8. तक्रारदाराने रु. 1,50,000/- ची नुकसान भरपाई व इतर अनुषंगिक दाद मागितली आहे. परंतु नुकसान भरपाई कशी रास्त आहे हे सिध्द करण्यास तक्रारदार यशस्वी झाला नाही. तसेच फक्त फोन नसल्याचे कारणाने तक्रारदाराचा अशिल जेलमध्ये गेला असा युक्तीवाद तर्कसंगत व न्यायोसंगत वाटत नाही. तक्रारदाराचे इज्जतीला धक्का पोहोचला असा कोणताही पुरावा/प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल नाही तरीदेखील मंच ग्राहय धरतो की तक्रारदारास त्याच्या वापरात असलेला जुना फोननंबर वेळीच सुरु न झाल्याने अतोनात मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे त्याकरीता सामनेवाले जबाबदार आहेत. त्यामुळे सामनेवाले यांनी काहीअंशी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली.
9. तक्रारदाराला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून सामनेवाले यांनी रु. 5,000/- देय करावे तसेच तक्रारदारास नोटीस खर्च रु. 1,000/- देय करावा असे मंच आदेशीत करतो.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार एकतर्फा अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास योग्य सेवा न पुरवून दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
- सामनेवाले यांनी तक्रादारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानीपोटी सामनेवाले यांनी रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार) देय करावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) देय करावे.
- आदेशाची प्रत उभय पक्षांस निःशुल्क देण्यात यावी.