निकाल
(घोषित दि. 12.05.2016 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार सामान्य रुग्णालय जालना येथे नोकरीस आहेत. त्यांनी प्रतिपक्ष यांचेकडून (E-Connect_3G_299) हा पोस्टपेड प्लॅन घेतला. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे दिली. त्यानुसार दिनांक 24.07.2015 रोजी तक्रारदारांना 9923428088 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला व अशा त-हेने तक्रारदार प्रतिपक्ष यांचे ग्राहक झाले. दिनांक 24.07.2015 ते 04.08.2015 या कालावधीसाठी त्यांना रुपये 192.90 अशी आकारणी केली गेली व एकुण रुपये 219.91 अशी आकारणी केली. त्यात मोबाईल क्रमांक 7507711770 या क्रमांकाचे बिल जोडून देण्यात आले. तक्रारदारांच्या नावावर दोन कलेक्शन नव्हते तरी देखील त्यांना वरील प्रमाणे बिल देण्यात आले. त्यानंतर दिनांक 05.08.2015 ते 04.09.2015 या कालावधीसाठी देखील 555.93 व दिनांक 05.09.2015 ते 04.10.2015 या कालावधीसाठी रुपये 1001.96 अशी चुकीची मागणी दोन कनेक्शन्स तक्रारदाराच्या नावावर दाखवून प्रतिपक्षाने केली. तक्रारदारांनी वारंवार वरील गोष्टीबाबत प्रतिपक्षाकडे तक्रारी केल्या. परंतु प्रतिपक्षाने त्याकडे लक्ष दिले नाही. तक्रारदारास प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेस बिल येणे अपेक्षीत असतांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेस बिल दिले जात आहे. तक्रारदारांचे नावावर दोन मोबाईल कनेक्शन नसतांना देखील प्रतिपक्ष त्यांचे बिलावर दोन कनेक्शन्स दाखवित आहेत. म्हणजेच तक्रारदारांनी फोन घेतेवेळी दिलेल्या कागदपत्रांचा प्रतिपक्ष गैरवापर करीत आहेत ही प्रतिपक्ष यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून तक्रारदारांनी हि तक्रार दाखल केली आहे. तक्रारी अंतर्गत तक्रारदारांनी प्रतिपक्षाने त्यांना दिलेली सर्व बिले दुरुस्त करुन मिळावीत व प्रतिपक्षाकडून झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रुपये 5,00,000/- मिळावी अशी प्रार्थना केलेली आहे.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत प्रतिपक्षाने त्यांना मोबाईल क्रमांक 7507711770 ची दिलेली बिले, तक्रारदार व प्रतिपक्ष यांच्यातील ई-मेल संभाषणाचा उतारा, बिल भरल्याची पावती अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
प्रतिपक्ष 1 मंचासमोर हजर झाले, त्यांनी नि.12 वर लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या सर्व तक्रारीचे निराकरण झालेले आहे. तशा अर्थाचा ई-मेल दिनांक 09.11.2015 रोजी तक्रारदारांना पाठविला आहे. त्यांची कंपनी मोबाईल नेटवर्क देणारी नामांकीत कंपनी आहे. त्यांच्या प्रणालित झालेल्या चुकीमुळे तक्रारदारांचे नावावर दुसरा Relationship Number देण्यात आला. परंतु वरील तांत्रीक चुक प्रतिपक्षाने लवकरात-लवकर सुधारली आहे. प्रतिपक्षाने तक्रारदारांकडून कोणतीही जास्तीची रक्कम स्वीकारलेली नाही. तक्रारदाराच्या तक्रारीची प्रतिपक्षाने ताबडतोब दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केलेली आहे. अशा त-हेने प्रतिपक्षाने तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कोणेतीही त्रुटी केलेली नाही.
तक्रारदारांचे बिल प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेलाच पाठविले जाते व ते सर्वसाधारणपणे सात दिवसाच्या आत ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर मिळते. तक्रारदाराच्या तक्रारीची प्रतिपक्षाने योग्य ती दखल घेऊन निराकरण केलेले असतांना देखील तक्रारदारांनी ही खोटी व बनावट तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी प्रार्थना प्रतिपक्ष 1 यांनी केली आहे.
प्रतिपक्ष 2 नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाहीत म्हणून तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
तक्रारदारांची तक्रार, प्रतिपक्ष 1 यांचा जबाब, दाखल कागदपत्रे व मंचा समोरील युक्तीवादावरुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.प्रतिपक्ष यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली ही बाब तक्रारदारांनी
सिध्द केली आहे का ? प्रतिपक्ष 1 साठी होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – प्रतिपक्ष 1 ही मोबाईल सेवा देणारी कंपनी असुन प्रतिपक्ष 2 हे केवळ शाखा कार्यालय आहे. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांचे नावे वोडाफोन मोबाईल क्रमांक 7507711770 या क्रमांकाचे दिनांक 24.07.2015 ते 04.08.2015 या कालावधीचे रुपये 219.91, दिनांक 05.08.2015 ते 04.09.2015 या कालावधीचे रुपये 555.93, दिनांक 05.09.2015 ते 04.10.2015 या कालावधीचे रुपये 1001.96 अशी बिले प्रतिपक्ष 1 यांनी पाठविल्याचे दिसते. वरील मोबाईल क्रमांकाचे वरील प्रमाणे बिल तक्रारदारांना दिले गेले असले तरी प्रत्यक्षात तो क्रमांक तक्रारदारांना दिला गेलेला नव्हता व प्रतिपक्ष यांच्या संगणकीय प्रणालीतील काही चुकीमुळे तो क्रमांक तक्रारदार यांच्या नावावर Relationship Number म्हणून दाखविला गेला असल्याचे प्रतिपक्ष क्रमांक 1 यांनी मंचासमोरील लेखी जबाबात मान्य केले आहे. प्रतिपक्ष 1 यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या संगणकीय प्रणालीतील चुकीमुळे वरील प्रमाणे मोबाईल क्रमांक दर्शविला गेला. परंतु त्या संदर्भातील तक्रारदाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांची चुक दुरुस्त केली. त्यांच्या व तक्रारदाराच्या दरम्यान झालेल्या ई-मेल संभाषणात त्यांनी वरील नंबर तक्रारदारांच्या खात्यावरुन दिनांक 14.10.2015 रोजी काढून टाकला असल्याबाबत तक्रारदारांना कळविले होते. तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण झालेले असतांना देखील तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केलेली आहे.
प्रतिपक्षाच्या जबाबात म्हटल्याप्रमाणे त्यांनी दिनांक 14.10.2015 पासून वरील नंबर तक्रारदारांच्या खात्यातून काढून टाकला होता. तक्रारदारांना दिलेल्या बिलाचे अवलोकन करता त्यांना मोबाईल क्रमांक 7507711770 चे बिल दिनांक 04.10.2015 पर्यंतच आकारले गेल्याचे दिसते. म्हणजेच त्यानंतर प्रतिपक्षाने ई-मेल संभाषणात नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारांच्या नावाने दाखविले गेलेले वरील मोबाईल क्रमांकाचे कनेक्शन बंद केले होते. तक्रारदारांनी वरील क्रमांकावर आलेल्या बिलाची कोणतीही रक्कम प्रत्यक्षात प्रतिपक्ष यांचेकडे भरलेली नाही. म्हणजेच प्रतिक्षाने चुकीचे बिल आकारले असले तरी कोणत्याही अयोग्य रकमेची वसुली तक्रारदारांकडून केलेली नाही. तक्रारदारांची अशीही तक्रार आहे की, त्यांना प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेस मोबाईल बिल येणे अपेक्षीत होते. तसा संदेशही त्यांच्या मोबाईलवर येत होता. परंतु प्रत्यक्षात त्यांना दरमहिन्याच्या 05 तारखेस बिल येत गेले. परंतु वरीलबाब तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत.
असे असलेतरी देखील प्रतिपक्षाने तक्रारदारांचे नावे त्यांनी वेगळे कनेक्शन घेतले नसतांना देखील Relationship Number म्हणून मोबाईल क्रमांक 7507711770 चे बिल लावले ही प्रतिपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत केलेली कमतरता आहे असे मंचाला वाटते. तक्रारदारांनी वरील बाबीची नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,00,000/- एवढी रक्कम मंचाकडे मागितली आहे. तक्रारदारांचे एवढे नुकसान कसे झाले याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण अथवा पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. असे असलेतरी प्रतिपक्ष 1 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत वरीलप्रमाणे कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. वारंवार प्रतिपक्ष यांचेशी संपर्क करुन तक्रार करावी लागली. ही गोष्ट तक्रारदारांनी दाखल केलेल्या ई-मेल संभाषणाच्या प्रतीवरुन स्पष्ट दिसते. म्हणून या प्रकरणात तक्रारदारांना जो मानसिक त्रास झाला त्या त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 2,500/- एवढी रक्कम प्रतिपक्ष 1 यांनी तक्रारदारांना द्यावी असा आदेश मंच करीत आहे.
आदेश
· तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
· प्रतिपक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रार खर्च रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) एवढी रक्कम आदेश दिनांकापासून 45 दिवसाचे आत द्यावी.
· वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास त्यावर देय दिनांकापासून द.सा.द.शे 9 टक्के व्याज दराने व्याज द्दयावे.
श्री सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्रीमती नीलिमा संत
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना