(द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख , अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराची पती मयत राजेंद्र दत्तु वाघ हे भूमीहीन शेतमजूर होते. त्यांचा मृत्यु दिनांक 23/1/2009 रोजी जळाल्याने झाला. त्यानंतर एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पीएम करण्यात आला. तक्रारदारानी सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म तहसीलदार खुलताबाद यांच्याकडे दिनांक 7/11/2009 रोजी पाठवून दिला. मयत राजेंद्र दत्तु वाघ हे आम आदमी विमा योजनेचे विमाधारक होते. गैरअर्जदारांनी त्यांना अद्यापपर्यंत रक्कम दिली नसलयामुळे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारानी तक्रारीसोबत शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा क्लेम त्यांना प्राप्त झाला नाही म्हणून तक्रारदारा तक्रार अमान्य करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदार क्र 2 तहसीलदार खुलताबाद यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार आम आदमी विमा योजनेची त्यांनी यादी बनविली त्यामध्ये मयत राजेंद्र दत्तु वाघ यांचे नांव नाही. स्वत: मयत किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे भूमिहीन शेतमजूर म्हणून नांव दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला नाही. या कारणावरुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज अमान्य करावा अशी मागणी ते करतात. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तहसीलदार खुलताबाद यांनी त्यांच्या आम आदमी विमा योजनेच्या यादीमध्ये मयताचे नांव समाविष्ट नाही असे म्हणतात. म्हणून मंच असा आदेश देतो की, तहसीलदार खुलताबाद व तलाठी या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे जाऊन क्लेम फॉर्म भरावा त्यानंतर तहसिलदार खुलाताबाद व तलाठी या दोघांनी मयत राजेंद्र दत्तु वाघ यांचे नांव भूमिहीन शेतमजूरच्या यादीमध्ये समाविष्ठ करावे. त्याचप्रमाणे नॉमिनीचे नांवही लिहावे. आम आदमी विमा योजना ही केंद्र शासनाने कार्यन्वित केलेली आहे त्यामध्ये राज्य शासन हे नोडल एजंट म्हणून काम करतात. त्या योजनेनुसार राज्य शासनाचे तहसीलदार व तलाठी यांनी भूमिहीन शेतमजूराचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरी जाऊन सर्व माहिती घेऊन क्लेम फॉर्म भरण्यास मदत करावी असे असतानाही तहसिलदार यांनी केवळ यादीमध्ये नांव नाही म्हणून तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी मागणी करतात. तसहलीदार यांनी पुराव्यासाठी यादी सुध्दा दाखल केलेली नाही. तलाठी वेरुन ता खुलताबाद यांनी मयत राजेंद्र दत्तु वाघ यांना भूमिहीन शेतमजूर म्हणून दिनांक 1/4/2009 रोजी प्रमाणपत्र दिले होते व असे असतानाही तहसीलदार यांनी त्यांचे नांव भूमिहीन शेतमजूर म्हणून आम आदमी विमा योजनेमधील यादीमध्ये दाखल केले नाही यामध्ये सर्वस्वी तहसीलदार खुलताबाद हे जबाबदार ठरतात. त्यासाठी म्हणून मंच तहसीलदार यांनी तक्रारदारास रु 1,000/- द्यावेत असा आदेश देत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश
1. तक्रारदारानी तहसीलदार खुलताबाद यांच्याकडे आदेशाची प्रत मिळाल्यानंतर एक आठवडयाच्या आंत जावे आणि तहसीलदार खुलताबाद यांनी सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म भरुन घेऊन यादीमध्ये त्यांचे नांव समाविष्ठ करुन एलआयसीकडे 4 आठवडयाच्या आंत क्लेमफॉर्म पाठवावा. 2. गैरअर्जदार क्र 1 एलआयसीने सदरील क्लेमफॉर्म मिळाल्यापासून 6 आठवडयाच्या आंत तक्रारदाराचा क्लेम सेटल करावा.
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |