मंचः- श्री. एम.वाय. मानकर, अध्यक्ष : श्री.शां.रा.सानप, सदस्य
तक्रारदारातर्फे वकील : श्री. नाडकर्णी.
सामनेवाले क्र 1 : एकतर्फा
सामनेवाले क्र 2 तर्फे वकील : श्रीमती. अनिता मराठे
आदेशः- श्री. एम.वाय. मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
न्यायनिर्णय
1. तक्रादारांनी सामनेवाले यांचेकडून विदयुत घट माळेवर (बॅटरी) चालणारी चारचाकी वाहन रेवा विकत घेतली. त्या वाहनाबद्दल सेवा देण्याबाबत उद्भवलेल्या वादामुळे तक्रारदारानी ही तक्रार सामनेवाले क्र 1 अधिकृत विक्रेता व सामनेवाले क्र 2 उत्पादक कंपनी यांचेविरूध्द दाखल केली. सामनेवाले क्र 1 यांना नोटीस प्राप्त झाली व त्याबाबत पोस्टाची पोचपावती संचिकेत दाखल आहे. परंतू ते मंचासमक्ष उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले. सामनेवाले क्र 2 मंचासमक्ष उपस्थित राहून आपली लेखीकैफियत दाखल केली व तक्रारदारानी लावलेले आरोप फेटाळून लावलेत. दोन्ही पक्षांनी तक्रार व लेखीकैफियतीसह कागदपत्रे दाखल केली.
2. तक्रारदारानूसार त्यांनी रेवा चारचाकी वाहनाकरीता दि 05/11/2002 ला रक्कम अदा केली व सामनेवाले क्र 2 तर्फे वाहनाची पोचवनी दि. 20/01/2003 ला करण्यात आली. त्यानंतर,दि. 20/01/2006 ला त्या वाहनामध्ये नविन पॉवर पॅक 8 बॅटरी असलेला बसविण्यात आला व त्याकरीता तक्रारदारानी केलेत.रू. 47,126/-,अदा केलेत. परंतू 1 वर्षाचे आतमध्ये नविन बसविण्यात आलेला बॅटरी पॉवर पॅक मध्ये दोष निर्माण झाला व तक्रारदारांनी आपली तक्रार नोंदविल्यानंतर सा.वाले यांनी वारंवार दुरूस्ती किंवा बॅटरी बदलली. तक्रारदारांनी त्याबाबत रक्कम अदा केली. वाहनातील दोष दुर झाला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराना 30 जानेवारी 2008 ला एक नविन कोटेशन देऊन नविन पॉवर पॅक करीता किंमत रू 71,053/-नमूद केली व नविन पॉवर पॅक ची वारंटी 1 वर्ष दर्शविण्यात आली. तक्रारदारानूसार 1 वर्षाकरीता बॅटरी करीता एवढी किंमत मोजण्यापेक्षा पेट्रोलवर त्यापेक्षा 1 वर्षामध्ये कमी खर्च येतो. तक्रारदारानी वारंवार सामनेवाले यांना पत्र लिहीले होते वाहनामध्ये दुरूस्ती करण्यात आली नाही वाहन बंद अवस्थेत उभे आहे. वाहनातील आसन सुध्दा व्यवस्थीतपणे बसविण्यात आले नाही. तक्रारदारांनी दैनंदिन प्रवासासाठी प्रवास खर्च, उभ्या असलेल्या वाहनाचे पार्किंग चॉर्जेस व वाहनाच्या साफसफाईसाठी केलेला खर्च व मानसिक त्रासासाठी असा एकुण 4,85,500/-, ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी जुन्या वाहनाऐवजी नविन कार निःशुल्क बदलवून देण्याबाबत किंवा संपूर्ण पॉवर पॅक सिसटीम बदलवून वाहन दुरूस्त करून सडकेवर धावण्याच्या स्थितीमध्ये आणणे किंवा तक्रारदारानी अदा केलेली संपूर्ण रक्कम रू 3,50,000/-,12 टक्के व्याजासह परत करावी अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले क्र 2 यांनी सामनेवाले क्र 1 त्यांचे अधिकृत विक्रेता व सेवाकेंद्र असल्याचे मान्य केले व त्याच्या वाहनाबद्दल वैशिष्टपूर्ण बाबी नमूद केल्या. सामनेवाले क्र 2 प्रमाणे तक्रारदारांनी गाडी बदलवून मिळण्याकरीता 7 वर्षानंतर मागणी केल्यामूळे ती कालबाहय आहे. तसेच आधारहीन आहे. सदरहू वाहनामध्ये कोणताही निर्मीती दोष नसल्यामूळे वाहन बदलवून देता येणार नाही. सदरहू वाहनामध्ये पहिल्या तीन वर्षामध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तीन वर्षानंतर पुरविण्यात आलेला पॉवर पॅक हा सवलतीच्या दरात देण्यात आला होता व या बॅटरीला 1 वर्षाची वारंटी होती. या बॅटरीमध्ये अंदाजे 1 वर्षानंतर दोष निर्माण झाला व सामनेवाले यांनी वेळोवेळी दुरूस्ती केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी दिलेली सेवा व सहकार्याबद्दल दि. 10/01/2008 ला सामनेवाले यांना प्रशस्ती पत्र पाठविले. सामनेवाले यांनी दुस-या पॉवर पॅकची वारंटी संपल्यावर सुध्दा तक्रारदार यांना सेवा दिली. वारंटी संपल्यानंतर त्या पॉवर पॅकमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्यामूळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नविन पॉवर पॅक ट्रॉयजन कंपनीचा ज्याचे मुल्य रू 67,553/-,चे कोटेशन पाठविले होते. तक्रारदार नविन पॉवर पॅकबाबत राजी नव्हते. तक्रारदारानी सामनेवाले यांना धमकीपेरीत पत्र पाठविले. वारंटीच्या कालावधीत तक्रारदार यांनी वाहनाचा भरपूर वापर केला सामनेवाले यांनी वारंटीप्रमाणे तक्रारदाराना सेवा दिली. सामनेवाले हे सेवा देण्यात कसुरवार ठरले याबाबत तक्रारदारानी कोणताही पुरावा दिलेला नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी.
4. उभयपक्षांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला तोंडीयुक्तीवादाच्या दिवशी तक्रारदार हे गैरहजर होते. सामनेवाले क्र 2 यांचे प्रतिनीधी वकील श्रीमती. रश्मी व्यंकटेश यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदार यांच्या प्लिडींग्स व लेखीयुक्तीवाद विचारात घेऊन प्रकरण जुने असल्यामूळे निकाली काढण्यात येत आहे.
5. उपरोक्त बाबींचा विचार करता खालील बाबी हया मान्य आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदारांनी सामनेवालेकडून विदयुत घट माळेवर चालणारी चारचाकी वाहन रेवा विकत घेतली. वाहनाची पोचवनी दि. 20/01/2003 ला करण्यात आली होती. वाहनाबाबत तिन वर्षाची वॉरंटी देण्यात आली होती. पहिल्या 3 वर्षात वाहनाबाबत तक्रार नव्हती. दि. 20/01/2016 ला नविन पॉवर पॅक 8 बॅटरीचा शुल्कासह बसविण्यात आला. त्यानंतर वाहनाबाबत तक्रारी उद्भवल्या. वाहन बंद स्थितीत तक्रारदारांकडे आहे.
6. सदरहू तक्रार निकाली काढण्याकरीता खालील बाबी महत्वाच्या आहेत.
- तक्रारदार हे नविन वाहन किंवा दिलेला मोबदला व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत काय? हे बघणे महत्वाचे ठरते. मान्य बाबीप्रमाणे वाहनाबाबत 3 वर्षाची वारंटी होती व या 3 वर्षामध्ये वाहनाच्या उपयोगाबाबत कसलीच तक्रार उद्दभवली नाही. यावरून असे म्हणता येईल की, वाहनामध्ये उत्पादीत किंवा निर्मीती दोष नव्हता. त्यामुळे आमच्या मते वाहनाचा मोबदला किंवा जुन्या ऐवजी नविन वाहन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदार या मागणीकरीता पात्र नाहीत.
- तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून गाडी दुरूस्त करून घेण्यास पात्र आहेत हे सुध्दा पाहणे आवश्यक ठरते. सामनेवाले यांचे रेवा वाहन हे एक विशिष्ट प्रकारचे विजेरीवर चालणारे वाहन आहे. हे सामनेवाले यांनी उत्पादन केलेले आहे त्यामुळे हे वाहन सामनेवाले चांगल्या प्रकारे दुरूस्त करू शकतात. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्यामूळे ते त्यांची सेवा मिळण्यास नक्कीच पात्र आहेत. ही दुरूस्ती वारंटी कालावधीत नसल्यामूळे तक्रारदार यांनी त्याकरीता खर्च करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे.
- तक्रारदार हे बंद असलेल्या वाहनामध्ये झालेल्या खर्चाकरीता व मानसिक त्रासाकरीता मोबदला मिळण्यास पात्र आहेत काय? हे बघणे महत्वाचे ठरते. नविन बॅटरी पॅक दि. 21/01/2006 ला बसविण्यात आले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पत्र लिहीले. दि. 24/12/2007 च्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे या बॅटरी पॉवर पॅक मध्ये अंदाजे दिड वर्षानी दोष निर्माण झाला तक्रारदार यांचे नूसार पॉकर पॅक ची वारंटी 3 वर्षाची असणे आवश्यक होती. जी वॉंरंटी पहिल्या बॅटरी करीता देण्यात आली होती. सामनेवाले यांचे नूसार ती वारंटी दुस-या बॅटरी पॉवर पॅक करीता फक्त एक वर्षाकरीता होतेी तक्रारदारानी या दाव्याच्या पृष्ठर्थ कोणताही दस्ताऐवज दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार ही बाब सिध्द करू शकले नाही. सामनेवाले यांनी नविन बॅटरी पॉवर पॅककरीता दि. 30/06/2008 ला दिलेले कोटेशनमध्ये वारंटीचा कालावधी एक वर्ष नमूद आहे. दुस-या बॅटरी पॉवर पॅककरीता दोष निर्माण झाल्यामूळे व 3 वर्षाची वारंटीबाबत दस्ताऐवज नसल्यामूळे सामनेवाले यांना निःशुल्क सेवा देण्याबाबत जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाले यांचा सेवेकरीता व साहित्याकरीता मोबदला घेण्याच्या अधिकार वॉरंटी कालावधी नंतर नाकारता येणार नाही. तसेच, वांरटीची मुदत संपल्यानंतर सामनेवाले यांना निःशुल्क सेवा देण्याकरीता बाध्य करता येणार नाही. तक्रारदारानूसार कोटेशनमध्ये नमूद केलेली रक्कम बघता ही वारंटी 3 वर्षाकरीता असणे आवश्यक आहे. तक्रारदार दि. 30/06/2008 च्या कोटेशनबाबत राजी असल्याचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर वाहन बंद अवस्थेत उभे असल्यास त्याकरीता सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच या बाबत झालेल्या खर्चाकरीता सुध्दा सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही.
7. तक्रारदार यांच्या कैफियतीनूसार बॅटरी पॉवर पॅक चे काम वारंवार होत असल्यामूळे त्या वाहनामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थीत करण्यात आली नाही. आमच्या मते सामनेवाले यांनी हे कार्य त्यांच्या ख्याती मुल्य विचारात घेऊन निःशुल्क करणे योग्य होईल.
8. उपरोक्त चर्चेनूसार व निष्कर्शानूसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
9. या मंचाचा कार्यभार व इतर प्रशासकिय बाबी विचारात घेता ही
तक्रार यापूर्वी निकाली काढता आली नाही.
आदेश
- तक्रार क्र 951/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले क्र 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या निकालाच्या दिनांकापासून एक महिन्याचे आत तक्रारदार यांना 7 दिवसांची पूर्व सूचना देऊन वाहनाचे निरीक्षण करावे. वाहनातील दोषाकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक (Estimate) निरीक्षण केल्यानंतर 10 दिवसाचे आत तक्रारदार यांना दयावे. तक्रारदार यांना ते स्विकार्य असल्यास त्यांनी रक्कम 15 दिवसात अदा करावी. रक्कम अदा केल्यानंतर सामनेवाले यांनी 1 महिन्याच्या आत वाहन दुरूस्त करून सडकेवर धावण्याच्या स्थितीत आणावे/करावे. वाहनाचे निरीक्षण झाल्यानंतर वाहनातील आसन व्यवस्थीत करावे.
- तक्रारदार यांची इतर मागणी फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
- npk/-