निकाल
(Dictated in open Court)
पारीत दिनांकः- 29/08/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांचे जाबदेणार बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट आहे. तक्रारदारांनी त्यांच्या अकाऊंटमधून रक्कम काढल्यास अथवा भरल्यास तसा मेसेज त्यांच्या मोबाईलवर येत असे. दि. 18/8/2010 रोजी तक्रारदारांच्या ई-मेलवर एक मेसेज आला व ऑनलाईन करण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांचा युजर नेम व पासवर्ड टाकला, त्यानंतर अचानकपणे त्यांच्या खात्यामधून दि. 20/08/2010 रोजी रक्कम रु. 47,000/- काढल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर तक्रारदारांना अर्ध्या तासाने कस्टमर केअरचा फोन आला व रक्कम दुसर्या खात्यात ऑंलाईन ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी तक्रारदारांना सांगितले. त्यावेळी तक्रारदारांनी स्वत: रक्कम काढले नसल्याचे त्यांना सांगितले व दि. 7/9/2010 रोजी बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर. दाखल केली. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 47,000/- 12% व्याजदराने, रक्कम रु. 1,00,000/- मानसिक त्रासाबद्दल व रक्कम रु. 15,000/- तक्रारीचा खर्च म्हणून मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांनी तक्रारदारांचे सर्व आरोप खोडून काढले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तक्रारदारांना योग्य सेवा दिलेली आहे, त्यांची कुठलीही सेवेतील त्रुटी नाही. उलट तक्रारदारांनी स्वत:च मेसेजला प्रत्युत्तर देऊन त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड कळविला, यामध्ये तक्रारदारांचाच निष्काळजीपणा आहे, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये, त्यांना त्यांच्या ई-मेल अकाऊंटवर मेसेज आल्यानंतर त्यांनी युजरनेम आणि पासवर्ड टाकला व त्यानंतर त्यांच्या खात्यामधून रक्कम रु. 47,000/- काढल्याचा मेसेज त्यांना आला. तक्रारदारांनी स्वत:च ऑनलाईन अपग्रेड करण्यासाठी त्यांचा युजरनेम आणि पासवर्ड मेसेंजरना कळविला होता. त्यामुळे अज्ञात इसमाने त्यांच्या खात्यामधून रक्कम काढून घेतली. कोणत्याही खात्याचा युजरनेम आणि पासवर्ड ही अतिशय गोपनिय माहिती असते, तक्रारदारांनी स्वत:च त्यांच्या खात्याची गोपनिय माहिती अज्ञात व्यक्तीस दिली, हे त्यांच्या तक्रारीवरुन स्पष्ट होते व हा तक्रारदारांचाच निष्काळजीपणा आहे, यामध्ये जाबदेणारांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही, असे मंचाचे मत आहे.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.