निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 18/03/2011 कालावधी 09 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 सदाशिव बाबुराव निकम. अर्जदार वय 45 वर्षे.धंदा शेती. अड.आर.बी.रासवे. रा.राव्हा.ता.सेलू.जि.परभणी. 2 सौ.उषाबाई भ्र.सदाशिवराव निकम. वय 38 वर्षे.धंदा.शेती व घरकाम. रा.राव्हा.ता.सेलू.जि.परभणी. विरुध्द 1 हिंद फॅब,तर्फे व्यवस्थापक. गैरअर्जदार. नोंदणीकृत कार्यालय 1961, अड.एस.एन.वेलणकर. पहिला मजला,रॉयल सायकलच्यावर, पंचकुवा गेटच्या आत,अहमदाबाद-380001. 2 प्रोप्रायटर,अधिकृत विक्रेता तथा कंत्राटदार, कृषीमित्र,व्हर्मीटेक सर्व्हीसेस, अंबाई हॉस्पीटल जवळ आय.यु.डी.पी.कॉलनी, पुसद नाका,वाशीम ता.जि.वाशीम. 3 तालुका कृषी अधिकारी सेलू. ता.सेलू.जि.परभणी. 4 जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) शेततळयाच्या अस्तरीकरणासाठी खरेदी केलेले प्लास्टीक फिल्म निकृष्ट दर्जाची निघाली म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदार मौजे राव्हा तालुका सेलू येथील रहिवासी आहेत.अर्जदाराच्या मालकीची राव्हा येथे सर्व्हे नं.199 मधील गट नं.3 मध्ये 34 X 34 मिटर क्षेत्रात फळबागेच्या पाणी पुरवठ्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्या तर्फे राबविल्या गेलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतात सन 2007- 2008 मध्ये शेततळे तयार केले होते. त्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 कडून पूर्व संमती घेतली होती. शेततळयामध्ये पाण्याची साठवणुक सतत राहावी म्हणून प्लास्टीक फिल्मचे अस्तरीकरण करुन घेणे बंधन कारक होते.गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या मार्गदर्शना प्रमाणे सदरची प्लास्टीक फिल्म रिइनफोर्सड् एचडीपीई जिओ मेम्बरेन आयएस 15351 :2008 या नंबरची उच्च दर्जाची असावी असे बंधन होते व त्याच फिल्मचे अस्तरीकरण करुन घेण्यासाठी मान्यता दिली होती. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की,प्लास्टीक फिल्म उत्पादकाने पुरवठा केलेल्या साहित्याची कमीत कमी 5 वर्षाची वॉरंटी देण्याची आहे तसेच उत्पादकाने पुरवठा केलेल्या फिल्मचा 3 X 3 आकाराचा नमुना विनाशुल्क खरेदी करणा-याला तपासणीसाठी देण्याचा आहे.तसेच पुरवठादाराने दिलेल्या बॅचची फिल्म खराब निघाल्यास ती विनाशुल्क बदलुन देणे अनिवार्य आहे.तसेच फिल्मची जाडी 500 मायक्रॉन असावी असेही बंधन होते. अर्जदाराने गैरअर्जदार नं 1 व 2 यांच्या कडून प्रती चौरस मिटर 60/- रु.दराने खरेदी केली होती सदरची प्लास्टीक फिल्मचे उत्पादक गैरअर्जदार क्रमांक 1 आहेत.खरेदी करते वेळी गैरअर्जदार क्रमांक 2 ने ती फिल्म 500 मायक्रॉन जाडीची असल्याची आणि गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी सांगितलेल्या नमुन्याची आहे व खराब निघाल्यास विना मुल्य बदलुन देण्याची हमी दिली होती. अर्जदाराने तारीख 26/08/2008 रोजी एकुण रु. 28,500/- ची प्लास्टीक फिल्म खरेदी केली होती.गैरअर्जदार क्रमांक 2 ने प्रती चौरस मिटर 15/- रु. मजुरी या दराने ती बसवुन दिली, पाणी साठविल्यावर ती निकृष्ट असल्यामुळे पाणी साठवुन न राहता झिरपु लागल्याचे दिसले याबाबतीत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 ला तारीख 11/12/2009 रोजी लेखी कळविले त्यानी प्रत्यक्ष घटनास्थळी येवुन पंचनामा केला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 ने दिलेल्या हमी प्रमाणे ती बदलुन दिली नाही फिल्म विना मुल्य बदलुन देणे बाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे अनेक वेळा मागणी केली. परंतु त्यांनी दाद दिली नाही अशा रितीने त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व मानसिकत्रास दिला. म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन निकृष्ट दर्जाच्या प्लास्टीक फिल्ममुळे शेततळयात पाणी साठले नाही त्यामुळे फळबागाचे नुकसान झाले, त्याची कायदेशिर दाद मिळावी व गैरअर्जदार 1 ने अर्जदारास प्लास्टीक फिल्म बदलुन देण्याचे आदेश व्हावेत व पिकाची नुकसानी, मशागताची नुकसानी, मानसिकत्रास वगैरेची एकत्रित नुकसान भरपाई म्हणून रु.4,00,000/- गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी द्यावेत. या खेरीज कोर्टाचा खर्च रु. 5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2.) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत प्लास्टीक फिल्म खरेदीची पावती गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ला तारीख 21/03/2009 दिलेल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत आणि गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी शेततळयाचा पंचनामा केल्याची छायाप्रत अशी 5 लागत पत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 2 ते 4 यांनी मंचाची नोटीस स्वीकारुली परंतु नेमले तारखेस हजर राहून तक्रार अर्जावर लेखी म्हणणे दिले नाही अथवा त्यानंतरही देण्याची व्यवस्था केली नाही म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 ते 4 विरुध्द तारीख 08/09/2010 रोजी आणि गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द तारीख 24/12/2010 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला गैरअर्जदार क्रमांक 1 उत्पादक यांनी तारीख 08/09/2010 रोजी प्रकरणात आपला लेखी जबाब ( नि.17) दाखल केला त्याचे म्हणणे असे की, फिल्म खरेदी संबंधी अर्जदाराने त्यांच्याशी कसलाही करार केलेला नव्हता. त्याने मागणी केल्या प्रमाणे फॅब्रीक्स (फिल्म ) त्याला दिलेली आहे. त्याची वॉरंटी, गॅरेंटी दिलेली नव्हती. खरेदी केलेली फिल्म राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत त्याने खरेदी केल्यासंबंधीची तक्रार अर्जातील मजकूर वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारला आहे.त्या योजनेची गैरअर्जदार क्रमांक 1 चा कसलाही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.अर्जदाराने 500 मायक्रॉन जाडीचे एचडीपीई फायब्रेक्सची मागणी करतांना ती आय.एस.आय. मार्कची असावी आणि जीईओ मेम्बरेन रिइनफार्सड् फॅब्रीक्स पाहिजे अशी मुळीच मागणी केली नव्हती. विक्री केलेली फिल्मच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार त्यांनी केलेला नाही. किंवा फसवणुक केलेली नाही. फिल्मची खरेदी गैरअर्जदार नं 2 च्या दुकानातून केलेली असली तरी गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीचा डिलर नाही. गैरअर्जदारांचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराने खरेदी केलेली फिल्म शासनाने दिलेल्या अनुदान रक्कमेतून केलेली असल्यामुळे तो गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. वस्तु खरेदी केल्यावर त्याने दोन वर्षांनंतर त्याबाबतची तक्रार केलेली असल्यामुळे मागितलेली दाद कायदेशिर मुदतीत नाही.कृषी अधिकारी मार्फत पंचनामा केला त्यावेळी गैरअर्जदाराला कोणतीही पूर्व सुचना दिलेली नाही त्याच्या समोर पंचनामा केलेला नाही. त्यामुळे ते त्यांच्यावर बंधनकारक नाही.तक्रार अर्जातील बाकीचा मजकूर त्यांनी वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारुन तक्रार अर्ज रु.25,000/- च्या कॉम्पन्सेटरी कॉस्टसह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र ( नि.18) दाखल केला आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.रासवे यांनी प्रकरणात लेखी युक्तिवाद सादर केला गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड.वेलणकर यांनी देखील प्रकरणात लेखी युक्तिवाद सादर केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराने गैरअर्जदार नंबर 1 यांनी उत्पादित केलेले व गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानातून शेततळयातील अस्तरीकरणासाठी खरेदी केलेली प्लास्टीक फॅब्रीक्स ( फिल्म) निकृष्ट दर्जाची देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 तक्रार अर्जातून केलेली नुकसान भरपाईची मागणी मिळणेसाठी अर्जदार पात्र आहे काय ? नाही. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत त्याच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 199 मध्ये फळबागेला पाणी पुरवठा करण्यासाठी सन 2007-2008 मध्ये शेततळे खोदले होते त्यासाठी शासनाच्या योजने प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांची पूर्व संमती व त्याच्या मार्गदर्शना खाली शेततळे काढले होते असे तक्रार अर्जात नमुद केले आहे.परंतु तथाकथीत योजने संबंधीचे माहितीपत्रक अथवा शासनाची शेततळे संबंधीची नेमकी काय योजना आहे या संबंधीचा कसलाही कागदोपत्री पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. अर्जदाराने तक्रार अर्जात स्वतःच असे नमुद केले आहे की, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत ठरवुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार खोदलेल्या तलावात पाण्याची साठवणुक व्हावी म्हणून लावण्यात येणा-या प्लास्टीक फिल्म(फॅब्रीक्स ) रिइनफोर्सड् एचडीपीई जिओ मेम्बरेन आयएसआय 15351 :2008 या मार्कची खरेदी करणे बंधन कारक होते. तसेच ज्या उत्पादकाकडून शेतक-याने फिल्म खरेदी केली आहे त्याचेकडून 5 वर्षाची वॉरंटी द्यावयाची आहे. शिवाय त्याने विक्री केलेल्या फिल्मचा 3 X 3 चा नमुना तपासणीसाठी खरेदीदाराला विनाशुल्क देण्याचा आहे खरेदी केलेली फॅब्रीक्स (फिल्म) खराब अथवा निकृष्ट निघाल्यास ती पुरवठा दाराने ती विनाशुल्क बदलुन देणे आवश्यक आहे.तसेच फिल्मची जाडी 500 मायक्रॉन इतकी असली पाहिजी असे संबंधीत योजने अंतर्गत ठरवुन दिलेले होते असे तक्रार अर्जात सविस्तरपणे नमुद केलेले आहे.अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यानी उत्पादित केलेली एचडीपीई (फॅब्रीक्स ) फिल्म 5 मायक्रॉन जाडीची तारीख 12/11/2008 रोजी बिल नंबर 226 प्रमाणे 1900 चौरस मिटर रु. 1,19,700/- ला खरेदी केली होती त्याची पावती पुराव्यात नि.5/1 वर दाखल केलेली आहे.सदर पावतीचे बारकाईने अवलोकन केले असता पावतीच्या तपशिलात तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 6 मध्ये नमुद केल्या प्रमाणे रिइनफोर्सड् एचडीपीई जिओ मेम्बरेन आयएस 15351 :2008 असे पावती मध्ये नमुद केलेले दिसत नाही फक्त 500 मायक्रॉन जाडी असल्याचे लिहिले आहे तसेच खरेदी केलेली फिल्म संबंधीची गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास वॉरंटी अथवा गॅरेंटी दिलेली होती त्याचाही पावतीत उल्लेख नाही संबंधीचाही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही अर्जदाराने खरेदी केलेली प्लास्टीक फिल्म गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानातून खरेदी केली होती असे तक्रार अर्जात म्हंटलेले आहे, परंतु खरेदी पावतीवर संबंधीत दुकानदाराचे नाव नाही मात्र शेततळयासाठी संबंधीत खरेदी केलेली फिल्म बसवुन दिल्यासंबंधीची मजुरीची पावती गैरअर्जदार क्रमांक 2 याची असल्याचे पुराव्यातील नि.5/2 वरील बिलावर दिसते. शेततळयामध्ये प्लास्टीकचे अस्तरीकरण तारीख 26/08/2008 रोजी केल्यावर त्यात पाणी साठवले असता ते झिरपु लागल्याचे व शेत तळे कोरडे पडत असल्याचे दिसले तसेच प्लास्टीकचे तुकडे झाल्याचे दिसून आले अशी अर्जदाराची प्रमुख तक्रार आहे.अर्जदाराने त्यासंबंधी गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 कडे याबाबत तक्रार केली होती याचाही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. जिल्हा कृषी अधिकारी परभणी ( गैरअर्जदार क्रमांक 4 ) यांना त्यासंबंधी तारीख 21/03/2009 रोजी लेखी तक्रार दिलेली होती त्या अर्जाची स्थळप्रत पुराव्यात नि.5/3 ला दाखल केलेली आहे.त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराच्या शेताची तारीख 26/11/2009 रोजी पाहणी करुन पंचनामा केला होता त्या पंचनाम्याची छायाप्रत पुराव्यात नि.5/5 ला दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये असे नमुद केले आहे की, अस्तरीकरण करण्यासाठी वापरलेले प्लास्टीक तळयातील सोडून इतर बाहेरील चारी बाजुचे हातात घेतले असता तुकडे पडत होते खरेदी केलेल्या बिलावर बॅच क्रमांक नमुद केलेला नाही.शिवाय वापरण्यात आलेले प्लास्टीक चांगल्या दर्जाचे नसल्याचे आढळून आले ” त्रोटकपणे असे नमुद केले आहे.अर्जदाराने तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 6 मध्ये नमुद केले प्रमाणे शासनाच्या योजने अंतर्गत शेत तळयासाठी वापरण्यात येणारी फिल्म कोणत्या दर्जाची असली पाहिजे आणि ती आय.एस.आय.मार्कची असली पाहिजे त्यासंबंधीचा खुलासा दिला आहे.एवढेच नव्हेतर फॅब्रीक्स ( फिल्म ) खरेदी करतांना उत्पादकाने त्या फॅब्रीक्सचा 3 X 3 चा तुकडा तपासणीसाठी खरेदीदाराला देणे बंधनकारक आहे असेही नमुद केलेले आहे.अर्जदाराने तो नमुना गैरअर्जदार क्रमांक 1 कडून घेणे तसेच तक्रार अर्जात वर्णना प्रमाणे फॅब्रीक्स ( फिल्म ) त्या मार्कची तथा दर्जाची खरेदी करणेही त्याची जबाबदारी होती. खरेदी पावतीवर त्या दर्जाचा उल्लेख नसल्यामुळे ती निश्चितपणे कमी दर्जाची अर्जदाराने खरेदी केली होती हे स्पष्ट दिसते. तसेच शासनाच्या योजने अंतर्गत ती खराब निघाल्यास विनामुल्य बदलुन देणे वगैरे काही मजकूर तक्रार अर्जातील परिच्छेद कमांक 5 व 6 मध्ये दिलेला आहे त्यासंबंधीचा कसलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 वर त्यासंबंधीची जबाबदारी कोणत्याही ठोस पुराव्या शिवाय येऊ शकत नाही मुळातच अर्जदाराने खरेदी केलेली प्लास्टीक फिल्म शासनाच्या मार्गदर्शना प्रमाणे आय.एस.आय. मार्कची व रिइनफोर्सड् एचडीपीई जिओ मेम्बरेन आयएस 15351 :2008 दर्जाची होती.हे खरेदी पावतीवर कोठेही नमुद नसल्यामुळे अर्जदाराने खरेदी केलेली प्लास्टीक त्याच दर्जाची होते ते कायदेशिररित्या शाबीत झालेले नाही. ग्राहक मंचात अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केल्यानंतर वास्तविक ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13 (1) (क) मधील तरतुदी प्रमाणे खरेदी केलेली प्लास्टीचा तुकडा मंचासमोर हजर करुन अथवा स्वतः समुचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवुन तो निकृष्ट दर्जाच्या असल्या संबंधीचा तपासणी अहवालाचा ठोस पुरावा दिल्या खेरीज खरेदी केलेली प्लास्टीक सदोष अथवा निकृष्ट होती हे ग्राहय धरता येत नाही.अर्जदाराने यासंबंधी कसलाही प्रयत्न केलेला नाही त्यामुळे खरेदी केलेली प्लास्टीक निकृष्ट दर्जाचे होते हे प्रयोगशाळेतून तपासणीतील निष्कर्षा खेरीज कायदेशिररित्या ग्राह्य धरता येणार नाही.या संदर्भात रिपोर्टेड केस 2007 (2) सी.पी.जे.पान 148 ( राष्ट्रीय आयोग ) आणि 2008 (2) सी.पी.आर. पान 193 ( राष्ट्रीय आयोग) मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, When there was no laboratory testing report then compliant was liable to be dismiss. अर्जदाराने पुराव्यात नि.5/5 दाखल केलेले तालुका कृषी अधिका-याच्या पंचनाम्यातील निष्कर्षा वरुन खरेदी केलेली प्लास्टीक निकृष्ट दर्जाची होती हे मुळीच ग्राह्य धरता येणार नाही कारण पंचनाम्याच्या वेळी उत्पादक व विक्रेता या दोघांच्याही समक्ष सदरचा पंचनामा करणे आवश्यक होते. संबंधीत गैरअर्जदार 1 व 2 यांना तशी पूर्व सुचना अथवा नोटीस दिली होती असाही पुरावा मंचापुढे आलेला नाही.त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 च्या अपरोक्ष केलेला पंचनामा त्यांच्यावर बंधनकारक राहणार नाही. वरील सर्व बाबी विचारात घेता अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले रिइनफार्सड् एचडीपीई जिओ मेम्बरेन आयएस 15351 :2008 ची होती व ती निकृष्ट दर्जाचे निघाले हे कायदेशिररित्या शाबीत करता आलेले नाही.त्यामुळे अर्जदाराने तक्रार अर्जातून मागणी केलेली कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस तो पात्र नाही. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |