(घोषित दि. 07.08.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती शिवाजी सुखदेव मुळे हे शेतकरी होते. ते दिनांक 01.10.2011 रोजी त्यांचा मित्र अशोक राठोड यांच्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.21 यु. 7466 वर त्यांचे मागे बसून येत असतांना जालना अंबड रस्त्यावर त्यांना ट्रकने धडक दिली व त्यात शिवाजी मुळे यांना गंभीर दुखापत झाली. नंतर त्यांना औरंगाबाद येथील अपेक्स हॉस्पीटल, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. त्यांचा दिनांक 03.04.2011 रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले व वरील अपघाताची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक 277/11 अन्वये करण्यात आली.
मयत शिवाजी यांच्या नावे लालवाडी ता.अंबड जिल्हा जालना येथे गट क्रमांक 204 व 207 मध्ये शेत जमीन होती. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना राबवली. त्या अंतर्गत शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा विमा सन 2011 – 2012 या वर्षासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे घेतला होता.
तक्रारदारांनी विहित नमुन्यात विमा अर्ज व आवश्यक सर्व कागदपत्र तालुका कृषी अधिकारी अंबड यांच्याकडे मुदतीत दाखल केले. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 13.09.2012 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून मूळ कागदपत्र पाठवावी अशी मागणी केली. तक्रारदारांनी मूळ कागदपत्र कृषी अधिकारी अंबड यांच्याकडे आधीच दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी केवळ दावा न देण्याच्या हेतूने असे पत्र पाठविले आहे. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्र दिल्या नंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी 3 महिन्यांच्या आत वरील प्रस्ताव निकाली काढायला हवा होता. तसे न करुन त्यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कमरता केली आहे. त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदार यांच्याकडून विमा दावा रक्कम रुपये 1,00,000/- व्याजासह व नुकसान भरपाई रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहेत. अशी तक्रारदारांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे मूळ कागदपत्र मागविणारे पत्र, क्लेम फॉर्मच्या छायांकीत प्रती, प्रथम खबर, शवविच्छेदन अहवाल, दोषारोप पत्राच्या छायांकीत प्रती, मयत शिवाजी यांच्या नावाचा 7/12 चा उतारा, फेरफार पत्र, 6 क चा उतारा, तक्रारदारांचे प्रतिज्ञापत्र, मयत शिवाजी यांचे मृत्यू प्रमाणपत्र अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपापले लेखी जवाब दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या जबाबानुसार तक्रारदारांनी मूळ कागदपत्र न देता फोटो कॉपीज् पाठविल्या आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारांकडे द्यावयाच्या मूळ कागदपत्राची मागणी केलेली आहे. तसे पत्र गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी जबाबा सोबत दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या जबाबानुसार तक्रारदारांनी त्यांना मूळ कागदपत्र पाठविली नाहीत. त्यांनी दिनांक 13.09.2012 व 02.01.2014 अशी पत्र पाठवून मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. परंतू तक्रारदारांनी त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांनी विमा प्रस्ताव निकाली काढला नाही. यात त्यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत काहीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता न करताच प्रस्तूत तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार Pre-Mature म्हणून नामूंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या जबाबानुसार त्यांनी जाक्र. 2737/11 अन्वये त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी अंबड यांच्याकडून आलेला प्रस्ताव दिनांक 30.12.2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 डेक्कन इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे पाठविला आहे.
तक्रारदारांनी तालुका कृषी अधिकारी, अंबड जिल्हा जालना श्री.शाळीग्राम रामभाऊ वाघ यांचा शपथेवर जबाब घेतला व गैरअर्जदार यांचे तर्फे त्यांचा उलटतपास घेण्यात आला.
तक्रारदार यांचे विव्दान वकील श्री. पी.एम.परिहार व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विव्दान वकील श्री.आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 युक्तीवादा दरम्यान गैरहजर आहेत. दोनही पक्षाचा युक्तीवाद व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- साक्षीदार शालीग्राम वाघ तालुका कृषी अधिकारी, अंबड यांनी त्यांच्या साक्षीत मयत शिवाजी मुळे यांच्या विम्या संदर्भात प्रस्ताव अशाबाई मुळे यांचेकडून दिनांक 30.12.2011 रोजी प्राप्त झाला. तो प्रस्ताव मूळ कागदपत्रासहीत होता. उपरोक्त प्रस्ताव त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पाठविला असे स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या या विधानाला छेद देणारा कोणताही पुरावा त्यांच्या उलट तपासात पुढे आलेला नाही. साक्षी दरम्यान त्यांनी प्रस्ताव मिळाल्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी असलेली जावक नोंदवही मंचा समोर दाखविली. या वरुन तक्रारदारांनी मूळ कागदपत्रासह विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे दिला होता व तो त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पाठविला ही गोष्ट सिध्द होते असे मंचाला वाटते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 त्यांच्या जबाबात म्हणतात की, तक्रारदारांनी मूळ कागदपत्र न देता फक्त फोटो कॉपी पाठविली आहे. या त्यांच्या म्हणण्याच्या पृठयर्थ त्यांनी शपथपत्र अथवा इतर पुरावा दिलेला नाही.
- गैरअर्जदार क्रमांक 2 देखील म्हणतात की, त्यांना दावा मूळ कागदपत्रासह प्राप्त झाला नाही. असे असले तरी साक्षीदार शालीग्राम वाघ यांच्या साक्षीवरुन त्यांनी मूळ कागदपत्रासह तक्रारदारांचा विमा प्रस्ताव ब्रोकींग कंपनीकडे पाठविला होता असे असतांना गैरअर्जदार विमा कंपनी यांनी पुन्हा दिनांक 13.09.2012 रोजी पत्र पाठवून त्यांच्याकडे मूळ कागदपत्रांची मागणी करणे न्याय्य नाही असे मंचाला वाटते.
- मंचा समोर दाखल केलेल्या कागदपत्रातील प्रथम खबर, शवविच्छेदन अहवाल, दोषारोप पत्र इत्यादी कागदपत्रावरुन शिवाजी यांचा मृत्यू दिनांक 03.10.2011 रोजी रस्ता अपघातात मार लागल्यामुळे झाला. अपघात समयी शिवाजी हे अशोक राठोड यांच्या मोटार सायकल वर मागे बसून प्रवास करत होते या गोष्टी स्पष्ट होतात. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेला 7/12 उतारा, 6 क उतारा, फेरफार उतारा यावरुन मयत शिवाजी हे शेतकरी होते व त्यांचे नावे 2011 – 2012 साली शेत जमीन होती ही गोष्ट स्पष्ट होते.
- अशा परिस्थितीत तक्रारदार त्यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- एवढी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांनी विहीत मुदतीत मूळ कागदपत्रांसह प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे दिलेला असताना गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 13.09.2012 रोजी त्यांना पत्र पाठवून पुन्हा मूळ कागदपत्रांची मागणी केली म्हणून दिनांक 13.09.2012 पासून 9 टक्के व्याज दराने व्याज मिळण्यासाठी पात्र आहेत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) दिनांक 13.09.2012 पासून तक्रारदारांना रक्कम मिळे पर्यंत 9 टक्के व्याज दराने द्यावेत.