(घोषित दि. 11.02.2015 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार हिने तिच्या तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, तक्रारदार ही मौजे निकळक पो.अकोला ता.बदनापूर जि.जालना येथील रहिवाशी असुन, ती शेती करते. अर्जदार हिचे पती नामे शेख हुसेन शेख चॉंद हे दिनांक 27.09.2013 रोजी दूध आणायला जात असतांना व रस्ता ओलांडतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली व त्यामध्ये शेख हुसेन यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनतर त्यांना अॅपेक्स हॉस्पीटल व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले, उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. डॉक्टरांनी शेख हुसेन यांचे पोस्ट मार्टम केले. त्याच प्रमाणे पोलीसांनी सदर घटनेची नोंद घेऊन अज्ञान वाहन धारकावर गुन्हा नंबर 43/2013 नुसार भा.द.वि 174 अन्वये दिनांक 07.10.2013 रोजी नोंद केली.
अर्जदार हिचे पती हे शेतकरी होते. त्यांचे नावे मौजे निकळक ता.बदनापूर जि.जालना येथे गट नंबर 158 मध्ये शेत जमीन होती. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता शेतकरी अपघात विमा योजना काढल्याने मयत शेख हुसेन हे सुध्दा सदर योजनेस पात्र होते. सदर विमा योजनेचा हप्ता हा शासनाने प्रतिपक्ष क्रमांक 2 यांना पुरविलेला आहे. अर्जदार हिने कृषी अधिकारी यांच्याकडे विहीत मुदतीमध्ये विमा प्रस्ताव दाखल केला होता व कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव योग्य त्या कार्यवाहीस्तव प्रतिपक्ष क्रमांक 1 व 2 यांचेकडे दाखल केला. प्रतिपक्ष क्रमांक 1 यांनी विमा प्रस्ताव प्रतिपक्ष क्रमांक 2 यांचेकडे दिल्यावर त्यांनी अर्जदार हिला दिनांक 08.02.2014 रोजी अपूर्ण कागदपत्र दिल्या बाबतचे पत्र अर्जदार हिला दिले व नमुना 6 ड तसेच शवविच्छेदन अहवाल याची मागणी केली. त्यानुसार अर्जदार हिने सदरचे कागदपत्र जिल्हा कृषी अधिकारी यांचे कडे दिनांक 21.03.2014 रोजी दाखल केले. परंतु प्रतिपक्ष यांनी अर्जदार हिच्या विमा दाव्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही व विमा दावा देण्यास टाळाटाळ केली असे म्हटले आहे व अर्जदार हिने तिच्या अर्जात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 9 टक्के व्याज दरासह मागणी केली आहे व अर्जदार हिने प्रकरणात प्रतिपत्र दाखल केले आहे. याबाबत प्रतिपक्ष क्रमांक 1, 2, 3 यांना नोटीसेस काढण्यात आल्या.
प्रतिपक्ष क्रमांक 1 डेक्कन इन्शुरंन्स व रिइन्शुरंन्स ब्रोकर्स यांनी प्रकरणात त्यांचे म्हणणे दाखल केले त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हिला गाव नमुना 6 ड व शवविच्छेदन अहवाल पुरविणे बाबत कळविण्यात आले होते. तो त्यांनी पुरविला नाही. त्यामुळे प्रतिपक्ष 3 विमा कंपनीने सदर दावा बंद केला. तसेच त्यांनी सदर प्रकरणात औरंगाबाद खंडपीठचा आदेश त्यांचे इतर म्हणण्याचे पृष्टयर्थ जोडला आहे. तसेच प्रतिपक्ष 3 यांनी दिलेल्या जबाबानुसार अर्जदार हिचा विमा प्रस्ताव दिनांक 08.01.2014 रोजी प्रतिपक्ष क्रमांक 3 यांचेकडे दाखल झाल्याचे सांगितले व तो प्रस्ताव त्यांनी दिनांक 08.01.2014 रोजी प्रतिपक्ष क्रमांक 2 यांना सादर केल्याचे म्हटले आहे.
तसेच प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी प्रकरणात लेखी जबाब व युक्तीवाद दाखल केला. प्रतिपक्ष क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हिने विमा दाव्या सोबत आवश्यक ती कागदपत्र दाखल केली नाहीत. तसेच जी कागदपत्रे प्रकरणाशी संबंधित नाहीत ती दाखल केली आहेत. त्याच प्रमाणे नमुना 6 ड व शवविच्छेदन अहवाल याची पुर्तता केली नाही. तसेच सदर दस्तऐवजांची पुर्तता करण्याकरिता प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 08.02.2014 व 06.03.2014 रोजी पत्रव्यवहार केला. परंतू सदरची कागदपत्र अर्जदार अथवा जिल्हा कृषी अधिकारी अथवा डेक्कन इन्शुरंन्स ब्रोकर यांनी प्रतिपक्ष क्रमांक 2 यांना पुरविले नाहीत. या कारणाने अर्जदार हिचा दावा निकाली काढता आला नाही असे म्हटले आहे.
तक्रारदाराच्या वतीने अॅड पी.एम.परिहार व प्रतिपक्ष क्रमांक 2 यांचे वतीने अॅड पल्लवी किनगावकर यांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्र व दोनही पक्षाच्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.अर्जदार या विमा दावा मिळण्यास पात्र
आहेत काय ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – अर्जदार हिचे पती नामे शेख हुसेन शेख चॉंद हे दिनांक 27.09.2013 रोजी दूध आणायला जात असतांना व रस्ता ओलांडतांना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली व त्यामध्ये शेख हुसेन यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनतर त्यांना अॅपेक्स हॉस्पीटल व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले, उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. डॉक्टरांनी शेख हुसेन यांचे पोस्ट मार्टम केले. ही बाब अर्जदार हिने दाखल केलेल्या नि.3/14, 3/18 यावरुन दिसुन येते. तसेच अर्जदार हिने नि.3/3 नुसार विमा दावा दाखल केला होता. सदर विमा दाव्या सोबत अर्जदार हिने नि.3/4 प्रमाणे 7/12 नि.3/11 प्रमाणे फेरफार उतारा दाखल केलेला आहे. त्याच प्रमाणे नि.3/14 प्रमाणे एफ. आय. आर दाखल केलेला आहे, त्यावरुन अर्जदार हिच्या पतीचा मृत्यू अपघातामध्ये झाल्याचे स्पष्ट होते. तसेच नि.3/18 चे अवलोकन केले असता अर्जदार हिच्या पतीचा मृत्यू अपघातामध्ये झाल्याचे शवविच्छेदन अहवालातील कारणांवरुन स्पष्ट होते. त्याच प्रमाणे प्रतिपक्ष 2 यांनी दाखल केलेल्या नि.11 व नि.12 या पत्रांवरुन अर्जदार हिला नमुना 6 ड व शवविच्छेदन अहवालाची मागणी केली होती हे स्पष्ट होते. वास्तविक पाहता अर्जदार हिचे पतीचे नावे 7/12 व 8 अ वर जमीनीची नोंद असतांना व संबंधित फेरफार दाखल असतांना नमुना 6 ड ची मागणी करण्याचे कोणतेही कारण नाही व शवविच्छेदन अहवाल हा यापुर्वीच अर्जदार हिने प्रकरणा सोबत दिला आहे. त्याच प्रमाणे अर्जदार हिने प्रतिपक्ष 2 यांना, त्यांनी मागणी केलेले कागदपत्र जिल्हा कृषी अधिकारी यांना नि.3/1 प्रमाणे दिनांक 02.03.2014 रोजी पुन्हा दिल्याचे दिसुन येते. त्यामुळे या कारणाने सदरचा विमा दावा अर्जदार हिला न देण्याचे कोणतेही कारण दिसुन येत नाही. सदर प्रकरणातील अर्जदार व प्रतिपक्ष यांनी केलेल्या दस्तऐवज व युक्तीवाद याचे अवलोकन केले असता अर्जदार ही विमा दावा मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून सदर प्रकरणात हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी अर्जदार हिला तिचे पती शेख हुसेन शेख चॉंद यांच्या विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश दिनांका पासून 45 दिवसाच्या आत द्यावी.
- सदर रक्कम आदेश मुदतीत न दिल्यास त्यावर 9 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.