(आदेश पारित व्दारा - श्री विजय सी प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक–07 फेब्रुवारी, 2017 )
- तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
- तक्रारीतील थोडक्यात हकीकत अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 कडुन दिनांक 13.1.2010 ला 25,000/- रुपये रक्कम भरुन विमा पॉलीसी घेतली होती व त्यानंतर दिनांक 18.1.2011 ला पॉलीसी रक्कम 25,000/- हप्ता भरण्यात आला होता असे एकुण रुपये 50,000/-तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 कडे भरले होते. तक्रारकर्त्याने पॉलीसीतील अटी व शर्ती मान्य नसल्याने विरुध्द पक्षाकडे भरलेली रक्कम परत करण्याकरिता विनंती केली होती. विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी त्यावर कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 24.2.2014 रोजी विरुध्द पक्षाला पॉलीसीची भरलेली रक्कम परत करण्याकरिता नोटीस पाठविली होती. सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला खोटे उत्तर दिले व पुर्ण रक्कम परत केली नाही म्हणुन सदर तक्रार दाखल करण्यात आली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की,विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी पॉलीस रक्कम रुपये 50,000/-व्याजासह परत करावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळण्याचे आदेश व्हावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं.3 हे नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन नि.क्रं.1 वर विरुध्द पक्ष क्रं. 3 विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी नि.क्रं.12 वर लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहेत. पुढे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी असे कथन केले आहे की, विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांना कंपनीने विरुध्द पक्ष क्रं.3 यांनी दिलेल्या निर्देशनानुसार पॉलीसी ग्राहकांसोबत व्यवहार करतात. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सदर पॉलीसीबद्दल व समर्पित मु्ल्यांचे आधाराने त्यांना धनादेश देण्यात आला ही बाब तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करतेवेळी नमुद केलेले नाही म्हणुन सदर तक्रार स्वच्छ हेतुने दाखल करण्यात आलेली नाही. सबब सदर तक्रार खोटी असल्याने खारीज करण्यात यावी अशी मागणी केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, प्रती उत्तर, विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 चे लेखी उत्तर, लेखी युक्तीवाद व उभयपक्षकारांचा तोंडी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खाली मुद्दे विचारार्थ आले.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ? होय.
- तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं.3 चा ग्राहक आहे काय? नाही
- वि.प. क्रं.1 व 2 ने तकारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी
प्रथेचा अवलंब केला आहे काय ? होय
- आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत –
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 कडे रुपये 50,000/- भरणा करुन पॉलीसी घेतली होती ही बाब विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ला मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रं.2 बाबत –
विरुध्द पक्ष क्रं.3 इंन्श्युरन्स रेग्युलेटरी अन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ही इंन्श्युरन्स कंपनी निष्कर्ष देणारी संस्था असुन तक्रारकर्त्याने हया संस्थेमार्फत कोणतीही पॉलीसी विकत घेतली नाही व त्यांना मोबदला दिला नाही व ग्राहक संबंधाने व्यवहार केला नाही म्हणुन तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्रं.3 चा ग्राहक नाही हे सिध्द होते सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
- मुद्दा क्रं.3 बाबत –
विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने आपले जवाबात असे कथन केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमा पॉलीसी समर्पित मु्ल्यांकाचे आधाराने दिनांक 11.2.2013 रोजी बँकेचे धनादेशाव्दारे समर्पित मुल्य तक्रारकर्त्याला देण्यात आलेले होते त्यासंबंधी विरुध्द पक्षाने कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याचे तक्रारीतील परिच्छेद क्रं.7 वर असे नमुद केलेले आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे नोटीसला दिलेले उत्तर खोटे व त्यांना नाकबुल आहे परंतु विरुध्दपक्षाने त्यांचे उत्तरामधे मांडलेले कथन सुध्दा नाकारलेले आहे. तसा पुरावा व खातेउतारा प्रकरणात दाखल केलेला नाही. यावरुन असे सिध्द होते की, पॉलीसीच्या सर्मर्पित किंमती मुल्यांचे आधारावर रक्कम देण्यात आलेली होती व तक्रारकर्त्याने वेळोवेळी मागणी करुनही त्यांवर कोणतीही दखल घेतलेली नाही सबब विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार प्रध्दतीचा अवलंब केला ही बाब सिध्द होते यावरुन मुद्दा क्रं. 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रं.4 बाबत
मुद्दा क्रं.1 ते 3 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
अं ती म आ दे श
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतलेली पॉलीसीची समर्पित मुल्यांचे आधाराने रक्कम तक्रारकर्त्याला दिनांक 4.3.2014 पासून 9 टक्के द.सा.द.शे दराने परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्रं. 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई दाखल रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,500/-(रुपये दोन हजार पाचशे फक्त )द्यावेत.
5. वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी
6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
7. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.