(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे खाते गैरअर्जदाराकडे आहे. त्याच खात्यात त्यांचा पगार जमा होतो. गैरअर्जदाराने तक्रारदारास क्रेडीट कार्ड दिलेले होते. परंतू तक्रारदारानी याचा उपयोग कधीच केला नाही. तरीसुध्दा गैरअर्जदारानी क्रेडीट कार्डचा उपयोग केला म्हणून त्याची थकबाकी व इन्शुरन्सचा हप्ता म्हणून 7599.73 हया रकमेची त्यांच्या खात्यातून वसुली केलेली आहे. तसेच चेक बाऊन्स चे रु 500/- चार्जेस गैरअर्जदार आकारत आहेत. हे चुकीचे आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्याबद्दलची सूचना सुध्दा ते तक्रारदारास देत नाहीत. तक्रारदाराचा पगार त्याच बँकेत जमा होतो. गैरअर्जदारानी तो विथहोल्ड ठेवला. त्यामुळे त्यांना व त्याच्या कुटूंबीयास त्रास होत असल्याचे म्हणतात. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 7599.73 ही रक्कम व्याजसहीत परत आणि रु 1485/- चेक अनादरित झाले म्हणून आकारत होते ते सुध्दा परत मागतात. तसेच मानसिक त्रासापोटी रु 10,000/- व इतर दिलासा मागतात. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणी विरोध दर्शविला आहे. तक्रारदाराने केलेले सर्व आरोप ते अमान्य करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराशी टेलिफोन वरुन बोलल्यावरुन, त्यांनी संमती दिल्यावरुनच पॉलिसी घेतली. बँकेचे व बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीचे टायअप आहे. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतली म्हणून गैरअर्जदाराने रु 7599.79 वजा केले. परंतू त्या पॉलिसीचे कागदपत्रे, गैरअर्जदारानी दाखल केले नाहीत. त्यापोटी चेक डिसऑनर झाला म्हणून लेट चार्जेस पेनॉल्टी हेही आकारण्यात आले. हे सर्व पॉलिसी घेतली असे समजूनच गैरअर्जदारानी वजा केले. याबद्दल त्यांनी तक्रारदारास कळविले नाही. त्यांची लेखी संमती घेतलेली नाही असे दिसून येते. त्यामुळेच गैरअर्जदारानी ही कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यानंतर युक्तिवादाच्या वेळेस, तक्रारदाराच्या खात्यात ही रक्कम जमा केल्याचे स्टेटमेंट मंचात दाखल केले. परंतु हया रकमेची तक्रारदारास गरज असतानाही व पॉलिसी न घेताही गैरअर्जदारानी ही रक्कम वजा केली ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे रक्कम दिलेली असल्यामुळे त्यावर फक्त 9 टक्क दराने व्याज द्यावे. कुठल्याही कागदपत्रावर सही न करता, पॉलिसी न घेताही ही रक्कम बँकेने वजा केली त्यामुळे तक्रारदारास नक्कीच मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागाला असेल म्हणून मंच रक्कम रु 3000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु 500/- द्यावा असा आदेश देतो. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम त्यांच्या खात्यातून वजा केली त्या तारखेपासून त्यावरील व्याज, नुकसान भरपाई म्हणून रु 3000/- व तक्रारीचा खर्च रु 500/- द्यावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |