जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३५३/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १६/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २४/०९/२०१४
डॉ. विनोद हुकूमचंद छाजेड
वय ५१ वर्षे, धंदा – वैद्यकीय (डॉक्टर)
रा.सि.स.नं.
वर्धमान हॉस्पीटल, गल्ली नं.६,
जुने अमळनेर स्टॅण्ड जवळ,
धुळे, ता.जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) दि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
रजि. ऑफिस प्लॉट नं. जी- ९
प्रकाशगड, प्रो.अनंत काणेकर मार्ग,
बांद्रा (पुर्व)
मुंबई ४०० ०५१.
२) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि. सुपरिटेंडींग इंजिनिअर,
वर्षा बिल्डींग, आनंदनगर,
इंदिरा गार्डन जवळ, देवपूर, धुळे
ता.जि. धुळे.
३) चिफ इंजिनिअर,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
साक्री रोड, धुळे ता.जि. धुळे
४) एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
साक्री रोड, धुळे ता.जि. धुळे
५) डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
साक्री रोड, धुळे ता.जि. धुळे
६) ज्युनिअर इंजिनिअर,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
लालबाग, गल्ली नं.२, धुळे
ता.जि. धुळे
७) श्री एम.एस. पाटील
ज्युनिअर इंजिनिअर
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन
कंपनी लि.
लालबाग, गल्ली नं.२, धुळे
ता.जि. धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एस.ए. पंडीत)
(सामनेवाले ५ व ७ तर्फे – अॅड.श्री.वाय.एल. जाधव)
(सामनेवाले १,२,३,४ व ६ तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी चुकीचे वीज देयक पाठवून, त्याबाबत वारंवार तक्रार आणि विनंती अर्ज करूनही त्याची दखल न घेवून सेवेत त्रुटी केली अशा आशयाची तक्रार तक्रारदार यांनी दाखल केली आहे.
२. आपल्या तक्रारीत तक्रारदार यांनी म्हटले आहे की, धुळे शहरातील गल्ली क्र.६ मध्ये त्यांची इमारत आहे. इमारतीच्या खालच्या मजल्यावर तक्रारदार यांचे रूग्णालय तर वरील मजल्यावर निवासस्थान आहे. त्यांनी सामनेवाले यांच्याकडून दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. रूग्णालयासाठी व्यावसायिक जोडणी असून त्याचा ग्राहक क्रमांक ००४०७८६ असा आहे. तर निवासस्थानासाठी घरगुती वापराची जोडणी होती. त्याचा ग्राहक क्रमांक ०६६४३ असा होता. मार्च १९९४ पर्यंत तक्रारदार यांना ०६६४३ या ग्राहक क्रमांकासाठी जी वीज देयके आली त्यावरून त्यांची वीजजोडणी घरगुती वापरासाठी असल्याचे दिसते. एप्रिल १९९४ पासून ०६६४३ या ग्राहक क्रमांकासाठी सामनेवाले यांनी व्यावसायिक दराची वीज देयके दिली. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.२४/११/१९९४, दि.०१/०९/१९९७, दि.०६/११/१९९८, दि.१८/०५/१९९९, दि.०९/१०/१९९९, दि.०२/०३/२०००, दि.१०/०२/२००१, दि.०८/०६/२००२, दि.१९/०४/२००३, दि.०८/०६/२००२, दि.१८/०६/२००३, दि.१४/११/२००३, दि.१५/०४/२००४, दि.२४/०२/२०१०, दि.१८/०३/२०१०, दि.२३/०५/२०१०, दि.२८/०५/२०१०, दि.२४/०६/२०१०, दि.१८/०२/२०१३ या तारखांना वेळोवेळी तक्रार अर्ज व विनंती अर्ज दिले आहेत. त्यावर सामनेवाले यांनी अनेकदा त्यांच्या शंकाचे आणि तक्रारीचे निरसन करण्याचे आश्वासन दिले. तथापि, सामनेवाले यांनी प्रत्यक्षात कृती केली नाही. यामुळे तक्रारदार यांना एकाचवेळी दोन व्यावसायिक जोडण्यांची वीज देयके येत होती. त्यापैकी काही त्यांना भरावी लागली. यामुळे तक्रारदार यांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्याची भरपाई रूपये १९,१४,४००/- एवढी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांच्या वीज ग्राहक क्रमांक ०६६४३ चे फेब्रुवारी-मार्च १९९४ चे मूळ वीज देयक, सदर देयक भरल्याची पावती, एप्रिल-मे १९९४ पासून दि.२७/०३/२००२ पर्यंतची वीज देयके, सामनेवाले यांना पाठविलेली दि.२४/११/१९९४, दि.०१/०९/१९९७, दि.०६/११/१९९८, दि.१८/०५/१९९९, दि.०९/१०/१९९९, दि.०२/०३/२०००, दि.१०/०२/२००१, दि.०८/०६/२००२, दि.१९/०४/२००३, दि.०८/०६/२००२, दि.१८/०६/२००३, दि.१४/११/२००३, दि.१५/०४/२००४, दि.२४/०२/२०१०, दि.१८/०३/२०१०, दि.२३/०५/२०१०, दि.२८/०५/२०१०, दि.२४/०६/२०१०, दि.१८/०२/२०१३ या तारखांची पत्रे, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीसला सामनेवाले यांनी दिलेले उत्तर आदी कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.५ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार हे व्यावसायिक ग्राहक आहेत. त्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. तक्रारदार यांना दि.०१/१२/२००२ पर्यंतची वीज देयके घरगुती वापराच्या दरानेच देण्यात आली होती. त्यांनी दि.१६/१२/१९९८ नंतर वीज देयकांचा भरणा न केल्यामुळे त्यांची वीज जोडणी तोडावी लागली. त्यांच्याकडे डिसेंबर २००२ पर्यंत रूपये १९,२४०/- एवढी थकबाकी आहे. तक्रारदार यांना दि.१७/०२/१९९४ पासून व्यावसायिक जोडणी देण्यात आली असून त्याचे देयक स्वतंत्रपणे देण्यात येत आहे. तक्रादार यांच्याशी कोणत्याही कर्मचा-याने गैरवर्तन केलेले नाही. घरगुती दरानुसारच त्यांना वेळोवेळी वीज देयके दिलेली आहेत. त्यामुळे त्यांना तक्रार करण्याचा अधिकार नाही. त्यांची तक्रार रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सामनेवाले क्र.७ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांचा वीज वापर व्यावसायिक पध्दतीचा आहे. त्यामुळे त्यांना व्यावसायिक दरानेच वीज आकारणी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ तपासणी केल्यानंतर आकारणी बदलण्यात आली. तक्रारदार यांनी वक्तशिरपणे भरणा केलेला नाही. तक्रारदार यांच्याकडे रूपये १९,२४०/- एवढया रकमेची थकबाकी झाली आहे. त्यामुळे त्यांचा विजपुरवठा बंद करण्यात आला होता. तक्रारदार यांची तक्रार बेकायदेशीर असून ती रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
५. सामनेवाले क्रमांक १ ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी डिट्रीब्युशन कंपनी आहे. त्यांच्यासह सामनेवाले क्र.२,३,४ व ६ यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत व त्यांनी खुलासा दाखल केला नाही. वरील सर्वांतर्फे सामनेवाले क्र.५ हेच उत्तरदायी असल्याने वरील सर्वांतर्फे सामनेवाले क्र.५ हजर होवून खुलासा दाखल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
. मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी अशा दोन प्रकारच्या वीज जोडण्या घेतल्या आहेत. त्यांचे ग्राहक क्रमांक अनुक्रमे ०६६४३ आणि ००४०७८६ असे आहेत. या ग्राहक क्रमांकांची वीज देयके तक्रारदार यांनी दाखल केली आहे. ती देयके सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांची धुळे शहरात गल्ली क्र.६ मध्ये स्वतःची इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर त्यांचे रूग्णालय असून त्यासाठी त्यांनी सामनेवाले यांच्याकडून व्यावसायिक पध्दतीचा विजपुरवठा घेतलेला आहे. इमारतीच्या वरच्या मजल्याचा वापर निवासस्थानासाठी केला जातो. त्यासाठी तक्रारदार यांनी घरगुती पध्दतीचा विजपुरवठा घेतला आहे. घरगुती वीज जोडणीचा तक्रारदार यांचा ग्राहक क्रमांक ०६६४३ असा आहे. या ग्राहक क्रमांकासाठी फेब्रुवारी-मार्च १९९४ पर्यंत सामनेवाले यांच्याकडून घरगुती वापरासाठीचेच देयक दिले जात होते. तथापि, एप्रिल १९९४ पासून या ग्राहक क्रमांकावर अचानक व्यावसायिक दराने वीज देयक दिले जावू लागले. सामनेवाले यांची ही कृती बेकायदेशीर आणि जुलमी पध्दतीने रक्कम वसूल करणारी आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी अचानक दिलेल्या व्यावसायिक वीज देयकाबाबत तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे.
तक्रारदार यांची ही तक्रार सामनेवाले क्र.५ व ७ यांनी फेटाळून लावली आहे. तक्रारदार हे व्यावसायिक ग्राहक आहेत. त्यांना व्यावसायिक दरानेच वीज देयके देण्यात आली. त्यांच्याकडे घरगुती वापराची जी वीज जोडणी होती त्यावर घरगुती दरानेच वीज देयक देण्यात येत होते. त्याचीच रूपये १९,२४०/- एवढी रक्कम तक्रारदार यांच्याकडे थकीत झाली आहे. त्यामुळे त्यांचा विजपुरवठा तोडावा लागला असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांच्या ०६६४३ या घरगुती वापराच्या ग्राहक क्रमांकाचे फेब्रुवारी-मार्च १९९४ या तारखेचे मूळ वीज देयक जोडले आहे. त्यात चालू रिडींग ४०४०, मागील रिडींग ३९३० असे दाखविण्यात आले आहे. याच बिलात वापरलेले युनीट्स ए ३०० असे दर्शविण्यात आले आहे. या बिलाची रक्कम रूपये ९९७/- एवढी तक्रारदार यांनी भरल्याची पावती सोबत जोडली आहे. एप्रिल-मे १९९४ या महिन्याचे मूळ देयकही तक्रारदार यांनी जोडले आहे. त्यात चालू रिडींग ४०४०, मागील रिडींग ४०४० आणि वापरलेले युनिट्स ए ३०० असे दर्शविण्यात आले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर १९९४, ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९४ या महिन्यांची देयके आणि त्यांची आकारणी वरीलप्रमाणेच आहे. फेब्रुवारी-मार्च १९९५ या महिन्याच्या देयकात चालू रिडींग ४१३० तर मागील रिडींग ४०४५, वापरलेले युनिट्स ९०, ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९५ या देयकात चालू रिडींग ४८५०, मागील रिडींग ४४२० आणि वापरेलेल युनिट ४३० या पध्दतीने दाखविण्यात आले आहेत. जून-जुलै १९९६ या वीज देयकात चालू रिडींग आणि वापरलेले युनिट्स दाखविण्यात आलेले नाही. मात्र मागील रिडींग ५४३० असे दाखविण्यात आले असून वीज देयक २६१/- रूपयांचे आहे. वरील देयकांचे अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना जी वीज देयके दिली आहे, त्यात चालू रिडींग आणि मागील रिडींग यांची वजावट करून दिसणारे वापरलेले युनिट्स यात मोठी तफावत दिसत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मार्च १९९८ पासून जी देयके दिली आहेत त्यात त्यांचे वीज मिटर फॉल्टी दिसत आहेत. तर डिसेंबर २००० आणि जानेवारी २००१ या देयकांमध्ये मिटर रिडींग दिसत आहे. जानेवारी २००१ नंतर तक्रारदार यांचे मिटर पुन्हा फॉल्टी दाखविण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च १९९४ या देयकात वापरलेले युनिट्स जास्तीचे दाखविण्यात आले आहे असे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी दि.२४/११/१९९४ रोजी सामनेवाले यांच्याकडे तक्रार अर्ज करून योग्य वीज देयक देण्याची विनंती केली. या पत्रात तक्रारदार यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, त्यांच्याकडे दोन स्वतंत्र वीज मिटर आहेत. त्यातील ०६६४३ या ग्राहक क्रमांकाचे मिटर घरगुती वापरासाठी असून ०४०७८६ या ग्राहक क्रमांकाचे मिटर रूग्णालयासाठी अर्थात व्यावसायिक वापरासाठी आहे. दोन्ही मिटर स्वतंत्र असून त्यांची स्वतंत्र देयक आकारणी करण्यात यावी. हे मिटर व्यवस्थीतपणे कार्य करीत नसावे अशी शंकाही तक्रारदार यांनी पत्रात उपस्थित केली होती. तक्रारदार यांचे हे पत्र कार्यकारी अभियंता यांनी संबंधित विभागाकडे पाठविले होते. मात्र त्या विभागाकडून तक्रारदार यांना कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.०१/०९/१९९७ रोजी पुन्हा एकदा सामनेवाले यांना पत्र पाठविले. त्यावर सामनेवाले यांनी कनिष्ठ अभियंताना दि.१९/०९/१९९७ रोजी तक्रारदार यांच्या निवासस्थानी जावून मिटरची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर कनिष्ठ अभियंता यांनी तपसणी करून अहवाल सादर केला. त्यात मिटर चालू आढळले की बंद, मिटर बॉडी सिल कसे आढळले, मिटर कव्हर सिल कसे आढळले, वीज वापर कशासाठी आदी प्रश्नांचा उल्लेख होता. त्यावर कनिष्ठ अभियंता यांनी कोणताही आक्षेपार्ह शेरा मारलेला नाही. यानंतरही तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण झाले नाही. त्यामुळे त्यांनी दि.०६/११/१९९८ रोजी पुन्हा सामनेवाले यांना स्मरणपत्र दिले. त्यानंतर दि.१८/०५/१९९९ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना आणखी एक पत्र दिले त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, त्या पत्रासोबत ते रूपये १५३९/- एवढया रकमेचा धनादेश जोडत असून तो फक्त क्रमांक ०४०७८६ च्या वीज देयकापोटी आहे. क्रमांक ०६६४३ बाबत वाद प्रलंबित असल्याने आणि माझ्या तक्रारीची आपण दखल घेत नसल्यामुळे या क्रमांकाचे देयक आणि त्यावरील रक्कम मी थांबवत आहे. तक्रारदार यांनी दि.०९/१०/१९९९ रोजी, दि.०२/०३/२००० रोजी सामनेवाले यांना अशाच प्रकारची पत्रे पाठवून त्यांची दोन्ही मिटर्स योग्य कार्य करीत नसल्याचे कळविले असून त्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. त्यानंतरही तक्रारदार यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता.
सामनेवाले यांनी दि.०१/०३/२००२ रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून तुमच्या अर्जांची दखल घेण्यात आली असून संबंधित बिलांबाबत योग्य ती दुरूस्ती होवून आपणांस पुढील येणा-या बिलातून त्याची मंडळाच्या नियमानुसारच वजावट करून देण्यात येईल असे कळविले होते. मात्र त्यानंतरही सामनेवाले यांच्याकडून पुढे काहीच पाउल उचलण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.०८/०६/२००२, दि.१९/०४/२००३ आणि त्यानंतरही आपला पाठपुरावा सुरूच ठेवल्याचे दिसते.
दि.१५/०४/२००८ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी करून स्थळपाहणी अहवाल तयार केला. त्यातही सामनेवाले यांनी कोणत्याही आक्षेपार्ह बाबी नमूद केलेल्या नाहीत. मिटर जागेवर असून सध्या त्याचा वापर नाही एवढेच त्यात नमूद करण्यात आले आहे. सामनेवाले यांचे दि.२२/०३/२०१० रोजीचे एक पत्र तक्रारदार यांनी जोडले आहे. तक्रारदार यांनी नविन वीज जोडणीसाठी अर्ज केला होता त्याचा या पत्रात उल्लेख आहे. तक्रारदार यांचा ०६६४३७ या ग्राहक क्रमांकाचा विजपुरवठा थकबाकीमुळे ०१/१२/२००२ रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. सदरचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांनी नविन विजपुरवठा घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर तक्रारदार यांच्याकडे कोणतीही थकबाकी नाही असा शेरा मारलेला आढळतो. या अर्जानंतर तक्रारदार यांना नविन वीज जोडणी देण्यात आल्याचे दिसते.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे माहिती कायद्याच्या अधिकारान्वये अर्ज केल्याचे दिसते. त्यावरून सामनेवाले यांनी दि.०५/०५/२०१० रोजी एक उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘तक्रारदार यांना संबंधित ग्राहक क्रमांकावरील वीज जोडणी दि.०१/०१/१९६५ रोजी घरगुती वापरासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे सदरची जोडणी घरगुती पध्दतीची आहे. याच क्रमांकावरील विजपुरवठा दि.०१/१२/२००२ रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. सदरचा विद्युत पुरवठा प्रलंबित थकबाकीमुळे बंद करण्यात आला आहे’, असेही या पत्रात नमूद आहे. सामनेवाले यांनी दि.२३/०५/२०१० रोजी तक्रारदार यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर दिले आहे. त्यात मुददा क्र.१ मध्ये म्हटले आहे की, ‘सदरहू मिटर घरगुती वापरासाठी असल्या कारणाने घरगुती दराने बिल देण्यात येत आहे.’ सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जांना दि.२८/०५/२०१०, दि.२४/०६/२०१० रोजीही उत्तरे दिली आहेत. दि.२४/०६/२०१० रोजी दिलेल्या उत्तरात सामनेवाले यांनी म्हटले आहे की, ‘घरगुती वापर असलेल्या ठिकाणी जर ग्राहकाने कंपनीच्या नियमानुसार अथवा परवानगीशिवाय व्यापारी पध्दतीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास सदर घरगुती ग्राहकास व्यापारी पध्दतीने बिल आकारण्यात येते.’ याच पत्रात सामनेवाले यांनी असेही म्हटले आहे की, ‘कंपनीच्या नियमानुसार एकाच जागेत एकाच कार्यासाठी दोन मिटर देता येत नाही.’
तक्रारदार यांनी वरील पत्रांच्या रूपाने सामनेवाले यांच्याशी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती, त्यावर सामनेवाले यांनी दिलेली माहिती, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दि.०१/०३/२००२ रोजी दिलेले उत्तर, सामनेवाले यांनी दि.१९/०९/१९९७ च्या पत्रान्वये तक्रारदार यांच्याकडे केलेली तपासणी आणि त्याबाबत सादर केलेला अहवाल, सामनेवाले यांनी दि.१५/४/२००८ रोजी तक्रारदार यांच्याकडे प्रत्यक्ष केलेली पाहणी या सर्वांचा विचार करता तक्रारदार यांच्याकडील ००६६४३ या ग्राहक क्रमांकासाठी देण्यात आलेले वीज मिटर, त्यावरील विजपुरवठा, त्याचा वापर, या क्रमांकासाठी फेब्रंवारी- मार्च १९९४ पर्यंतची देयके घरगुती पध्दतीची होती हे स्प्ष्ट होते. फेब्रुवारी-मार्च १९९४ पासून वरील ग्राहक क्रमांकाच्या वीज मिटरची देयके अचानक जास्तीची किंवा व्यावसायिक पध्दतीची येवू लागल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे अर्ज करून त्यांना त्याबाबत कळविले आणि योग्य ती वीज देयके देण्याची विनंती केली. मात्र अखेरपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही हेही दिसून येते. सामनेवाले यांनी दि.०१/०३/२००२ रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून तुमच्या अर्जांची दखल घेण्यात आली असून तुम्हाला पुढील बिलातून नियमानुसार वजावट करून देण्यात येईल असे कळविले. प्रत्यक्षात तक्रारदार यांच्या पुढील देयकात कोणतीही वजावट करून देण्यात आली नाही हेही दिसून येते. सामनेवाले यांच्याकडून अव्वाच्या- सव्वा दराने वीज देयकांची आकारणी होत असून त्याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही असे आढळून आल्यावर तक्रारदार यांनी दि.१८/०५/१९९९ रोजी सामनेवाले यांना पत्र पाठवून आपण ००६६४३ या ग्राहक क्रमांकवरील वीज देयकाची रक्कम भरणार नसल्याचे कळविले होते. त्यानंतरही तक्रारदार यांच्याकडे रूपये १९,२४०/- एवढया रकमेची थकबाकी दाखवून त्यांचा विजपुरवठा प्रथम तात्पुरता आणि नंतर कायमस्वरूपी बंद करण्यात आला. याच कारणामुळे तक्रारदार यांना नविन विजपुरवठा घ्यावा लागला. त्यासाठी त्यांना रूपये ९,०००/- एवढी रक्कम भरावी लागली. त्याची डिमांड नोट आणि पैसे भरल्याची पावती तक्रारदार यांनी दाखल केली आहे. विशेष म्हणजे नविन विजपुरवठा घेतांना सामनेवाले यांनी जो अहवाल तयार केला त्यावर सदर ग्राहकाकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला सामनेवाले यांनी दि.२४/०६/२०१० रोजी जे उत्तर दिले आहे, त्यात म्हटले आहे की, ‘घरगुती वापर असलेल्या ठिकाणी जर ग्राहकाने कंपनीच्या नियमानुसार अथवा परवानगीशिवाय व्यापारी पध्दतीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास सदर घरगुती ग्राहकास व्यापारी पध्दतीने बिल आकारण्यात येते.’ याच पत्रात पुढे असे नमूद केले आहे की, ‘कंपनीच्या नियमानुसार एकाच जागेत एकाच कार्यासाठी दोन मिटर देता येत नाही.’ सामनेवाले यांच्या या पत्राचा आणि तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दि.१९/०९/१९९७ आणि दि.१५/०४/२००८ रोजीच्या तपासणी अहवालाचा विचार केला असता तक्रारदार यांच्याकडे तपासणी दरम्यान सामनेवाले यांना कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही किंवा त्याबाबतचा कोणताही उल्लेख सामनेवाले क्र.५ व ७ यांनी आपल्या खुलाशात केला नाही. तक्रारदार हे त्यांच्या ग्राहक क्रमांक ००६६४३ या वीज मिटरचा वापर घरगुती वापरासाठी, अन्य कारणासाठी किंवा व्यापारी पध्दतीसाठी करीत होते असा कोणताही उल्लेख सामनेवाले यांच्या एकाही पत्रात किंवा अहवालात आढळत नाही. एवढेच नव्हे तर तक्रारदार हे त्यांच्या ००६६४३ या वीज मिटरचा वापर अन्य कारणासाठी करीत होते याचा कोणताही पुरावा सामनेवाले यांनी तक्रारीच्या चौकशी दरम्यान आणलेला नाही. कंपनीच्या नियमानुसार एकाच जागेत एकच कार्यासाठी दोन मिटर देता येत नाही असे सामनेवाले यांनी वरील पत्रात नमूद केले आहे. तथापि, तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन आणि पत्रव्यवहाराच्या रूपाने त्यांनी मंचासमोर आणलेल्या पुराव्यावरून हेच स्पष्ट होते की, तक्रारदार यांच्याकडील दोन्ही मिटरवर म्हणजे मिटर क्रमांक ००६६४३ आणि मिटर क्रमांक ०४०७८६ या दोन्हींवर सामनेवाले यांच्याकडून व्यावसायिक पध्दतीची वीज आकारणी केली जात होती. घरगुती वापरासाठीच्या मिटरवर व्यावसायिक दराने आकारणी करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे हेच तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी त्यासाठी सामनेवाले यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केले आणि त्यांच्या देयकात दुरूस्ती करून देण्यात यावी अशी मागणी केली. तथापि, अनेकदा पाठपुरावा करूनही सामनेवाले यांनी समाधानकारक उत्तरही दिले नाही. त्यामुळेच तक्रारदार यांना मनस्ताप सहन करावा लागला. म्हणूनच तक्रारदार यांना या मंचात दाद मागावी लागली. सामनेवाले यांची ही कृती निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे आम्हाला वाटते. म्हणनूच मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘क’– वरील दीर्घ विवेचनावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवत त्रुटी केली आहे हे स्पष्ट होते. एका छोट्याशा मुद्यासाठी तक्रारदार यांना दीर्घ लढा द्यावा लागला. त्यामुळे निश्चितच त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आणि आपला वेळही घालवावा लागला. त्याबददल त्यांना भरपाई मिळाली पाहीजे आणि ती देण्याची सामनेवाले यांची जबाबदारी येते असे आमचे मत बनले आहे. तक्रारदार यांना जो मनस्ताप झाला आणि जो संघर्ष करावा लागला त्याची पैशाने भरपाई होवू शकत नाही. तथापि, सामनेवाले यांना त्यांच्या सेवेतील त्रुटीची आणि जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी आम्ही तक्रारदार यांना अत्यल्प भरपाई देण्याचा निर्णय घेत आहोत. म्हणूनच आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्ररदार यांचा तक्रार अर्ज अंशता मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.१ ते ७ यांनी या निकालापासून ३० दिवसांच्या आत तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रूपये २०००/- (अक्षरी रूपये दोन हजार) व तक्रारीचा खर्च रूपये १०००/- (अक्षरी रूपये एक हजार) रोखीने अदा करावा.
३. उपरोक्त आदेश २ ची पुर्तता मुदतीत न केल्यास त्यानंतर संपूर्ण रक्कम देवून होईपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.