निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तो गैरअर्जदार क्रमांक 1 द्वारे चालविला जाणारा मल्टी कमोडिटीज एक्सचेंज चा व्यवसाय करतो. दिनांक 4/12/2008 रोजी क्रूडचे खरेदी दर रु 2305/- होते व त्याच्या खात्यावर रु 63457.58 बाकी होते. दिनांक 29/12/2008 रोजी सकाळी क्रूडचे दर रु 9448.55 होते त्यामुळे त्याने त्याची स्थिती सुरक्षित (hedge) करण्याचे ठरविले व त्यानुसार त्याने गैरअर्जदारांना तशी सुचना दिली. त्यावेळी गैरअर्जदारांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याची स्थिती सुरक्षित केल्याचे सांगितले. त्याची स्थिती सुरक्षित केल्यामुळे त्याला नुकसान होण्याचा प्रश्न नव्हता. त्याच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक होती तसेच तो रु 20,000/- चा धनादेश देखील गैरअर्जदारांना देण्यासाठी तयार होता. परंतु त्यावेळी गैरअर्जदारांच्या चुकीच्या नियोजानामुळे सर्व्हिलंस (surveillance) मध्ये कोणीही नव्हते त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. त्याचे खाते गैरअर्जदारांनी बंद (square off) केले. त्यामुळे त्याचे रु 1,18,000/- चे नुकसान झाले. म्हणून तक्ररदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदारांकडून रु 1,18,000/- नुकसान भरपाई व इतर नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदारांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार मोठया प्रमाणावर नफा कमविण्यासाठी शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे तो “ग्राहक” होत नाही. तक्रारदाराने दिनांक 4/12/2008 रोजी क्रूडचे दर चुकीचे दर्शविले असून तक्रारदार म्हणतो त्याप्रमाणे तो फेब्रूवारीचा करार नव्हता तर डिसेंबरचा करार होता. तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे दिनांक 29/12/2008 रोजी त्याची स्थिती मोडून त्यादिवशी व्यवहार केले. त्याने केलेल्या व्यवहारामुळे तक्रारदाराची एक्सचेंजच्या नियमानुसार आवश्यक स्थिती ठेवण्यासाठी तक्रारदाराच्या खात्यावर रु 27,705/- मार्जिन असणे आवश्यक होते. तक्रारदाराच्या खात्यावरील शिल्लक दुस-या दिवशी त्याची स्थिती कायम ठेवण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे त्याचे खाते बंद करावे लागले. त्याचे खाते बंद करण्यापूर्वी दोन वेळा टर्मीनल मेसेज देण्यात आला होता. तक्रारदाराने स्वत: सांगितले आहे की, तो रु 20,000/- चा धनादेश घेऊन गैरअर्जदाराच्या कार्यालयात हजर होता. यावरुन त्याच्या खात्यावर पुरेशी मार्जीन नसल्याचे स्पष्ट दिसते. तक्रारदाराच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील नाही. कलम 2(1)(ड) प्रमाणे “ग्राहक” आहे काय? 2. गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय? मुद्दा उरत नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 व 2 :- तक्रारदाराने स्वत: आणि गैरअर्जदारांच्या वतीने अड परदेशी यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने स्वत: तक्रारीच्या सुरुवातीलाच हे स्पष्टपणे नमुद केले आहे की, तो गैरअर्जदारांमार्फत मल्टी कमोडिटीज एक्सचेंजचा व्यवसाय करतो. तक्रारदाराच्या सदर निवेदनावरुन हे स्पष्ट दिसुन येते की, तो गैरअर्जदारांची सेवा व्यापारी कारणासाठीच घेतो. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2(1)(ड) मधील ग्राहकाच्या व्याख्येत व्यापारी कारणासाठी वस्तु खरेदी करणारा किंवा सेवा घेणारा बसत नाही. तक्रारदाराने निश्चितपणे गैरअर्जदाराची सेवा व्यापारी कारणासाठीच घेतलेली आहे. त्यामुळे तक्रारदार “ग्राहकाच्या” व्याख्येत बसत नाही म्हणून त्याची तक्रार या मंचात चालू शकत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असण्याचा मुद्दा उरत नाही. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी सोसावा. 3. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |