निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी कि, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून जीवन सुरक्षा पॉलीसी (अंतिम बोनस व विमा संरक्षण सहित) घेतली होती. तिचा वार्षिक हप्ता रु.10,000/- होता. पॉलीसीचा कालावधी 9 वर्षाचा होता. दि.28.03.1999 पासून पॉलीसी सुरु होणार होती व दि.28.03.2007 रोजी विम्याचा शेवटचा हप्ता भरावयाचा होता. त्यानंतर, दि.28.04.2007 पासून त्या पॉलीसीखाली तक्रारदाराला दरमहा पेन्शन मिळणार होते. पॉलीसी क्र.920921045 असा होता. तक्रारदाराने दि.28.03.2007 पर्यंत नियमित हप्ते भरले. या वस्तुस्थितीबद्दल उभय पक्षकारात दुमत नाही. तक्रारदाराने तक्रारीच्या निशाणी-ए ला पॉलीसीचे सर्टिफिकेट दाखल केले आहे. 2 दोन्हीं पक्षकारात वाद फक्त पेन्शनच्या रक्कमेबाबत आहे. तक्रारदाराचे म्हणणे कि, त्याला दरमहा रु.3,343/- पेन्शन मिळावयाचे होते. तक्रारदाराने त्यासाठी पॉलीसी सर्टिफिकेटचा आधार घेतला आहे. पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये पेन्शनची रक्कम रु.3,343/- टंकलिखित केलेली आहे. 3 सामनेवाले यांचे म्हणणे कि, त्या पॉलीसीखाली तक्रारदाराला दरमहा रु.1,365/- फक्त पेन्शन मिळावयाचे होते. सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियतीत असे म्हटले आहे कि, तक्रारदाराने जीवन सुरक्षा प्लॅन 122 खाली 14 वर्षासाठी विमा प्रस्तावपत्र भरले होते. परंतु पेन्शनची गणती करताना 14 वर्षाऐवजी 9 वर्षासाठी गणती केली गेली. तसेच वार्षिक हप्ता रु.10,378/- ऐवजी रु.10,000/- ठरविला. त्याप्रमाणे पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये 9 वर्षाचा कालावधी व वार्षिक हप्ता रु.10,000/- चा टंकलिखित करण्यात आला. मात्र पेन्शनचा हिशेब करताना 14 वर्षाचा कालावधी व हप्त्याची रक्कम रु.10,378/- समजून गणती करण्यात आली व त्यानुसार पेन्शन रु.3,343/- येऊन तसेच पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये टंकलिखित करण्यात आले. याप्रमाणे पॉलीसीचा कालावधी टंकलिखित करण्यात चूक झाल्याने 9 वर्षानेच पॉलीसी परिपक्व झाली. म्हणून तक्रारदाराला पत्र पाठवून त्यांनी त्याचा विकल्प विचारला. त्याला असेही कळविण्यात आले कि, त्याने विकल्प न दिल्यास, विकल्प-डी खाली त्याला मासिक पेन्शन रु.1,514/- दिले जाईल. तक्रारदार टंकलेखनातील चुकीचा फायदा घेऊ शकत नाही. त्याला विकल्प-एफ खाली मासिक पेन्शन रु.1,365/- ऐवजी रु.3,343/- देता येत नाही. 4 सामनेवाला यांचे असेही म्हणणे आहे कि, विमा प्रस्तावपत्र भरताना त्यात नमूद केल्याप्रमाणे 14 वर्षासाठी तक्रादाराने पहिला हप्ता रु.10,378/- चा दिला होता. परंतु नंतर 14 वर्षाऐवजी 9 वर्ष एवढाच कालावधी टंकलिखित झाल्यामुळे तक्रारदाराकडून पहिला हप्ता फक्त रु.10,000/- चा घेतला होता व रु.378/- त्याला परत केले होते. त्यानंतर, तक्रारदाराने वार्षिक हप्ता रु.10,000/- चा याप्रमाणे एकूण 9 वर्षासाठी हप्ते भरले. त्याने जर वार्षिक हप्ता रु.10,378/- प्रमाणे 14 वर्षे हप्ते भरले असते तर त्याला मासिक पेन्शन रु.1,365/- ऐवजी रु.3,343/- मिळाले असते. मात्र तक्रारदाराने वार्षिक रु.10,000/- प्रमाणे 9 वर्षोसाठी हप्ते भरलेले असल्याने त्याला रु.3,343/- प्रमाणे मासिक पेन्शन देता येत नाही, त्यांची सेवेत काहीही न्युनता नाही. म्हणून सदरची तक्रार रद्द करण्यात यावी. 5 आम्ही, तक्रारदारातर्फे श्रीमती वारुंजीकर, वकील व सामनेवाले तर्फे त्यांचे प्रतिनिधी श्री. मोरे यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. तक्रारदाराने सन-1991 मध्ये जीवन सुरक्षा इंडोमेन्ट प्रकारची पॉलीसी घेतली होती. त्या पॉलीसीच्या विमा प्रस्तावपत्राची प्रत सामनेवाले यांनी दाखल केली आहे, त्या प्रस्तावाची पॉलीसी क्र.920234402 असा आहे. त्या प्रस्तावपत्रवरुन असे दिसते कि, ती पॉलीसी प्लॅन-122 खाली 14 वर्षासाठी होती. त्या पॉलीसीचा वार्षिक हप्ता रु.10,378/- होता. यावरुन, सामनेवाले यांचे कथन कि, 14 वर्षाचा पॉलीसी कालावधी असेल तर वार्षिक हप्ता रु.10,378/- होतो, यात तथ्य वाटते. 6 तक्रारदाराने दाखल केलेल्या पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये सदरची पॉलीसी प्लॅन-122 खाली आहे असे नमूद आहे. परंतु वार्षिक हप्ता फक्त रु.10,000/- चा लिहीलेला आहे. पॉलीसी कालावधी 9 वर्षे टंकलिखित झालेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दि.02.09.2008 च्या पाठविलेल्या पत्राबरोबर त्याला उपलब्ध असलेल्या विल्कपांची व त्या विकल्पाखाली त्याला किती पेन्शन मिळेल याची माहिती पाठविली होती. त्याप्रमाणे, विल्कप-डी खाली पेन्शन दरमहा रु.1,514/- व विल्कप-एफ खाली पेन्शन दरमहा रु.1,365/- मिळते असे नमूद केले आहे. तसेच सामनेवाले यांनी पेन्शनची गणना कशी करतात याबद्दलची कार्यपध्दती त्यांची कैफियत व लेखी युक्तीवादात दिलेले आहे. सामनेवाले यांनी 9 वर्षाच्या कालावधीच्या व मासिक हप्ता रु.10,000/- चा असेल तर विल्कप-डी च्या पेन्शनचा हिशोब दिला आहे, त्याप्रमाणे मासिक पेन्शन रु.1,514/- येते व विल्कप-एफ खाली रु.1,365/- येते. जर पॉलीसी 14 वर्षासाठी असेल तर वार्षिक हप्ता रु.10,378/- येतो आणि त्यावेळी विल्कप-डी खाली मासिक पेन्शन रु.3,343/- व विल्कप-एफ खाली मासिक पेन्शन रु.2,939/- येते. 7 तक्रारदाराने, वार्षिक हप्ता रु.10,000/- याप्रमाणे फक्त 9 वर्षासाठी पैसे भरले होते, त्यामुळे सामनेवाले यांनी सविस्तर दिलेल्या पेन्शन गणतीनुसार विल्कप-डी खाली त्याला मासिक पेन्शन रु.1,514/- व विल्कप-एफ खाली मासिक पेन्शन रु.1,365/- मिळू शकते. परंतु पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये चुकून मासिक पेन्शनची रक्कम रु.1,365/- ऐवजी रु.3,343/- टंकलिखित झालेली दिसून येते. जर तक्रारदाराने वार्षिक हप्ता रु.10,378/- प्रमाणे 14 वर्षे हप्ते भरले असते तर त्याला दरमहा पेन्शन रु.3,343/- मिळाले असते. पॉलीसी सर्टिफिकेटमध्ये झालेल्या टंकलेखानाच्या चुकीचा फायदा तक्रारदाराला देता येत नाही. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, मंचाचे असे मत आहे कि, सामनेवाले यांचे सेवेत न्युनता आहे हे तक्रारदाराने सिध्द केलेले आहे. तक्रार रद्द होणेस पात्र आहे, म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.50/2011(347/2009)रद्दबातल करण्यात येत आहे. (2) उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |