नि.३६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २४५/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १८/०५/२०१०
तक्रार दाखल तारीख : १९/०५/२०१०
निकाल तारीख : ३०/०९/२०११
--------------------------------------------------------------
श्री बाळासो शामराव पाटील उर्फ
रणधीर रंगराव पाटील,
वय ३५ वर्षे, धंदा – शेती,
रा.येडेनिपाणी, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. तालुका निरिक्षक,
भूमिअभिलेख वाळवा – इस्लामपूर,
ता.वाळवा जि.सांगली
२. सर्व्हेअर, ए.जी.माने, धंदा-नोकरी
रा.आरग, ता.मिरज जि. सांगली
सदरची नोटीस ता.नि.भु.अ. वाळवा-इस्लामपूर
या कार्यालयात बजावणेत यावी. .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एफ.आर.मगदूम
जाबदार क्र.१ व २ : स्वत:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या जमीन मोजणीबाबत मिळालेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा येडेनिपाणी येथील रहिवासी असून त्याने त्याच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी जाबदार कार्यालयात दि.२८/१/२०१० रोजी मोजणी अर्ज केला होता. सदर अर्जात हद्द कायम मोजणी करुन हद्दी दर्शविणेबाबत विनंती केली होती व त्यासाठी रक्कम रु.३,०००/- जमा केलेले होते. सदर अर्जाप्रमाणे जाबदार क्र.२ यांनी दि.२६/३/२०१० रोजी मोजणी केली. परंतु जाबदार क्र.२ यांनी गटाच्या हद्दी दाखविल्या नाहीत. त्यानंतर जाबदार क्र.२ यांनी दि.६/४/२०१० रोजी मोजणीप्रमाणे जागेवर हद्दी दर्शविण्याकरिता तारीख नेमल्याचे कळविले. परंतु नेमले तारखेस जाबदार यांनी हद्दी न दाखविता निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१३/४/२०१० रोजी नोटीस पाठवून हद्दीच्या खूणा कायम करुन देणेबाबत कळविले होते. तथापि जाबदार यांनी नोटीसप्रमाणे पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज मोजणीप्रमाणे त्याच्या मालकीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी व रेकॉर्डप्रमाणे हद्दीच्या खूणा कायम करुन दर्शविणेबाबत जाबदार यांना आदेश द्यावा या मागणीसाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने १२ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचा मोजणीअर्ज प्राप्त झालेनंतर सदर मोजणी करण्याचे काम जाबदार क्र.२ यांना देण्यात आले होते. त्याप्रमाणे जाबदार क्र.२ यांनी नि.२६/३/२०१० रोजी दोन्ही बाजुंना आगाऊ नोटीस देवून मोजणी काम केले. त्यानंतर दि.६/४/२०१० रोजी उपलब्ध असणा-या अभिलेखाच्या फाळणी नकाशाच्या आधारे हद्दीच्या खूणा दाखविल्या. परंतु त्या अर्जदार यांनी अमान्य केल्या व जबाबावर सही करण्यास नकार दिला. हद्द निश्चित करणे हे भूमिअभिलेख विभागाचे काम असून क्षेत्र दर्शविणे हे भूमिअभिलेख विभागाच्या अखत्यारीतील बाब नाही असे जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१३ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांनी दिलेल्या म्हणण्याप्रमाणेच म्हणणे सादर केले आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१३ च्या यादीने ४ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.३२ वर शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.३४ वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.३५ वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार व जाबदार यांनी तोंडी युक्तिवाद केला नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये मोजणीप्रमाणे निश्चित क्षेत्र व रेकॉर्ड प्रमाणे हद्दीच्या खूणा कायम करुन मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी केलेली मागणी विचारात घेता तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? व सदरचा वाद हा ग्राहक वाद होतो का ? हा मुख्य मुद्दा मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतो. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे मोजणी करण्यासाठी रक्कम रु.३,०००/- भरले आहेत. मोजणी करणे ही बाब सेवा या सदरात येते का ? हे या ठिकाणी ठरविणे गरजेचे आहे. मोजणी करणे व त्यासाठी फी घेणे ही बाब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार जाबदार यांचेवर दिलेले कायदेशीर दायित्व आहे. सदर कायदेशीर दायित्व पार पाडत असताना त्यामध्ये एखाद्या पक्षकाराचे समाधान झाले नाही तर त्याविरुध्द दाद मागणेची तरतूद जमीन महसुल अधिनियमात केलेली आहे. सन्मा.राज्य आयोग यांनी या मंचाने प्रकरण क्र.७०८/२००७ मध्ये दि.२५/१/२००८ रोजी दिलेला निर्णय रद्दबातल करताना अपिल क्र.३७१/०८ तालुका इन्स्पेक्टर लॅण्ड रेकॉर्ड, तासगाव विरुध्द सुकुमार चौगुले मध्ये दि.१६/१/२००९ रोजी दिलेला निर्णय व त्यामधील निष्कर्ष याठिकाणी महत्वपूर्ण ठरतो. सन्मा.राज्य आयोग यांनी सदर निवाडयामध्ये पुढील निष्कर्ष काढला आहे.
Activities of office of land records who collects fees for measuring the lands, as per rules and Government Resolutions in force cannot be termed as service u/s 2(1)(O) of Consumer Protection Act.
सन्मा. राज्य आयोग यांनी काढलेला निष्कर्ष विचारात घेता जाबदार यांचेकडे तक्रारदार यांनी मोजणीसाठी पैसे भरणे व जाबदार यांनी जमीनीची मोजणी करणे ही बाब सेवा या सदरात येत नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत व सदरचा वाद हा ग्राहकवाद होत नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. ३०/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११