नि. 35
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. 2349/2009
------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 30/12/2009
तक्रार दाखल तारीख : 05/01/2010
निकाल तारीख : 14/02/2012
-----------------------------------------------
श्री प्रणंद दिनेश शहा
वय 21 वर्षे, धंदा– शिक्षण
तर्फे वटमुखत्यार श्रीमती तृप्ती दिनेश शहा
वय 43 वर्षे, धंदा – घरकाम
रा.796, गणपतीपेठ, सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
1. दि कराड अर्बन को-ऑप बँक लि.
शाखा कर्नाळ चौकी, सांगली
2. श्रीमती शशिकला युगलाल शहा
वय सज्ञान, धंदा – घरकाम
रा.796, गणपतीपेठ, सांगली.
3. श्री राजेश युगलाल शहा,
वय सज्ञान, धंदा – व्यापार
द्वारा सांगली बुक डेपो, सराफ कट्टा,
सांगली. ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड ए.व्ही.गद्रे, अॅड.पी.बी.रजपूत
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड एस.एस.मेहता
जाबदारक्र.2 व 3 तर्फे : अॅड एस.एस.दोशी, अॅड.एस.एस.शहा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज ठेवीवरील रक्कम मिळणेसाठी दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे जाबदार क्र.2 यांचे नातू असून जाबदार क्र.3 यांचे पुतणे आहेत. जाबदार क्र.3 ही सहकारी बँक असून पार्श्वनाथ को-ऑप.बँक ही जाबदार क्र.1 बँकेमध्ये विलीन झाली आहे. जाबदार क्र.2 शशिकला व त्यांचे पती युगलाल शहा यांनी सन 1996 मध्ये लक्ष कलश ठेव योजनेमध्ये either or survivor अशा प्रकारच्या संयुक्त खात्यावर पार्श्वनाथ को-ऑप.बँकेमध्ये ठेव ठेवली होती. सदरची पार्श्वनाथ को-ऑप.बँक ही जाबदार क्र.1 या बँकेत विलीन झाल्यामुळे त्या सर्व बँकेची येणी-देणी जाबदार क्र.1 बँकेने अंगिकृत केली आहेत. संयुक्त ठेवीदारपैकी युगलाल उत्तमचंद शहा हे दि.15/3/2001 रोजी मयत झाले. पावतीची मुदत संपली तेव्हा अर्जदार व जाबदार क्र.2 हे हयात होते. त्यामुळे सदरची रक्कम अर्जदार अथवा जाबदार क्र.2 अथवा दोघांस देणे जाबदार बँकेवर बंधनकारक होते. त्याप्रमाणे अर्जदार याने जाबदार यांचेकडे ठेवीची रक्कम स्वतला व जाबदार क्र.2 यांना देणेची मागणी केली तेव्हा जाबदार क्र.1 याने त्यास टाळाटाळ केली व दि.2/6/2007 च्या पत्राने न्यायालयाकडून आदेश आणण्यास कळविले. सदरची ठेव ही either or survivor या नावची असल्याने ठेवीदारांपैकी कोणाही एकास अथवा मागणीप्रमाणे राहिलेल्या सर्वांस रक्कम परत करणे बँकेवर बँकींग रेग्युलेशन अॅक्टमधील तरतुदीनुसार बंधनकारक आहे. असे असताना अर्जदार यांच्या वडिलांशी झालेल्या वितुष्टावरुन जाबदार क्र.3 यांनी पावतीवर अर्जदारास या नावास कंस करुन मयत वारसदार म्हणून स्वतचे नाव लिहून घेतले. जाबदार बँकेने जाबदार क्र.3 यांचेशी संगनमत करुन तक्रारदार यांची ठेव देण्याचे नाकारले त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज ठेवीची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.3 ला शपथपञ व नि.5 च्या यादीने 6 कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.7 वर झालेला विलंब माफ होणेसाठी उशिर माफीचा अर्ज दाखल केला आहे व त्याचे पुष्ठयर्थ नि.8 वर शपथपत्र दाखल केले आहे.
3. जाबदार क्र.1 यांनी याकामी नि.12 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात तक्रारदारांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदयामध्ये उशिर माफीचा अर्ज देण्याची तरतूद नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतीत नसल्याने फेटाळणेत यावा असे नमूद केले आहे. जाबदार क्र.2 श्रीमती शशिकला युगलाल शहा यांनी जाबदार बँकेकडे दि.12/9/2003 रोजी अर्ज देवून ठेवपावती वरील प्रणंद शहा यांचे नाव कमी करुन राजेश युगलाल शहा यांचे नाव लावणेत यावे असा अर्ज दिला होता व त्याचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले होते. त्यानुसार पूर्वाश्रमीच्या पार्श्वनाथ बँकेने राजेश युगलाल शहा यांचे नावची नोंद जाबदार क्र.2 यांचेबरोबर केली होती. त्यामुळे सदर पावतीची रक्कम मागण्याचा अर्जदार यांना कोणताही हक्क प्राप्त होत नाही. राजेश शहा यांचे कर्जखाते असलेने सदर ठेवपावतीवर लिन मार्क करण्यात आले आहे व बँकेकडील कर्ज थकीत असल्याने ठेवपावतीवर जाबदार क्र.1 बँकेचा अग्रहक्क होतो त्याही कारणे तक्रारदार यांना सदरचे ठेवपावतीच्या रकमेची मागणी करता येणार नाही. तक्रारदार यांनी जाबदार बँकेस नाहक त्रासात पाडण्याच्या हेतूने प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. जाबदार बँकेने तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी म्हणण्याचे पुष्ठयर्थ नि.13 ला शपथपञ व नि.15 चे यादीने 10 कागद दाखल केले आहेत.
4. जाबदार क्र.1 यांनी नि.18 वर उशिर माफीच्या अर्जास म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी उशिर माफीस कोणतेही सबळ व योग्य कारण दिले नसल्याने प्रस्तुतचा उशिर माफीचा अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे व त्याचे पुष्ठयर्थ नि.19 ला शपथपत्र दाखल केले आहे.
5. जाबदार क्र.2 व 3 यांनी नि.20 वर उशिर माफीच्या अर्जास म्हणणे दाखल केले आहे. ठेवीची मुदत दि.14/3/2006 रोजी संपली होती. तेव्हापासून अगर बँकेने दि.2/6/2007 रोजी रक्कम देण्यास नकार दिल्याच्या तारखेपासून कायदा मुदतीत प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केलेला नाही. उशिर माफीच्या अर्जास कोणतेही योग्य व सबळ कारण दिलेले नाही त्यामुळे उशिर माफीचा अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
6. जाबदार क्र.2 व 3 यांनी नि.27 ला मूळ अर्जास म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वादातील ठेवपावती ही जाबदार क्र.2 व त्यांचे पती युगलाल शहा यांचे नावे होती. जाबदार क्र.2 यांचे पती मयत झाले असून त्यांना प्रशांत युगलाल शहा असे अन्य वारस आहेत. सदर प्रशांत युगलाल शहा यांना याकामी सामील पक्षकार केले नसल्याने प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. वादातील ठेवपावतीवर अर्जदार प्रणंद यांचे नाव ते युगलाल उत्तमचंद यांचे वारस नसताना कसे लागले याचा बोध होत नाही. अर्जदार व जाबदार क्र.1 यांचे दरम्यान ठेव ठेवणार व ठेव ठेवून घेणार असे नातेसंबंध निर्माण होत नसल्याने अर्जदार हे जाबदार क्र.1 यांचे ग्राहक होत नाहीत. जाबदार क्र.1 बँकेने ठेवीदारांच्या वारसांमध्ये वाद उपस्थित झालेमुळे वारसा दाखला आणण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी वारसा दाखला आणलेला नाही. जाबदार क्र.2 हे हयात असताना अर्जदार यांनी बेकायदेशीरपणे ठेवपावतीवर स्वतचे नाव लावून घेतल्याचा गैरफायदा घेवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही. जाबदार क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
तक्रारदार यांनी नि.22 ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे व त्याचे पुष्ठयर्थ नि.23 ला शपथपत्र दाखल केले आहे.
7. जाबदार क्र.1 यांनी नि.24 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.25 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ ए.व्ही.गद्रे यांनी विधिज्ञ कु.पी.बी.रजपूत यांना युक्तिवाद करणेसाठी दिलेले अधिकारपत्र नि.34 ला दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांचे संपूर्ण म्हणणे दाखल असल्याने केवळ उशिर माफीच्या अर्जावर युक्तिवाद ऐकण्यापेक्षा संपूर्ण तक्रारअर्जाबाबत युक्तिवाद ऐकण्याचे ठरविण्यात आले व त्याप्रमाणे दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
8. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद व तक्रारदार व जाबदार यांचे विधिज्ञांचा ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन पुढील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
1. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? - होय. जाबदार क्र.1 यांचे.
2. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा दिली आहे का ? - नाही.
3. तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत का ? - नाही.
4. तक्रारदार यांचा उशिर माफीचा अर्ज मंजूर होणेस पात्र
आहे का ? - नाही.
5. काय आदेश ? - अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
9. मुद्दा क्र.1
तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय ? हे ठरवित असताना तक्रारदार यांचे तक्रार अर्जावरुन तक्रारदार व जाबदार क्र.2 व 3 हे एका कुटुंबातील सदस्य आहेत ही बाब स्पष्ट होते. त्यांच्यापैकी जाबदार क्र.2 व युगलाल शहा यांनी ठेवलेल्या ठेवपावतीबाबत सदरचा वाद उपस्थित झाला आहे. तक्रारदार व जाबदार क्र.2 व 3 हे एकाच घरातील असलेमुळे तक्रारदार हे जाबदार क्र.2 व 3 यांचे ग्राहक होणार नाहीत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार हे जाबदार क्र.1 यांचे ग्राहक होतात का हे ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे पूर्वहक्कदार यांनी पूर्वाश्रमीच्या पार्श्वनाथ बँकेमध्ये रक्कम गुंतविली होती. व सदर ठेवपावतीला तक्रारदार यांचेही नाव लागले असल्याचे दाखल ठेवपावतीवरुन दिसून येते. सदरची पार्श्वनाथ बँक ही जाबदार क्र.1 बँकेमध्ये विलीन झाली आहे. पार्श्वनाथ बँकेची सर्व येणी-देणी ही जाबदार बॅंकेने अंगिकृत केली आहेत त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.1 बँकेचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
10. मुद्दा क्र.2 व 3 एकत्रित
तक्रारदार हे जाबदार क्र.1 बँकेचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांना बँकेने न्यायालयातून आदेश आणणेस सांगितले व सदरची ठेवपावती either or survivor प्रकारची असल्यामुळे प्रस्तुतची रक्कम तक्रारदार अथवा जाबदार क्र.2 यांना देणे आवश्यक होते. परंतु बँकेने ती रक्कम परत केली नाही असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांचे तक्रारअर्जावरुन ठेवपावती ही जाबदार क्र.2 व त्यांचे पती यांचे संयुक्त नावे होती. सदर ठेवपावतीवर तक्रारदार यांचे नाव नेमके कसे लागले याचा कोणताही ऊहापोह तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये केलेला नाही. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदार यास रक्कम देण्यास विरोध केला आहे. सदर ठेवपावतीपैकी एक ठेवीदार युगलाल शहा हे मयत झाले आहेत. सदर युगलाल शहा यांचे जागी मयत वारसदार म्हणून राजेश युगलाल शहा यांचे नाव लागले आहे. जाबदार क्र.2 व 3 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये मयत युगलाल शहा यांना प्रशांत नावचा आणखी एक मुलगा आहे त्यांना याकामी आवश्यक पक्षकार केले नाही अशीही हरकत घेतली आहे. या सर्व बाबींवरुन ठेवपावतीवरुन तक्रारदार व जाबदार क्र.2 व 3 व त्यांच्या घरातील इतर वारसदार यांचेमध्ये वाद निर्माण झाला आहे. असा वाद निर्माण झाला असताना जाबदार बँकेने सदर ठेवपावतीबाबत योग्य त्या न्यायालयातून आदेश आणण्यास सांगणे ही बाब संयुक्तिक व योग्य आहे. त्यामुळे जाबदार बँकेने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली असे म्हणता येणार नाही. वारसांचेमध्ये ठेवपावती बाबत वाद उपस्थित झाल्यास त्याबाबत योग्य त्या सक्षम न्यायालयातून वारसा दाखला आणणे गरजेचे आहे त्यामुळे तक्रारदार यांनी सदर ठेवपावतीबाबत सक्षम न्यायालयात वारसा ठरवून घेणे व त्याबाबत योग्य ते आदेश अथवा सक्षम न्यायालयाचा दाखला मिळणेसाठी दाद मागणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील वाद हा ग्राहक वाद होत नसून दिवाणी स्वरुपाचा वाद निर्माण झाला असल्याने त्याबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागणे संयुक्तिक ठरणारे असल्याने तक्रारदार हे या मंचातून कोणताही आदेश मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत झाले आहे.
11. मुद्दा क्र.4
तक्रारदार यांनी नि.7 वर उशिर माफीचा अर्ज दाखल केला आहे. सदर उशिर माफीच्या अर्जाचे अवलोकन केले असता प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करण्यास उशिर का झाला हे कोठेही नमूद केलेले नाही. जाबदार बॅंकेने दि.2/7/2007 रोजीच्या पत्राने न्यायालयाकडून आदेश आणण्याबाबत कळविले आहे. त्यानंतर सदरचा तक्रारअर्ज दाखल करण्यास उशिर का झाला याबाबत कोणतेही स्पष्ट कारण तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेले नाही. तक्रारदार यांनी उशिर माफीच्या अर्जामध्ये मोघम विधाने केली आहेत. त्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये पार्श्वनाथ बँकेचे जाबदार बँकेमध्ये विलिनीकरण झाले असेही नमूद केले आहे. परंतु सदर विलिनीकरण नेमके कधी झाले याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. या सर्व बाबींवरुन तक्रारदार यांनी उशिर माफीच्या अर्जास कोणतेही सबळ कारण दिले नसल्याने तक्रारदार यांचा उशिर माफीचा अर्ज मंजूर होण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. 14/02/2012
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.