तक्रारदार - स्वत:
// निकाल //
पारीत दिनांकः-25/04/2013
(द्वारा- श्रीमती.सुजाता पाटणकर, सदस्य )
तक्रारदाराची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदारांनी दि.21/4/2012 रोजी जाबदार यांचेकडे सोफासेट बनविण्यासाठी ऑर्डर दिली. त्यानंतर जवळ-जवळ दोन महिन्यांनी म्हणजेच दि.14/6/2012 रोजी सोफासेटची डिलीव्हरी जाबदारांनी तक्रारदारांना दिली. त्यावेळी जाबदारांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे तक्रारदारांना सोफासेटची डिलीव्हरी दिलेली नव्हती. सोफ्याची क्वालिटी चांगली नसल्याने तीन महिन्यांच्या वापराने सोफासेटची सपोर्ट फ्रेम तुटली. तक्रारदार यांनी सोफासेट खरेदीपूर्वी त्यांनी पसंत केलेल्या सोफासेटची किंमत रु.38,000/- एवढी ठरलेली होती. परंतु त्या सोफासेटचे 3 + 1 + 1 असे स्वरुप होते. त्यानंतर तक्रारदार यांना 3 + 2 + 1 अशा स्वरुपाचा सोफासेट हवा असल्याने तक्रारदार रक्कम रु.45,000/- देऊन सदर सोफा घेण्यास तयार झाले. परंतु जाबदार मुकेश खेतान यांनी सोफासेटसाठी असणा-या फॅब्रिकची जादा किंमत रक्कम रु.2,500/- समाविष्ठ केल्याने एकूण रक्कम रु.47500/- एवढी ठरली. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या फोटो नं. 2 प्रमाणे तक्रारदार यांनी पुस्तक पाहून, शोरुममध्ये डिजाईन पाहून लाकडी फ्रेमसहित सोफा घेण्याचे ठरविलेले होते. सदरच्या सोफ्यासाठी टिकवूड प्रकारचे लाकूड आणि स्लीपवेल फोम कुशन ठरलेले होते. त्यावेळी जाबदार यांनी त्यांच्या सर्व उत्पादनाची पाच वर्षे वॉरंटी असल्याबाबत तक्रारदारांना सांगितले. जाबदार यांनी तक्रारदार यांना दि. 14/6/2012 रोजी सोफासेटची डिलीव्हरी दिली होती परंतु जाबदारांनी तक्रारदारांना फोटो क्रमांक 3 मध्ये दाखविलेल्या सोफासेटची डिलीव्हरी केल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. सदरच्या सोफासेटमध्ये बॉटम सपोर्टींग फ्रेम नसल्याचे दिसून आले. तसेच सोफा कुशन आणि साईडफ्रेम जॉईंट केलेले स्क्रू लो क्वालिटी असल्याचे दिसून आले. सोफासीट सपोर्ट हे हलक्या दर्जाचे व नायलॉन स्ट्रीप्सचे होते, कुशनसपोर्टसाठी टिकवूडचा वापर केला नव्हता अत्यंत हलक्या प्रतीचे लाकूड पिक्चरमध्ये दाखविल्याप्रमाणे वापरले होते कि ज्यामुळे पाहुणे त्याच्यावर बसल्यानंतर तक्रारदारांचा सोफा तुटलेला आहे. वास्तविक पाहता मार्केटमध्ये रक्कम रु.25,000/- ते रु.35,000/- या किंमतीस चांगल्या दर्जाचे टिकवूडचे सोफा उपलब्ध आहेत. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.49,300/- घेऊन अत्यंत हलक्या प्रतीचा सोफासेट तक्रारदारास देऊन तक्रारदाराची फसवणूक केली आहे. याबाबत तक्रारदारांनी जाबदारांकडे जवळ-जवळ शंभरवेळा तक्रारी केल्या आहेत. प्रत्येकवेळी तक्रारदार जाबदार यांच्या शोरुममध्ये स्वत: जात होते. त्या-त्या वेळी त्यांना खोटी आश्वासने देऊन जाबदार टाळाटाळ करत होते. ज्यावेळी जाबदार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारी ऐकण्याचे नाकारले तसेच त्यांचे फोन कॉल्स घेण्याचे बंद केले, त्यावेळी तक्रारदारांनी मा. राष्ट्रीय आयोग यांच्या हेल्पलाईनवरुन माहिती घेऊन प्रस्तुतची तक्रार या मे. मंचात जाबदारांविरुध्द दाखल केलेली आहे. ज्यावेळी सोफासेट तुटला त्यावेळी अनेकदा जाबदार यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारदारांनी दि. 23/7/2012 रोजी जाबदारांना मेल पाठविला, त्याचेही काहीही उत्तर जाबदार यांचेकडून आले नाही त्यामुळे तक्रारदारांना या मे. मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे, तरी तक्रारदाराची विनंती की, रक्कम रु.49,300/- सोफासेटच्या खरेदीपोटीची किंमत परत मिळावी. मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- दयावेत, कायदेशीर बाबींकरिता केलेला खर्च तसेच फोन कॉल्स्, प्रवास खर्च आणि इतर कारणांसाठी, तक्रारी अनुषंगिक केलेला खर्च जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी शपथपत्र व कागदयादीने कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदारांना या मे. मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते मे. मंचात हजर राहिले नाहीत, त्यामुळे मे. मंचाने त्यांचेविरुध्द दि.14/2/2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला आहे.
3. तक्रारदारांनी दि.17/4/2013 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
4. प्रस्तुत प्रकरणातील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा एकत्रित विचार करता खालील मुद्दे (points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मुद्दा क्र. 1 :- जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये
कमतरता केली आहे का ? ... होय.
मुद्दा क्र. 2 :- काय आदेश ? ... अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1:- तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून सोफासेटची खरेदी केलेली आहे ही बाब तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि.21/4/2012 रोजीच्या पावतीवरुन स्पष्ट झालेली आहे. सदरचे तक्रारदार यांचे कथन जाबदेणारांनी या मे. मंचात हजर राहून कोणत्याही प्रकारे नाकारलेले नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचा विचार होता, तक्रारदार हे जाबदेणारांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे.
6. तक्रारदार यांच्या अर्जातील कथनानुसार, जाबदारांनी तक्रारदार यांना शोरुममधील पुस्तकात पाहून पसंत केलेल्या सोफासेटची डिलीव्हरी केलेली नाही. त्यासाठी तक्रारदारांनी सोफासेटचे स्वरुप दर्शविणारे फोटो या अर्जाचे कामी दाखल केलेले आहेत. सदरच्या फोटोग्राफचे अवलोकन केले असता, जाबदारांनी तक्रारदारांना त्यांनी पसंत केलेला सोफासेट तक्रारदार यांना दिलेला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील कथनानुसार, सोफासेट खरेदी केल्यानंतर अंदाजे तीन महिन्यानंतर तक्रारदार यांचेकडे आलेले पाहुणे सोफासेटवर बसले असता, सोफासेट तुटलेला आहे. याबाबत तक्रारदारांनी त्यांच्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये नमुद केलेले आहे. जाबदारांनी तक्रारदार यांना दिलेला सोफासेट हा हलक्या प्रतीचा असल्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार अर्जात नमुद केले आहे. तसेच तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील कथनानुसार, सदर सोफासेटसाठी टिकवूडचा वापर केला नाही तसेच सोफा कुशन आणि साईडफ्रेम जॉईंट केलेले स्क्रू लो क्वालिटी असल्याचे दिसून आले. तक्रारदार यांच्या वरील कथनाच्या पृष्टयर्थ तक्रारदारांनी सोफासेटचे फोटो दाखल केलेले आहेत. सदर फोटोवरुन जाबदारांनी तक्रारदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे अगर पसंतीप्रमाणे सोफासेटची डिलीव्हरी केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच सोफ्याचा बॉटम सपोर्ट तुटलेला असून कुशनफ्रेमच्या आतमधील भाग तुटला असल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारांनी याबाबत जाबदारांकडे तक्रारी केल्याचे नमुद केले आहे. तसेच सदर तक्रारीबाबत जाबदारांना मेलद्वारे कळविल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. परंतु जाबदारांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निराकरण केल्याचे दिसून येत नाही. तसेच जाबदारांनी मे. मंचात हजर राहून तक्रारदार यांचे तक्रार अर्जातील कथन नाकारलेले नाही म्हणजेच ते अबाधित राहिलेले आहेत. तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे वस्तुचा पुरवठा न करणे त्याची प्रत हलकी निघणे अगर सदरची वस्तु तुटणे आणि याबाबत तक्रार करुनही त्याचे निरसन न करणे ही एकप्रकारची सेवेतील कमतरताच ठरते, याचा विचार होता मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
7. तक्रारदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे, जाबदारांनी सोफासेटची डिलीव्हरी केलेली नाही तसेच सदरचा सोफासेट हा तीन महिन्यामध्येच तुटलेला आहे याबाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी जाबदारांकडे तक्रारी करुनही तक्रारदारांच्या तक्रारीचे जाबदार यांचेकडून निरसन झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदार यांची सोफासेटच्या किंमतीची जाबदारांकडून रिफंडची मागणी मान्य करणे योग्य व उचित असे ठरणारे आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये जाबदार यांचेकडून रक्कम रु.49,300/- सोफासेटच्या खरेदीपोटीची रक्कम जाबदारांकडून परत मिळावी अशी मागणी केली असली तरी या अर्जाचेकामी दाखल केलेल्या पावतीमध्ये रक्कम रु.47,500/- एवढीच रक्कम जाबदारांना दिली असल्याबाबत नमुद केल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर पावतीवर तक्रारदार व जाबदार यांच्या सहया आहेत. उर्वरित रक्कम रु.2,500/- जाबदारांना जादा दिलेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचेकडून सोफासेटच्या किंमतीपोटी रक्कम रु. 47,500/- वसुल करुन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. मंचाच्या आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास रु. 47,500/- या रकमेवर दि.23/7/2012 पासून म्हणजेच तक्रारदारांनी सोफासेट तुटल्याबाबत जाबदारांना पाठविलेल्या मेलच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने जाबदारांकडून रक्कम वसुल होऊन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
8. जाबदार यांचेकडून सोफासेटची खरेदी केल्यानंतर जाबदार यांनी पाठविलेला सोफा तीन महिन्यांमध्ये तुटलेला आहे तसेच तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे तक्रारदारांनी सोफासेट पाठविलेला नाही याचा विचार होता, तक्रारदार यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तु न मिळाल्यामुळे त्या वस्तुचा स्वत:साठी योग्य रितीने उपभोग घेता आला नाही तसेच स्वत:च्या पसंतीप्रमाणे घेतलेली वस्तु जाबदारांनी न पाठविल्याने तक्रारदारांना निश्चितच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. तसेच योग्य ती किंमत देऊनही मागणीप्रमाणे वस्तुचा पुरवठा न झाल्यामुळे व सोफासेट तुटल्यामुळे तक्रारदारांना निश्चितपणे आर्थिक त्रासही सहन करावा लागला आहे, याचा विचार होता तक्रारदार हे जाबदारांकडून नुकसानभरपाईपोटी म्हणून रक्कम रु.10,000/- वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदेणार यांचेकडून तक्रारदारास त्यांच्या पसंतीनुसार योग्य सोफासेट न मिळाल्यामुळे तसेच सोफासेट तुटल्यामुळे तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे जाबदारांकडून निराकरण न झाल्याने तक्रारदारांना या मंचामध्ये अर्ज करावा लागला आहे व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- जाबदेणार यांचेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
9. जाबदार यांनी तक्रारदार यांना आदेशात नमुद केल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर जाबदारांनी तक्रारदारांना दिलेला सोफासेट स्वखर्चाने घेऊन जावा.
10. वर नमुद सर्व विवेचनाचा विचार होता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
// आदेश //
(1) तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदार यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 47,500/- दयावेत.
(3) यातील जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रु. दहा हजार मात्र) दयावेत.
(4) यातील जाबदेणार यांनी तक्रारदारांना रु.3,000/- (रक्कम रु.तीन हजार मात्र) तक्रार अर्जाच्या खर्चापोटी दयावेत.
(5) वरील सर्व रक्कम जाबदारांनी तक्रारदारांना अदा केल्यानंतर जाबदारांनी तक्रारदारांना दिलेला सोफासेट स्वखर्चाने परत घेऊन जावा.
(6) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदेणार यांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून पंचेचाळीस दिवसांचे आत करावी.
(7) मंचाच्या आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास रु. 47,500/- या रकमेवर दि.23/7/2012 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत होणारी व्याजासह एकूण रक्कम जाबदारांनी तक्रारदारांना दयावी.
(8) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.