(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे कॉम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. गैरअर्जदारानी या कोर्ससाठी जाहिरात दिली होती, त्यामध्ये 100% जॉब गॅरंटी म्हणून सांगितले होते, त्यामुळेच तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे प्रवेश घेतला. तक्रारदारानी या कोर्ससाठी रु.25,000/- गैरअर्जदाराकडे भरले. त्यापैकी फक्त रु.20,000/- ची पावती त्यांना दिली, आणि रु.5,000/- ची पावती दिली नाही. तक्रारदार, गैरअर्जदाराकडे क्लाससाठी जात होते, त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, तेथील फॅकल्टी, टिचर्स हे योग्य त्या क्वॉलिफिकेशनचे नव्हते. कारण कुठलाही प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर त्यांना देता येत नव्हते. यासाठी तक्रारदारानी अडमिनिस्ट्रेटरला सांगितले असता, त्यांनी लवकरच नविन टिचींग स्टॉफ येईल असे आश्वासन दिले. परंतू टिचींग स्टॉफ नविन आला नाही आणि जे कोणी शिकवत होते ते व्यवस्थित शिकवत नव्हते. त्यामुळे तक्रारदारानी, आणि त्यांच्या वडीलांनी हा प्रवेश रदद करावा असे ठरविले, त्यानुसार अडमिनिस्ट्रेटरकडे गेले, त्यांच्याकडे रक्कम परत करावी अशी मागणी केली. अडमिनिस्ट्रेटरने ही रक्कम परत केली नाही, म्हणून तक्रारदारानी वकीलामार्फत दि.22.10.2008 मध्ये गैरअर्जदारास नोटीस पाठविली. गैरअर्जदारानी त्याचे उत्तर ही दिले नाही, आणि ही रक्कम ही परत केली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, गैरअर्जदाराकडून फीस ची रक्कम रु.25,000/- 18% व्याजदराने, तसेच नुकसान भरपाई रु.6,000/-, आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊनही मंचात गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचानी पारित केला. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी एकूण रु.20,000/- दिल्याच्या पावत्या मंचात दाखल केल्या आहेत, त्यावर गैरअर्जदाराचे नाव आणि पत्ता नमूद केला आहे. तसेच तक्रारदारानी माहितीपत्रक दाखल केले आहे. या कोर्सला आय.एस.ओ.9001 चे अवॉर्ड मिळाले आहे असे दिसून येते. माहितीपत्रकात क्लासरुम, फॅकल्टी, लायब्ररी, वेबसाईट वगैरे अनेक सोयीसुविधा असल्याबददल नमूद केले आहे. क्लासरुम हे ए.सी.क्लासरुम असे प्रत्येकाला एक स्वतंत्र कॉम्प्युटर दिला जाईल असे नमूद केलेले आहे. फॅकल्टीबददल सी.ए., सी.एस., आय.सी.डब्ल्यु.ए., एम.बी.ए. या क्वॉलिफिकेशनचे टिचर असतील असेही नमूद केलेले आहे. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, तेथे क्लासरुममध्ये पुरेसे कॉम्प्युटरही नव्हते आणि टिचींग स्टॉफही योग्य त्या क्वॉलिफिकेशनचा नव्हता. त्याच माहितीपत्रकात जॉब/ मनीबॅक याचा दावा गैरअर्जदारानी केल्याचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे माहितीपत्रकात सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत. परंतू प्रत्यक्षात मात्र काहीही नाही. म्हणूनच तक्रारदारानी अडमिशन घेतल्यानंतर लगेचच रक्कम परत मागितली. परंतू ती गैरअर्जदारानी दिली नाही. तक्रारदारानी दि.10.03.2007 च्या पावतीची प्रत दाखल केली आहे, त्यावर रु.1,000/- भरलेले दिसून येतात. त्याचा ब्रेकअप पुढील प्रकारचा आहे. अडमिशन फीस 891/- आणि सर्व्हिस टॅक्स 109/- असे एकूण रु.1,000/- गैरअर्जदारानी घेतलेले दिसून येतात. वरील माहिती पुस्तकातील माहिती पाहून गैरअर्जदारानी तशा प्रकारचे क्लासरुम, फॅकल्टी, किंवा शिकवणी दिली नाही ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. आणि रक्कम घेऊनही माहितीपत्रकाप्रमाणे क्लासरुम, आणि फॅकल्टी दिल्या नाहीत, यावरुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार, तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. गैरअर्जदारानी, तक्रारदाराकडून रु.25,000/- फीस पोटी घेतल्याचे तक्रारदार म्हणतात, परंतू तक्रारदारानी केवळ रु.20,000/- ची पावती दाखल केलेली आहे. गैरअर्जदारानी अडमिशन फीस चे रु.1,000/- वजा करुन रु.19,000/- तक्रारदारास द्यावे. असा आदेश मंच गैरअर्जदारास देत आहे. आणि या सर्व प्रकरणामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक, शारिरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच, तक्रारदारास खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत असा आदेश देत आहे. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) गैरअर्जदारानी, तक्रारदारास रु.19,000/- दि.17.07.2007 पासून 9% व्याजदराने द्यावे. व खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत. या आदेशाची पुर्तता निकाल दिनांकापासून सहा आठवडयाच्या आत करावी. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |