द्वारा- श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) तक्रारदारांचे सामनेवाला 1 सिटी बँकेत क्रं.5182149111 सुविधा खाते आहे. सदरचे खाते तक्रारदारांनी सामनेवाला 1 यांच्या बँकेत सन 1998 साली उघडले असून दि.09/12/2008 पर्यंत सदरच्या खात्यावर तक्रारदार नियमितपणे व्यवहार करीत असत. दि.03/12/2008 रोजी तक्रारदारांनी त्यांच्या नावाचे 2 धनादेश सामनेवाला 1 बँकेतील त्यांच्या खात्यात भरले. सदरच्या धनादेशाची छायांकित प्रत व त्यासोबतची डिपॉसिट स्लिपची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी A-B ला सादर केलेली आहे.
2) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला 1 बँकेनी सदरचे धनादेश वठविण्यासाठी संबंधीत बँकेकडे न पाठविता दि.06/12/2008 च्या पत्रासोबत रक्कम रु.5,000/- चा धनादेश क्रं.206724 तक्रारदारांना परत पाठविण्यात आला. त्या धनादेशावर Payee’s Name खातेदाराच्या नावापेक्षा वेगळे आहे असे कारण दिले. रक्कम रु.10,884=28 चा दूसरा धनादेश क्रं.561118 परत पाठविण्यासाठीसुध्दा Payee’s Name व खातेदाराचे नाव वेगवेगळे असल्याचे नमूद केले. सामनेवाला यांच्या वरील पत्राची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत निशाणी C-D ला दाखल केलेली आहे.
3) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नाव ‘हरनाम सिंग’ व आडनाव ‘खालसा’ आहे. त्यांनी सामनेवाला 1 बँकेत वरील नावाचे खाते उघडले होते. खाते उघडल्यानंतर 10 वर्षाच्या कालावधीत त्यांनी सदर खात्यावर त्यांना आलेले धनादेश ज्यांच्यावर तक्रारदाराचे नाव ‘एच.एस्.खालसा’ किंवा ‘हरनाम सिंग’ किंवा ‘हरनाम सिंग खालसा’ लिहीलेले होते असे धनादेश त्यांनी सामनेवाला बँकेत सादर केलेले होते. तथापि, तक्रार अर्जात नमूद केलेले वरील 2 धनादेश सामनेवाला 1 बँकेनी संबंधीत बँकेकडे न पाठविता तक्रारदारांना परत पाठविले. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे दूरध्वनीवरुन विचारणा केली असता सामनेवाला यांच्या संबंधीत अधिका-यांने त्यांनी तक्रारदारांचे धनादेश परत पाठविण्याचा घेतलेला निर्णय बरोबर असल्याचे सांगितले. तक्रारदारांनी दि.27/12/2008 रोजी सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली व त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला यांनी सदरच्या नोटीसीस दि.27/01/2009 रोजी उत्तर पाठवून वादातित धनादेश सामनेवाला बँकेनी खातेदाराचे नाव व धनादेशावरील Payee’s Name मध्ये फरक असल्यामुळेच परत पाठविल्याचे उत्तर दिले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना नवीन धनादेश पाठवावेत अशी विनंती केली.
4) तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला बँकेनी बँकींग सेवा पुरविण्यात हलगर्जीपणा केला. योग्य कारणाशिवाय तक्रारदारांचे दोन्ही धनादेश न वठविता परत पाठविले. वास्तविक सामनेवाला 1 बँकेनी त्यांच्याकडे असणा-या तक्रारदारांच्या खात्यासंबंधीचे रेकॉर्ड पाहणे आवश्यक होते, कारण तक्रारदारांच्या खात्यात 10 वर्षाच्या कालावधीत ‘एच.एस्.खालसा’ किंवा ‘हरनाम सिंग’ किंवा ‘हरनाम सिंग खालसा’ या नावाने असणारे धनादेश सामनेवाला यांनी वठविलेले होते. सदरचे वरील 2 धनादेश संबंधीत बॅंकेकडे वठविण्यासाठी पाठविण्याची जबाबदारी सामनेवाला 1 बँकेची होती. तक्रारदारांनी विनंती करुन, कायदेशीर नोटीस पाठवूनसुध्दा सामनेवाला यांनी सदरचे धनादेश संबंधीत बँकेकडे वठविण्यासाठी पाठविले नाहीत त्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला. सामनेवाला 1 बँकेनी त्यांच्याकडे असणारे तक्रारदारांचे सुविधा खाते क्रं.5182149111 तक्रारदारांना ‘एच.एस्.खालसा’ किंवा ‘हरनाम सिंग’ किंवा ‘हरनाम सिंग खालसा’ या नावांनी वापरण्याची परवानगी द्यावी असा आदेश सामनेवाला बँकेस देण्यात यावा. तसेच, वरील दोन्ही धनादेश रक्कम रु.5,000/- व रक्कम रु.10,884=84 यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने 1 महिन्याच्या कालावधीत व्याजाची रक्कम रु.238=27 सामनेवाला बँकेनी तक्रारदारांना द्यावे असा सामनेवाला बँकेस आदेश करावा अशी तक्रारदारांनी विनंती केलेली आहे. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व गैरसोयीपोटी सामनेवाला बँकेनी नुकसान भरपाईदाखल रक्कम रु.51,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.20,000/- द्यावेत असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी विनंती केलेली आहे.
5) सामनेवाला 1 ते 3 यांनी एकत्रितपणे कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रार अर्जास काहीही करण घडलेले नसून तक्रार अर्जात केलेले सर्व आरोप खोटे असून सामनेवाला यांच्याकडून निव्वळ पैसे उकळण्याच्या उद्देश्यानेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल केलेला असल्यामुळे तो खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांचे त्यांच्याकडे असणारे सुविधा खाते क्रं. 5182149111 ‘खालसा हरनाम सिंग’ या नावाने आहे. वरील दोन्ही धनादेशावर असणारे नाव त्यांच्याकडे असणा-या खातेदाराच्या नावापेक्षा वेगळे होते त्यामुळेच खातेदाराच्या नावापेक्षा वेगळे नाव असणारे धनादेश अन्य बँकाकडे पाठविण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सामनेवाला बँकेनी सदरचे धनादेश तक्रारदारांना परत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. सदरच्या तक्रार अर्जास काही कारण घडलेले नसून तक्रार अर्ज खर्चासहित रद्द होण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी तक्रार अर्जातील सर्व आरोप नाकारलेले असून तक्रारदारांना सामनेवाला यांच्याकडून व्याज, नुकसान भरपाई किंवा या अर्जाचा खर्च यापैकी कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही. तक्रार अर्ज खोटा असल्याने तो खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
6) तक्रारदारांनी पुराच्याचे शपथपत्र दाखल करुन त्यासेबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला यांच्या वतीने जी.एम.प्रभू देसाई यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन त्यासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच, तक्रारदारांच्या खात्याच्या उता-याची प्रमाणित प्रत दाखल केलेली आहे. याकामी तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच, सामनेवाला यांनीही लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तक्रारदार स्वतः व सामनेवाला यांच्या वतीने अडव्होकेट वाघ यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला व तक्रार अर्ज निकालावर ठेवण्यात आला.
7) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-
मुद्दा क्रं. 1 – तक्रारदार हे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय?
उत्तर – नाही.
मुद्दा क्रं. 2 – तक्रारदारांना तक्रार अर्जात मागितल्याप्रमाणे सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाई, व्याज, या अर्जाचा खर्च मागता येईल काय?
उत्तर – नाही.
कारण मिमांसा :-
मुद्दा क्रं. 1 - तक्रारदारांचे सामनेवाला 1 बँकेत सुविधा खाते क्रं. 5182149111 सन, 1998 पासून असून सदरच्या खात्यावर दि.09/12/2008 पर्यंत तक्रारदार व्यवहार करीत होते ही बाब उभयपक्षकारांना मान्य आहे. तक्रारदारांचे सामनेवाला 1 बँकेत असणारे वर नमूद केलेले सुविधा खाते ‘खालसा हरनाम सिंग’ या नावाने आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या वरील खात्याचा खाते उता-याची प्रमाणित प्रत हजर केलेली आहे. तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला बँकेस दिलेल्या सहीच्या नमुन्याची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदारांना सामनेवाला 1 बँकेतील त्यांचे खाते ‘खालसा हरनाम सिंग’ नावाने असल्याचे मान्य आहे. तक्रारदारांनी सामनेवाला 1 बँकेत तक्रार अर्जात नमूद केलेले जे 2 धनादेश दिलेले होते त्यापैकी एका धनादेशावर Payee’s Name ‘हरनाम सिंग’ व दूस-या धनादेशावर ‘एच.एस्.खालसा’ असे होते व तक्रारदारांचे सामनेवाला बँकेकडे असणारे सुविधा खाते ‘खालसा हरनाम सिंग’ या नावाने होते ही वस्तुस्थिती तक्रारदारांनासुध्दा मान्य आहे. धनादेशावरील Payee’s Name हे खातेदाराच्या नावापेक्षा वेगळे असल्यामुळे सामनेवाला 1 यांनी कोणताही धोका न पत्करता सदरचा धनादेश तक्रारदारांना परत करण्याचा निर्णय घेतला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला 1 यांनी सदरचे धनादेश वठविण्यासाठी संबंधीत बँकेकडे पाठविणे ही सामनेवाला बँकेची जबाबदारी होती. असे असतानाही सामनेवाला बँकेने सदरचे धनादेश वठविण्यासाठी न पाठविता परत पाठविले ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे. सामनेवाला यांच्या वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे धनादेशावरील Payee’s Name व खातेदाराचे नाव वेगवेगळे असल्यामुळे सदरचे धनादेश अन्य इसमाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही व अशी शक्यता असल्यामुळेच सामनेवाला बँकेनी सदरचे धनादेश तक्रारदारांना परत केले. त्यामुळे ती सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता आहे असे म्हणता येणार नाही.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सन, 1998 पासून ‘एच.एस्.खालसा’ किंवा ‘हरनाम सिंग’ किंवा ‘हरनाम सिंग खालसा’ या नावाने आलेले धनादेश सामनेवाला 1 बँकेकडे पाठविले होते व सामनेवाला यांनी सदरचे धनादेश संबंधीत बँकांकडे वठविण्यासाठी पाठवून त्या धनादेशांची रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा केलेली आहे ही बाब सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली आहे. तक्रारदारांनी पूर्वी वेगवेगळ्या म्हणजेच ‘एच.एस्.खालसा’ किंवा ‘हरनाम सिंग’ किंवा ‘हरनाम सिंग खालसा’ या नावाने आलेले धनादेश सामनेवाला 1 बँकेतर्फे वठविले होते हे दाखविणारा काहीच पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता धनादेशावरील Payee’s Name खातेदाराच्या नावापेक्षा वेगळे असल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या हिताच्या दृष्टीने सदरचे धनादेश वठविण्यास न पाठविता सदरचे धनादेश तक्रारदारांना परत केलेले आहे असे दिसते त्यामुळे ही सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता होवू शकत नाही. तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द न करता आल्यामुळे मुद्दा क्रं. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 –वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करता आली नाही. तक्रारदारांना त्यांचे किती नुकसान झाले हे ही सिध्द करता आले नाही. सबब तक्रारदारांना वरील धनादेशावरील रकमेवर व्याज, नुकसान भरपाई व या अर्जाचा खर्च इत्यादी सामनेवाला यांच्याकडून वसूल करता येणार नाही. त्यामुळे मुद्दा क्रं.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रार अर्ज रद्द होण्यास पात्र असल्यामुळे खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
1) तक्रार अर्ज क्रं. 84/2009 रद्द करण्यात येतो.
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
3) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देणेत यावी