तक्रारदार : वकीलामार्फत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारे वाहन दुरुस्ती केंद्र आहे. तक्रारदारांकडे MH-20-AG-1218 SKODA हे वाहन होते. व त्या वाहनाचा तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांचेकडे विमा काढला होता. जुलै,2007 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहनाच्या अंतर्गत भागात पाणी शिरले व वाहन नादुरुस्त झाले. तक्रारदारांनी वाहन दुरुस्त करणेकामी आपले वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडे दिनांक 28.7.2007 रोजी सुपुर्द केले व सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक रु.97,913/- तक्रारदारांना दिले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमा कंपनीकडे दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे रु.97,913/- अदा करावेत असे मागणीपत्र सादर केले.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले क्र.1 यांच्या विमा सर्वेक्षकांनी वाहनाची तपासणी केली व रु.35,505/- येवढी रक्कम धनादेशाव्दारे सा.वाले क्र.2 यांना वाहन दुरुस्ती खर्चाचे प्रतिपुर्तीकामी अदा केले. त्याच वेळेस सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदाराचे काही को-या कागदावर व फॉर्मवर सहया घेतल्या.
3. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले क्र.1 यांनी फ्लाय व्हिल अॅस्ली (Fly Wheel Assly ) या भागाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडे चौकशी केली असता सा.वाले क्र.2 यांचे प्रतिनिधीनी तक्रारदारांना असे सांगीतले की, फ्लाय व्हिल अॅस्ली हा वाहनाच्या मशिन मधील एक भाग असून तो खराब झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.
4. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे दिनांक 29.8.2007 व 3.9.2007 अशी पत्रे पाठविली व फरकाच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सा.वाले क्र.1 यांनी या पत्रांना दाद दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना दिनांक 12.11.2007 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्या नोटीसीला देखील सा.वाले क्र.1 यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 29.1.2008 रोजी प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल केली, व सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा करारा अंतर्गत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे. तसेच वाहन दुरुस्तीच्या फरकाची रक्कम रु.62,408/- सा.वाले क्र.1 यांचेकडून वसुल होऊन मिळावी व त्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई मिळावी अशी दाद मागीतली.
5. सा.वाले यांना तक्रारीमध्ये हजर होऊन कैफीयत दाखल करणेकामी नोटीस पाठविण्यात आली व सा.वाले यांना नोटीस बजावूनही सा.वाले हे गैरहजर राहीले. त्यानंतर तक्रारदारांनी नोटीस बजावल्याचे शपथपत्र दाखल केले. त्यावरुन सा.वाले यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हजर केली. तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, शपथपत्रे, कागदपत्रे, यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र.1 यांनी विमा करारा अंतर्गत कमी नुकसान भरपाई अदा करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईच्या फरकाची रक्कम वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय रु.62,408/- 9 टक्के व्याजासह. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले क्र.2 वाहन दुरुस्ती केंद्राने दिलेल्या अंदाजपत्रकाची प्रत निशाणी अ येथे हजर केलेली आहे. त्यावरुन सा.वाले क्र.2 यांनी वाहन दुरुस्तीचे अंदाजपत्रक रु.97,913/- तक्रारदारांना दिलेले होते ही बाब सिध्द होते. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांना दिनांक 3.9.2007 रोजी दिलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यातील मजकूरावरुन असे दिसते की, सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 दुरुस्ती केंद्र यांना तक्रारदारांकरीता रु.35,507/- विमा करारा अंतर्गत धनादेशाव्दारे अदा केले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांना तिन पत्रे दिली त्या पत्रातील मजकूरावरुन असे दिसून येते की, तक्रारदार हे फरकाची रक्कम म्हणजे रु.62,406/- येवढी रक्कम अदा करण्याबद्दल सा.वाले क्र.1 यांचेकडे तगादा लावत होते. तरी देखील सा.वाले क्र.1 यांनी त्या पत्रांना दाद दिली नाही.
8. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने व शपथपत्रातील मजकूरावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांच्या वाहनातील फ्लाय व्हिल अॅस्ली (Fly Wheel Assly ) या भागाकरीता सा.वाले क्र.1 यांनी खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी नाकारली. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांना तक्रारीत नोटीस बजावल्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी प्रकरणात हजर होऊन आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची रु.62,408/- येवडया रक्कमेची मागणी का नाकारली या बद्दल समर्थनीय कारण, खुलासा करणे आवश्यक होते. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी विमा सर्वेक्षकाच्या अहवालाची प्रत हजर करणे आवश्यक होते. सा.वाले क्र.1 यांनी हजर होऊन कैफीयत दाखल केलेली नसल्याने तक्रारदारांच्या तक्रारीतील तसेच पुराव्याच्या शपथपत्रातील कथने अबाधीत रहातात व ती सा.वाले यांनी नाकारलेली नसल्याने ती स्विकारणे योग्य व न्याय ठरते.
9. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 वाहन दुरुस्ती केंद्र यांचे विरुध्द कुठलीही दाद मागीतलेली नसल्याने त्यांचे विरुध्द कुठलीही दाद देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
10. वरील परिस्थितीत सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा करारा अंतर्गत सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा करारा अंतर्गत नुकसान भरपाईच्या फरकाची रक्कम रु.62,408/- तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजे दिनांक 29.1.2008 पासून 9 टक्के व्याज दराने अदा करावी असा आदेश देणे उचित व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
11. तक्रारदारांनी नुकसान भरपाईची वेगळी रक्कमेची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदारांना मुळ रक्कम 9 टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश होत असल्याने वेगळी नुकसान भरपाई देणे योग्य ठरणार नाही असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 36/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा करारा अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम कमी अदा करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना वाहन खर्चाच्या दुरुस्तीच्या फरकाची रक्कम रु.62,408/- त्यावर 9 टक्के व्याज दिनांक 29.1.2008 पासून ती रक्कम अदा करेपर्यत या प्रमाणे अदा करावी असा आदेश देण्यात येतो.
4. त्या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.