नि का ल प त्र :- (दि.29/06/2012) (द्वारा : सौ. वफा जमशीद खान, सदस्या)
(1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार हे विरुध्द पक्षकार बँकेचे खातेदार असून सदर बँकेचे ए.टी.एम. सन 2002 पासून वापरत आहेत. तक्रारदाराचा सदर बँकेतील खाते क्र. 016601001616 असून ए.टी.एम. क्र. 4667060166013474 असा आहे. तक्रारदाराने सदर ए.टी. एम. वापरुन रुईकर कॉलनी येथील एच.डी.एफ.सी. बँकेच्या एटीएम् मशीनमधून रक्कम रु. 8,000/- (अक्षरी रक्कम रु. आठ हजार फक्त) काढण्याचा प्रयत्न केला. सदर रक्कम मशिनमधून बाहेर आली नाही; परंतु एटीएम् मधून चलन बाहेर आले त्यामध्ये रक्कम रु. 8,000/- (अक्षरी रक्कम रु. आठ हजार फक्त) रक्कम खात्यामधून कमी झाली होती. म्हणून त्याने तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले असता दोन तासात रक्कम जमा होईल असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तक्रारदाराला नोकरीनिमित्त बाहेरगावी जावे लागल्याने त्याने बँकेत तक्रार दिली नाही असे तक्रारदाराने कथन केले आहे.
(2) तक्रारदाराने दि. 27/01/2012 रोजी त्याच एटीएम् मशिनमधून पैसे काढले असता खात्यातील शिल्लक रक्कम रु. 8,000/- (अक्षरी रक्कम रु. आठ हजार फक्त) कमी असल्याचे जाणवले. त्याने लघु विवरणाद्वारे रक्कम तपासली असता त्याचे असे लक्षात आले की, दि. 7/01/2012 रोजी रक्कम रु. 8,000/- ही रक्कम वजा झाली, जमा झाली व परत वजा झाली म्हणून त्याने विरुध्दपक्ष बँकेशी संपर्क साधला असता त्याला तेथून ग्राहक सेवा केंद्र यांचेशी संपर्क साधण्यास कळविल्याने तेथे तक्रार दिल्यानंतर दि. 22/02/2012 रोजी केंद्राकडून असे सांगण्यात आले की, रक्कम रु. 8,000/- तक्रारदाराला दि. 7/01/2012 रोजी मिळालेले आहेत. त्यावर तक्रारदाराचे समाधान न झाल्यामुळे तक्रारदाराने पुन्हा तक्रार दिली व पुन्हा विरुध्द पक्ष बँकेकडे तक्रार दिली असता बँकेने देखील दि. 7/01/2012 रोजी तक्रारदारास पैसे मिळाल्याचे सांगितले. तक्रारदारांने त्यांना आपणास पैसे न मिळाल्याचे पटवून देवूनही त्यांनी काही दखल घेतली नाही, म्हणून तक्रारदाराने सदर रक्कम मिळावी आणि मानसिक त्रास व अर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावा याकरिता तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराने त्यांचे अर्जासोबत शपथपत्र व दि. 7/01/21012 ला एटीएम् मधून रक्कम काढल्याची स्लिप दाखल केली आहे.
(3) तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष बँकेला पाठविणेत आली. विरुध्द पक्ष बँक वकील प्रतिनिधीमार्फत हजर होवून बँकेने लेखी म्हणणे मंचासमोर दाखल करुन तक्रारदाराची तक्रार शपथेवर नाकारली आहे. विरुध्द पक्ष त्यांचे लेखी म्हणण्यात सांगतात की, दि. 7/01/2012 रोजी तक्रारदार यांनी प्रथम एटीएम् कार्ड 11:35:04 वाजता वापरले आहे. तथापि, एचडीएफसी बँकेच्या एटीएम् मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रक्कम मशिनमधून बाहेर न येता रक्कम काढली गेली असल्याची पोहोच बाहेर आली. सदरची रक्कम काही सेकंदामध्यचे म्हणजे 11:35:07 वाजता तक्रारदार यांचे खात्यावर पुन्हा वर्ग करणेत आली. त्यानंतर तक्रारदार यांनी आपले एटीएम् कार्ड पुन्हा मशिनमध्ये सरकवून पुन्हा नवीन व्यवहार 11:35:38 वाजता केलेला आहे. सदर व्यवहार संगणकीकृत व्यवहार प्रणालीमध्ये नोंदविला गेलेला आहे. यावरुन स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी एटीएम् मशिनचा दोनदा वापर केलेला आहे व दुस-या प्रयत्नात तक्रारदार यास रक्कम रु. 8,000/- मिळालेली आहे. तक्रारदाराने दि. 27/01/2012 रोजी दिलेल्या तक्रारीना योग्य उत्तर दिले असून तक्रारदाराला सदरची रक्कम मिळाली आहे, परंतु बँकेस त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केल्याने ती फेटाळण्याची विनंती केली आहे. तसेच सदरच्या तक्रारीमध्ये तक्रारदाराने एचडीएफसीला पक्षकार केले नसल्याने सदर तक्रार कायद्याने चालण्यास पात्र नाही, असेही म्हटले आहे.
(4) तक्रारदार व विरुध्द पक्ष बँक यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने तक्रार अर्जात एचडीएफसी बँकेला पक्षकार केले नाही असा मुद्दा विरुध्द पक्षाने उपस्थित केला आहे. परंतु तक्रारदार हा विरुध्द पक्षकार बँकेचा ग्राहक असल्याने व सदरचा वाद हा विरुध्द पक्षकार बँकेच्या सेवेतील त्रुटी संबंधाने असल्याने एच.डी.एफ.सी. बँकेला जरी पक्षकार केले नसले तरी तक्रार अर्जाला कोणतीही बाधा येणार नाही.
(5) तक्रारदाराने केलेला वादातीत आर्थिक व्यवहार हा यांत्रिक व्यवहार पध्दतीने एटीएम् मशिनच्या माध्यमातून केलेला आहे. सध्यस्थितीमध्ये बँकाचे आर्थिक व्यवहार हे संगणीकृत व्यवहार पध्दतीचे होत आहेत. तक्रारदाराने दि. 7/01/2012 रोजी एचडीएफसी बँकेचे एटीएम् मधून 11:35 वाजता रक्कम रु. 8,000/- काढल्याची एटीएम् स्लीप तक्रारदाराने दाखल केली आहे. परंतु त्या स्लिपमध्ये अॅव्हेलेबल बॅलन्स हा रु. 6,976.80 पैसे इतका दाखविलेला आहे. तक्रारदाराने एटीएम् मशिनवर व्यवहार केला त्याचदिवशी म्हणजे दि. 7/01/2012 रोजी त्याने दिलेल्या चेक क्र. 932097 द्वारे रक्कम रु. 7,000/- (अक्षरी रक्कम रु. सात हजार फक्त) वजा झाली आहे आणि ही चेकची बाब तक्रारदाराने मान्य केलेली आहे. तक्रारदाराच्या वादातीत आर्थिक व्यवहाराची घटना ही दि. 7/01/2012 रोजीची असून त्याने त्यासंबधाने तक्रार विरुध्दपक्ष यांचेकडे उशिराने म्हणजे दि. 27/01/2012 रोजी केली आहे. वास्तविक एटीएम् मशिनद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराची तक्रार एच्.डी.एफ.सी. बँकेचे एटीएम् मशीन वापरल्यामुळे त्या बँकेकडे आणि विरुध्द पक्ष बँक यांचेकडे त्वरीत करणे आवश्यक होते.
(6) तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराने दि. 7/01/2012 रोजी 11:35 वा. रक्कम रु. 8,000/- काढली व ती रक्कम वजा झाली, परंतु रक्कम रु. 8,000/- प्राप्त झाले नाहीत. तक्रारदाराचा तक्रारदाराने व विरुध्द पक्षकार बँकेने दाखल केलेला खातेउतारा पाहता त्याच्या खात्यामधून दि. 7/01/2012 रोजी 11:35:04 वा. रक्कम रु. 8,000/- काढल्याचे दिसून येते. परंतु दि. 7/01/2012 रोजी 11:237:07 ला रु. 8,000/- त्याचे खात्यावर जमा झाल्याचे दिसून येते. त्याचदिवशी त्याच खात्यामधून 11:35:38 ला रक्कम रु. 8,000/- रक्कम काढल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणपणे 11:35:07 ते 11:35:38 या कालावधीत त्याच एटीएम् मशिनवर आर्थिक व्यवहार तक्रारदारांकडून निश्चितपणे होवू शकतो. तसेच तक्रारदाराने त्याच अकाउँटच्या दिेलेल्या चेकच्या माध्यमातून रु. 7,000/- रक्कम त्याच दरम्यान वजा झालेली आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेली एटीएम् मधील रक्कम रु. 8,000/- काढलेली स्लिप ही तक्रारदाराने दि. 7/01/2012 रोजी एटीएम् मशिनवर केलेल्या पहिल्या आर्थिक व्यवहाराची नसून ती स्लिप त्याचदिवशी केलेल्या दुस-या वेळच्या आर्थिक व्यवहाराची स्लिप आहे व या दुस-या आर्थिक व्यवहारात तक्रारदाराला रु. 8,000/- (अक्षरी रुपये आठ हजार फक्त ) प्राप्त झालेले आहेत हे स्पष्ट होते. तक्रारदाराला सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवल्याचे तक्रारदारतर्फे सिध्द न झाल्याने तक्रारदाराचे तक्रार फेटाळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. त्या दृष्टीकोनातून आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब आदेश.
- अंतिम आदेश -
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. खर्चाबद्दल हुकूम नाही.
Prounounced on dated 29-06-2012