(दि. 11/06/2012) द्वारा : मा. अध्यक्ष, श्री.एम.जी.राहटगांवकर 1. तक्रारदाराचे कथन थोडक्यात खालील प्रमाणे- त्याचे जवळ विरुध्द पक्ष क्र. 1 व विरुध्द पक्ष क्र. 2 याचे क्रडिट कार्ड होते. दि.10/07/2010 रोजी त्याने या कार्डाचा वापर करुन विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेकडुन मुंबई-कोची-मुंबई असे विमानाचे 3 प्रवाशांचे तिकीट ऑनलाईन बुकींग पध्दतीने इन्टरनेटद्वारा काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे 8 ते 10 वेळा क्रेडिट कार्डाचा वापर करुनही विमानाचे तिकिट तयार होऊन मिळाले नाही. मात्र त्याचे क्रेडिट कार्ड खात्यातुन रु.10,050/- तिकिटासाठी खर्च झाल्याचे विरुध्द पक्ष क्र. 1 ने नमुद केले. रु.1,04,000/- तिकिटासाठी खर्च झाल्याचे विरुध्द पक्ष क्र. 2 ने नमुद केले. ए.बी.एन ऑम्रो क्रडिट कार्डातुन रु.20,100/- याच कामासाठी खर्च झाल्याचे व स्टॅर्डड चार्टड बँकुतुन रु.10,050/- याच कामी खर्च झाल्याचे नमुद करण्यात आले. प्रत्यक्षात तिकिट न मिळता त्यांच्या क्रेडिट कार्डातुन या रक्कमा खर्च झाल्याचे दाखवुन विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने रकमेची मागणी केली. दि.14/06/2006 ते 03/07/2006 या कालावधीतील क्रेडिट कार्ड खाते उतार्याचे आधारे त्याला या सर्व गोंधळाची कल्पना आली. त्याने विरुध्द पक्षाकडे संपर्क साधला विरुध्द पक्ष क्र. 2 ने रु.60,000/- त्याचे खात्यात परत जमा दाखवली व विरुध्द पक्ष क्र.1 ने त्याचे तक्रारीची दखल घेतली नाही. या उलट विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने जोरजबरदस्तीने या रक्कमेची त्याचेकडे सातत्याने मागणी केली. 2. त्याचे पुढे म्हणणे असे की विरुध्द पक्ष क्र. 1 व विरुध्द पक्ष क्र. 2 यांची स्वतःची चुक असतांना ती दुरूस्त करण्याऐवजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 4 कडे चुकीचा अहवाल पाठवला या अहवालानुसार तो थकबाकीदार असल्याचे कळविल्यामुळे त्याला व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेमधुन नविन क्रेडिट कार्ड मिळाले नाही व त्याची बदनामी झाली त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार विरुध्द पक्ष दोषपुर्ण सेवासाठी जबाबदार असल्याचे मंचाने जाहीर करावे. रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच खर्च मंजुर करावा अशी तक्रारदाराची मागणी आहे. निशाणी 2 अन्वये तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 5 अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. 3. विरुध्द पक्षाने आपले लेखी जबाब दाखल केले. त्यांचा भर प्रामुख्याने सदर प्रकरण मुदतबहाय्य असल्याने मंचाने प्रकरण खारीज करावे यावर आहे. इतर मुद्दांचा गुणवत्तेच्या आधारे विचार करण्याआधी मंचाने प्रकरण मुदतीत दाखल आहे की नाही याचा विचार प्रथम करावा असा युक्तिवाद मंचासासमोर विरुध्द पक्षाने केला. मंचाच्या मते देखिल सदर प्रकरणी हा मुद्दा प्रथम निकाली काढणे आवश्यक आहे, कारण या मुद्दाच्या निष्कर्षावर तक्रारीतील पुढील भाग अवलंबुन आहे. सबब खालील मुद्दाचा मंचाने विचार केला. 1. सदर तक्रार मुदतबहाय्य आहे काय? उत्तर - होय. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 - मंचाने सदर मुद्दा संदर्भात सर्व पक्षांचा तपशिलवार युक्तिवाद ऐकला त्याचप्रमाणे त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. त्या आधारे असे निदर्शनास येते की, किंगफिशर एयरलाईन्स (विरुध्द पक्ष क्र. 3) यांच्या मुंबई-कोची-मुंबई विमान प्रवासाचे तिकिटे दि.10/07/2010 रोजी तक्रारदाराला काढायची होती त्याचेकडे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांची क्रेडिट कार्ड होते त्याने आपल्या तक्रारीच्या परीच्छेद क्र. 4 मध्ये नमुद केल्यानुसार 8 ते 10 वेळा क्रेडिट कार्डाचा वापर केला मात्र इंटरनेट प्रणालीद्वारा अँनलाईन बुकींगद्वारा विमान प्रवासाची तिकिटे त्याला मिळली नाही मात्र त्याचे खात्यातुन दोन्ही बँकांनी रक्कम तिकिटासाठी खर्च झाल्याच्या नोंदी केल्या. ही गळबळ विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे क्रेडिट कार्डाचे खाते उतारे पहातेच त्याच्या निदर्शनास आले. त्याने स्वतः तक्रारीचे परिच्छेद क्र. 11 मध्ये बँकेकडुन दि.14/06/2006 ते 13/07/2006 या कालावधीचे बिल व खाते उतारा विरुध्द पक्ष 1 कडुन त्याला मिळाला. तसेच त्यानंतच्या दि.14/07/2006 ते 12/08/2006 या काळातील क्रेडिट कार्ड खाते उतारा त्याला प्राप्त झाला व त्या वेळेस हा गोंधळ त्याचे लक्षात आला असे म्हटले आहे. थोडक्यात आपले क्रेडिट कार्ड खात्यातुन अकारण रक्कम तिकिट खरेदीसाठी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने दाखवली मात्र प्रत्यक्षात तिकिट मिळाले नाही ही बाब त्याला सर्व प्रथम 2006 साली क्रेडिट कार्ड खातेउतारा मिळते बरोबर समजली होती. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने या रक्कमेसाठी त्याचे कडे तगादा लावला होता हे देखिल त्याने नमुद केले आहे म्हणजेच उभय पक्षातील वाद निर्माण होण्यास कारण 2006 साली घडले व त्याची माहिती देखील तक्रारदारास 2006 साली होती त्यामुळे मंचाच्या मते ऑगष्ट 2006 ते ऑगष्ट 2008 या 2 वर्षाच्या कालावधीत त्याने तक्रार दाखल करणे ग्राहक कायद्याचे तरतुदीनुसार आवश्यक होते. तक्रारीचे परिच्छेद क्र.20 मध्ये त्याने अशी भुमीका मांडली आहे की, दि.24/01/2011 रोजी त्याने विरुध्द पक्ष 1 व 2 ला नोटिस पाठवली त्या दिवसापासुन वादाचे कारण निर्माण झाले असे समजण्यात यावे. मंचाच्या मते त्याचे हे म्हणणे वस्तुस्थिती विसंगत तसेच तर्क विसंगत आहे. विरुध्द पक्ष क्र. 4 कडे थकबाकीदार असल्याचा अहवाल गेल्यामुळे त्याला पंजाब बँकेचे क्रेडिट कार्ड मिळाले नाही व त्याची बदनामी झाली म्हणुन दि.24/01/2011 रोजी नोटिस पाठवली त्या दिवसापासुन वादाचे कारण घडले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मंचाच्या मते त्याचे हे म्हणणे न पटण्यासारखे असल्याने मान्य करता येत नाही. प्रत्यक्षात त्याचे खात्यातुन जास्त रक्कम काढण्यात आली ही बाब त्याला जेव्हा समजली म्हणजेच 2006 साली वादाचे कारण उदभवले मात्र ही तक्रार 2011 साली दाखल केल्याने ती निश्चीतपणे मुदतबहाय्य आहे असे सिध्द होते. 4. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.मुदतबहाय्य असल्याने खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभय यपक्षांनी स्वतः करावे. |