तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदाराकडून क्रेडीट कार्ड घेतले होते. त्याबाबत तक्रारकर्त्यांना गैरअर्जदारांनी मागणीचे देयक जास्तीचे दिले आहे असे त्यांनी सांगितल्यावर, गैरअर्जदारांनी दि.23.07.2008 रोजी पत्र देऊन रु.16,000/- 30.08.2008 पर्यंत जमा केले तर सदर हीशोब बंद करण्यात येईल असे तक्रारकर्त्याला कळविले. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यापैकी रु.12,000/- धनादेशाद्वारे त्या तारखेच्या आत दिले. गैरअर्जदारातर्फे श्री. तिवारी नावाचे व्यक्तीने रु.2,000/- दोनवेळेस सदर तारेखपूर्वी घेऊन गेले. त्यामुळे तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण रक्कम दिलेली आहे. गैरअर्जदार मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे घेणे नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र देत नाही, म्हणून त्यांनी सदर तक्रार दाखल केली आणि त्याद्वारे गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे ठरवावे, ना देय प्रमाणपत्र द्यावे, मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळावी आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. गैरअर्जदारांनी हजन होऊन उत्तर दाखल केले. त्यांनी तक्रारीतील विपरीत विधाने नाकबूल केली. तक्रारकर्त्याने प्रस्तावित तारखेच्या आत रक्कम जमा केली नाही व दाखल केलेल्या दोन पावत्या खोटया आहेत आणि त्या पावत्या देणारी व्यक्ती त्यांचा अभिकर्ता नाही आणि म्हणून त्यांना त्या मान्य नाहीत, अशा स्वरुपाचा उजर घेतला व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. मंचाने सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- मंचासमक्ष आलेली वस्तूस्थिती अशी आहे की, तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराने रु.16,000/- दि.30.08.2008 पूर्वी जमा करण्याचा प्रस्ताव दिला. त्यापैकी रु.12,000/- धनादेशाद्वारे दिले. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या रु.4,000/- च्या पावत्या गैरअर्जदारांच्या अभिकर्त्याने दिल्या. असे असले तरीही तक्रारकर्त्याने, त्या पावत्या गैरअर्जदार विचारात घेण्यास तयार नसल्याने, रु.4,000/- 29.09.2008 ला दिले व गैरअर्जदार सदर रक्कम मिळाल्याचे मान्य करतात. गैरअर्जदारांच्या वकिलांनी असे मान्य केले आहे की, सदर प्रकरणात त्यांना पैसे मिळालेले आहे. त्याप्रमाणे गैरअर्जदारांनी ’ना देय प्रमाणपत्र’ दिलेले आहे. या प्रकरणात गैरअर्जदारांची सेवेत कोणतीही त्रुटी आहे असे मंचास दिसत नाही. गैरअर्जदाराने सद्य परिस्थतीत प्रस्ताव दिला व त्याप्रमाणे रक्कम स्विकारली व उशिरा रक्कम स्विकारुनही ना देय प्रमाणपत्र दिले आहे आणि आज मंचासमोर प्रमाणपत्र आणलेले आहे. सदर प्रकरणातील वाद व वादातील बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या दोन पावत्या प्रकरणात दाखल आहेत, त्या गैरअर्जदारांच्या अभिकर्त्याने म्हणजे श्री. तिवारी नावाचे इसमाने त्यांना दिल्या आहेत व तक्रारकर्त्याकडून रु.2,000/- प्रत्येकी दोनवेळेस दि.27.08.2008 व 30.08.2008 रोजी घेतलेले आहेत. गैरअर्जदार ही बाब नाकारीत आहेत. याचाच अर्थ असा होतो की, या प्रकरणात श्री. तिवारी नावाचे व्यक्ती तक्रारकर्ता वा गैरअर्जदार किंवा दोघेही यांची फसवणूक करीत आहे आणि ही गंभीर स्वरुपाची बाब असल्यामुळे आवश्यक ती चौकशी व पोलीस कारवाई होणे गरजेचे आहे असे मंचाचे मत आहे. सदर आदेशाद्वारे गैरअर्जदारांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी सदर तिवारी नावाचे इसमाविरुध्द क्राईम ब्रांच, नागपूर यांचेकडे तक्रार दाखल करावी व त्यांच्या गैरकृतीबद्दल चौकशीची मागणी करावी. क्राईम ब्रांचने या कृतीची गंभीर दखल घेऊन योग्य ती तर्कसंगत कायदेशीर कारवाई करावी. तक्रारकर्त्याने विवादित मुळ दस्तऐवज सांभाळून ठेवावे व चौकशीचे वेळेस सहकार्य करावे. वरील सर्व वस्तूस्थितीच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे त्या ना देय प्रमाणपत्र मिळालेले असल्याने तक्रार निकाली काढण्यात येते. 2) गैरअर्जदाराने CIBIL (डिफॉल्टर यादी) कडे तक्रारकर्त्याचे नाव कळविले आहे, ते त्यातून वगळण्याची कारवाई करावी. 3) तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |