निकाल
पारीत दिनांकः- 11/07/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार क्र. 1 या मयत श्री सतीश किसनराव टकले यांच्या पत्नी असून तक्रारदार क्र. 2 व 3 ही त्यांचे मुले आहेत. मयत श्री सतीश किसनराव टकले यांनी त्यांची पत्नी तक्रारदार क्र. 1 यांच्यासह एच.डी.एफ.सी. लि. कडून सदनिका क्र. बी-9/10, दुसरा मजला, समर्थ संकुल प्लॉट क्र. 55, ए.एम.कॉलेजजवळ, मांजरी रोड, हडपसर, पुणे – 411028 खरेदी करण्यासाठी संयुक्तीकपणे रक्कम रु. 7,00,000/- चे गृहकर्ज घेतले होते. सदरच्या कर्जाकरीता त्यांनी जाबदेणारांकडून ग्रुप लाईफ इन्शुरन्स पॉलिसीही घेतली होती व त्याचा वन टाईम प्रिमिअम रक्कम रु. 39,934/- दि. 18/11/2004 रोजी भरला होता. दि. 16/5/2006 रोजी विमाधारक श्री सतीश किसनराव टकले यांचा मृत्यु झाला. त्यानंतर दि. 7/6/2006 रोजी तक्रारदारांनी एच.डी.एफ.सी. लि. मार्फत जाबदेणारांकडे क्लेम दाखल केला. परंतु जाबदेणारांनी दि. 31/7/2006 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा क्लेम खालील कारणावरुन नाकारला.
“late Mr. Satish Takale was suffering from Alcoholic Liver
Disease with Cirrhosis of Liver with PHT with upper GI
bleed and was treated prior to proposing for the policy
and therefore the declaration made by him of good health
was not proper.”
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी कुठलेही मेडीकल चेक-अप न करता प्रिमिअमची रक्कम घेतली व पॉलिसी दिली. मयत श्री सतीश किसनराव टकले हे पॉलिसी घेण्याआधीपासून Liver Cirrhosis ने आजारी नव्हते. त्यामुळे जाबदेणारांनी बेकायदेशिरपणे आणि चुकीच्या कारणावरुन त्यांचा क्लेम नाकारला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून सम अॅशुअर्डची रक्कम द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 5000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मयत श्री सतीश किसनराव टकले यांनी प्रपोजल फॉर्म भरताना त्यांच्या पूर्वीच्या आजाराबद्दलची माहिती दडविली. फॉर्मच्या सेक्शन 3 मधील डिक्लरेशनवर इन्शुरन्सचा करार आधारीत आहे व डिक्लरेशननुसारच त्यांनी मयत श्री सतीश किसनराव टकले यांना पॉलिसी दिलेली आहे व त्यानंतर तक्रारदारांना “Liver Cirrhosis with Hepatic Encephalopathy with GI Bleed” हा आजार आहे व पॉलिसी घेण्यापूर्वी त्यांनी या आजाराकरीता उपचार घेतले आहे, हे उघड झाले. तक्रारदारांनी जेव्हा क्लेम त्यांच्याकडे दाखल केला, त्यावेळी त्यांनी केलेल्या तपासामध्ये विमाधारकाने जहांगिर हॉस्पिटलमध्ये डॉ. देशपांडे व दि. 5/9/2002 रोजी डॉ. कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. तेथील केस पेपर्सवर मयत श्री सतीश किसनराव टकले हे ‘क्रोनिक अल्कोहोलिक’ होते असा उल्लेख आढळतो. त्यामुळे त्यांनी तक्रारदारांचा क्लेम पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार नाकारला व ते योग्य आहे. म्हणून प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्यापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. विमाधारक मयत श्री सतीश किसनराव टकले यांनी जहांगिर हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या उपचारांच्या केस पेपर्सच्या प्रती जाबदेणारांनी दाखल केलेल्या आहेत. दि. 5/9/2002 रोजीच्या केस शीटमध्ये “chronic alcoholic + tobacco chewer, c/o haematemesis 3 times” असे नमुद केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे, दि. 5/9/2002 रोजीच्याच सोनोग्राफीच्या अहवालामध्ये “Patient is alcoholic with complaint of haematemesis” व IMP : LIVER CIRRHOSIS WITH EARLY PORTAL HYPERTENSION” असे नमुद केल्याचे दिसून येते. मयत श्री सतीश किसनराव टकले यांनी वरील उपचार सन 2002 मध्ये घेतलेले आहेत व सन 2004 मध्ये पॉलिसी घेतलेली आहे आणि पॉलिसी घेतेवेळी विमाधारकाने त्यांच्या पूर्वीच्या आजाराबद्दल व जहांगिर हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या उपचाराबद्दलची माहिती डिक्लरेशन फॉर्ममध्ये नमुद केली नाही/दडवून ठेवली. जाबदेणारांनी क्लेमबाबत सर्व चौकशी केली तेव्हा या सर्व बाबी उघड झाल्या. वर नमुद केलेले कागदपत्रांची पाहणी केली असता, तक्रारदारांना LIVER CIRRHOSIS हा आजार पूर्वीपासूनच होता, हे स्पष्ट होते. पॉलिसीच्या अटी व शर्ती या दोन्ही बाजूंवर बंधनकारक असतात. त्यामुळे जाबदेणारांनी पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसारच तक्रारदारांचा क्लेम नाकारला आणि ते योग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.