न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य, यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार जाबदार क्र.1 ते 14 विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांचे तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
2. तक्रारदार हे शुक्रवार पेठ सातारा येथील रहिवासी असून त्यानी त्यांचे भविष्यकालीन बचत व भविष्यकालीन आर्थिक तरतूद या हेतूने मूलतः भैरवनाथ ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. करंजे तर्फ सातारा यांचेकडे खालील तपशीलाप्रमाणे मुदतबंद ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेव परतीचा दिनांक | व्याजदर टक्के |
1 | 0090 | 15,000/- | 13-6-2003 | 13-7-2004 | 13 |
2 | 0095 | 15,000/- | 9-8-2003 | 17-8-2005 | 13 |
3 | 0099 | 3,000/- | 16-9-2003 | 17-9-2005 | 13 |
4 | 0169 | 25,000/- | 03-11-2004 | 3-11-2005 | 13 |
5 | 0180 | 20,000/- | 18-1-2005 | 18-6-2005 | 13 |
येणेप्रमाणे तपशीलातील रकमा तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेकडे मुदत स्वरुपात ठेवलेल्या होत्या, त्याची मुदत पूर्ण झालेवर तक्रारदारानी जाबदाराकडे ठेवीच्या रकमांची मागणी केली. परंतु जाबदारानी त्यांच्या ठेवी आज देतो, उदया देतो असे करीत देणेचे टाळले. दरम्यानचे काळात विषयांकित भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था ही सध्याच्या दि गुजराथी अर्बन को.ऑ.क्रे.सोसायटी यामध्ये विलीन झालेचे समजले. त्यामुळे या गुजराथी अर्बन सोसायटीकडे तक्रारदारानी त्यांच्या ठेवीची मागणी केली. त्यानीही वारंवार ठेवीच्या रकमा तक्रारदाराना देणेस नकार दिला. वास्तविक गुजराथी अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसायटी यानी मूळ भैरवनाथ पतसंस्थेच्या संपूर्ण येणेदेणेच्या सर्व जबाबदा-यांसह विलीनीकरण स्विकारले होते परंतु त्यानी त्यांची जबाबदारी पार न पाडता तक्रारदारानी मागणी करुनही ठेवीच्या रकमा दिल्या नाहीत, त्यामुळे त्यानी मूळ पतसंस्था गुजराथी अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसायटीमध्ये विलीन झालेनंतर त्याना त्यांचेविरुध्द या मंचात दाद मागून त्यांच्या ठेवीच्या रकमा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. जाबदारांनी तक्रारदारांना त्यांच्या कायदेशीर देय ठेवीच्या रकमा परत न देऊन तकारदाराना सदोष सेवा दिलेमुळे तक्रारदारानी या मंचात जाबदाराविरुध्द दाद मागितली आहे व जाबदाराकडून त्यांच्या ठेव ठेवलेल्या दिनांकापासूनच्या रकमा रक्कम हाती पडेपर्यंतच्या द.सा.द.शे.12 टक्के दराने होणा-या व्याजासह मिळाव्यात, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, अर्ज खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेची विनंती मंचास केली आहे.
3. तक्रारदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारीचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि. नि.5/1 ते 5/5 कडे ठेवीच्या मूळ पावत्या पुराव्यासाठी दिल्या असून नि.5/6 कडे तक्रारदारानी दि.16-11-2013 रोजी जाबदाराना पाठवलेली वकीलांतर्फे नोटीस व त्या नोटिसीस दि.30-11-2013 रोजी जाबदारानी दिलेली उत्तरी नोटीस, नि.5/7 कडे दाखल असून त्यानी त्यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र नि.12 व 13 कडे दिलेले असून लेखी युक्तीवाद नि.14 कडे दाखल केला आहे.
4. सदर प्रकरणाच्या नोटीसा मंचातर्फे यातील जाबदार 1 ते 14 याना रजि.पोस्टाने काढण्यात आल्या. सदरच्या नोटीसा जाबदाराना मिळाल्याच्या पोस्टाच्या पोचपावत्या नि.16/1 ते नि.16/11 कडे दाखल असून यातील जाबदार क्र.2 ते 14 चे वतीने अँड.डी.एच.पवार यांनी नि.18 कडे वकीलपत्र दाखल केले असून ते जाबदार क्र.2 ते 14 तर्फे दाखल केले आहे. जाबदार 1 यानी यापूर्वी त्यांचे म्हणणे नि.9 व प्रतिज्ञापत्र नि.10 कडे दाखल केले असून नि.17 कडे जाबदार क्र.2 ते 14 यानी जाबदार क्र.1 यांनी नि.9 कडे दाखल केलेले म्हणणे व प्रतिज्ञापत्र हेच जाबदार 2 ते 14 यांचे म्हणणे समजणेत यावे अशी पुरसीस दिली. त्यामुळे या सर्व जाबदारांचे म्हणणे म्हणून नि.9 कडील जाबदारांचे म्हणणे व प्रतिज्ञापत्राचा विचार करता जाबदारानी खालीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत-
जाबदारांचे सोसायटीत भैरवनाथ ग्रा.बि.शे.पतसंस्था विलीन झाली आहे हे मान्य आहे. तक्रारदारांच्या सर्व पावत्या मुदतबाहय झाल्यामुळे व 8 ते 9 वर्षाचा काळ पावत्याना लोटल्यामुळे त्या मुदतबाहय झाल्या आहेत, त्यामुळे तक्रार फेटाळणेस पात्र आहे, सबब ती फेटाळावी. सहकार कायदा कलम 164 प्रमाणे या प्रकरणाची नोटीस तक्रारदारानी जाबदाराना दिलेली नव्हती. त्यामुळे तक्रारअर्ज फेटाळावा असे आक्षेप जाबदारानी नोंदवलेले आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार व जाबदारांचे आक्षेप विचारात घेता सदर प्रकरणाचे निराकरणार्थ आमचेपुढे खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारांनी तक्रारदारांच्या ठेवी बेकायदेशीर कारणे दाखवून
ठेवीच्या रकमा देणेचे नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम निर्णय काय? तक्रार अंशतः मंजूर.
6. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3
यातील मूळ पतसंस्था भैरवनाथ ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था ही आर्थिक संस्था असून संस्थेच्या भांडवलवृध्दीसाठी व व्यवसाय वाढीसाठी त्याना रकमेची आवश्यकता भासते. सदरची पैशाची गरज ते जनतेतून ठेवस्वरुपात रकमा गोळा करुन मुदतबंद स्वरुपात ठेवून घेऊन दिलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने ती सव्याज परत करणे हा वरील पतसंस्थेचा व्यवसाय आहे. हाच व्यवसाय प्रस्तुत जाबदारांचाही आहे. जाबदारानी तक्रारदारांना दिलेल्या ठेवपावतीचे स्वरुप पाहिले असता तो एक प्रकारचा उभयतातील करारनामा असून तक्रारदारानी त्यांचेकडे ठेवलेल्या ठेवरकमेची मुदतपूर्तीनंतर सव्याज परत करणेचे वचन दिलेले असते. अशा प्रकारची सेवा जाबदार तक्रारदार-ठेवीदाराना देत असतात. या व्यवहारावरुन तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असलेचे निर्विवादरित्या शाबीत होते. सदर कामी तक्रारदारांची मूळ पतसंस्था भैरवनाथ ग्रा.बि.शे.सह.मर्या.ही प्रस्तुत जाबदारांच्या पतसंस्थेत विलीन झाली आहे. जाबदारांनी मूळ भैरवनाथ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे देणे व इतर सर्व जबाबदा-यांसह त्यांच्यात विलीन झाली असल्याने सदरच्या ठेवीची रक्कम देणेची जबाबदारी निःसंशयरित्या जाबदारांवर येते हे स्पष्ट होते. तक्रारदारानी यातील जाबदारांकडे त्यांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवीची रक्कम वारंवार मागणी करुनही जाबदारानी तक्रारदाराना दिली नाही. त्यानंतर तक्रारदारानी नि.5/6 प्रमाणे जाबदारांना दि.26-11-13 रोजी नोटीस पाठवून ठेवीच्या रकमांची मागणी केली, तरीही जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम जाबदारानी परत केली नाही. त्यामुळे सदर जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही अंशतः मंजुरीस पात्र असून तक्रारदार हे त्यांच्या निकालपत्रात दर्शवलेल्या तपशीलाप्रमाणे ठेवीच्या रकमा मिळणेस पात्र आहेत. मुदत पूर्ण झालेल्या ठेवी जाबदारांकडून वेळेत न मिळाल्याने निःसंशयरित्या तक्रारदाराना त्यांच्या सांसारिक जीवनात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला त्यामुळे त्याना शारिरीक, मानसिक त्रास झालेचे शाबित होते, त्यामुळे त्यापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच आला आहे. मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7. प्रस्तुत जाबदारानी त्यांचे म्हणणे नि.9 कडे म्हणणे व नि.10 कडे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामध्ये जाबदार हे मूळ संस्थेचे विलीनीकरण सदर जाबदार संस्थेत झालेचे मान्य करतात परंतु त्यांचा मुख्य आक्षेप तक्रारदारांच्या ठेवी मुदत संपून 8-9 वर्षाचा काळ झाला असल्याने त्या देता येणार नाहीत व तक्रार फेटाळून लावावी, परंतु आमचे मते जोपर्यंत जाबदार पतसंस्था तक्रारदारांच्या ठेवी सव्याज परत करीत नाहीत तोपर्यंत सदर ठेवीच्या अर्जाला मुदतीची बाधा येत नाही. कारण मुदत पूर्ण झालेल्या दिवसापासून तक्रारदार हे जाबदाराकडे पैसे मिळणेसाठी वारंवार हेलपाटे मारत होते. 2013 मध्ये वकीलामार्फत तक्रारदारानी नोटीसही दिली आहे. तरीही ठेवीचे पैसे जाबदारानी तक्रारदारास अदा केले नाहीत त्यामुळे त्यास मुदतीची बाधा येत नाही. त्याचप्रमाणे जाबदार संस्थेविरुध्द तक्रार करणेपूर्वी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 164 प्रमाणे नोटीस देणे आवश्यक होते ती दिली नसल्याने सदरची तक्रार चालत नाही असाही आक्षेप जाबदारानी नोंदवला आहे परंतु तक्रारदारानी संस्थेच्या व्यवसायाला कोठेही हात घातला नसल्याने व ग्राहक या नात्याने ते ठेवी मागत असल्याने सदर कामी अशा नोटीसीची गरज नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे जाबदारानी सदर कामी नोंदवलेले आक्षेप या ठिकाणी लागू पडत नाहीत. त्याचप्रमाणे प्रस्तुत ठेवी तक्रारदारानी मागणी करुनही जाबदारानी न दिल्यामुळे सदरच्या ठेवी आजही ठेवस्वरुपातच जाबदारांकडे जमा आहेत व या रकमांचा वापर ते संस्थेसाठी करत आले आहेत त्यामुळे आजअखेर मूळ ठेवलेल्या ठेवीच्या रकमा या ठेवस्वरुपातच आजही अस्तित्वात आहेत असे गृहीत धरुन त्यावेळी जाबदारानी सदर ठेवीस दिलेले द.सा.द.शे.13 टक्के व्याज हेच आजअखेर देय रकमेस लागू होते असे मंचाचे स्पष्ट मत आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणे मंचास योग्य व न्याय्य वाटते.
8. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदारांनी तक्रारदारांच्या ठेवी बेकायदेशीर कारणे दाखवून ठेवीच्या रकमा देणेचे नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे असे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.90 ची रक्कम रु.15,000/- त्यावर दि.13-6-2003 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याजाने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या तारखेपर्यंत होणारी संपूर्ण सव्याज रक्कम आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
4. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.95 ची रक्कम रु.15,000/- त्यावर दि.17-8-2004 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याजाने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या तारखेपर्यंत होणारी संपूर्ण सव्याज रक्कम आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
5. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.99 ची रक्कम रु.3,000/- त्यावर दि.17-9-2004 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याजाने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या तारखेपर्यंत होणारी संपूर्ण सव्याज रक्कम आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
6. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.169 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.3-11-2004 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याजाने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या तारखेपर्यंत होणारी संपूर्ण सव्याज रक्कम आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
7. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.180 ची रक्कम रु.20,000/- त्यावर दि.18-1-2005 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याजाने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या तारखेपर्यंत होणारी संपूर्ण सव्याज रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
8. जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारांस अदा करावी.
9. सदर आदेशाचे पालन विहीत मुदतीत जाबदारानी न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
11. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 15-5-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.