(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 22 जुलै, 2011) तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे तक्रारीनुसार तक्रारदाराने गैरअर्जदार यांना खसरा क्रमांक 8 आणि 16, मौजा चिकना, तह. नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील सनराईज लेआऊटमधील भूखंड क्र.12, एकूण क्षेत्रफळ 1550.01 चौरस फुट रक्कम रुपये 6,58,754/- एवढ्या रकमेत खरेदी करण्याचा गैरअर्जदार यांचेशी करार केला. करारानाम्याचे दिवशीपर्यंत तक्रारदाराने बुकींग रकमेपोटी रुपये 1,000/- व करारनाम्याचे वेळी रुपये 2,61,000/- गैरअर्जदार यांना अदा केले व तशी पावती गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिली. उर्वरित रक्कम रुपये 3,97,754/- तक्रारदाराने विक्रीपत्राचे वेळी अदा करावयाचे असे उभय पक्षांत ठरलेले होते. दिनांक 25/2/2010 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे सूचनेवरुन विक्रीपत्राची उर्वरित रक्कम रुपये 3,97,754/- गैरअर्जदारास अदा केली, परंतू वारंवार विनंती केल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्याचे मुळ शेतमालक यांचेसोबत वाद झाल्याने विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नाही असे विक्रीपत्र नोंदवून न देण्याचे कारण सांगीतले व तक्रारदाराची रक्कम व्याजासह परत करण्यात येईल असे आश्वासन दिले. तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही अद्यापपावेतो गैरअर्जदार यांनी सदर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही किंवा त्यांचे नोटीसला उत्तरही दिले नाही आणि तक्रारदाराने गैरअर्जदार यांना दिलेली सदरची रक्कम परत केलेली नाही, ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रारीद्वारा गैरअर्जदार यांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करण्यास मनाई करावी, सदर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून द्यावे आणि विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारदाराने दिलेली रक्कम रुपये 6,58,754/- 24% व्याजासह परत मिळावी, तसेच तक्रारदाराची फसवणूक केल्याबद्दल रुपये 1 लक्ष एवढी रक्कम मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- व तक्रारीचे व नोटीसचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारदाराने सदरची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत करारनाम्याची प्रत, वेळोवेळी दिलेल्या रकमेच्या पावत्या, चेकची प्रत, 7/12 चा उतारा, नोटीस, पोस्टाची पावती, जबाब इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे, गैरअर्जदार यांचे कथनानुसार तक्रारदार हा त्यांचा ‘ग्राहक’ नाही आणि सदर तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. तसेच तक्रार उद्भवन्यास कोणतेही कारण घडलेले नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे सर्वच म्हणणे नाकारलेले आहे आणि सदरची तक्रार दंडासह खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे. // का र ण मि मां सा // . वरील प्रकरणातील एकंदरीत वस्तूस्थिती पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ‘ग्राहक’ आहे. तसेच सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्या खसरा क्रमांक 8 आणि 16, मौजा चिकना, तह. नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील सनराईज लेआऊटमधील भूखंड क्र.12, एकूण क्षेत्रफळ 1550.01 चौरस फुट एकूण रक्कम रुपये 6,58,754/- एवढ्या मोबदल्यात खरेदी करण्याचा गैरअर्जदार यांचेशी करार केलेला होता व दिनांक 10/2/2009 ते 25/2/2010 या कालावधीमध्ये वेळोवेळी मिळून तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना संपूर्ण रक्कम रुपये 6,59,054/- अदा केलेली होती ही बाब कागदपत्र क्र.14 ते 19 वरील पावत्यांवरुन निदर्शनास येते. गैरअर्जदार यांनी वरील बाब नाकारण्या साठी कुठलाही सुस्पष्ट पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. वरील सर्व वस्तूस्थिती व परीस्थिती पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदार यांनी भूखंडाची संपूर्ण रक्कम स्विकारुनही अद्यापपावेतो तक्रारदारास सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही, अथवा तक्रारदाराने गैरअर्जदारास अदा केलेली रक्कम सुध्दा परत केलेली नाही ही गैरअर्जदार यांची कृती त्यांच्या सेवेतील कमतरता आहे व तक्रारदाराचे नुकसान भरपाईस गैरअर्जदार जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास खसरा क्र. 8 आणि 16, मौजा चिकना, तह. नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील सनराईज लेआऊटमधील भूखंड क्र.12, एकूण क्षेत्रफळ 1550.01 चौरस फुट चे विक्रीपत्र नोंदवून द्यावे. कराराप्रमाणे इतर चार्जेस देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. अथवा 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 6,59,054/- एवढी रक्कम परत करावी. सदर रकमेवर रक्कम अदा केल्याचे तारखेपासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द. सा.द.शे. 12% दराने व्याज द्यावे. 4) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- आणि दाव्याचे खर्चापोटी रुपये 2,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 12,000/- (रुपये बारा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |