तक्रारकर्ता तर्फे त्यांचे वकील : श्री.जी.सी.साखरे हजर.
विरूध्द पक्षातर्फे वकील : श्री. एस.बी.राजनकर हजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक 28/11/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेत शिक्षक आहेत. आणि विरूध्द पक्षकार हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा सातगांव ता. सालेकसा जि. गोंदियाचे मुख्य व्यवस्थापक आहे. महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण शिक्षकाचा पगार विरूध्द पक्ष यांच्या बँकेत जमा होतो. सुभाष हॉयस्कूल सावली/डोंगरगांव या शाळेतील सर्व शिक्षक हे त्यांच्या महिन्याचा पगार विरूध्द पक्षकार यांच्या बँकेतून घेतात. तक्रारकर्ता क्र 1 व 2 हे गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँकेचे नियमीत ग्राहक आहेत व त्यांचे बचत खाते गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव शाखेत आहेत. तक्रारकर्ता क्र 1 यांचे खाते क्र. 016030200002093 हा असून तक्रारकर्ता क्र.2 यांचा खाते क्र. 016030200001278 हा आहे.
3. विरूध्द पक्षकार यांनी दि. 23/11/2015 ला तक्रारकर्ता यांना एक नोटीस पाठविली की, श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी दि. 08/04/2004 ला रू. 1,50,000/-,चे कर्ज घेतले. ती संपूर्ण रक्कम बँकेत भरली नाही. बँकेनी श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्यावर कोणतीही कर्ज वसूली करण्याकरीता कोणतीच कार्यवाही केली नाही. बँकेनी जेव्हा श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी आपले ग्रॅज्युटी प्राव्हीडंट फंडाची राशी बँकेत जमा असतांना सुध्दा बँकेनी वसूलीकरीता काहीच कार्यवाही केली नाही. आणि श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी आपली संपूर्ण राशी बँकेतून उचलून टाकली. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्या जवळ तीन ते पाच एकर जमीन आहे. रू. 25,00,000/-, चा बंगला आहे आणि ती सक्षम व्यक्ती आहे. परंतू, बँकेनी आतापर्यंत कर्ज वसूलीकरीता श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर किंवा कुणावरही कोणतीच कार्यवाही केली नाही.
4. विरूध्द पक्षकार यांनी (गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता, सालेकसा जि. गोंदिया व्यवस्थापकाने) यांनी तक्रारकर्ता यांच्या खालील नमूद केल्याप्रमाणे कोणताही कोर्टाचा आदेश न घेता, तक्रारकर्त्याच्या खात्यामधून दुस-या खात्यामध्ये राशी जमा केली व तक्रारकर्त्याला परत केली नाही.
दिनांक | तक्रारकर्त्याचे खाते क्रमांक | कर्ज खाते | जमा केलेली राशी |
25/04/2016 | 2093/1278 | 5802/133 | रू. 6,000/-, |
25/04/2016 | वरीलप्रमाणे | वरीलप्रमाणे | रू. 4,000/- |
03/06/2016 | वरीलप्रमाणे | वरीलप्रमाणे | रू. 6,000/-, |
19/07/2016 | वरीलप्रमाणे | वरीलप्रमाणे | रू. 3,075/-, |
| एकुण रू.19,075/-, |
विरूध्द पक्षांनी वरीलप्रमाणे रू. 19,075/-,इतकी रक्कम कपात करून, तक्रार करणा-यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याकरीता जाणुनबूजुन केले आहे. तक्रारकर्ते हे बँकेचे नियमीत ‘ग्राहक’ आहेत. परंतू एप्रिल 2016 ते जूलै 2016 पर्यंत बँकेनी तक्रारकर्ते यांच्या खात्यामधून कर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये एकुण रू. 19,075/-,जमा केले. विरूध्द पक्षांनी वरील नमूद रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यामधून कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करतांना तक्रारकर्त्याला कळविले आहे. विरूध्द पक्षांनी कोणत्याही कोर्टातुन किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिका-याकडून तक्रारकर्त्याचे विरूध्द आदेश घेतले नाही. तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
5. तक्रारकर्त्याचे खात्यामधून राशी खाते क्र. 5802/133 मध्ये वळती करण्यास विरूध्द पक्षाला मनाई करण्यात यावी. विरूध्द पक्षाला तक्रारकर्त्याचे खा.त्यामधून वळती करण्यात आलेली रक्कम रू. 19,075/-,परत करण्याबाबत आदेश व्हावे. तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबाबत प्रत्येकी रू. 20,000/-,देण्याबाबत विरूध्द पक्षाला आदेशीत करावे.
6. विरूध्द पक्षाचे कथनानूसार तक्रारकर्ते हे सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेत शिक्षक आहेत. विरूध्द पक्षकार हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा सातगांव ता. सालेकसा जि. गोंदियाचे मुख्य व्यवस्थापक आहेत. विरूध्द पक्षकार हि नोंदणीबध्द संस्था आहे आणि त्यामुळे मंचाला प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार नाही आहे.
7. तक्रारकर्त्याचे नियमीत पगार विरूध्द पक्षाचे बँकेतुन होतात. तक्रारकर्ता क्र 1 चा खाते क्र. 016030200002093 व तक्रारकर्ता क्र 2 चा खाता क्र. 016030200001278 हा विरूध्द पक्षाचे बँकेत आहे.
8. दि. 23/11/2015 ला विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नोटीस पाठविली की, ते श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांना दि. 08/04/2004 रोजी रू. 1,50,000/-,चे कर्ज दिले त्यामध्ये ते जामीनदार आहेत. तक्रारकर्त्यानी दि. 08/04/2004 ला विरूध्द पक्ष यांना प्राधीकार पत्र लिहून दिले की, त्यांच्या बँकेच्या सेव्हींग खाते क्र. 2093 मधून कर्ज रक्कम व्याजासह वसुल करावी. तक्रारकर्त्यांनी दि. 08/04/2004 ला कर्जदार श्री. मधुकर पी. ब्राम्हणकर सह Promissory Note आणि जामीनपत्र (Continuity Security ) विरूध्द पक्षाचे नावाने कर्ज वसुलीबाबत लिहून दिली.
9. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी कर्ज रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या नावाने प्राधीकृत तसेच कागदपत्राच्या आधारे विरूध्द पक्षाला तक्रकारकर्त्याच्या खात्यामधून कर्ज रक्कम वसुली करण्याचा कायदेशीर आधिकार आहे. दि. 23/11/2015 ला विरूध्द पक्षाचे वकीलांनी कर्जदार तसेच तक्रारकर्ता यांना नोटीस पाठविली की, कर्जदार यांनी कर्ज रक्कम परत करण्याबाबत कसुर केला आहे. आणि त्यांनी कर्ज रक्कम परतफेड करण्यास कसुर केल्यास, संबधीत कर्ज रक्कम कर्जाच्या दस्तऐवजातील अटीनूसार वसुल करण्यात येतील. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाचे नावाने दिलेल्या प्राधिकृत पत्रानूसार थकीत कर्जाची घ्यावयाची रक्कम व्याजासह तक्रारकर्त्याचे खात्यामधून वसुल करण्यात आली. त्यामुळे विरूध्द पक्षाने बेकायदेशीरपणे रू. 19,075/-, तक्रारकर्त्याच्या खात्यामधून कर्जदाराच्या खात्यामध्ये वळती केले नाही. त्यामुळे विरूध्द पक्षाने कोणतीही सेवेत न्यूनता केली नाही. त्यामुळे विरूध्द पक्षकार तक्रारकर्त्याचे खात्यामधून कर्जदाराचे खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या रू. 19,075/-, 18 टक्के व्याजासह परत करण्यास बाध्य नाही. विरूध्द पक्षांनी कोणतीही सेवेत न्यूनता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
10. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचे वकील श्री. जी.सी.साखरे व विरूध्द पक्षकाराचे वकील श्री. एस.बी.राजनकर यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
11. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्षकाराचे लेखीकैफियतीसोबत इतर दस्ताऐवज, लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः येते |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
12. तक्रारकर्ता क्र 1 व 2 हे सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेत शिक्षक आहेत व ते दरमहा विरूध्द पक्षकार म्हणजे गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया या शाखेतून पगार घेतात. तक्रारकर्ता क्र.1 यांचा बँक खाते क्र. 016030200002093 व तक्रारकर्ता क्र 2 यांचा बँक खाते क्र. 016030200001278 हा आहे. म्हणजे ते विरूध्द पक्षाचे नियमीत ‘ग्राहक’ आहेत व ते विरूध्द पक्षाला मान्य आहे. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे सुभाष हॉयस्कुल डोंगरगांव/सावली या शाळेचे मुख्याधापक होते व त्यांनी विरूध्द पक्षकार गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया या शाखेतून दि. 08/04/2004 ला रू. 1,50,000/-,चे कर्ज घेतले. कर्ज घेतेवेळी तक्रारकर्ता श्री. विनायक आनंदराव येडेवार व या शाळेतील दुसरे शिक्षक श्री. रामकृष्ण इस्तारी रूखमोडे हे जामीनदार होते. तक्रारकर्ता कर्जदार व इतर जामीनदार या तिघांनी दि. 08/04/2004 ला गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक, सातगांव या बँकेशी कर्जाबाबत करारनामा केला होता. तसेच, तक्रारकर्ता यांनी रोख पैसे देणे असल्याबाबतची वचन चिठ्ठी (Promisary Note ) आणि जामीन चालु ठेवण्याबाबत पत्र (Continuing Security) अंमलात आणले होते. सदरची कागदपत्रे/दस्ताऐवज विरूध्द पक्षाने त्यांनी मंचात दाखल केलेल्या लेखीजबाबासोबत दाखल केली आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याचे काहीच आक्षेप नाही.
13. विरूध्द पक्षकार यांनी माहे एप्रिल- 2016 ते माहे जुलै- 2016 दरम्यान तक्रारकर्ता क्र 1 व 2 यांचे खाते क्र.016030200002093 व खाते क्र. 016030200001278 मधून एकुण रू. 19,075/-,कर्जदार यांचे कर्ज खाते क्र. 5802/133 मध्ये वळती केले..
14. कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेतील मुख्याधापक असून ते स्वतः आहरण व संवितरण अधिकारी आहेत व ते सुध्दा विरूध्द पक्षकार गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया यांचे ‘ग्राहक’ असून त्यांचे वेतन जिल्हा बँकेतून होते. कर्जाची परतफेड करण्यात व वसूल करण्यात श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे कर्जदार तसेच आहरण व संवितरण अधिकारी (कार्यालय प्रमुख) या नात्यानी सर्वस्वी जबाबदार आहेत. तसेच विरूध्द पक्षांनी श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्या पगारातुन वसूली करण्यात बेजबाबदारपणा दाखविला आहे. तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांची जमानत घेतली असली तरी, विरूध्द पक्षकार यांनी कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांचेकडून वसुली करण्यास कसुर व डोळेझाक केली आहे असे मंचाचे मत आहे. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्यावर कोणतीही वसुलीची कार्यवाही न करता, तक्रारकर्ता क्र 1 व 2 यांचे खातेमधून रू. 19,075/-,कर्जदार यांचे खाते क्र. 5802/133 या खात्यामध्ये वळती करून, कर्ज वसुलीची कारवाई करणे हि विरूध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता आहे.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याच्या खात्यामधून कर्जदाराच्या खात्यामध्ये वळती केलेली रक्कम रू. 19,075/-,दि. 25/04/2016 पासून 6 टक्के व्याजासह परत करावी.
3. विरूध्द पक्षांनी कर्जाची रक्कम वसुलीची प्रक्रिया प्रचलित नियमांच्या अधीन राहून करावी.
4. विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल तसेच तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रू. 2,000/-,अदा करावे.
5. विरूध्द पक्षांना यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावी. तसे न केल्यास, त्या रकमेवर 9 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
6. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
5. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.