तक्रारकर्ता तर्फे वकील : श्री. जी.सी. साखरे हजर.
विरूध्द पक्षातर्फे वकील : श्री. एस.बी.राजनकर हजर.
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री.सु.रा.आजने सदस्य , -ठिकाणः गोंदिया
न्यायनिर्णय
(दिनांक 28/11/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेत शिक्षक आहे. शासनाकडून संपूर्ण शिक्षकाचा पगार विरूध्द पक्ष यांच्या बँकेत जमा होतो. सुभाष हॉयस्कूल सावली/डोंगरगांव या शाळेतील सर्व शिक्षक हे त्यांच्या महिन्याचा पगार विरूध्द पक्षकार यांच्या बँकेतून घेतात. तक्रारकर्ता श्री. रामकृष्ण इस्तारी रूखमोडे हे सुध्दा त्यांचा मासिक पगार गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव या शाखेतून दरमहिन्याला घेतात व त्यांचा बँक खाते क्र. 016030200001278 हा आहे. म्हणजे तो विरूध्द पक्षांचा नियमीत ग्राहक आहे. त्यामुळे तक्रारकर्ता गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांवचा नियमीत ‘ग्राहक’ आहे. तक्रारकर्ता व विरूध्द पक्षकार हे गोंदिया जिल्हयातील कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे सदर तक्रार जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रात येत असल्यामूळे मंचात दाखल करण्यात आली आहे.
3. विरूध्द पक्षकार यांनी दि. 23/11/2015 ला तक्रारकर्ता यांना एक नोटीस पाठविली की, श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी दि. 08/04/2004 ला रू. 1,50,000/-,चे कर्ज घेतले. ती संपूर्ण रक्कम बँकेत भरली नाही. बँकेनी श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्यावर कोणतीही कर्ज वसूली करण्याकरीता कोणतीच कार्यवाही केली नाही. बँकेनी जेव्हा श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी आपले ग्रॅज्युटी प्राव्हीडंट फंडाची राशी बँकेत जमा असतांना सुध्दा बँकेनी वसूलीकरीता काहीच कार्यवाही केली नाही. आणि श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी आपली संपूर्ण राशी बँकेतून उचलून टाकली. परंतू, बँकेनी त्यांच्या कर्जखात्यामध्ये जमा केली नाही. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्या जवळ तीन ते पाच एकर जमीन आहे. रू. 25,00,000/-, चा बंगला आहे आणि ते सक्षम व्यक्ती आहेत. परंतू, बँकेनी आतापर्यंत कर्ज वसूलीकरीता श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर किंवा कुणावरही कोणतीच कार्यवाही केली नाही.
4. तक्रारकर्ता हा या शाखेचा नियमीत ग्राहक असल्यामूळे दि. 06/01/2016 ला गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता, सालेकसा जि. गोंदिया मधून शेतीच्या कामाकरीता आवश्यकता होती म्हणून धनादेश क्र. 016234 रू. 15,000/-,चा राशी ट्रॉन्सपर करण्याकरीता लावला होता. परंतू तक्रारकर्त्याचा धनादेश गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांवने परत केला. तक्रारकर्त्याने जेव्हा वरील धनादेश त्यांची राशी ट्रॉन्सपर करण्याकरीता बँकेत लावली तेव्हा तक्रारकर्त्याचे संपूर्ण पगार बँकेत जमा होती. बँकेनी सदर धनादेश परत करतांनी तक्रारकर्त्याला कोणतीची सूचना दिली नाही किंवा तक्रारकर्त्यानी आपल्या खात्यामधून राशी थांबवावी असे कोणतेही लिखीत किंवा मौखीक सूचना बँकेला दिली नाही.
5. तक्रारकर्त्याने जेव्हा दि. 06/01/2016 ला गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांवमधून रू. 15,000/-,चा धनादेश वटविण्याकरीता बँक ऑफ इंडिया आमगांव या शाखेमध्ये दिले तेव्हा बँक ऑफ इंडियानी तक्रारकर्त्याला दि. 13/01/2016 चा धनादेश परतीचा मेमो दिला. त्यामध्ये Refer to Drawer असे नमूद केले. तक्रारकर्त्याने बॅकेला आपल्या नावाने
कोणताही धनादेश शोधनासाठी आला तर, त्याला थांबवावे किंवा परत करावे अशी कोणतीही लेखी किंवा मौखीक सूचना बँकेला केव्हाही दिली नाही. परंतू, गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांवने रू. 15,000/-,चा तक्रारकर्त्याचा धनादेश कोणतेही आदेश नसतांना सुध्दा धनादेश न वटविता परत केले. विरूध्द पक्षकाराने कोणत्याही मा. कोर्टातुन आदेश सुध्दा प्राप्त केला नाही आणि बँकेच्या अधिकाराचे हनन केले.
6. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला धनादेश परतीचा कारण माहिती करण्याकरीता आणि धनादेशची रक्कम देण्यासाठी वैधानीक नोटीस वकीलामार्फत पाठविली. परंतू, विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याच्या धनादेशाची रक्कम, पुरेशी रक्कम त्याच्या खात्यामध्ये असतांना सुध्दा देण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला व तक्रारकर्त्याला मंचासमोर तक्रार दाखल करण्यास बाध्य केले.
तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केली आहेः-
(अ) तक्रारकर्त्याला धनादेशाची संपूर्ण रक्कम रू. 15,000/- 18 टक्के
व्याजासह परत करावी.
(ब) मानसिक, शारीरीक, आर्थिक नुकसान व त्रासाकरीता रू. 20,000/-
,देण्यात यावे.
(क) तक्रारीचा खर्च देण्यात यावा.
7. विरूध्द पक्षाने आपल्या लेखी जबाब व लेखीकैफियतीमध्ये कबुल केले आहे की, तक्रारकर्ता हा सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली. ता. देवरी जि. गोंदिया या शाळेतील शिक्षक आहे व शिक्षकांचे वेतन विरूध्द पक्ष यांच्या बँकेतून केले जाते. तक्रारकर्त्याला मासिक पगार खाते क्र. 016030200001278 मधून विरूध्द पक्षांच्या बँकेतून मिळते. विरूध्द पक्षकार हा गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया या बँकेचा मॅनेजर आहे याबाबत वाद नाही. विरूध्द पक्षकार हि नोंदणीबध्द सहकारी सोसायटी आहे. मा. मंचाला दाखल तक्रारीचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार नाही.
8. विरूध्द पक्षाने दि. 23/11/2015 ला तक्रारकर्त्याला कायदेशीर नोटीस पाठविली की, दि. 08/04/2004 ला श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी रू. 1,50,000/-,चे कर्ज घेतले त्या कर्जात तक्रारकर्ता श्री. विनायक आनंदराव येडेवारसह जामीनदार आहेत. तक्रारकर्त्याने दि. 08/04/2004 ला विरूध्द पक्षाचे नावाने पगारातुन खाते क्र. 016030200001278 मधून कर्जाची रक्कम व्याजासह कपात करण्याबाबतचे अधिकारपत्र अंमलात आणण्याबाबतचे पत्र दिले याबाबत वाद नाही. कर्जाच्या वसुलीबाबत दि. 08/04/2004 ला कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर तसेच तक्रारकर्ता व दुसरे जामीनदार श्री. विनायक आनंदाव येडेवार यांनी विरूध्द पक्षाचे नावे (Promissory Note) रोख पैसे देणे असल्याबाबतची वचन चिठ्ठी आणि जामीन चालु (Continuity Security) ठेवण्याबाबतचे पत्र अंमलात आणले होते. वरील दोन्ही पत्रे मंचाचे लक्षपूर्ण वाचन्याकरीता दाखल केले आहे. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांनी कर्जाची रक्कम परत केली नाही याबाबत वाद नाही. परंतू श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांची मालमत्ता माहित नसल्यामूळे नाकारण्यात येत आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये निःष्कारण आरोप हे चुकीचे आणि निराधार असल्यामूळे नाकारण्यात येत आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या नावाने दिलेले अधिकारपत्र व इतर कागदपत्रामूळे विरूध्द पक्षकार यांना तक्रारकर्त्याच्या खात्यामधून थकीत कर्जाची रक्कम व्याजासह वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
9. विशेष करून नाकारण्यात येते की, विरूध्द पक्षाने कोणतीही नोटीस किंवा माहिती न देता, धनादेश Refer to Drawer कारणास्तव परत केला. विरूध्द पक्षाच्या विद्वान वकीलाने दि. 23/11/2015 ला अर्जदार/तक्रारकर्ता व दुसरे जामीनदार श्री. विनायक आनंदराव येडेवार यांना नोटीस दिली की, कर्जदार यांनी कर्जाचे परतफेड करण्याबाबत गुन्हा केला आहे. आणि कर्जाची रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी झाला आहे. कर्जाची संबधीत रक्कम, कर्जाच्या दस्तऐवजातील अटीप्रमाणे वसूल करण्यात येते. नमूद करावेसे वाटते की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाचे नावे दिलेल्या अधिकार पत्राप्रमाणे तक्रारकर्त्याचे खाते थकीत कर्जाच्या वसूलीकरीता प्रतीबंधीत करण्यात आली. तक्रारकर्त्याने रक्कम दुस-या खात्यामध्ये वळती करण्याकरीता सादर केलेला धनादेश हा Refer to Drawer हे कारण दाखवून परत करण्यात आला. कोर्टाचा कोणताही आदेश न घेता, विरूध्द पक्षकार, कर्जदार व जमानतदार यांच्याकडून विरूध्द
पक्षकार यांच्या नावे दिलेल्या अधिकारपत्र व इतर हमीपत्राच्या द्वारे थकीत कर्जाची रक्कम तक्रारकर्ता व जमानतदार यांच्याकडून वसूल करण्यास विरूध्द पक्षकार कायदेशीर पात्र आहे. विरूध्द पक्षाने कोणत्याही प्रकारे सेवेत न्यूनता केली नसून, तक्रारकर्ता रू. 15,000/-,18 टक्के व्याजासह परत मिळण्यास कायदेशीर पात्र नाही. तक्रार खारीज करून, विरूध्द पक्षकार न्यायीक दृष्टीने भरपाई मिळण्यास पात्र आहे.
10. तोंडीयुक्तीवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचे वकील श्री. जी.सी.साखरे व विरूध्द पक्षकाराचे वकील श्री. एस.बी.राजनकर यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
11. प्रस्तुत मंचाने तक्रारकर्त्यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्षकाराचे लेखीकैफियतीसोबत इतर दस्ताऐवज, लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले आहे. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्रा.सं.कायदा कलम 2(1),डी प्रमाणे ग्राहक होतात काय? | होय. |
2. | विरूध्द पक्षकारांनी तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कसुर केली ही बाब तक्रारकर्ता सिध्द करतात काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
12. तक्रारकर्ता हा सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेत शिक्षक आहे व तो दरमहा विरूध्द पक्षकार म्हणजे गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया या शाखेतून पगार घेतो. त्याचा बँक खाते क्र. 016030200001278 हा आहे. म्हणजे तो विरूध्द पक्षाचा नियमीत ‘ग्राहक’ आहे व ते विरूध्द पक्षाला मान्य आहे. श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे सुभाष हॉयस्कुल डोंगरगांव/सावली या शाळेचे मुख्याधापक होते व त्यांनी विरूध्द पक्षकार गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया या शाखेतून दि. 08/04/2004 ला रू. 1,50,000/-,चे कर्ज घेतले. कर्ज घेतेवेळी तक्रारकर्ता श्री. रामकृष्ण इस्तारे रूखमोडे व या शाळेतील दुसरे शिक्षक श्री. विनायक आनंदराव येडेवार हे जामीनदार होते. तक्रारकर्ता कर्जदार व इतर जामीनदार या तिघांनी दि. 08/04/2004 ला सातगांव या बँकेशी कर्जाबाबत करारनामा केला होता. तसेच, तक्रारकर्ता यांनी रोख पैसे देणे असल्याबाबतची वचन चिठ्ठी (Promisary Note ) आणि जामीन चालु ठेवण्याबाबत पत्र (Continuing Security) अंमलात आणले होते. सदरची कागदपत्रे/दस्ताऐवज विरूध्द पक्षाने त्यांचे मंचात दाखल केलेल्या लेखीजबाबासोबत दाखल केली आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याचा काहीच आक्षेप नाही.
13. तक्रारकर्ता हा बँकेचा नियमीत ‘ग्राहक’ असल्याने दि. 06/01/2016 ला शेतीच्या कामासाठी पैशाची आवश्यकता असल्यामूळे धनादेश क्र. 016234 रू. 15,000/-,ची राशी ट्रॉन्सपर करण्याकरीता बँक ऑफ इंडिया आमगाव या शाखेमध्ये दिले तेव्हा बँक ऑफ इंडिया आमगाव या शाखेने तक्रारकर्त्याला दि. 13/01/2016 चा धनादेश परतीचा मेमो दिला. त्यामध्ये Refer to Drawer असे नमूद केले. तक्रारकर्त्याने बँकेला आपल्या नावाने कोणताही धनादेश शोधनासाठी आला तर, त्याला थांबवावे किंवा परत करावे अशी कोणतेही लेखी सूचना बँकेला केव्हाही दिली नाही, तरी सुध्दा विरूध्द पक्षाने श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांच्यावर कोणतीही वसुलीची कार्यवाही न करता, तक्रारकर्त्याचे धनादेश न वटविता थांबविणे हे विरूध्द पक्षाच्या सेवेतील न्यूनता आहे.
14. कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे सुभाष हॉयस्कूल डोंगरगांव/सावली ता. देवरी. जि. गोंदिया या शाळेतील मुख्याधापक असून ते स्वतः आहरण व संवितरण अधिकारी (कार्यालय प्रमुख) आहेत व ते सुध्दा विरूध्द पक्षकार गोंदिया जिल्हा, मध्यवर्ती सहकारी बँक सातगांव ता. सालेकसा. जि. गोंदिया यांचे ‘ग्राहक’ असून त्यांचे वेतन जिल्हा बँकेतून होते. कर्जाची परतफेड करण्यात व वसूल करण्यात श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर हे कर्जदार तसेच आहरण व संवितरण अधिकारी (कार्यालय प्रमुख) या नात्यानी सर्वस्वी जबाबदार आहेत. तसेच विरूध्द पक्षांनी त्यांच्या पगारातुन वसूली करण्यात बेजबाबदारपणा दाखविला आहे. तक्रारकर्ता व इतर जामीनदार यांनी कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांची जमानत घेतली असली तरी, विरूध्द पक्षकार यांनी कर्जदार श्री. मधुकर पाडूरंग ब्राम्हणकर यांचेकडून वसुली करण्यास कसुर व डोळेझाक केली आहे असे मंचाचे मत आहे.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती व पुराव्याचा विचार करता, हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहोत.
वरील चर्चेवरून व नि:ष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल तसेच
तक्रारीचा खर्च म्हणून रू. 2,000/-,अदा करावे.
3. विरूध्द पक्षांना यांना आदेश देण्यात येतो की, उपरोक्त आदेशाची पूर्तता
आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावी. तसे न केल्यास, त्या रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करेपर्यंत लागु राहील.
4. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
5. अतिरीक्त संच तक्रारकर्त्याला परत करण्यात यावे.