(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या क्लबचे सभासदत्व घेतले आहे. गैरअर्जदार यांनी कबूल केलेल्या सुविधा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अर्जदाराने त्यांना भरलेली रक्कम परत मागितली. गैरअर्जदार यांनी ती न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्यातर्फे वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या जाहिरातीवरुन व माहिती पुस्तिकेवरुन गैरअर्जदार यांच्या क्लबचे सभासदत्व घेतले. अर्जदाराने दि.06.12.2009 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे, फी म्हणून 70,000/- रुपये जमा केले. गैरअर्जदार यांनी, त्यांना दि.14.12.2009 रोजी मेंबरशिप कार्ड, स्मार्ट कार्ड तसेच त्यांना देण्यात येणा-या विविध सुविधा इत्यादीची माहिती दिली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांना औरंगाबाद येथील, औरंगाबाद जिमखाना हे त्यांचे संलग्न क्लब असून, या ठिकाणी मान्य केलेल्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगितले. अर्जदाराने औरंगाबाद जिमखाना क्लब येथे भेट दिली असता, त्यांना, गैरअर्जदार यांच्या क्लब बरोबर असलेली त्यांची संलग्नता रदद करण्यात आली असल्याचे कळविले व ही माहिती तेथील नोटीस बोर्डवर लावण्यात आली असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने या बाबतीत दि.07.04.2010 रोजी गैरअर्जदार यांना सदरील माहिती कळविली. गैरअर्जदार यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही व अर्जदारास कबूल केलेल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. अर्जदाराने, गैरअर्जदार यांच्याकडे जमा केलेली सभासद फी, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने सभासदत्व रक्कम देण्यापूर्वी त्यांच्या अटी व शर्ती मान्य केलेल्या आहेत, ज्यामध्ये सभासदत्व फी परत केली जाणार नाही असे म्हटले आहे. अर्जदार व त्यांच्यात झालेला करार कायदेशीर असल्यामुळे त्याच्यात बदल करता येत नाही. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसून, अर्जदारासोबत झालेला करार हा हैद्राबाद येथे झालेला आहे व अर्जदार हा ग्राहक नाही असे सांगून ही तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्यामुळे खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. (3) त.क्र.433/10 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी वृत्तपत्रातून दिलेल्या जाहिरातीवरुन विविध सेवा, सवलती पाहून अर्जदाराने त्यांचे सभासदत्व घेतले आहे व यासाठी दि.06.12.2009 रोजी त्यांनी 70,000/- रुपये गैरअर्जदार यांना दिले आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मेंबरशिप कार्ड, स्मार्ट कार्ड, इत्यादी बरोबर फ्री हेल्थ क्लब, स्विमिंग, सोनाबाथ, लॉन टेनिस इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे म्हटले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांना औरंगाबाद जिमखाना क्लब हा त्यांचा संलग्न क्लब असून, तेथे या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत असे सांगण्यात आले. अर्जदाराने औरंगाबाद जिमखाना क्लब येथे विचारणा केली असता गैरअर्जदार यांच्या क्लबची संलग्नता रदद करण्यात आली असल्याचे व मुख्य नोटीस बोर्डवर सूचना लावण्यात आली असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, तसेच औरंगाबाद जिमखाना क्लब बरोबर असलेली संलग्नता, ती रदद झाली असल्यास अर्जदारास दुस-या कोणत्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत याबाबत काहीही स्पष्टीकरण आपल्या जवाबात दिलेले नाही. यावरुन मान्य केलेल्या सेवा गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या नाहीत हे सिध्द होते. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येत आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात अर्जदार हे ग्राहक नसून ही तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे म्हटले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलमानुसार गैरअर्जदार यांचे हे म्हणणे मंच मान्य करीत नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात, सभासद फी म्हणून भरलेली रक्कम परत करता येणार नाही या एकाच मुद्यावर विशेष भर दिला आहे. मान्य केलेल्या सेवा किंवा जाहिरातीत दाखविलेली विविध प्रलोभने, इत्यादी बाबी अर्जदारास/ग्राहकांना देण्यात अपयश आले तर सभासद फी कशासाठी घेण्यात आलेली आहे, याबाबत कोणताही खुलासा गैरअर्जदार यांनी केलेला नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात या प्रकरणी दाखल केलेल्या अटी व शर्तीचे निरीक्षण केल्यावर त्यात कुठेही सभासद फी परत केली जाणार नाही असे म्हटलेले नाही. वृत्तपत्रातून आकर्षक जाहिरातीद्वारे तसेच माहिती पुस्तिकेद्वारे विविध प्रलोभने दाखवून ग्राहकांना आकर्षित करणे, त्यांच्याकडून सभासद फी म्हणून मोठमोठया (4) त.क्र.433/10 रक्कम स्विकारणे व नंतर कोणत्याही सुविधा न पुरविता अटी व शर्तीच्या नावाखाली घेतलेली रक्कम परत करण्यास नकार देणे ही गैरअर्जदार यांची कृती दंडनीय असून, ग्राहक संरक्षण कायद्यातील अनुचित व्यापारी प्रथा यामध्ये मोडते. आदेश 1) गैरअर्जदार यांनी, अर्जदारास रु.70,000/- दि.06.12.2009 पासून 9% व्याजदराने 30 दिवसात परत द्यावे. 2) गैरअर्जदार यांनी, अर्जदारास मानसिक त्रासाबददल रु.25,000/- 30 दिवसात द्यावे. 3) गैरअर्जदार यांनी, अर्जदारास खर्चापोटी रु.1500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |