(दि.10/12/2012) द्वारा : मा.प्र.सदस्या, सौ.स्मिता ल. देसाई 1. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी विक्री पश्चात देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रृटी निर्माण केली म्हणुन प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल झाली आहे. 2. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी निर्माण केलेला लॅपटॉप दि.16/11/2009 मध्ये खरेदी केला. त्याला एक वर्षाची वारंटी होती त्यानंतर जुन 2010 ला सदर लॅपटॉप मधील स्क्रीन दिसेनासा झाला. तक्रारदाराने सदर लॅपटॉप घेऊन विरुध्द पक्ष क्र. 2 यांचेकडे गेले. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी लॅपटॉपची तपासणी केली व सदर लॅपटॉप वॉरंटी कालावधीमधील असल्यामुळे सदर लॅपटॉप स्क्रीन बिनामुल्य बदलुन देतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी दहा दिवस वाट पाहीली परंतु नवीन स्क्रीन उपलब्ध नसल्याचे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सांगितले. तक्रारदार यांनी लॅपटॉप नसल्यामुळे त्यांना गैरसोय होत असल्याचे सांगितल्यावर विरुध्द पक्ष यांनी सदर लॉपटॉप दुस-या स्क्रीनला जोडुन काम करु शकता असे सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी मधल्या काळात सदर लॅपटॉप दुस-या स्क्रीनला जोडुन वापरला. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी नवीन स्क्रीन उपलब्ध झाल्याचे सांगितल्यावर तक्रारदार हे विरुध्द पक्ष 1 यांचेकडे लॅपटॉप घेऊन गेले परंतु तरीही लॉपटॉप स्क्रीन सुरु झाला नाही म्हणुन त्यांनी सदर लॅपटॉप विरुध्द पक्ष क्र. 2 यांचे ताब्यात तपासणीसाठी दिला. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी 17 जुनला लॅपटॉपचा नो डिसप्ले असा प्रॉब्लंब आहे असे सांगितले होते. तक्रारदार यांचे प्रमाणे त्यांनी सदर लॅपटॉपचा जेव्हा विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडे दिला तेव्हा लॅपटॉप, लॅपटॉपचा मदरबोर्ड चांगला होता कारण तक्रारदारांनी लॅपटॉप दुस-या स्क्रीनला जोडुन चालविला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 2 यांचे ताब्यात लॉपटॉप तपासणीसाठी दिल्यानंतर 29 जुनला सदर लॅपटॉपचा मदरबोर्ड चालत नाही असे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सांगितले व नवीन मदरबोर्ड वारंटी कालावधीमध्ये येत नसल्यामुळे तक्रारदार यांना नवीन मदरबोर्ड बदलण्याचा खर्च दयावा लागेल तक्रारदार यांचा लॉपटॉप वारंटी कालावधीमध्ये येत असल्याने खर्च देऊन दुरूस्ती करण्यास तक्रारदार यांनी नकार दिला व त्या संदर्भात विरुध्द पक्ष यांचेशी वेळोवेळी संपर्क साधला.
3. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांचा लॅपटॉप वारंटी कालावधीमध्ये बसत असल्यामुळे तो लॉपटॉपच्या संदर्भात कोणताही खर्च देण्यास जबाबदार नाहीत. विरुध्द पक्ष यांना तक्रारदार यांनी याबाबत संपर्क साधला नोटिस पाठविली पण विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या सदोष लॅपटॉपमुळे, सदोष सेवेमुळे तक्रारदार यांचे व्यवसायीक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरची तक्रारी मंचामध्ये दाखल केली आहे. आल्या तक्रारीतील मागणीमध्ये तक्रारदार यांनी झालेल्या गैरसोयीबद्दल व मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.1,00,000/- तसेच सदोष लॅपटॉप व सदोष सेवेसाठी रक्कम रु.1,00,000/- त्यांच्या लॅपटॉप मधील डाटा लोप झाल्यामुळे रक्कम रु.12,50,000/- विरुध्द पक्ष यांचे कडुन मिळावे अशी विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ठयार्थ निशाणी 2 वर शपथपत्र निशाणी 3च्या यादीने लॅपटॉपचे बुकींग फार्म, टॅक्स इनव्हाईस, सर्विस डाटा रिपोर्ट, कोटेशन, नोटिस व पोचपावती पोस्टाच्या पावत्या व पत्र इत्यादी कागदपत्रे जोडलेले आहेत.
5. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी निशाणी 14 वर आपले म्हणणे मांडले आहे. त्यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या कडुन लॅपटॉप खरेदी केला होता व तो दुरूस्तीसाठी त्यांच्याकडे आणला होता हे त्यांनी मान्य केले आहे. तक्रारदार यांचा लॅपटॉप वारंटी कालावधीमध्ये नादुरूस्त झाला हे ही मान्य आहे. तसचे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिली नाही असे म्हटले आहे. तक्रारदार यांची तक्रार ही कायद्याने चालविण्याजोगी नाही व तक्रारदार यांची तक्रार ही ग्राहक वाद होऊ शेकत नाही असे नमुद केले आहे. तक्रारदार यांचा लॅपटॉप तपासणीसाठी आल्यानंतर त्यांच्या तज्ञण्यावतीने तक्रारदार यांचा लॅपटॉप व्यवस्थित वापरला नाही म्हणुन मदरबोर्ड खराब झाला असा अहवाल दिला होता. त्यामुळे वारंटीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारयांनी लॅपटॉपचा वापर व्यवस्थित न केल्याने त्यामुळे तक्रारदार यांना नवीन मदररोड विकत घेण्यासाठी सांगण्यात आले. तसेच सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सिध्द करण्यासाठी तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही. शेवटी तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी विनंती केली आहे. विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणयासोबत निशाणी 15 वर शपथपत्र, निशाणी 19 वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 6. विरुध्द पक्ष 2 यांना नोटिसची बजावणी होऊनही त्यांनी सदर तक्रारीमध्ये म्हणणे मांडले नाही. 7. तक्रारदार यांची तक्रार विरुध्द पक्ष यांचे म्हणणे, शपथपत्रे, दाखल कागदपत्रे यावरुन न्यायमंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दा क्र. 1- तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय? उत्तर – होय. मुद्दा क्र. 2 तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिली काय? उत्तर – होय. मुद्दा क्र. 3 तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजुर होण्यास पात्र आहे काय? उत्तर – होय. मुद्दा क्र. 4. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. निष्कर्ष मुद्दा क्र.1 – तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडुन त्यांच्या व्यवसायासाठी व स्वतःच्या वापरासाठी लॅपटॉप खरेदी केला होता. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी त्यांच्याकडुन लॅपटॉप खरेदी केलेला आहे हे मान्य केले आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी आपले म्हणणे मांडलेले नाही. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 हे सर्विसे सेंटर आहे असे नमुद केले आहे. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे मधील वाद हा विक्रीपश्चात देण्यात येणा-या सेवे संदर्भात असल्यामुळे तो ग्राहक वाद ठरतो. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचे कडुन लॅपटॉप खरेदी केला असल्यामुळे व वॉरंटी कालावधीत सेवे संदर्भात वाद झाल्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत अशा मताशी आम्ही आलो आहेत. मुद्दा क्र. 2 – तक्रारदार यांनी लॅपटॉपच्या दुरूस्ती संदर्भात वारंटी कालावधीत विरुध्द पक्ष यांचेशी वेळोवेळी संपर्क साधला परंतु त्यांचा लॅपटॉप दुरूस्त झाला नाही हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार हे लॅपटॉपच्या तपासणीसाठी गेले असता विरुध्द पक्ष यांनी वेगवेगळी सबब सांगुन तक्रारदार यांना वेळोवेळी लॅपटॉप तपासणीसाठी बोलावले असे निदर्शनास येते. तक्रारदार यांचा लॅपटॉप हा वारंटी कालावधीत होता म्हणुन प्रथम लॅपटॉपचा नवीन स्क्रीन बिनामुल्य बदलुन देण्याचे सांगितले नंतर काही कालावधीनंतर तक्रारदारयांच्या लॅपटॉप मधील मदरबोर्ड नादुरूस्त झाला बदलावा लागेल व त्यासाठीचा खर्च तक्रारदार यांना सोसावा लागेल असे सांगितले. अभिलेखाचे अवलोकन करता तक्रारदार हे वॉरंटी कालावधीत जुन 2010 मध्ये लॅपटॉप दुरूस्तीसाठी गेले होते हे स्पष्ट होते हे विरुध्द पक्ष ह्यांनी मान्य केले तसेच दि. 17 जुनला सर्विस कॉल रिपोर्ट दिला आहे परंतु त्याचा लॅपटॉप दि.29 जुन 2010 पर्यंत दुरूस्त झाला नव्हता हे ही निदर्शनस येते व त्यानंतर सदर बोर्ड खराब आहे अशी सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन सांगण्यात आली. तक्रारदारयांचा लॅपटॉप वॉरंटी कालावधीमध्ये दुरूस्तीसाठी आल्यानंतर त्यामध्ये नेमका काय दोष आहे हे जाणुन घेणे हा तक्रारदार यांचा अधिकार होता परंतु असे न करता तक्रारदार यांना वेळोवेळी सर्विसे सेंटरला बोलावले व त्यांच्या लॅपटॉपमध्ये दोष काय आहे हे नेमके सांगितले नाही यामध्ये विरुध्द पक्ष यांच्या सेवेत दोष दिसुन येतो. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या लॅपटॉप्च्या तक्रारीबद्दल वेळेत सेवा दिली व दोष निदर्शनास आणुन दिला हे स्पष्ट केलेले नाही. तक्रारदार यांनी शपथपत्राने व दाखल कागपदपत्राने विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिली हे सिध्द केले आहे अशा मताशी आम्ही आलो आहोत. मुद्दा क्र. 3 – तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या मागणीमध्ये विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिली व त्यामुळे त्यांना गैरसोय झाली लॅपटॉप डाटा लोप झाला, मानसिक त्रास व प्रकरण खर्चास सामोरे जावे लागले त्यामुळे नुकसान भरपाई म्हणुन एकुण रक्कम रु.12,50,000/- विरुध्द पक्ष यांचेकडुन मिळावे अशी मागणी केली आहे. विरुध्द पक्ष यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे व तक्रारदार यांनी वॉरंटीच्या अटी व शर्तीप्रमाणे लॅपटॉपचा वापर केला नाही असे नमुद केले आहे व तक्रारदार यांचा लॅपटॉप हा लीकवीड स्पीलेजमुळे खराब झाला आहे असा अहवाल त्याच्या तज्ञ व्यक्तीने दिल्यामुळे व तक्रारदार यांचा लॅपटॉपचा मदरबोर्ड यामुळे वॉरंटी कालावधीमध्ये विनामुल्य देणे बसत नसल्यामुळे त्यांनी मदर बोर्ड खरेदी करण्यासाठी कोटेशन दिले असे नमुद केले आहे. विरुध्द पक्ष यांचे मते लॅपटॉपचा मदरबोर्ड हा वारंटी कालावधीमध्ये येतो परंतु त्यांनी चांगले हाताळले नाही त्यामतुळे लीकवीड स्पिलेज झाले असे नमुद केले आहे याबाबत विरुध्द पक्ष यांनी वारंटीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या नाहीत तसेच लॅपटॉप हा तक्रारदार यांनी व्यवस्थित हाताळले नाही म्हणुन लिकवीड स्पिलेज झाले याबाबत तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही त्यामुळे त्यांचे म्हणणे पुराव्या अभावी मान्य करणे योग्य होणार नाही असे आमचे मत झाले आहे. मुद्दा क्र. 1 मध्ये दिलेल्या विवेचनाप्रमाणे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे त्याबाबत खर्च मिळण्यास तक्रारदार हे पात्र ठरतात. परंतु तक्रारदार यांनी रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली आहे त्याबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे योग्य विचारांती तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे कडुन वैयक्तिक अथवा संयुक्तकरित्या खर्चाची रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) मिळण्यास पात्र ठरतात अशा मताशी आम्ही आलो आहोत. तसेच तक्रारदार यांनी सदोष लॅपटॉप बाबत व लॅपटॉपचा डाटा लोप झाल्याने जी नुकसान भरपाई मागीतली आहे त्यामध्ये कोणताही पुरावा अगर तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी लॅपटॉप हा व्यवसायिक कारणासाठी व स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी घेतला होता. तक्रारदार यांची व्यवसायिक नुकसानी देण्याचे अधिकार ग्राहक मंचामध्ये अभिप्रेत नाहीत तयामुळे त्यांची त्याबाबतची मागणी अमान्य करण्यात येते. तक्रारदारयांनी स्वतःच्या वैयक्तिक कारणास्तव पण लॅपटॉप वापरलेला असे नमुद केले आहे त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी वारंटी कालावधीत दिलेल्या सदोष सेवेसाठी ते पात्र ठरतात व त्यासाठी त्यांना सदर तक्रार दाखल कागदपपत्रांवरुन तक्रारदार यांचा लॅप्टॉप हा विरुध्द पक्ष यांचे ताब्यात आहे हे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले आहे. परत देण्यास तैयार आहे हे स्पष्ट होते. ह्या संदर्भात आम्ही खालील न्यायनिवाडा विचारात घेत आहेत. “2006(2) CPR(NC) M/s. East India Constrution Co., V.s, M/s. Modern Consultancy Services and Ors. “State Commission while asking refund of Price with compensation and cost should also have directed that the Complainant shall return the detective equipment to the dealer” असे नमुद केले आहे. सदर न्यायनिवाडयाच्या आधारे तक्रारदार यांनी आपला लॅपटॉप परत आपल्या ताब्यात विरुध्द पक्ष यांचे कडुन घ्यावा अशा मताशी आम्ही आलो आहेत.
8. वरील विवेचनावरुन सदरचा मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. - अंतिम आदेश – 1) तक्रारदारांचा तक्रार अर्ज क्र.208/2010 मंजूर करण्यात येतो. 2) तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदोष सेवे संदर्भात वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) अदा करावेत. 3) तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या प्रकरणाच्या खर्चासाठी रक्कम रु.10,000/- (रु. दहा हजार फक्त) अदा करावेत. 4)वर नमुद आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी 45 दिवसांच्या आत करावी.. दिनांक : 10/12/2012 ठिकाण : कोंकण भवन, नवी मुंबई. (सौ.स्मिता ल.देसाई ) (सौ.ज्योती अभय मांधळे) प्र. सदस्या प्र.अध्यक्ष ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, |