आदेश पारीत व्दाराः श्रीमती स्मिता नि. चांदेकर, मा. सदस्य.
तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असुन तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय खालिल प्रमाणे...
- तक्रारकर्ती ही उपरोक्त पत्त्यावर राहते, विरुध्द पक्ष क्र. 1 हे मारुती सुझुकी कंपनीचे नागपूर येथील अधिकृत विक्रेता (डिलर) असुन ते कंपनीचे चार चाकी वाहन विकण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र.2 हे मारुती सुझुकी कंपनीचे नागपूर येथील एरीया मॅनेजर असुन विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे सदर कंपनीचे दिल्ली येथील जनरल मॅनेजर व पूणे येथील रिजनल मॅनेजर आहेत. तक्रारकर्तीला स्वतःकरीता व कुटूंबीयांकरीता नवीन कार घ्यावयाची होती. त्यानुसार तक्रारकर्तीने दि.4, एप्रिल 2017 रोजी तिची जुनी कार (exchange) बदली करुन विरुध्द पक्ष क्र.1 कडून नवीन मॉडेल स्विफ्ट VXI (BS4) रजि. नं.MH-31/FA-1095 खरेदी केले. तक्रारकर्तीने तिची जुनी कार दि.30.12.2016 ला विरुध्द पक्षाला exchange मध्ये दिली व रु.10,000/- भरुन वरील नवीन कारची नोंदणी केली होती. विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीला तिच्या जुन्या कारची रु.3,10,000/- एवढी किंमत दिली होती. तक्रारकर्तीने नवीन कार जानेवारी-2017 मध्ये घ्यावयाचे ठरविले होते परंतू काही कारणास्तव तिचे कर्ज मंजूर न झाल्यामुळे तिने सदर कार एप्रिल-2017 मध्ये घेण्याचे ठरविले. त्यानुसार तक्रारकर्त्याने रामनवमीच्या मुहुर्तावर दि.04.04.2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 कडून कारची डिलीव्हरी घेतली असता कारच्या बिलाची व इन्शुनन्सची तारीख ही अगोदरची होती व कार 81 कि.मी. अंतर चालविण्यात आल्याचे आढळून आले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 चे कर्मचा-यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर बाबही फार मोठी नसुन त्यात सुधारणा करुन देण्यांत येईल असे सांगितले व कारची डिलीव्हरी घेण्यांस भाग पाडले.
2. तक्रारकर्तीने पूढे असे नमुद केले की, कारची डिलीव्हरी घेऊन घरी जात असतांना तिचे वडील कार चालवित होते व त्यांच्या असे लक्षात आले की, कारच्या स्टेअरींगमध्ये hardness व stiffness आहे. त्यामुळे त्यांनी लगेच दि.05.04.2017 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1च्या शोरुममध्ये जाऊन त्याबाबत तक्रार केली. विरुध्द पक्ष क्र.1 ने काही दिवस कार चालविण्यांत आल्यावर आपोआप फ्रि होईल असे सांगितले, परंतु सदर तक्रार दूर झाली नसल्याने शोरुम मधील प्रत्येक सर्व्हीसिंगच्या दरम्यान व अनेकदा तक्रारकर्त्याच्या वडिलांनी विरुध्द पक्ष क्र.1 कडे तक्रार केली होती. माहे ऑक्टो.2018 मध्ये तक्रारकती ही कामठी हायवे ने जात असता कारच्या कॅबिनमधुन आवाज येत असल्याने त्यांनी कामठी रोडवरील कंपनीच्या शोरुममध्ये गाडी दाखविली त्यावेळी सदरचा आवाज हा स्टेअरींग संबंधीत असल्याबाबत कंपनीच्या कर्मचा-यांनी सांगितले व पूर्वीप्रमाणे सदर पार्ट बदलवुन वारंटी क्लेम करण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्तीला पहिल्यांदाच तिच्या परवानगीशिवाय कारचे पार्टस् बदलवून वारंटी क्लेम करण्यात आल्याचे कळले म्हणून तिने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडे तक्रार करुन विचारणा केली असता विरुध्द पक्ष क्र.1 ने ई-मेलद्वारे उत्तर पाठविले, जे की असमाधानकारक होते. तक्रारकर्तीने सदर कार ही तिच्या वडिलांकरीता घेतली होती. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 च्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे व कारमधील दोष काढण्यांस अपयशी ठरल्यामुळे तक्रारकर्ती कारचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुळे सदर कार त्यांनी दि.14.10.2018 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 च्या हवाली केली असुन कार दुरुस्ती न करता आजपावेतो विरुध्द पक्ष क्र.1 च्या ताब्यात आहे.तक्रारकर्तीने वारंवार विनंती करुनही विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीच्या समस्येवर तोडगा काढला नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीला वापरलेली व दोषपूर्ण कार दिली असल्याने ती बदलवुन देण्यांस विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. म्हणून तक्रारकर्तीने दि.19.01.2019 रोजी कायदेशिर नोटीस पाठवुन दोषपूर्ण कार बदलवुन त्याच मॉडेलची नवीन कार देण्याची विनंती केली. सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने त्यास उत्तर दिले नाही व कार बदलवुन नवीन कार दिली नाही म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीची दोषपूर्ण कार बदलवून त्याच प्रकारची व मॉडेलची नवीन मारुती सुझुकी VXI (BS4) द्यावी किंवा कारच्या किंमतीची रक्कम कर्जाच्या व्याजासह परत करण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्तीला दोषपूर्ण कारकरीता नुकसान भरपाई रु.3,00,000/- व शारीरिक मानसिक त्रासाकरीता रु.3,00,000/- तसेच तक्रारकर्तीला वाहना अभावी येणारा खर्च प्रतिमाह रु. 20,000/- माहे ऑक्टो.2018 पासुन आदेशा पावेतो देण्यांत यावा असा आदेश होण्याकरीता विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ने दि.05.08.2019 रोजी तक्रारकर्तीच्या तक्रारीस लेखीउत्तर दाखल करीत तक्रारकर्तीच्या तक्रारीस विरोध केला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्तीला डिसेंबर 2016 च्या Exchange Offer नुसार जुन्या गाडीची किंमत रु.3,10,000/- देण्यांत आली. त्यानुसार तक्रारकर्तीने दि.11.01.2017 रोजी नवीन कार बुक केली. विरुध्द पक्षाने पूढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीला दि.31.01.2017 रोजी कर्ज मंजूर झाले त्यामुळे सदर कारची बिल दि.31.01.2017 रोजी करण्यांत आले. तक्रारकर्तीने त्याची जुनी कार दि.05.02.2017 रोजी विरुध्द पक्षाकडे दिली असुन त्याबाबत रु.3,10,000/- तक्रारकर्तीला दिल्याची पावती आहे. तक्रारकर्तीला दि.28.03.2017 रोजी कर्जाची रक्कम प्राप्त झाल्यामुळे कारची डिलेव्हरी ही तक्रारकर्तीच्या इच्छेनुसार दि.04.04.2017 रोजी देण्यांत आल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 ने नमुद केले आहे. परंतु तक्रारकर्तीला डिसेंबर 2016 ची Exchange Offer चा लाभ हवा असल्यामुळेच तक्रारकर्तीचे आग्रहास्तव तिच्या नवीन कारचे बिल दि.31.01.2017 चे करण्यांत आले असा खुलासा विरुध्द पक्ष क्र.1 ने केला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने हे मान्य केले की, तक्रारकर्तीच्या कारची डिलेव्हरी दिली त्यावेळी कार 81 कि.मी. चालली होती. पुढे त्याबाबत कारण नमुद करतांना असे कथन केले की, तक्रारकर्तीने तिची कार दि.11.01.2017 रोज बुक केली होती. परंतु तक्रारकर्तीला कर्जाची रक्कम उशिरा मंजूर झाल्यामुळे कारची डिलेव्हरी दि.04.04.2017 रोजी देण्यांत आली. त्या दरम्यान तक्रारकर्तीची कार ही गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती व तक्रारकर्तीने व तिचे वडिलांनी जेव्हा जेव्हा विरुध्द पक्षाच शोरुमला भेट दिली त्यावेळी सदर कार गोडाऊनमधुन शोरुममध्ये आणण्यात आल्यामुळेच कार डिलेव्हरीच्या वेळी 81 कि.मी. रिडींग दाखवित होती.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्तीच्या तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य केले असुन त्यांचे विशेष कथनात असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीची कार पहिल्यांदा दि.26.04.2017 रोजी सर्व्हीसिंगकरीता आणली तेव्हा ती 930 कि.मी. चालली होती. तक्रारकर्तीने स्टेअरींगबाबत तक्रार केली असता विरुध्द प क्ष क्र. 1 च्या वर्क्स मॅनेजर व जनरल मॅनेजरने कारच्या स्टेअरिंगची तपासणी केली असता steering Force साधारण (normal) होते व त्यात कुठलाही दोष नव्हता. त्यानंतर तक्रारकर्तीने पुन्हा दि.29.04.2017 रोजी steering मध्ये आवाज येत असल्याचे तक्रार केली त्यावेळी तपासणी केली असता steering अगदी बरोबर होते व steering मध्ये थोडासा आवाज असल्यामुळे तक्रारकर्तीच्या समाधानाकरीता steering रॅंक वॉरंटी कालावधीमध्ये बदलविण्यांत आले. तक्रारकर्तीने दुस-या सर्व्हीसिंगकरीता दि.02.07.2017 रोजी कार आणली तेव्हा ती 5631 कि.मी. चालविण्यांत आली होती. तक्रारकर्तीने त्यावेळी पुन्हा steering बाबत तक्रार नोंदविली असता steering तपासण्यात आले व त्यामध्ये कोणताही बिघाड आढळून आला नाही. अश्याप्रकारे तक्रारकर्ती प्रत्येक वेळी steering बाबत तक्रार घेऊन आली असता steering मध्ये कुठलाही दोष आढळून आला नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीला वापरलेली व सदोष कार दिली नाही. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.1 ला त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण तिची कार दि.14.10.2018 पासुन विरुध्द पक्ष क्र.1 च्या शोरुममध्ये ठेवली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीला वारंवार विनंती करुन देखिल तक्रारकर्तीने तिची कार शोरुममधुन न नेल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्तीला कार पार्कींगकरीता रु.300/- रोजप्रमाणे मुल्य आकारण्याबाबत नोटीसद्वारे कळविल्याचे विरुध्द पक्ष क्र.1 ने नमुद केले. तक्रारकर्तीची कार 16890 कि.मी. चालविल्यानंतर नवीन कारची मागणी करीत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचा सदर दावा खोटा, बिनबुडाचा, तथ्यहीन व गुणवत्ताहीन असल्यामुळे खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष क्र.1 ने केली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 ने एकत्रित लेखीउत्तर दाखल केले असुन असा प्राथमिक आक्षेप नोंदविला आहे की, तक्रारकर्तीने तिच्या कारचे steering दोषपूर्ण असल्याबाबत तक्रार केली आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(1)(c) नुसार मान्यताप्राप्त प्रयोग शाळेतुन त्याबाबतचा परिक्षण अहवाल/ तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीच्या कारमधील steering सदोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रारकर्तीचे आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही स्वच्छ हाताने मंचासमक्ष आली नसुन तिने मंचापासुन महत्वाचे तथ्य लपवुन ठेवले आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 ने पुढे असे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 व तक्रारकर्तीमध्ये झालेल्या कार विक्रीच्या व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही. कारण सदर विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 हे फक्त एक वाहन विकत नाही तर विरुध्द पक्ष क्र.1 व त्यांच्यात Principle to Principle तत्वावर करार झाला आहे. त्यानुसार वाहने मागणीनुसार विरुध्द पक्ष क्र.1 ला पुरविल्यावर त्यांची जबाबदारी उरत नाही. तक्रारकर्त्याने दि.04.04.2017 रोजी कारची डिलेव्हरी घेतली ही बाब विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 ने मान्य करत असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने त्यावेळी कोणतीही तक्रार न करता कारचा ताबा घेतला होता. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 ने तक्रारकर्त्याचे इतर परिच्छेदनिहाय कथन अमान्य केले आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 ने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने शोरुममध्ये दि.26.04.2017 ला कार पहिल्या फ्री सर्व्हीसिंग करीता आणली त्यावेळी स्टेअरींगबाबत तक्रारीची तपासणी केली असता स्टेअरींगमध्ये कोणताही बिघाड असल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर दि.29.04.2017 ला स्टेअरींगमध्ये आवाज येत असल्यामुळे स्टेअरींग Assembly वारंटीनुसार बदलविण्यात आली. सदर विरुध्द पक्षाने त्यांचे लेखीउत्तरात तक्रारकर्तीने दि.09.05.2017, 25.05.2017 12.06.2017, 02.07.2017 व त्यानंतर वेळोवेळी केलेली सर्व्हीसिंग व तक्रारीचे जॉब कार्डसह सविस्तर तपशिल नमुद केला असुन तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी व तथ्यहीन असल्यामुळे खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. तक्रारकर्तीतर्फे विरुध्द पक्षांचे लेखीउत्तरास प्रतिउत्तर दाखल करण्यांत आले. तसेच उभय पक्षांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केला. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकूण घेण्यांत आला. तसेच अभिलेखावर दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालिल प्रमाणे...
- // निष्कर्ष // -
7. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.1 कडून विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 कंपनीची उत्पादीत मारुती सुझुकी स्विफ्ट VXI (BS4) ही कार खरेदी केली होती याबाबत उभय पक्षात वाद नाही. अभिलेखावर दाखल Invoice बिलावरुन देखील सदर बाब स्पष्ट होते. त्यावरुन तक्रारकर्ती व विरुध्द पक्षांमध्ये ग्राहक व सेवापुरवठाधारक असा संबंध प्रस्थापित होत असल्याने तक्रारकर्ती विरुध्द पक्षांची ग्राहक ठरते.
8. तक्रारकर्तीने तक्रारीत तिची सदोष कार बदलवुन त्याच मॉडेलची नवीन कार विरुध्द पक्षाकडून मिळण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. तक्रारकर्त्याची मागणी बघता तक्रारकर्तीची मुख्य तक्रार ही तिच्या कारमध्ये उत्पादकिय दोष असल्याबाबतची दिसुन येते. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिने कारची डिलेव्हरी घेतली त्या दिवसापासुन कारच्या स्टेअरींगमध्ये Hardness असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने वेळोवेळी विरुध्द पक्ष क्र.1 कडे त्याबाबत तक्रार केली, परंतु विरुध्द पक्ष क्र.1 ने स्टेअरींगमधील दोष काढुन दिला नाही. विरुध्द पक्ष क्र.1 च्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीला वारंवार विरुध्द पक्षाकडे जावे लागले त्यामुळे तिला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व कारचा उपभोग घेता येत नाही. तक्रारकर्तीने अशीही तक्रार केली आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 ने तिला जुनी व वापरलेली सदोष कार विकत दिली आहे. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीचे पृष्ठयर्थ कारचे बिल, डिलेव्हरी रिपोर्ट, रजिस्ट्रेशन सर्टीफीकेट तसेच कारच्या सर्व्हीसिंग व दुरुस्तीबाबतचे जॉब कार्ड अभिलेखावर दाखल केले आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारकर्तीने दि.31.01.2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 कडून मारुती स्विफ्ट व्हीएक्सआय कार खरेदी केली आहे. सदर कार डिलेव्हरी नोटनुसार तक्रारकर्तीला दि.04.04.2017 रोजी देण्यांत आल्याचे दिसत असुन सदर बाब उभय पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीत स्वतः असे नमुद केले आहे की, तिला कर्जाची रक्कम मिळण्यांस उशिर झाल्यामुळे तिने कारची डिलेव्हरी दि.04.04.2017 रोजी घेण्याचे ठरविले होते. तक्रारकर्तीची कार डिलेव्हरीच्या वेळी 81 कि.मी. चालली असल्याचे रिडींग दर्शवित होती, ही बाब विरुध्द पक्ष क्र.1 ने मान्य केली असुन त्याबाबत त्यांचे लेखी उत्तरात सविस्तर खुलासा केला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने दि.11.01.2017 ला कार बुक केली होती व डिलेव्हरी दि.04.04.2017 ला घेतली. त्या दरम्यान तक्रारकर्ती शोरुममध्ये जितक्यांदा आली त्यावेळी कार गोडाऊन मधुन शोरुममध्ये आणण्यात आली होती. तक्रारकर्तीने देखिल कारबाबत समाधान व्यक्त करीत कुठलीही तक्रार न नोंदविता कारची डिलेव्हरी दि.04.04.2017 रोजी घेतल्याचे अभिलेखावर दाखल डिलेव्हरी नोटवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.1 च्या कथनाचे प्रतिउत्तरात ठोस खंडन केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचे कारच्या बिलावरील आणि डिलेव्हरी नोटवरील तारखेतील तफावत तसेच कार डिलेव्हरी पूर्वीच 81 कि.मी. चालविण्यात आल्याचा आक्षेप मान्य करण्या सारखा नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. तक्रारकर्तीच्या वकीलांनी असाही युक्तिवाद केला आहे की, तक्रारकर्तीच्या कारमध्ये वारंवार स्टेअरींगमध्ये Hardness चा त्रास होत असल्यामुळे तिने विरुध्द पक्षांकडे तक्रार केली असता सदर बिघाड दुरुस्त करण्यांत आला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने तिची कार दि.14.10.2018 पासुन विरुध्द पक्षांकडे ठेवली असुन देखिल विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी वारंटीनुसार तक्रारकर्तीला तिची कार दुरुस्त करुन दिली नाही. याउलट तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष क्र.1 ने अभिलेखावर दाखल केलेल्या जॉब शिटवरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्तीने जेव्हा जेव्हा सर्व्हीसिंग दरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 कडे स्टेअरींग Hardness बाबत तक्रार केली आहे त्या त्या वेळी विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे स्टेअरींगची तपासणी करण्यांत आली असुन स्टेअरींग फोर्स हा मानकाप्रमाणे बरोबर असल्याचे आढळले आहे. दि.29.04.2017 रोजी स्टेअरींगमध्ये आवाज येत असल्यामुळे तकारकर्तीच्या समाधानासाठी काही पार्ट (cabin rack) वारंटी कालावधीत बिनामुल्य बदलवुन देण्यांत आल्याचे जॉबकार्डवरुन दिसुन येते. दि.14.10.2018 चे जॉबकार्डनुसार तक्रारकर्ती स्वतःहून कार विरुध्द पक्ष क्र.1 च्या शोरुममध्ये सोडून आल्याचे दिसुन येते. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 ने त्यानंतर दि.12.11.2018, 19.11.2018 रोजी ई-मेल द्वारे तक्रारकर्तीला कार वारंटीनुसार दुरुस्त करण्यास तिची परवानगी मागितल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.1 ला प्रतिसाद न देताच दि.19.01.2019 रोजी कायदेशिर नोटीस पाठवून कार बदलवुन नवीन कार देण्याची मागणी केल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष क्र.1 ने सदर नोटीसला उत्तर पाठविले असता सदर नोटीस ‘घेण्यांस नकार’ या शे-यासह परत आल्याबाबतचा लिफाफा विरुध्द पक्ष क्र.1 ने दाखल केला आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 चे वकीलांनी असा युक्तिवाद केला की, ते तक्रारकर्तीला वारंटीच्या अटी व शर्तींनुसार कार दुरुस्त करुन देण्यांस तयार आहेत. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही.
10. वास्तविकतः तक्रारकर्तीची कार ही आजपावेतो 16890 कि.मी. चालविण्यांत आली आहे. तक्रारकर्तीच्या कारबाबत तक्रारीचे विरुध्द पक्ष क्र.1 ने वेळोवेळी निराकरण केल्याचेही अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याच्या कारमध्ये जर उत्पादकीय दोष असता तर सदर कार एवढे अंतर चालु शकली नसती. मात्र तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार कारच्या स्टेअरींगमध्ये कार घेतल्यापासुन सतत बिघाड आहे व तो दुरुस्त होत नसल्यामुळे त्यात उत्पादकीय दोष आहे. कारमध्ये उत्पादकिय दोष आहे किंवा नाही ही बाब पूर्णतः तांत्रिक असुन ते सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सल्ला अहवाल आवश्यक आहे व ही बाब सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची आहे. तक्रारकर्तीने तिच्या कथना पृष्ठर्थ कोणताही तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे योग्य पूराव्या अभावी तक्रारकर्तीच्या कारमध्ये उत्पादकीय दोष आहे असे म्हणता येणार नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी तक्रारकर्तीला वारंटीच्या अटींनुसार कार दुरुस्त करुन देण्याचे प्रतिपादन केले असुन तसे तक्रारकर्तीला कळविल्याचे अभिलेखावर दाखल ई-मेलच्या प्रतीवरुन दिसून येते. परंतु तक्रारकर्तीने त्याकरीता आवश्यक संमती विरुध्द पक्षाला दिलेली नाही. वरील संपूर्ण बाबींचा सखोल विचार करता मंचास विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांच्या सेवेत त्रुटी आढळून येत नाही. सबब पूराव्या अभावी तक्रारकर्तीची तक्रार मान्य करता येत नाही, त्यामुळे ती खारीज होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
करीता वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यांत येते.
2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यांत यावी.
3. तक्रारकर्तीस तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.