तक्रारदार : वकील महेश सहस्त्रबुध्दे हजर.
सामनेवाले क्र.2 व 3 : गैर हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे मोटर वाहनाचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 वाहनाचे विक्रेते आहेत. सा.वाले क्र.3 हे सा.वाले क्र.2 चे उप विक्रेते आहेत. ज्यांचेकडून तक्रारदारांनी वाहनाचा ताबा घेतला होता. सा.वाले क्र.4 व 5 हे वाहनाचे दुरुस्ती केंद्र आहे. तक्रार दाखल होताना तक्रार फक्त सा.वाले क्र.2 व 3 यांचे विरुध्द दाखल करुन घेण्यात आली, तर सा.वाले क्र.1,4 व 5 यांचे विरुध्द रद्द करण्यात आली.
2. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेले मोटर वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडून विकत घेतले व वाहनाचा ताबा तक्रारदारांना सा.वाले क्र.3 यांचेकडून दिनांक 27.3.2008 रोजी प्राप्त झाला. वाहनाची विनामुल्य दुरुस्ती दिनांक 3.6.2008 रोजी करुन घेण्यात आली.
3. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे दिनांक 10.8.2010 रोजी तक्रारदारांचे वाहन मुंबई उपनगर, सायन येथे रस्त्यावर बंद पडले ते दुरुस्तीकामी सा.वाले क्र.5 यांचेकडे नेण्यात आले. व त्यांनी तक्रारदारांना असे सूचविले की, वाहनामध्ये इसीएम युनिट योग्य रितीने बसविले नसल्याने व बंद पडल्याने वाहन बंद पडले होते. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, त्यांना सा.वाले क्र.2 यांचे कडून माहिती मिळाली की, अॅटोकॅब वायरिंग जर बरोबर करण्यात आली असती तर हा दोष निर्माण झाला नसता. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांना दुरुस्तीकामी रु.5,405/- खर्च करावा लागला. त्याच प्रमाणे त्यांची गैरसोय व कुचंबणा झाली. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचेकडून दुरुस्तीचा खर्च रु.5,405/- वसुल होऊन मिळावेत. अन्यथा वाहनाची संपूर्ण किंमत तसेच नुकसान भरपाई सा.वाले यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी दाद मागीतली.
4. सा.वाले क्र.2 वाहनाचे विक्रेते यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, अॅटोकॅब हे विद्युत वापराचे एक यंत्र तक्रारदारांनी वाहनामध्ये सा.वाले क्र.4 म्हणजे दुरुस्ती केंद्र यांचेकडून स्वतः स्वखुशीने व वेगळा खर्च करुन बसवून घेतले व ते संयत्र सा.वाले क्र.2 अथवा 3 यांनी तक्रारदारांना वाहन ताब्यात देताना बसविलेले नव्हते. या प्रकारे अॅटोकॅब संयत्रामुळे वाहनामध्ये दोष निर्माण झाला असेल तर त्याची जबाबदारी सा.वाले 2 व 3 यांचेवर येऊ शकत नाही. व त्यास तक्रारदार स्वतः जबादार आहेत.
5. सा.वाले क्र.3 यांनी वेगळी कैफीयत दाखल केली. व त्यामधील कथने देखील सा.वाले क्र.2 यांचे कैफीयतीमधील कथनाशी सुसंगत आहेत. तक्रारदारांनी शपथपत्र दाखल करुन त्यांनी संपूर्ण दुरुस्तीचा खर्च रु.53,738/- अदा करुन वाहनाचा ताबा घेतला असे कथन केले. तक्रारदारांनी त्या व्यतिरिक्त सा.वाले क्र. 2 व 3 यांचे कैफीयतीला प्रति उत्तराचे वेगळे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये असे कथन केले की, सा.वाले क्र.2 व 3 यांचे सूचनेवरुनच तक्रारदारांनी सा.वाले क्र. 4 यांचेकडून वाहनामध्ये अॅटोकॅब संयत्र बसवून घेतले होते व ते नादुरुस्त झाल्यास अथवा सदोष असल्यास दुरुस्तीची व नुकसान भरपाईची जबाबदारी सा.वाले क्र. 2 व 3 यांचेवर येते.
6. सा.वाले क्र.2 यांनी पुराव्याचे वेगळे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी व सा.वाले क्र.2 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना वाहनाचे दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतलेल्या दादी मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले क्र.5 म्हणजे दुरुस्ती केंद्र यांनी दिलेला अहवाल दिनांक 14.8.2008 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, अॅटोकॅब संयत्र सदोष पध्दतीने बसविल्याने वाहन बंद पडले होते. तक्रारदारांचे वाहन बंद पडल्यानंतर आपले वाहन सा.वाले क्र.5 यांचेकडून सा.वाले क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकामी नेले. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दिनांक 29.8.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी वाहनाचे संदर्भात दिलेल्या अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये देखील अॅटोकॅब संयत्र सदोष पध्दतीने बसविल्यामुळे वाहन बंद पडले होते. व अॅटोकॅब संयत्र काढून टाकण्यात आलेले आहे असे त्या अहवालामध्ये नमुद केलेले आहे.
9. सा.वाले क्र. 2 व 3 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये हे स्पष्टपणे नमुद केले आहे की, अॅटोकॅब संयत्र हा वाहनाचा भाग नव्हता तर तक्रारदारांनी स्वखुशीने ते बाहेरुन बसवून घेतले होते. असे स्पष्ट कथन केलेले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी अॅटोकॅब संयत्र सा.वाले क्र.2 च 3 यांचे सूचनेवरुनच बसवून घेतले होते व त्यामुळेच सा.वाले क्र.2 व 3 वाहन दुरुस्तीचे खर्चास जबाबदार आहेत. तक्रारदारांचे प्रति उत्तराचे शपथपत्रातील वरील स्वरुपाचे कथन बनावट व नंतर असलेले कथानक आहे. ही बाब पुढील दोन मुद्यांवरुन स्पष्ट होते.
10. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये कुठेही कथन केले नाही की, अॅटोकॅब संयत्र तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 व 3 यांचे सूचनेवरुन बाहेरुन बसवून घेतले होते व त्याची जबाबदारी सा.वाले क्र.2 व 3 यांची होती. अॅटोकॅब संयत्राबद्दल वरील कथन तक्रारीमध्ये नसल्याने सहाजिकच प्रति उत्तराचे शपथपत्रामधील कथन नंतरचे व बनावट आहे हे स्पष्ट होते.
11. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तक्रारदारांनी स्वतः तक्रारीसोबत सा.वाले क्र.4 दुरुस्ती केंद्र यांनी दिलेला अहवाल दिनांक 29.8.2008 ची प्रत जोडलेली आहे. त्यामध्ये दिनांक 27.3.2008 मध्ये तक्रारदारांचे वाहनामध्ये ते अॅटोकॅब संयत्र बसविण्यात आलेले होते व ते ज्यादा यंत्र होते ही बाब स्पष्ट नमुद आहे. सा.वाले क्र.5 यांनी त्या अहवालामध्ये असे नमुद केले आहे की, अॅटोकॅब संयत्र बसविल्यानंतर वाहन पाच महिने व्यवस्थित चालले व त्यानंतर दोष निर्माण झाला. म्हणजे तो अॅटोकॅब संयत्राचा दोष नव्हता किंवा सदोष बांधणीचा दोष नव्हता असे सा.वाले क्र.4 यांना सूचवावयाचे होते. महत्वाचा भाग म्हणजे सा.वाले क्र.4 यांनी आपल्या दिनांक 29.8.2008 च्या अहवालामध्ये ही बाब मान्य केलेले आहे की, अॅटोकॅब संयत्र वाहनाचा भाग नव्हता व ते नंतर तक्रारदारांचे विनंती वरुन बसविण्यात आले होते.
12. उपलब्ध पुराव्या वरुन असे दिसून येते की, वाहनातील दोष अॅटोकॅब संयत्र सदोष पध्दतीने बसविल्यामुळे निर्माण झाला होता. परंतु ते संयत्र तक्रारदारांनी स्वतःहून सा.वाले क्र.4 व 5 यांचेकडून बसवून घेतले होते. व तो वाहनाचा मुळचा भाग नव्हता. साहाजिकच सा.वाले क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना सदोष वाहन विक्री केले असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यातही तक्रार सा.वाले क्र. 1,4, व 5 यांचे विरुध्द दाखल सुनावणी दरम्यान रद्द करण्यात आल्याने त्यांचे विरुध्द कुठलाही आदेश पारीत करणे शक्य नाही. या परिस्थितीमध्ये तक्रारदार सा.वाले क्र.2 व 3 यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप सिध्द करु शकले नाहीत. व तक्रारदार तक्रारीमधील मागीतलेल्या दादी मिळण्यास पात्र नाहीत.
13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 520/2008 रद्द करण्यात येते.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 06/06/2013