(घोषित दि. 30.07.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे वडील श्री. दिगंबर देशपांडे यांच्या नावाने गैरअर्जदार यांचेकडून दोन विद्युत जोडणी घेतलेल्या होत्या. त्यांचे क्रमांक 510030069151 व 510030069160 असे आहेत. त्यातील 9510030069151 हे असून त्याची बिले तक्रारदार वेळोवेळी भरत आलेले आहेत.
क्रमांक 510030069160 क्रमांकाचे मीटर गैरअर्जदारांकडून यापूर्वीच तात्पूरते खंडीत केलेले आहे. त्या मीटरचे रुपये 1,410/- रुपयाचे बिल दिनांक 01.01.2005 रोजी तक्रारदाराने भरले. त्यानंतर तक्रारदाराला बिल आले नाही.
दिनांक 01.10.2012 रोजी तक्रारदाराला मीटर क्रमांक 510030069151 चे बिल रुपये 23,610/- प्राप्त झाले. त्यात मीटर क्रमांक 510030069151 या मीटरचे बिल रुपये 19,072/- दाखवले होते व मीटर क्रमांक 510030069151 चे बिल रुपये 4,266/- इतके दाखवले होते. गैरअर्जदारांनी मीटर क्रमांक 510030069160 तक्रारदारांनी रुपये 1,410/- चे बिल भरुनही सुरु केले नाही व मीटरच काढून नेले. त्या मीटरची बिले देखील तक्रारदारांना आली नाहीत. परंतू अचानक ऑक्टोबर 2012 मध्ये मीटर क्रमांक 510030069151 च्या बिलात रुपये 19,072/- बाकी म्हणून दाखवले व बिल भरण्याबाबत नोटीस पाठवली. तक्रारदारांनी त्यानंतर वेळोवेळी गैरअर्जदारांकडे बाकी चुकीची दाखवली आहे. म्हणून अर्ज केले व सी.पी.एल. ची मागणी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर दिनांक 15.01.2013 रोजी तक्रारदारांनी मीटर क्रमांक 510030069160 चे सी.पी.एल मिळाले त्यात फेब्रूवारी 2004 ते जूलै 2006 पर्यंत मीटर टी.डी.एस.(तात्पुरते बंद) असे दाखवले आहे. त्यानंतर ऑगस्ट 2006 ते मे 2009 पर्यंतच्या काळात मीटर काहीवेळा आर.एन.ए (Reading not aviable) काही वेळा Inacceकाही वेळा Faulty तर काही वेळा Normal असे दाखवले आहे. शेवटी मे 2009 पासून मीटर पी.डी. (कायम बंद) असे दाखवले आहे.
तक्रारदारांनी वेळोवेळी गैरअर्जदारांकडे तक्रार केली व दुसरे मीटर बंद होईल या भीतीने रुपये 15,000/- तसेच रुपये 10,000/- इतके बिल नाराजीने (under Protest)भरले.
तक्रारदारांनी मीटर क्रमांक 510030069151 वर बेकायदेशीरपणे व मनमानीपणे मीटर क्रमांक 510030069160 चे बिल गैरअर्जदारांनी लावले म्हणून सदरची तक्रार केली आहे. त्या अंतर्गत ते गैरअर्जदारांनी रुपये 19,072/- ही रक्कम बिलातून वगळावी, त्या बिलापोटी भरलेली रक्कम रुपये 10,000/- परत करावी. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- तक्रारदारांना द्यावेत इत्यादी प्रार्थना करत आहेत.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी सोबत विद्युत देयके, त्यांनी गैरअर्जदारांकडे केलेले अर्ज, विद्युत देयके भरल्याच्या पावत्या, मीटर क्रमांक 510030069160 चे सी.पी.एल इत्यादी कागदपत्रे दाखल केली तसेच अंतरिम अर्ज देखील केला होता. दिनांक 28.12.2013 रोजी मंचाने सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांनी तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडित करु नये असा आदेश केला आहे.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबाप्रमाणे तक्रारदारांनी ग्राहक क्रमांक 510030069160 ही टी.डी. झालेली विद्युत जोडणी ऑगस्ट 2006 मध्ये चालू करुन घेतली व वीज वापर सुरु केला. परंतू विद्युत देयकाचा भरणा मात्र केला नाही. त्यामुळे तक्रारदार हे थकबाकीदार झाले. त्यांच्याकडे देय असलेली रक्कम रुपये 19,072/- न भरल्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा जून 2009 ला कायमचा खंडीत करण्यात आला. तक्रारदाराच्याच जागेत त्यांचे नावे दुसरे विद्युत मीटर असल्याने ऑक्टोबर 2012 च्या देयकात सदरची रक्कम बाकी म्हणून दाखवण्यात आली ती कायद्याने बरोबर आहे. तक्रारदाराच्या सी.पी.एल. मध्ये झालेल्या नोंदी रिंडींग घेताना ज्याप्रमाणे दिसत होत्या त्या प्रमाणेच घेतल्या असून त्या बरोबर आहेत. तक्रारदाराला इतक्या जुन्या बिलाबाबत दुरुस्ती मागता येत नाही. गैरअर्जदारांनी सी.पी.एल मध्ये सदरची रक्कम सतत बाकी म्हणून दाखवली आहे. तसेच विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्या अटी विनियम 2005 अन्वये देखील त्यांना जागेच्या कायदेशीर वारसाकडून किंवा वहिवाटदाराकडून मागील देय रक्कम वसूल करण्याचे अधिकार आहेत. तक्रारदारांना दिलेले बिल योग्य आहे त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. आर.टी.बिरादार व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे वकील श्री.दिगंबर देशपांडे यांचे नावे मीटर क्रमांक 510030069151 व 510030069160 ही विद्युत कनेक्शन होती.
- तक्रारदारांना ऑक्टोबर 2012 मध्ये 510030069151 या मीटर क्रमांकाचे बिल आले त्यात रुपये 19,072/- एवढी रक्कम मीटर क्रमांक 510030069160 ची बाकी म्हणून दाखवण्यात आली.
- तक्रारदारांनी त्यांचे मीटर क्रमांक 510030069151 च्या मूळ बिलापोटी रक्कम रुपये 15,000/- दिनांक 21.01.2013 रोजी भरली आहे तसेच वादग्रस्त बाकीरकमे पोटी रक्कम रुपये 10,000/- दिनांक 02.02.2013 रोजी भरलेली आहे.वरील सर्व गोष्टी गैरअर्जदारांना देखील मान्य आहेत.मीटर क्रमांक 510030069160 च्या सी.पी.एल वरुन असे दिसते की, फेब्रूवारी 2004 पासून ऑगस्ट 2006 पर्यंत सदरचे कनेक्शन तात्पुरते बंद (T.D.) केलेले होते. तक्रारदारांनी त्या मीटरचे बिल रुपये 1,410/- जानेवारी 2005 मध्ये भरुनही त्यांचे कनेक्शन पूर्ववत झालेले नाही. ऑगस्ट 2006 नंतर कधीही वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करावे असा तक्रारदारांचा अर्ज अथवा कनेक्शन सुरु करण्यासाठीची रुपये 50 एवढी फी त्यांनी भरली याचा पुरवा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही.
- मीटर क्रमांक 510030069160 चे सी.पी.एल. बघता त्यात फेब्रूवारी 2004 ते जूलै 2006 पर्यंत मीटर तात्पूरते बंद दाखविले आहे. मीटर क्रमांक 510030069160 चे सी.पी.एल मिळाले त्यात फेब्रूवारी 2004 ते जूलै 2006 पर्यंत मीटर टी.डी.(तात्पुरते बंद) असे दाखवले आहे. त्यानंतर ऑगस्ट 2006 ते मे 2009 पर्यंतच्या काळात मीटर काहीवेळा आर.एन.ए (Reading not aviable) काही वेळा Inacceकाही वेळा Faulty तर काही वेळा Normal असे दाखवले आहे. शेवटी मे 2009 पासून मीटर पी.डी. (कायम बंद) असे दाखवले आहे. यावरुन सदरचे सी.पी.एल. वरील नोंदी योग्य त-हेने झालेल्या नाहीत असे दिसते.
- तक्रारदारांच्या कथनानुसार वादग्रस्त मीटर पूर्वीच गैरअर्जदारांनी काढून नेलेले आहे. त्यांनी जानेवारी 2005 नंतर कधीही त्या मीटरवरुन वीजेचा वापर केलेला नाही अथवा जानेवारी 2005 नंतर त्यांना कधीही प्रस्तुतच्या मीटरचे बिल आलेले नाही. डिसेंबर 2012 च्या वादग्रस्त बिलापूर्वी कधीही गैरअर्जदारांनी तक्रारदारांकडे त्या मीटरच्या बाकी रकमेची मागणी केल्याचा पुरावा मंचासमोर नाही. त्याच प्रमाणे वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करण्यासाठीची फी तक्रारदारांनी भरलेली नसताना गैरअर्जदारांनी ते कनेक्शन पुन्हा चालू (Live) कसे केले याचा कोणताही खुलासा गैरअर्जदारांनी केलेला नाही.
- गैरअर्जदारांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार त्यांनी सी.पी.एल मध्ये सदरची रक्कम सतत बाकी म्हणून दाखवली आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम मागण्याचा अधिकार आहे. सी.पी.एल. वरील बाकी रक्कम दाखविली असली तरी त्याची मागणी गैरअर्जदारांनी तक्रारदारांकडे सातत्याने केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदारांना आता एकदम 2012 मध्ये अशी मागणी करता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
- डिसेंबर 2012 पूर्वी कधीही गैरअर्जदारांनी सदर रकमेची मागणी तक्रारदारांकडे केल्याचा पुरावा मंचासमोर नाही तक्रारदार त्यांचे त्याच आवारात असलेल्या मीटर क्रमांक 510030069151 चे बील नियमित भरत आलेले आहेत. परंतू त्यांना मीटर क्रमांक 510030069160 चे बील प्राप्त झाले नाही. मीटर क्रमांक 510030069160 तात्पुरते बंद झालेले होते त्यानंतर ते पुन्हा चालू होऊन तक्रारदारांनी त्याद्वारे वीज वापर केला. याचा पुरावा मंचासमोर नाही. त्यामुळे रुपये 19,072/- ही तक्रारदारांना दिलेल्या बिलात दाखविलेली रक्कमच चुकीची आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांकडून मीटर क्रमांक 50030069160 ची बाकी म्हणून रक्कम रुपये 19,072/- (अक्षरी रुपये एकोणीस हजार बाहत्तर फक्त) वसूल करु नये.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांनी वरील बाकी पैकी नाराजीने (under Protest) भरलेली रक्कम रुपये 10,000/- (अक्षरी दहा हजार फक्त) मीटर क्रमांक 50030069151 च्या बिलाच्या रकमेत समायोजित करावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.