(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडून जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याची आई मयत सत्यभामाबाई ही शेतकरी होती व गैरअर्जदार क्र.2 सोसायटीची सभासद होती. दि.10.08.2006 रोजी अतिवृष्टी होऊन घराची भिंत पडल्यामुळे त्याच्या आईचे निधन झाले. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना तोंडी सांगितली, परंतू घटनेचा पंचनामा झाला नाही. तसेच त्याने सदर (2) त.क्र.303/10 घटनेची माहिती गैरअर्जदार सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँक औरंगाबाद यांना दिली. तक्रारदाराने दि.07.09.2009 रोजी विम्याची रक्कम द्यावी अशी विनंती गैरअर्जदाराकडे केली परंतू त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. गैरअर्जदाराने विमा रक्कम न देऊन त्यास त्रुटीची सेवा दिलेली आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावा आणि तक्रार मुदतीत दाखल केली आहे असे समजून तक्रारदारास विमा रक्कम रु.2,00,000/- व्याजासह गैरअर्जदारांकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, अपघाताचेवेळेस मयत सत्यभामाबाई हया शेतकरी होत्या, तसेच विविध कार्यकारी संस्थेच्या सभासद होत्या यासंबंधी तक्रारदाराने पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे विमा पॉलीसीचा लाभ मिळू शकत नाही. मयत सत्यभामाबाईचे निधन दि.10.08.2006 रोजी झाले आणि तक्रारदाराने तक्रार 2010 मधे दाखल केलेली आहे. तक्रारदाराने अत्यंत विलंबाने तक्रार दाखल केली असून, मुदतबाहय आहे. मयत सत्यभामाबाईचे निधनानंतर शवविच्छेदन केलेले नसल्यामुळे मृत्युचे नेमके कारण कळू शकत नाही. तक्रारदाराने दि.07.09.2009 रोजी विमा दाव्याबाबत तोंडी सुचना दिली हे दावा दाखल करण्याचे कारण होऊ शकत नाही. पॉलीसीतील तरतुदीनुसार तक्रारदाराने एफ.आय.आर., पंचनामा व शवविच्छेदन अहवाल दाखल केला नाही, म्हणून त्याचा विमा दावा फेटाळण्यात आला. गैरअर्जदाराने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्यात आले. तक्रारदाराने पुरावा म्हणून स्वतःचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत पुरावा म्हणून विश्वास गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे. मंचाने शपथपत्र व कागदपत्रांची पाहणी केली. तक्रारदार गैरहजर. गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने युक्तिवाद ऐकला. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? असा मुद्या उपस्थित होतो. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे त्याच्या आईचे अपघाती निधनानंतर जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावा सादर केला होता. तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीने दि.24.04.2007 रोजी मयत सत्यभामाबाईचा शवविच्छेदन अहवाल दाखल केला नाही, म्हणून मृत्युचे (3) त.क्र.303/10 नेमके कारण कळू शकत नाही या कारणावरुन फेटाळला. त्यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दि.24.04.2007 रोजी उदभवले म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24 (अ) प्रमाणे तक्रारदाराने ही तक्रार दाखल करण्याचे कारण घडल्याचे दिनांकापासून दोन वर्षाचे आत म्हणजे दि.24.04.2009 पूर्वी दाखल करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदाराने ही तक्रार दि.01.10.2009 रोजी म्हणजे सहा महिन्याच्या विलंबाने दाखल केलेली आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करावा अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत विलंबमाफीचा अर्ज दाखल केलेला आहे, परंतू तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाबददल कोणतेही संयुक्तिक कारण दिलेले नाही. तक्रारदाराने जाणूनबुजून तक्रार दाखल करण्यास विलंब केलेला नाही असे विलंबाबाबत स्पष्टीकरण दिले आहे, परंतू सदर कारण संयुक्तिक वाटत नाही. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणातील इतर मुद्याबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तक्रारदाराने ही तक्रार दाखल करण्याचे कारण दि.07.09.2009 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीला तोंडी सुचना दिल्यानंतर घडले असे म्हटले आहे. तक्रारदाराच्या या म्हणण्याला कोणताही अर्थ नसून, गैरअर्जदार विमा कंपनीने दि 24.04.2007 रोजी त्याचा विमा दावा फेटाळल्याचा निर्णय कळविला, त्याचवेळी त्यास तक्रार दाखल करण्याचे कारण उदभवले होते. तक्रारदाराला त्याची तक्रार मुदतबाहय असल्याचे माहित असल्यामुळेच त्याने विमा कंपनीला तोंडी सुचना दिल्याच्या कारणावरुन ही तक्रार मुदतीत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू आमच्या मतानुसार ही तक्रार मुदतबाहयच आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |