तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
वाहन क्र. एम.एच.04-पी-4389 ट्रकची सामनेवालेकडे विमा पॉलिसी क्र. 253100/31/09/67-00004226 दि. 19/2/2010 ते दि. 18/2/2011 पर्यंत अस्तित्वात होती त्यामध्ये रु. 100/- कंपलसरी पर्सनल अॅक्सिडेंट ओनर कम ड्रायव्हरकरीता विमा घेतलेला होता. त्यामध्ये विमा रक्कम रु. 2,00,000/- पर्यंत मालक चालकाचे अपघातामुळे इजा किंवा मृत्यू झाल्यास मिळणार होते.
दि. 23/10/2010 रोजी तक्रारदार आपले वडीलांसोबत सदर वाहनातून पिंपरी चिंचवडकडे जात असतांना काशेली ब्रिजजवळ कापुर बावडी पोलिस स्टेशन अंतर्गत वाहनास अपघात झाला. त्याबाबत घटनास्थळ पंचनामा पोलिसांनी केला. तक्रारदाराने सामनेवालेकडे इन्श्युरन्स क्लेम दि. 9/3/2011 रोजी रू. 2,00,000/- चा दाखल केला. परंतु त्यांनी सदर दावा निकाली काढला नाही आणि त्यामुळे तक्रारदारास सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली आहे आणि त्यामुळे तक्रारदाराचे मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान झाले आणि म्हणून नुकसान भरपाई रु. 50,000/- मिळणेस तो पात्र आहे. तक्रारदार या मंचाचे कार्यक्षेत्रात राहतो तसेच सामनेवाले या मंचाचे कार्यक्षेत्रात राहतात. म्हणून सदर तक्रार या मंचासमोर चालू शकते. म्हणून प्रतिज्ञालेखासह सदर तक्रार दाखल केली आणि दस्तऐवज यादी पान क्र. 7 सोबत दाखल केली. त्यात घटनास्थळ पंचनामा, विमा पॉलिसी, अपघातानंतर तक्रारदाराचा इलाज केल्याबद्दलचे दस्तऐवज, मेडिकल बिल तसेच डॉक्टरांचा दाखला, रेशन कार्ड, पोचपावती, नोटीस व इतर दस्तऐवज दाखल आहेत.
सामनेवाले यांना दि. 14/10/011 रोजी नोटीस लागून त्यांचेवतीने कोणीही हजर झाले नाही. सामनेवालेचेवतीने कोणताही लेखी जबाब न आल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवाद केला आणि तक्रारीचे समर्थन केले.
तक्रारदाराचे शपथेवरील लेखी कथन, त्यांचे दाखल दस्तऐवज आणि केलेला युक्तीवाद यांचे वाचन करुन व ऐकून मंचाद्वारे निर्णयाकरीता खालील मुद्दा उपस्थित झालाः
मुद्दाः
सामनेवाले यांनी तकारदाराचा क्लेम निकाली न काढून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? आणि जर होय तर तक्रारदार काय दाद मिळणेस पात्र आहेत?
निष्कर्षः
मंचासमोर सामनेवाले यांनी कोणताही लेखी जबाब किंवा कथन सादर केलेले नाही. म्हणून तक्रारदाराचे शपथेवरील लेखी कथन सुक्ष्मपणे पडताळणी करणे गरजेचे आणि आवश्यक आहे.
तक्रारदाराने नमूद व कथन केलेनुसार वाहनाचा विमा सामनेवालेकडे होता व त्यासंबंधी दस्तऐवज दाखल आहेत आणि म्हणन मंचाने ग्राहय धरले व तक्रारदाराचे वाहनाचा विमा सामनेवालेकडे होता. तसेच सदर विमा पॉलिसीअंतर्गत बंधनकारक नियमानुसार चालक व मालक यांचा रु. 2,00,000/- चा वैयक्तीक अपघात विम्याअंतर्गत विमा हप्ता रु. 100/- सदर विमा पॉलिसीअंतर्गत स्विकारलेला आहे आणि म्हणून सामनेवाले यांचेकडे घटनेचे तारखेस तक्रारदाराचे वाहनाचा व त्याचे अपघाताविषयीचा विमा होता.
तक्रारदाराने नमूद केलेनुसार दि. 23/10/2010 रोजी त्याचे वाहनाला पोलिस स्टेशन कापुर बावडी, जिल्हा ठाणे अंतर्गत अपघात झालेला आहे व त्याबद्दल घटनास्थळ पंचनामा पान क्र. 8 वर दाखल आहे. त्याचदिवशी तक्रारदारास आरोग्य हॉस्पिटल येथे भरती केले. त्याबद्दल पान क्र. 14 वर दस्तऐवज दाखल आहेत आणि तक्रारदारावर तेथे इलाज केलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम मंजूर अथवा नामंजूर करणे हे कायदयाने अभिप्रेत आहे. तक्रारदाराने सामनेवालेस नोटीस देखील पाठविल्याचे दिसून येते. तरीदेखील त्यास कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच मंचाची नोटीस मिळून सामनेवाले यांनी आपले कोणतेही लेखी म्हणणे मांडलेले नाही.
सामनेवाले यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे मंचासमोर कोणतेही दस्तऐवज नाही. तक्रारदाराने सामनेवालेकडे क्लेम दाखल केल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे आणि सदर क्लेम निकाली काढल्याबद्दल कोणताही दस्तऐवज नाही म्हणून तक्रारदासराने दि. 9/3/2011 रोजी सामनेवालेस नोटीस दिल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले नोटीस मिळून गैरहजर राहिले आणि तसेच तक्रारदाराचा क्लेम दाखल झाल्याचे विहीत मुदतीत निकाली काढलेला नाही आणि याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिलेली मंचासमोर स्पष्ट होते.
तक्रारदाराने सामनेवालेकडून रु. 2,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदाराने सामनेवालेकडे किती रकमेची मागणी केली हे देखील दस्तऐवजावरुन स्पष्ट होत नाही. तक्रारदाराने इलाजाबद्दल दस्तऐवज व औषधांचे बिल दाखल केले असून डॉक्टरांचा दाखला दाखल आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचा क्लेम विहीत मुदतीत निकाली न काढल्याने त्यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिलेबद्दल नुकसान भरपाई मंजूर करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराचा क्लेम विशिष्ट कालावधीत मंजूर करावा किंवा नामंजूरीची कारणे दयावीत असेसुध्दा आदेशीत करणे कायदेशीर आहे. तसेच प्रस्तुत खर्च सामनेवाले यांनी दयावा असेसुध्दा आदेशीत करणे न्यायोचित राहिल. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा विहीत मुदतीत निकाली न काढून तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवेसाठी नुकसान भरपाई म्हणून रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) देय करावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) देय करावे.
4. सामनेवाले यांनी आदेश प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारदाराचा विमा दावा मंजूर करावा अथवा नामंजूरीची कारणे दयावीत आणि तक्रारदाराचा विमा दावा अंतीमतः निकाली काढावा.
5. सामनेवाले यांनी विहीत मुदतीत कारवाई न केल्यास तक्रारदाराचा क्लेम सामनेवाले यांनी नामंजूर केल्याचे ग्राहय धरण्यात येईल आणि तक्रारदार परत याविषयी तक्रार करण्यास मोकळे राहतील.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांस निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.