(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराच्या पतीने दि.28.06.2008 रोजी टाटा इंडिका गाडी गैरअर्जदाराच्या अर्थसहाय्याने खरेदी केली होती. कर्जाची रक्कम देतेवेळेस गैरअर्जदार कंपनीने तक्रारदाराच्या पतीस त्यांच्या कंपनीची लाईफ इन्शुरन्स पॉलीसी घेण्याबददल त्यांच्यावर दबाव टाकला होता, त्यामुळे तक्रारदाराच्या पतीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीची पॉलीसी घेतली होती. तक्रारदारास कर्जाची रक्कम मिळणे गरजेचे होते, म्हणून गैरअर्जदाराचे म्हणणे ऐकून त्यांनी ही पॉलीसी घेतली होती. गैरअर्जदार क्र.1 यांचे एजन्ट ब्रदेश्वर देवगिरे यांनी, पॉलीसीच्या अटी व शर्ती तक्रारदारास समजून दिल्या होत्या. ही पॉलीसी चार वर्षाची असून, प्रिमियमची रक्कम एकदाच भरावयाची होती, प्रिमियमची रक्कम रु.5,000/- अशी होती. या पॉलीसीनुसार तक्रारदारानी रु.5,000/- दि.12.07.2008 रोजी चेकने भरलेले होते. ही रक्कम गैरअर्जदारास प्राप्त सुध्दा झाली, रक्कम प्राप्त होऊनही गैरअर्जदारांनी या पॉलीसीचे कागदपत्रे, सर्टिफिकेट तक्रारदारास दिले नाहीत. दि.25.09.2009 रोजी तक्रारदाराचे पती म्हणजेच विमाधारकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही माहिती तक्रारदारानी गैरअर्जदार क्र.1 यांना कळविली, आणि पॉलीसीनुसार रु.1,00,000/- + फायदे मिळावेत म्हणून अर्ज दाखल केला, त्यावर गैरअर्जदार क्र.1 यांनी, तक्रारदाराच्या पतीने घेतलेली पॉलीसी ही लॅप्स झाली. कारण, तक्रारदारानी किंवा विमाधारकानी पॉलीसीचे हप्ते नियमितपणे भरलेले नव्हते. त्यानंतर तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली, तरी सुध्दा गैरअर्जदारानी त्यांना क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- + मॅच्युरिटी बेनिफिट, डेथ बेनिफिट द्यावेत. तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1 आणि 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही मंचात गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 यांना संधी देऊनही लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून त्यांच्याविरुध्द नो से चा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी दि.12.07.2008 रोजी श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे रु.5,000/- भरल्याचे त्यांच्या पासबुकवरुन दिसून येते. तक्रारदाराची हीच तक्रार आहे की, प्रिमियमची रक्कम घेऊनही गैरअर्जदारांनी त्यांना पॉलीसीचे कागदपत्रे दिली नाहीत. यावरुन गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, हे दिसून येते. तक्रारदारानी पॉलीसी कुठली घेतली होती, हे गैरअर्जदार मंचात गैरहजर असल्यामुळे मंचास समजू शकले नाही. म्हणून मंच गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांना असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदाराकडून ज्या पॉलीसीबदद्ल प्रिमियमची रक्कम रु.5,000/- घेतली होती, त्याबदद्लचे पॉलीसीचे सर्व कागदपत्रे चार आठवडयात दयावेत. ही कागदपत्रे तक्रारदारास देणे, हे गैरअर्जदाराचे कर्तव्य असतांनाही त्यांनी ती दिली नाहीत. म्हणून गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास रु.2,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.500/- द्यावेत, असा आदेश मंच देत आहे. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास पॉलीसीचे सर्व कागदपत्रे व सेवेतील त्रुटीबददल रु.2,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.500/- निकाल दिनांकापासून चार आठवडयात दयावेत. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |