::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/07/2015 )
माननिय सदस्य श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता याने स्वत:च्या वापराकरिता घेतलेली टाटा इंडीका कार क्र. एम एच-29-व्ही 7997 चा विमा विरुध्द पक्ष कंपनीकडे दिनांक 19/12/2013 ते 18/12/2014 या कालावधीकरिता काढला होता. त्याची विमा पॉलिसी क्र. 515034/31/14/003490 असून त्यामध्ये गाडीची किंमत (आय.डी.व्ही. ) रुपये 2,01,825/- व इलेक्ट्रीकल अॅसेसरीज रुपये 23,000/- असे एकूण रुपये 2,24,825/- अंतर्भूत होते. त्याकरिता लागणारा पूर्ण प्रिमीअम भरलेला आहे. तक्रारकर्त्याने वरील वाहन हे श्री. गजानन नथ््थुजी इंगोले यांचेकडून कायदेशीररित्या विकत घेतलेले आहे.
सदर गाडी ही दिनांक 21/04/2014 रोजी तक्रारकर्ता व त्यांची बहिण दक्षा राजेश लखाणी हे येवला येथून औरंगाबाद येथे येत असतांना रात्री 3.30 वाजता कोटमगाव गावाजवळ अपघातग्रस्त झाली होती व त्यामध्ये गाडीचे बरेच नुकसान झाले. अपघाताचे वेळी गाडी तक्रारकर्त्याची बहिण दक्षा राजेश लखाणी चालवीत होती व तिच्याकडे नियमानुसार लागणारा वाहन चालविण्याचा परवाना आहे. तक्रारकर्त्याने तात्काळ सदर अपघाताबाबत विरुध्द पक्षाचे अधिका-याला सुचना दिली. त्या सुचनेनुसार कंपनीच्या अधिकृत अधिका-यामार्फत वाहनाचा सर्वे सुध्दा झालेला होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त गाडी, साई मोटर्स, नगर मनमाड हायवे, कोपरगाव जि. अहमदनगर येथुन सुधारुन घेतली. त्यासाठी रुपये 1,49,307/- एवढा खर्च तक्रारकर्त्यास लागला. तक्रारकर्त्याने त्याचे वाहन दुरुस्ती करुन आणल्यानंतर विमा कंपनी यांचेकडे विमा दाव्याची रक्कम मिळणेकरिता लागणारी पूर्ण कागदपत्रे, दुरुस्तीचे बील इ. जमा केली. परंतु बरेच दिवस विरुध्द पक्षाने दाव्यावर निर्णय घेतला नाही व विलंब केला गेला. नंतर विलंबाने विमा कंपनीकडून तक्रारकर्त्याला रुपये 53,977/- दावा मंजूर करण्यात आला, असे कळविण्यात आले. ती रक्कम अत्यंत कमी असल्यामुळे, तक्रारकर्त्यास मान्य नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 21/08/2014 रोजी नोंदणीकृत डाकेने पोचपावतीसह नोटीस देवून विरुध्द पक्षास कळविले. परंतु विरुध्द पक्षाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.
त्यामुळे, तक्रारकर्ता यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, वाहनाची नुकसान भरपाई रुपये 1,49,307/- व त्यावर दरसाल, दरशेकडा 18 % दराने व्याज मिळावे, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- व नोटीसचा खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा, तक्रारीचा खर्च मिळावा, अशी मागणी, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 13 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब -
विरुध्द पक्षाने निशाणी 11 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये, कागदपत्रावरुन व पुराव्यावरुन अपघात झाला असे सिध्द झाल्यास, नमुद केले की, दिनांक 21/04/2014 रोजी येवला ते औरंगाबाद मार्गावर तक्रारकर्त्याची इंडीका कार क्र. एम एच-29/व्ही – 7997 चा अपघात झाला होता हे सिध्द करण्याकरिता तक्रारकर्त्याने कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारीसोबत दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने एफ.आय. आर., स्पॉट पंचनामा, किंवा पोलीस स्टेशनची कोणतीही कागदपत्रे दाखल केली नाहीत. तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना विरुध्द पक्ष यांना नेमकी कोणत्या तारखेला व किती वाजता, कशाप्रकारे दिली होती, हयाबाबत तक्रारीत काहीही नमुद केले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवर 24/04/2014 ही तारीख लिहिलेली आहे परंतु सदरहू क्लेम फॉर्म विरुध्द पक्ष हयांना केंव्हा व कोणत्या तारखेला प्राप्त झाला होता हे निश्चितपणे सिध्द करणारा, कोणताही दस्तऐवज, तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. तक्रार अर्जावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला क्लेम इंटीमेशन 48 तासानंतर दिलेली होती. पॉलिसी प्रमाणे 48 तासानंतर दिलेली क्लेमची सुचना ही ऊशीरा दिलेली सुचना समजण्यात येते व पॉलिसीचे ऊल्लंघन ठरते.
घटनेच्या वेळी सदरहू वाहन, तक्रारकर्त्याची बहिण दक्षा राजेश लखाणी चालवीत होती, हयाबाबत देखील कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. शिवाय दक्षा राजेश लखाणी यांना आर.टी.ओ. रायपुर हयांनी जो वाहन चालविण्याचा परवाना दिलेला होता तो दिनांक 21/03/2014 रोजी दिलेला होता असे दिसते व सदरहू घटना ही दिनांक 21/04/2014 रोजी झाली असे नमुद केले आहे. हयावरुन हे स्पष्ट होते की, दक्षा लखाणी ही सदरहू वाहन चालविण्यांस सक्षम नव्हती व तिचेजवळ वाहन चालविण्याचे नुकतेच मिळविलेले लायसन्स होते. अशा व्यक्तीला वाहन चालविण्याची परवानगी दिली व अशाप्रकारे तक्रारकर्ता हाच स्पष्टपणे सदरहू घटनेला जबाबदार आहे. घटनेच्या वेळी वाहनामध्ये नेमके किती प्रवासी बसलेले होते ही बाब तक्रार अर्जात नमुद केलेली नाही. यावरुन घटनेच्या वेळी अधिकृत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते, हे स्पष्ट होते.
तक्रारकर्त्याने सदरहू वाहन साई मोटर्स, कोपरगांव जि. अहमदनगर येथे दुरुस्त केले होते व त्याला रुपये 1,49,307/- एवढा दुरुस्ती खर्च आला असे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेले सदरहू रक्कमेचे इस्टीमेट हे चुकीचे व जास्त रक्कमेचे आहे. तसेच साई मोटर्स, कोपरगांव चे मालकाचा प्रतिज्ञालेख तक्रारीसोबत दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष यांचे सर्व्हेअर प्रशांत एस. झवरे यांनी जो सर्व्हे केलेला होता त्याप्रमाणे रुपये 66,366/- एवढी रक्कम सर्व्हे रेकॉर्डमध्ये दाखविलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी सर्व्हे रिपोर्ट व इतर कागदपत्रे विचारात घेवून तक्रारकर्त्याकरिता रुपये 53,977/- एवढी रक्कम असेस केलेली होती व ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीत मान्य केलेली आहे. परंतु रुपये 53,977/- ही रक्कम सुध्दा देण्याची विरुध्द पक्ष विमा कंपनीची कोणतीही जबाबदारी नाही, कारण तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीचे ऊल्लंघन केलेले आहे. यावरुन, तक्रारकर्त्याने पॉलिसी प्रमाणे त्याची जबाबदारी पूर्ण केलेली नाही. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, विरुध्द पक्षाचा लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्षाचे लेखी युक्तिवादाला तक्रारकर्त्याने दिलेले प्रतिऊत्तर व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद, तसेच विरुध्द पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, वि. मंचाने खालील कारणे देऊन निष्कर्ष पारित केला.
तक्रारकर्त्याने श्री. गजानन नथ््थुजी इंगोले यांचेकडून विकत घेतलेली टाटा इंडीका कार क्र. एम एच-29-व्ही 7997 चा विमा विरुध्द पक्ष कंपनीकडे दिनांक 19/12/2013 ते 18/12/2014 या कालावधीकरिता काढला होता. त्याची विमा पॉलिसी क्र. 515034/31/14/003490 असून त्यामध्ये गाडीची किंमत (आय.डी.व्ही. ) रुपये 2,01,825/- व इलेक्ट्रीकल अॅसेसरीज रुपये 23,000/- असे एकूण रुपये 2,24,825/- अंतर्भूत होते. त्याकरिता लागणारा पूर्ण प्रिमीअम भरलेला आहे. सदरहू गाडीचा दिनांक 21/04/2014 रोजी तक्रारकर्ता व त्यांची बहीण दक्षा राजेश लखाणी हे येवला येथून औरंगाबाद येथे येत असतांना रात्री 3.30 वाजता कोटमगाव गावाजवळ अपघात झाला, त्यामध्ये गाडीचे बरेच नुकसान झाले. त्यानंतर तात्काळ तक्रारकर्त्याने अपघाताबाबत विरुध्द पक्षाचे अधिकरी यांना सुचना दिली. त्या सुचनेनुसार कंपनीचे अधिकृत अधिका-यामार्फत वाहनाचा सर्व्हे झाला. त्यानंतर तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त गाडी साई मोटर्स, नगर मनमाड हायवे कोपरगाव जि. अहमदनगर येथे दुरुस्त करुन घेतली. त्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये 1,49,307/- एवढा खर्च आला. सदरहू गाडीचा विमा असल्याच्या कारणास्तव तक्रारकर्त्याने दिनांक 24/04/2014 रोजी क्लेम फॉर्म भरुन, त्यासोबत आवश्यक ते दस्तऐवज विरुध्द पक्षाकडे जमा केले. परंतु नंतर बरेच दिवसानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा रुपये 53,977/- चा मंजूर केला. सदरहू दावा रक्कम तक्रारकर्त्याला मान्य नसल्याच्या कारणास्तव तक्रारकर्त्याने दिनांक 21/08/2014 रोजी विरुध्द पक्षाला नोटीसव्दारे कळविले. परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून तक्रारकर्त्याला प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली.
विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व पुराव्यावरुन अपघात झाला हे सिध्द होत नाही. तसेच तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना विरुध्द पक्षाकडे नेमकी कोणत्या तारखेला व किती वाजता, कशाप्रकारे दिली होती, हयाबाबत तक्रारीत काहीही नमुद केले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवर 24/04/2014 ही तारीख लिहिलेली आहे परंतु सदरहू क्लेम फॉर्म विरुध्द पक्ष हयांना केंव्हा व कोणत्या तारखेला प्राप्त झाला होता हे निश्चितपणे सिध्द करणारा, कोणताही दस्तऐवज, तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. तक्रार अर्जावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला क्लेम इंटीमेशन 48 तासानंतर दिलेली होती. पॉलिसी प्रमाणे 48 तासानंतर दिलेली क्लेमची सुचना ही ऊशीरा दिलेली सुचना समजण्यात येते व पॉलिसीचे ऊल्लंघन ठरते. तसेच विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, गाडी चालविणारी तक्रारकर्त्याची बहिण दक्षा राजेश लखाणी, हयांना जो वाहन चालविण्याचा परवाना दिलेला आहे तो दिनांक 21/03/2014 रोजी दिलेला होता असे दिसते व सदरहू घटना ही दिनांक 21/04/2014 रोजी झाली असे नमुद केले आहे. हयावरुन हे स्पष्ट होते की, दक्षा लखाणी ही सदरहू वाहन चालविण्यांस सक्षम नव्हती व तिचेजवळ वाहन चालविण्याचे नुकतेच मिळविलेले लायसन्स होते. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने दाखल केलेले रक्कमेचे इस्टीमेट हे चुकीचे व जास्त आहे. विरुध्द पक्षाचे सर्व्हेअर प्रशांत एस. झवरे यांनी गाडीचा सर्व्हे करुन नुकसानीची रक्कम 66,366/- रुपये एवढी दाखविलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी सर्व्हे रिपोर्ट व इतर कागदपत्रे विचारात घेवून तक्रारकर्त्याकरिता रुपये 53,977/- एवढी रक्कम असेस केलेली होती. परंतु विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीचे ऊल्लंघन केल्यामुळे कुठलाही विमा दावा रक्कम देण्यास जबाबदार नाही.
कागदपत्राचे अवलोकन केल्यावरुन असे दिसून येते की, दिनांक 21/04/2014 रोजी सदरहू वाहनाचा अपघात झाला, अपघाताच्या वेळेस तक्रारकर्त्याची बहिण दक्षा राजेश लखाणी, ही वाहन चालवित होती व तिच्याकडे नियमानुसार लागणारा वाहन चालविण्याचा परवाना होता. विरुध्द पक्षाने त्यांच्या अधिकृत सर्व्हेअर मार्फत सदरहू गाडीचा सर्व्हे केला, यावरुन पुढील बाबी सिध्द होतात की, तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाला होता, याबाबतची सुचना विरुध्द पक्षाला वेळेत मिळालेली होती. विरुध्द पक्षाने दाखल केलेले न्याय-निवाडे या प्रकरणात लागू होत नाहीत, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याने साई मोटर्स, कोपरगाव यांच्याकडून गाडी दुरुस्त करुन घेतली होती व त्याकरिता तक्रारकर्त्याला रुपये 1,49,307/- एवढा खर्च आला. तक्रारकर्त्याने ती रक्कम भरल्याबाबत मुळ पावत्याच्या प्रती प्रकरणात दाखल केल्या आहेत. या सर्व बाबीवरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्ता सदरहू खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा मिळून सुध्दा झालेल्या नुकसानीची कमी आकारणी करुन ती सुध्दा तक्रारकर्त्यास दिली नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीची नुकसान भरपाईची रक्कम नाकारुन, सेवेमध्ये न्युनता दर्शविलेली आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे, तक्रारकर्ता त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे, असे ही मंचाचे मत आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास टाटा इंडीका कार क्र. एम एच-29-व्ही 7997 या वाहनाचे नुकसानीपोटी, रुपये 1,49,307/- (रुपये एक लाख एकोनपन्नास हजार तीनशे सात फक्त) ईतकी रक्कम दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारकर्त्यास दयावा.
- विरुध्द पक्ष / विमा कंपनी यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे. अन्यथा विरुध्द पक्ष हे वरील रक्कम अदायगी पर्यंत तक्रारकर्त्याला द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज देण्यास जबाबदार राहतील.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svGiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.