(घोषित दि. 22.09.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
भारतीय जिवन विमा निगमच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती बद्रीनाथ जिगे यांनी दिनांक 28.03.2007 रोजी गैरअर्जदार भारतीय जिवन विमा निगमकडे पॉलिसी क्र.98767793 अंतर्गत स्वत:चा विमा उतरविला होता. विमा कालावधीमध्येच त्यांचे क्षयरोग झाल्याने निधन झाले. त्यामुळे तिने गैरअर्जदार भारतीय जिवन विमा निगमकडे विमा दावा दाखल केला. परंतु जीवन विमा निगमने तिचा विमा दावा तिच्या पतीने आजाराची माहिती दडविल्याच्या कारणावरुन फेटाळला. वस्तुस्थितीमध्ये तिच्या पतीला त्यास क्षयरोग असल्याचे माहित नव्हते. जीवन विमा निगमने चुकीचे कारण देवुन विमा दावा फेटाळला व त्रुटीची सेवा दिली. म्हणून जीवन विमा निगमकडुन पॉलिसीमधील तरतुदीनुसार विम्याची रक्कम सर्व लाभासह मिळावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
गैरअर्जदार जीवन विमा निगमने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पती ब्रदीनाथ यांची दिनांक 28.03.2007 रोजी सुरु झालेली पॉलिसी सप्टेबर,2007 मधील विमा हप्ता न भरल्याने बंद (Lapse)पडलेली होती. सदर पॉलिसीचे मयत बद्रीनाथने दिनांक 29.05.2008 रोजी (Renival)नुतनीकरण करुन घेतले. त्यापुर्वी मयत बद्रीनाथ हा दिनांक 13.05.2008 पासुन हेडगेवार हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी भरती झालेला होता व त्यास क्षयरोग झाल्याचे माहित होते. परंतु पॉलीसीचे नुतनीकरण करताना मयताने त्यास क्षयरोग झाल्या विषयीची माहिती दडविली. मयताने दिनांक 29.05.2008 रोजी पॉलीसीचे नुतनीकरण करुन घेतले व त्याचे दिनांक 02.06.2008 रोजी निधन झाले. मयताने आजारा विषयीची माहिती दडवून पॉलीसीतील अटींचे उल्लंघन केले म्हणुन तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आलेला असुन तिची तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा निगमने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थीत होतात.
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगमच्या
सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.पी.एम.परिहार आणि गैरअर्जदाराच्या बाजुने अड.शेख इक्बाल अहमद यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचे पती बद्रीनाथ यांनी गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगमकडे दिनांक 28.03.2007 रोजी स्वत:चा विमा उतरविला होता. सदर पॉलसी सप्टेबर,2007 मधील विमा हप्ता न भरल्याने बंद पडली. त्यानंतर सदर पॉलीसीचे तक्रारदाराचे पती बद्रीनाथ यांनी दिनांक 29.05.2008 रोजी नुतनीकरण करुन घेतले व त्यांचे दिनांक 02.06.2008 रोजी निधन झाले. त्यानंतर तक्रारदाराने विमा दावा दाखल केला होता. परंतू तक्रारादाराचा विमा दावा गैरअर्जदार भारतीय जीवन विमा निगमने फेटाळला. तक्रारदाराच्या पतीने पॉलीसीचे नुतनीकरण करुन घेत असतांना त्यास जडलेल्या क्षयरोगा विषयीची माहिती दडविल्याच्या कारणावरुन जीवन विमा निगमने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तिचे पती ब्रदीनाथ यांना क्षयरोग (TB with CRA) असल्याचे त्यांना माहित नव्हते व त्यांचे ब्रेनटयुमरमुळे निधन झाले होते.
भारतीय जीवन विमा निगमने तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळलेला आहे. तक्रारदाराच्या पतीची पॉलीसी विमा हप्ता भरला नाही म्हणुन बंद अवस्थेत होती. त्यानंतर दिनांक 13.05.2008 रोजी मयत बद्रीनाथ यांना डॉ.हेगडेवार रुग्णालय, औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते. त्याठिकाणी दिनांक 26.05.2008 पर्यत उपचार घेतल्यानंतर मयत बद्रीनाथ यास डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पीटलमध्ये जवळपास 14 दिवस उपचार घेतल्यानंतर दिनांक 29.05.2008 रोजी मयताने त्यांच्या बंद पडलेल्या विमा पॉलीसीचे नुतनीकरण करुन घेतले आणि नुतनीकरण करुन घेत असतांना त्यांनी भारतीय जीवन विमा निगमकडे निवेदन नि.12/2 देत आसतांना स्वत:ला जडलेल्या आजाराविषयी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच एक आठवडयाहून अधिक काळ उपचार आवश्यक असलेल्या आजाराविषयी सदर निवेदनामध्ये नेमका प्रश्न असुनही त्या प्रश्नाला चुकीची उत्तरे दिली व तसा आजार नसल्याचे सांगितले. वास्तविक सदर निवेदन नि.12/2 हे मयताने हॉस्पीटलमध्ये 14 दिवस उपचार घेतल्यानंतर तीनच दिवसांनी भरुन दिले आहे. यावरुन मयत बद्रीनाथ यांनी जाणुन बुजून स्वत:ला जडलेल्या आजाराविषयी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट दिसते.
मयत बद्रीनाथ यांनी दिनांक 29.05.2008 रोजी पॉलीसीचे नुतनीकरण करण्यासाठी निवेदन नि.12/2 दिल्यानंतर 3 दिवसांनीच म्हणजे दिनांक 02.06.2008 रोजी त्यांचे निधन झाले. यावरुन देखिल मयताचा पॉलीसीचे नुतनीकरण करण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसतो.
आमच्या मतानुसार मयत बद्रीनाथ यांना स्वत:ला क्षयरोग जडल्याचे माहित होते व त्यांनी पॉलीसीचा गैर फायदा घेण्याच्या हेतुनेच पॉलीसीचे नुतनीकरण करुन घेतले होते. त्यामुळे गैरअर्जदार जीवन विमा निगमने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळुन कोणतीही चूक केलेली नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणुन मुद्दा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.