नि का ल प त्र :- (दि. 09/05/2013) (द्वारा- श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार दि. 13-01-2012 रोजी दाखल होऊन दिनांक 23-01-2012 रोजी स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. युक्तीवादाचे वेळेस तक्रारदार व वि.पक्ष यांचेतर्फे वकील हजर. तक्रारदार व वि.पक्ष यांचे वकिलांचा तोंडी युक्तीवाद ऐकणेत आला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-
तक्रारदार यांनी 4 दिवसाचा “आवडेल तेथे प्रवास” हा बस पास यातील वि.पक्षकार नं. 2 यांचेकडून रक्कम रु. 700/- (सातशे रुपये) देऊन घेतला त्याचा पास नं. 001-018800 असा होता. सदरचा पास हा संपूर्ण महाराष्ट्र राज्य व आंतरराज्य साध्या व निमआराम बसने प्रवास करता येईल यासाठी होता. सदरचा पास दि. 12-02-2011 (00.00) दि. 15-02-2011 (24.00) पर्यंत होता. तक्रारदारांना प्रथम पुण्याला जावयाचे होते त्यासाठी दि. 12-02-2011 रोजी रत्नागिरी-पुणे बस नं. एम.एच. 07-सी-7480 कोल्हापूर बस आगारमध्ये पाहिली व तक्रारदार यांनी रात्री 12.00 वाजता या बसमध्ये प्रवेश केला. सदर बस कोल्हापूर शहराबाहेर पुना-बेंगळूर महामार्गावर आली तेंव्हा बसमधील वाहकाने तक्रारदार यांना बस तिकीट घेण्याची मागणी केली त्यावेळी तक्रारदार यांनी आपल्याजवळ रु. 700/- चा 4 दिवसाचा बस पास वाहकाला दाखवला त्यावेळी तक्रारदारांबरोबर बसमधील वाहकाने हुज्जत घालून सदरचा पास हा या गाडीस चालत नाही तू खाली उतर असे तक्रारदार यांना सांगितले. त्यावेळी रात्रीचे 12.30 वाजले होते. त्यावेळी तक्रारदार यांनी बस वाहकास सदर पास हा आंतरराज्य पास आहे व आपण बसमध्ये चढताना कोल्हापूर बस कंट्रोलर यांचेकडे चौकशी करुनच बसमध्ये बसण्याचे सांगितले. परंतु बस वाहक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बसमधील वाहक तक्रारदाराबरोबर उध्दट वर्तन करुन हुज्जत घालत होते. त्यामुळे तक्रारदार यांना अपमान सहन करावा लागत होता. तक्रारदार हे पूर्णपणे खचले होते. त्यामुळे रात्रभर गाडीत झोपू शकले नाहीत त्याला बसमधील वाहकच जबाबदार आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत कराड आगार व्यवस्थापक यांचेकडे तोंडी तक्रार केली. व स्वारगेटला पोहचताच स्वारगेट आगार व्यवस्थापकडे लेखी तक्रार केली. तक्रारदारांना आपला 4 दिवसाचा प्रवास व आपल्या सुटटीची मजा लुटता आली नाही यास वाहकच कारणीभूत आहे.
तक्रारदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक, आर्थिक व भावनिक त्रासाबद्दल वकिलामार्फत नोटीस पाठवून रु. 1,00,000/- नुकसानभरपाईची मागणी केली. वि.पक्षकार यांनी दि. 8-04-2011 रोजी पत्र पाठवून वाहकाच्या चुकीमुळे तक्रारदारांना त्रास झाल्याचे मान्य केले आहे. सदर वाहकावर महामंडळाच्या नियमानुसार वाहकास रु. 100/- दंडाची शिक्षा करण्यात आली असे कळविले आहे. तक्रारदारांनी पाठविलेली नोटीसीस खोटे उत्तर पाठवून नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे टाळले त्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब, तक्रारदार यांनी शारिरीक,मानसिक, आर्थिक व भावनिक त्रास झाल्यामुळे रु. 1,00,000/- व तक्रार दाखल केल्या तारखेपासून द.सा. द. शे. 18 टक्के व्याजासह वि.पक्षकार यांचेकडून नुकसानभरपाई व लिगल नोटीस चे रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च इत्यादी देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी “आवडेल तेथे प्रवास” पास नं. 001-018800 दि. 12-02-2011, स्वारगेट आगामध्ये दिलेली फीर्याद दि. 12-02-2011, स्वारगेट आगाराचे पत्र दि. 12-02-2011 व रत्नागिरी आगाराचे पत्र दि. 26-2-2011 प 8-04-2011 व 8-8-2011, दि. 14-07-2011 रोजीची लिगल नोटीस, पोष्ट पावती, रजि. ए.डी. पावती, कोल्हापूर परिवहन महामंडळाचे दि. 20-06-2011 रोजीचे पत्र, लिगल नोटीसीला दिलेले उत्तर दि. 22-08-2011 इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. व शपथपत्र दाखल केलेले आहे.
(4) वि. पक्षकार यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. तक्रारदाराने नमूद क्रमांकाचा पास वि.प. नं. 2 कडून घेतेवेळी पास संबंधातील अटी, नियम पासावर नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी गर्दीच्या हंगामामाध्ये प्रवास केलेला असून ते एकटे होते व सोबत त्यांचेकडे सामान जास्त व जड असलेमुळे अशा सामानाची वाहतुक बेकायदेशीर असल्याने बसचे वाहकाने तक्रारदार यांना जास्त व जड सामानाबाबत अटकाव केला. वाहकाने लगेज चार्जेस भरण्यास सांगितल्याने त्याचा राग तक्रारदारांना आल्याने लगेच चार्जेस भरणार नाही असे वाहकास सांगितले. बसमध्ये तक्रारदारांना फक्त डाव्या बाजूस बसण्यास जागा हवी होती. सदर बाकांवर इतर प्रवासी बसलेले असताना तक्रारदार हे संबंधित प्रवाशाला उठवून जागा देणेबाबत मागणी करुन हुज्जत घालू लागले. तक्रारदार यांना सदर पास हा पास असून तो रिझर्व्हेशन नाही याची माहिती व कल्पना वाहकाने दिली होती. वाहकाने तक्रारदारांना जागा उपलब्ध असेल तिथे नाहीतर मागील भागाच्या बाकांवर बसणेस सांगितले. तक्रारदारांचा प्रवास शांततेत व योग्य वेळेत पुर्ण करुन त्यांच्या इच्छित स्थळी पुणे येथे उतरले. त्यावेळी सुध्दा तक्रारदाराने वाहकास तुला कोर्टात खेचतो अशी भाषा वापरुन धमकी दिली. तक्रार अर्जातील कलम 4 मध्ये कथने खोटी आहेत. तक्रारदारांना सुट्टीची मजा लुटता आली नाही हे कथन चुकीचे आहे.
वि.पक्षकार त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार आलेनंतर तक्रारीची दखल घेऊन तक्रारी संदर्भात चौकशी सुरु केली होती. त्यामध्ये संबंधीत वाहक यांनी शो कॉज नोटीसला उत्तर न दिलेमुळे त्यांना दंड करणेत आला आहे. तक्रारदारांचे तक्रारीत फक्त वाहकावर कारवाई करणेची तक्रार केलेली होती. नुकसान भरपाईची मागणी केलेली नव्हती. तक्रारदारांनी वेगवेगळया अधिका-यासमोर एकसारख्या तक्रारी करणे हे चुकीचे व बेकायदेशीर आहे. सबब, सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. व तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेने तक्रारदारांकडून रु. 25,000/- दंड होऊन वि.पक्षकार यांना अदा करणेचा आदेश व्हावा अशी विंनती केली आहे. वि.पक्षकार यांनी बस वाहक श्री. पठाण ए.आर. यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
(5) वि. पक्षकार तर्फे दि. 27-03-2012 रोजी पाच (5) कागदपत्रे दाखल केली आहेत. दि. 26-03-2012 रोजीचे अधिकारपत्र, आवडेल तेथे प्रवास या योजनेचा पासाचे अटी व शर्तीचे माहितीचे परिपत्रक क्र. 12/2010 व पुढील परिपत्रक क्र. 7321, बसचे वाहक श्री. पठाण यांना पाठविलेली शो-कॉज ची नोटीस क्र. 179-11/23050 दि. 30-04-2011, शो-कॉज नोटीसीप्रमाणेचा दंड श्री. ए.आर. पठाण यांना केलेची समज दि. 9-06-2011, अर्जदारास श्री. पठाण यांना दंड केलेबाबतचे पत्राने कळविलेचे पत्राची प्रत इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(6) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, वि. पक्ष यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांच्या वकिलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
मुद्दे
1. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? --- होय
2. वि. पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहे काय ? ---- होय.
4. आदेश काय ? --- खालीलप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र.1: तक्रारदार यांनी 4 दिवसाचा “आवडेल तेथे प्रवास” हा बस पास यातील वि.पक्षकार नं. 2 यांचेकडून रक्कम रु. 700/- (सातशे रुपये) देऊन घेतला त्याचा पास नं. 001-018800 असा होता. सदरचा पास हा संपूर्ण महाराष्ट्र राज्य व आंतरराज्य व साध्या व निमआराम बसने प्रवास करता येईल यासाठी होता. सदरचा पास दि. 12-02-2011 (00.00) दि. 15-02-2011 (24.00) पर्यंत होता. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2: प्रस्तुत तक्रारीमध्ये वि.प. यांचे कंडक्टर श्री. पठाण, बिल्ला क्र. 4/970 यांनी यातील तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? हा वादाचा मु़द्दा निघतो. त्या अनुषंगाने या मंचात तक्रारदाराने दाखल केलेल्या यादीसोबतच्या क्र. 1 ते 5 या कागदपत्राचे अवलोकन केले असता, यादीसोबत क्र. 3 कडे दाखल केलेले दि. 30-04-2011 रोजीची शोकॉज नोटीस पाहिला असता, सदरची नोटीस विभागीय वाहतुक अधिक्षक ( अपराध) राज्य परिवहन, रत्नागिरी यांनी वाहक श्री. ए.आर. पठाण यांना कामातील अक्षम्य निष्काळजीपणा व हयगय केली व याबाबत खुलासा करणेबाबत दिलेली दिसते व अनुक्रमांक 4 कडे दि. 9-06-2011 रोजीचा विभागीय वाहतुक अधिक्षक राज्य परिवहन, रत्नागिरी यांचा आदेश दाखल केला असून त्यामध्ये यातील वाहन श्री. ए.आर. पठाण यांना रक्कम रु. 100/- दंड केल्याचे स्पष्ट दिसून येते. व उपरोक्त दोन्ही कागदपत्र पाहता याचे सखोलपणे अवलोकन केले असता यातील वि.प. क्र. 1 यांचे वाहक श्री. पठाण यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3: तक्रारदार यांना वि.प. क्र. 1 वाहक श्री. ए. आर.पठाण वाहक यांनी योग्य ती सेवा दिलेली नाही, व त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्यांनी चार दिवसाचा प्रवास पुर्ण केलेला नाही. तक्रारदार हे “आवडेल तेथे प्रवास”चे पासची रक्कम रु. 700/- परत मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. व तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- इतके मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे म्हणून मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 4: सबब, या प्रकरणी हे मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) वि. पक्षकार यांनी तक्रारदार यांना “आवडेल तेथे प्रवास ”पासची रक्कम रु. 700/- (अक्षरी रु. सातशे फक्त) सदर आदेशापासून 60 दिवसांचे आत द्यावेत. अन्यथा सदर रक्कमेवर वसुल होईपावेतो द.सा. द.शे. 9 % प्रमाणे व्याज द्यावे.
3) वि. पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रु. एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 500/- (अक्षरी रु. पाचशे फक्त) द्यावेत.
4) सदरच्या निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.