(मंचाचे आदेशान्वये – सौ.प्रतिमा जी आकरे, सदस्या )
-- आदेश --
(पारित दिनांक 29.06.2006)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार त्याला प्राप्त झालेल्या टेलिफोनच्या जास्त रक्कमेच्या बिलाबद्दल दाखल केली असून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराला जास्तीचे बिल न आकारतात त्याच्या नेहमीच्या बिलाप्रमाणे अव्हरेज रुपये 1,300/- (दोन महिन्याकरिता ) आकारावे. तसेच नुकसानीबद्दल व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता हा महागांव (तिल्ली) तह. गोरेगांव, जि. गोंदिया येथील रहिवासी असून त्याचा व्यवसाय शेती आहे. त्याच्याकडे बी.एस.एन.एल. चा टेलिफोन क्रं.234139 हा 1998 पासून असून त्याचा वापर घरी केला जातो. त्यावर एस.टी.डी. ची सोयपण आहे. तक्रारकर्त्याला आजपर्यंत टेलिफोनचे दोन महिन्याचे बिल साधारणतः रुपये 1,200/- ते 1,300/- येत असे व ते बिल तो नियमितपणे भरीत असे. मे-2005 पर्यंत सर्व ठिक होते परंतु अचानक मे-जुन-2005 चे बिल रुपये 4,500/- चे आले.
तक्रारकर्त्याने या जादा बिलाबद्दल संबंधित कार्यालयात गैरअर्जदार क्रं. 2 कडे तक्रार केली असता त्यांनी सुचविले की, अर्जदाराने बिल भरावे व आम्ही नंतर चौकशी करु व जर जादा रक्कम आकारली असे दिसून आल्यास नंतरच्या बिलात त्याचे समायोजन करण्यात येईल. म्हणून अर्जदाराने मे – जुन-2005 चे बिल रुपये 4,500/-भरले. पण नंतर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा जुलै- ऑगस्ट-2005 चे रुपये 3,340/- चे बिल तक्रारकर्त्याला प्राप्त झाले. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने दर्शविल्या इतका टेलिफोनचा वापर त्या कालावधीत केलेला नाही. म्हणून अर्जदाराने दि. 29.09.2005 ला गैरअर्जदाराकडे बिलाचे डिटेल्स देण्याबद्दल अर्ज केला. परंतु त्याला मे-2005 ते ऑगस्ट-2005 या कालावधीतील फोन कॉल्सचे सविस्तर वर्णन देण्यास गैरअर्जदाराने स्पेशल नकार दिला म्हणून अर्जदाराच्या मते ही गैरअर्जदाराकडून झालेली सेवेतील त्रृटी आहे.
आपल्या कथना पुष्टयर्थ अर्जदाराने निशाणी क्रं. 3 व 4 द्वारे वकालतनामा व टेलिफोनची काही बिले दि. 01.05.2004 ते 30.06.2004, 1.7.04 ते 31.08.04, 1.3.05 ते 30.04.05, 1.7.05 ते 31.08.05 व दि. 29.09.05 ला एस.डी.ओ.ला केलेल्या तक्रारीची प्रत दाखल केली आहे. तत्पूर्वी अर्जदाराने निशाणी क्रं. 2 द्वारे एक अर्ज करुन ही केस आहे तो पर्यंत आपले टेलिफोन कनेक्शन कापण्यात येऊ नये अशी मागणी केली. मंचाला हे उचित वाटल्याने व अर्जदाराच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून मंचाने गैरअर्जदार याने या केसची सुनावणी चालू आहे तो पर्यंत अर्जदाराचे टेलिफोन कनेक्शन कापू नये असे निर्देश दिले आहे.
गैरअर्जदाराने निशाणी क्रं. 11 द्वारे सादर केलेल्या लेखी बयानात अर्जदाराचे काही मुद्दे खोडले आहेत. गैरअर्जदार क्रं. 2 हा एस.डी.सी.ए. (Shor distance charging area)चा मुख्य अधिकारी असून चोपा एक्सचेंज एस.डी.सी.ए. मध्ये येते. अर्जदार हा नियमितपणे बिल भरत होता हा मुद्दा खोडतांना गैरअर्जदार क्रं. 2 ने निशाणी क्रमांक -15 द्वारे अनेक्सचर दाखल केले. त्यात अर्जदाराने दिनांक 07.09.2005 रोजीचे टेलिफोन बिल रुपये 3,410/- न भरल्याने दि. 26.10.2005 ला दूरध्वनी खंडित करण्यात आला होता व रिकनेक्शनचे रुपये 110/- व टेलिफोनचे बिल रुपये 3,410/- असे एकूण रुपये 3,520/- भरल्यावर दि. 03.11.2005 ला टेलिफोन पूर्ववत चालू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर गैरअर्जदार क्रं. 2 ने उशिरा प्राप्त झालेल्या मंचाच्या आदेशाप्रमाणे दूरध्वनीचे कनेक्शन कापले नाही.
अर्जदाराने दिनांक 07.07.2005 चे बिल रुपये 4,500/- वेळेत भरले याचा अर्थ हे बिल त्याला मान्य होते व नंतर अर्जदाराने तक्रार दाखल केली. उपरोक्त टेलिफोन एक्सचेंज C-DOT -256 या टाईपचे असून आधी केलेल्या कॉल्सची माहिती देता येत नाही ही तांत्रिक अडचण गैरअर्जदाराने नमूद केली मात्र त्यासाठी कुठलेही कागदपत्र दाखल केले नाही. तसेच अगोदार अर्ज केल्यास तशी सोय करता येते. परंतु अर्जदाराने तशा प्रकारचा कुठलाही अर्ज अगोदर केला नव्हता असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. परंतु यासाठी देखील कुठल्याही प्रकारचे शपथपत्र गैरअर्जदाराने दाखल केले नाही. अर्जदाराने दि.29.09.2005 ला संबंधित कार्यालयाला भेट दिली असता तेथील अधिका-याने अर्जदाराला त्याच्या दूरध्वनीचे मीटरचे वाचन दाखवले ते बरोबर असल्याने अर्जदाराचे समाधान झाले असे गैरअर्जदार क्रं. 2 चे म्हणणे आहे. त्यामुळे गैरअर्जदार तर्फे कुठल्याही प्रकारची सेवेत त्रृटी नसल्याने ही तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी गैरअर्जदाराने मंचाला विनंती केली.
या प्रकरणात सर्व दस्ताऐवजांची तपासणी केली असता व वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र | मुद्दे | निर्णय |
1 | अर्जदार मागणीप्रमाणे बिलाची रक्कम कमी करुन घेण्यास पात्र आहे काय ? | होय, अंशतः |
2 | गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी केली आहे काय ? | होय |
3 | या तक्रारीचा अंतिम आदेश काय ? | कारणमिमांसानुसार |
का र ण मि मां सा
मुद्दा क्रमांक 1- अर्जदार हा व्यवसायाने शेती करीत असून त्याच्याकडे दूरध्वनी क्रं. 234139 हा आहे, याचा वापर घरी होतो यावर एस.टी.डी.सेवा उपलब्ध आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराला दूरध्वनीचे 2 महिन्याचे बिल रुपये 1200/- ते 1300/- येत असे. मे-2005 पर्यंत ठिक होते परंतु मे-जुन 2005 या कालावधीचे बिल रुपये 4500/- आले. अर्जदाराने संबंधित कार्यालयात चौकशी केली असता हे बिल आधि भरा नंतर चौकशी करुन जास्त रक्कम असल्यास त्याचे समायोजन पुढील बिलात करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे अर्जदाराने वरील बिल भरले. त्यानंतर जुलै-ऑगस्ट-2005 चे बिल पुन्हा रुपये 3,340/- कालावधीत न भरल्यास रुपये 3,410/- आले. अर्जदार हा नियमितपणे बिलाचा भरणा करत असे. अर्जदाराने निशाणी क्र. 3 व 4 द्वारे दूरध्वनीची 5 बिले पुढीलप्रमाणे सादर केली.
अ.क्र. | बिल दिनांक | कालावधी | रुपये |
1 | 07.07.2004 | 01.05.04 ते 30.06.04 | रु.722/- |
2 | 07.09.2004 | 01.07.04 ते 31.08.04 | रु.1,204/- |
3 | 07.03.2005 | 01.01.05 ते 28.02.05 | रु.1,315/- |
4 | 07.05.05 | 01.03.05 ते 30.04.05 | रु.1,233/- |
5 | 07.09.2005 | 01.07.05 ते 31.08.05 | रु.3340/- |
मात्र मे जून 2005 चे वादीत बिल रुपये 4,500/- सादर केलेले नाही.
गैरअर्जदाराने निशाणी क्रं. 15 प्रमाणे रिकनेक्शनची पावती दाखल केली आहे. अर्जदाराने जुलै-ऑगस्ट-05 हे बिल रुपये 3,340/-वेळेत न भरल्यामुळे अर्जदाराचा दूरध्वनी खंडित करण्यात आला होता. मात्र उपरोक्त बिल +रिकनेक्शन चार्जेस भरल्यावर तो पूर्ववत जोडून देण्यात आला.
गैरअर्जदाराच्या लेखी बयानात नमूद केल्याप्रमाणे अर्जदार याचा लाखेचा व्यवसाय असून हा दूरध्वनी घरी व दुकानात वापरण्यात येतो व या दूरध्वनीला एस.टी.डी.सेवा उपलब्ध आहे असे नमूद केले असले तरी व्यवसायाबाबत पुरावा दाखल केला नाही. दूरध्वनीच्या वापरावर बिलाची रक्कम आकारण्यात येते. अर्जदार हा शेतीचा व्यवसाय करीत आहे असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारकर्त्यास एप्रिल 2005 पर्यंत आलेल्या बिलाचे अवलोकन केले असता त्याला जुन महिन्यात आलेले बिल 4,500/-रुपयाचे अवास्तव जास्तीचे असल्याचे वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 हा होकारार्थी ठरविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 अर्जदाराला जास्तीचे बिल मे-जुन-2005 या कालावधीकरिता रुपये 4,500/- आल्यानंतर अर्जदाराने संबंधित कार्यालयात चौकशी केली असता अगोदर बिल भरा मग चौकशी करु आणि खरोखर जास्त रक्कम बिलात असेल तर पुढील बिलात ती समायोजित करण्यात येईल असे सांगितल्याने अर्जदाराने हे बिल भरले. परंतु पुढे काहीच कारवाई झाली नाही. पुन्हा जुलै- ऑगस्ट 2005 चे बिल रुपये 3,340/- चे आल्याने अर्जदाराने निशाणी क्रं. 4 मधील डाक्युमेंट नं. 6 प्रमाणेगैरअर्जदाराला दि. 29.09.2005 ला पत्र लिहून कॉल्सचे सविस्तर वर्णन मागितले असता गैरअर्जदाराने ते अर्जदाराला दिले नाही. वास्तविक पाहता एस.टी.डी. सेवा उपलब्ध असलेल्या दूरध्वनीचे कॉल्सचे विवरण मागितले असता ते ग्राहकाला देणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य होते. त्यांनी आपल्या कामात कसूर केली असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 हा होकारार्थी ठरतो.
अंतिम आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारकर्त्यास गैरअर्जदाराने पाठविलेले 4,500/- रुपयाचे व 3,340/- रुपयाचे बिल रद्दबादल करण्यात येत आहे व त्याऐवजी तक्रारकर्त्यास या अगोदर आलेल्या 3 महिन्याच्या बिलाची सरासरी काढून बिल द्यावे.
3 गैरअर्जदाराने, अर्जदाराला मानसिक त्रासाबद्दल व खर्चाबाबत 1,000/-रुपये द्यावे.
4 तक्रारकर्त्याने बिलाची भरलेली जास्तीची रक्कम त्याला देण्यात येणा-या पुढील बिलामध्ये समायोजित करण्यात यावी.