तक्रार व त्यांचे वकील श्री.त्रिपाठी हजर. सामनेवालेतर्फे – वकील श्री.मनोज गुर्जर हजर. मा.सदस्यानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांची मुलगी श्रीमती.राकेशा देवी(हल्ली मयत) हिला ताप आल्यामुळे तिला दिनांक 28/11/2005 रोजी सामनेवाले यांच्या रुग्णालयात औषोधोपचारासाठी नेले होते. डॉक्टरांनी तिला तपासून औषोधोपचार केला व ती घरी आली. त्यानंतर दिनांक 05/12/2005 रोजी तिला खूप ताप आल्याने दुपारी 11.30 वाजता तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेले. त्यावेळी सामनेवाले यांच्या डॉक्टरांनी तपासून तिला भरती करुन घेतले व 4 थ्या मजल्यावरील ब-14 हा बिछाना तिला देण्यात आला. तक्रारदाराचे म्हणणे की, दिनांक 06/12/2005 रोजी रात्री 9.30 वाजता त्यांनी सामनेवाले यांना विचारले होते की, मुलीजवळ रात्री थांबण्याची गरज आहे काय ? परंतु त्यांनी आश्वासन दिले की, ते तिची सर्वप्रकारे काळजी घेतील. म्हणून ते तिला जेवण व औषध देऊन घरी निघून गेले. त्या रात्री 1.30 वाजता त्यांना दवाखान्यातून फोन आला की, राकेशा देवी हिने 4 थ्या मजल्यावरुन खिडकीतून उडी मारली म्हणून ते व त्यांचे कुटुंबीय लगेचच दवाखान्यात गेले. त्यावेळी सामनेवाले यांनी त्यांना सांगीतले की, 4 थ्या मजल्यावरील ग्रील नसलेल्या खिडकीतून त्यांच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असेही आरोप केले की, तिचे मानसीक संतुलन बिघडलेले आहे. तक्रारदारांची मुलगी त्यावेळी अतिदक्षता विभागात भरती होती. ती सकाळी 3.00 वाजता मरण पावली. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यांच्या मुलीचे मानसीक संतुलन बिघडलेले नव्हते. आत्महत्या करण्यासाठी तिला कोणतेही कारण नव्हते. ती हुशार मुलगी होती. 7 महिन्यापुर्वीच तिचे लग्न झाले होते. सासरी ती समाधानी होती. दिनांक 06/12/2005 रोजी तिच्या मैत्रीणी तिला भेटावयास आल्या होत्या व त्याची एकमेकांत हसीमजाक झाली होती. ती स्वभावाने शांत होती. 2. तक्रारदाराचा असा आरोप की, सामनेवाले रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या मुलीकडे वेळोवेळी जावून लक्ष दिले नाही. घटनेच्या दिवशी रात्री 10.00 वाजेपासून दुस-या दिवशी सकाळी 01.00 वाजेपर्यत तिच्याकडे डॉक्टर किंवा नर्स कुणीही गेले नाही. सामनेवाले यांनी तिला योग्य औषोधोपचार केला नाही. त्यामुळे तिच्या शरीरावर व मनावर परीणाम होऊन तिचा मृत्यू झाला. तिला दिलेल्या औषधाची व इंजेक्शनची रिअक्शन आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यांनी त्या बद्दल पोलीसांना कळविले होते. परंतु सामनेवाले यांच्या विरुध्द त्यांनी काही कारवाई केली नाही. तक्रारदारांचा असा आरोप की, सामनेवाले यांच्या रुग्णालयाच्या खिडक्यांना ग्रील नसल्यामुळे त्यांची मुलगी आत्महत्या करु शकली. जर खिडक्यांना ग्रील असते तर ही घटना घडली नसती. तक्रारदार यांचा असा आरोप की सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. 3. तक्रारदार यांचे म्हणणे की, त्यांची मुलगी तरुण होती. ती महीन्याचे रु.10,000/- कमवत होती. त्यांनी तिच्या लग्नासाठी रु. 10 लाख खर्च केला होता व या घटनेच्या अगोदर रुपये 50,000/- औषोधोपचारासाठी खर्च केला होता. मुलीच्या अशा मृत्यूमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना बराच मानसिक त्रास झाला. त्याला सामनेवाले जबाबदार आहेत. म्हणून त्यांनी सदरहू तक्रार करुन सामनेवाले यांचयाकडून रुपये 20,00,000/- ची नुकसान भरपाई मागीतलेली आहे. व त्यावर द.सा.द.शे.20 दराने व्याजाची मागणी केली आहे. 4. सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणे देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले आहेत. दिनांक 28/11/2005 रोजी राकेशा देवीची त्यांनी बाह्य रुग्ण म्हणून ट्रीटमेंट केली होती, दिनांक 5 डिसेंबर, 2005 रोजी तिला त्यांच्या रुग्णालयात भरती केले होते व 4 थ्या मजल्यावरील बिछाना क्र. ब-14 तिला दिला होता हे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. त्यांचे म्हणणे की, रुग्णाला भरती करण्यापूर्वी जरुरी असलेल्या सर्व तपासण्या करुन त्या रुग्णाला सतत देखरेखीची व औषोधोपचाराची जरुरी असली तर तिला रुग्णालयात भरती केली जाते. राकेशा देवीला भरती केले त्यावेळी तिला 102 डिग्री ताप होता. त्यानंतर तिचा ताप कमी होऊन 100 डिग्री झाला. डॉक्टरांनी लिहून दिलेला औषोधोपचार तिला दिला होता. तिला भरती केल्यानंतर दोन व्हिजिटर पासेस देण्यात आल्या होत्या. अशा वेळी तिच्याजवळ त्यांचा एखादा नातेवाईक रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी तेथे राहाण्याची गरज होती. तक्रारदार व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रात्री 9.00 वाजता दवाखान्यात आले होते. त्यावेळी तक्रारदार व राकेशा देवी हयांच्यामध्ये जोरदार बोलणी झाली होती.तिच्या जवळ कुणीही न थांबता 9.30 वाजता सर्व तेथून निघून गेले. त्यानंतर ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. तक्रारदार तेथून जात असताना तेथील पहारेक-यांनी ते का निघून जात आहेत असे त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्याकडे काही लक्ष दिले नाही. 5. सामनेवाले यांचे म्हणणे की, राकेशा देवीच्या रुममध्ये आणखी एक रुग्ण होता. तिचे नाव अंजली असे होते. तिचा बिछाना खिडकीजवळ होता. राकेशा देवीचा बिछाना खिडकीपासून दूर होता. त्या रात्री 00.30 वाजता अंजली हिच्या आरोळया ऐकु आल्या. ती सिस्टरला बोलावत होती. त्यामुळे सिस्टर व निवासी डॉक्टर तेथे धावत गेले. त्यावेळी राकेशा देवी खिडकीत बसलेली होती. राकेशा देवीने खिडकीतून उडी मारली. परंतू ती घटना क्षणार्धात घडली त्यामुळे तिच्याजवळ जाऊन तिला कुणीही वाचवू शकले नही. राकेशा देवी खाली असलेल्या गॅरेजवर पडली. पडण्याचा आवाज ऐकून पहारेकरी तेथे आले व त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. सामनेवाले यांच्या व्यवस्थापनाने ताबडतोब पोलीसांना सूचना दिली. राकेशा देवीला अति दक्षता विभागात भरती केले व तिला गरज असलेला सर्व औषोधोपचार केला. परंतू ती वाचू शकली नाही. रात्री 1.30 वाजता ती मयत झाली. पोलीसांनी तिचे शवविच्छेदन केले व डोक्याला व बरगडयांना झालेल्या तीव्र/असंख्य जखमामुळे ती मरण पावती असा शव विच्छेदनाचा अहवाल देण्यात आला. पोलीसांनी प्राथमिक चौकशी केली होती व निवासी डॉक्टर, सिस्टर, मयताचे नातेवाईक, तसेच तिच्या रुम मधील दुसरी रुग्ण अंजली यांचे जबाब घेतले होते. 6. सामनेवाले यांचे म्हणणे की, राकेशा देवीला योग्य ती ट्रीटमेंट देण्यात आली होती व तीची सर्व प्रकारे काळजी घेतली होती. त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये काही असूर केलेली नाही. त्यांच्या डॉक्टर व नर्सेस हे चांगले व्कालीफाईड व लायक असून वेळोवेळी रुग्णाकडे जावून त्याची काळजी घेतात. राकेशा देवीने काही वैयक्तिक कारणावरुन अथवा निराशेपोटी आत्महत्या केली असावी. सामनेवाले यांचे म्हणणे की, जसलोक हॉस्पीटल, बॉम्बे हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल इत्यादी हॉस्पीटलच्या इमारती खूप उंच आहेत, तेथेसुध्दा खिडक्यांना ग्रील नसतात. हॉस्पीटलच्या खिडक्यांना ग्रील लावायात पाहिजेत असे बंधनकारक नाही. सामनेवाले यांचे म्हणणे की, त्यांनी तक्रारदार यांच्या मुलीच्या औषोधोपचाराबद्दल निष्काळजीपणा केला नाही. त्यांच्या सेवेत काही न्यूनता नाही. तक्रारदाराच्या मुलीच्या मृत्यूस ते जबाबदार नाहीत. म्हणून तक्रारदाराने केलेली मागणी देण्यास ते जबाबदार नाहीत. सदरहू तक्रार रद्द करण्यात येऊन त्याचा खर्च देववावा. 7. आम्ही तक्रारदार याचे तर्फे वकील श्री. त्रिपाटी व सामनेवाले यांचे तर्फे वकील श्री.मनोज गुर्जर यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. 8. मयत राकेशा देवीने हिला दिनांक 28/11/2005 रोजी सामनेवाले यांच्या रुग्णालयात बाहयरुग्ण म्हणून ट्रीटमेंट घेतली, दिनांक 05/12/2005 रोजी तिचा ताप वाढल्याने तिला सामनेवाले यांच्या रुग्णालयात भरती करुन घेतले होते, तिला रुग्णालयाच्या 4 थ्या मजल्यावरील बिछाना क्र.4-ब देण्यात आला होता, त्याच रात्री 00.30 वाजता तिने रुग्णालयाच्या खिडकीतून उडी टाकली व तिच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागाला खूप जखमा/फ्रॅक्चर होऊन ती त्याच रात्री 1.30 वाजता मरण पावती, तिच्या खोलीमध्ये दुसरी रुग्ण नामे अंजली हिलाही ठेवण्यात आले होते या बद्दल पक्षकारांचे दुमत नाही. 9. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे सदरहू घटना घडली. म्हणून सामनेवाले हे त्यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. " या कामी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे का किंवा मयत राकेशा देवी हिच्या औषोधोपचारामध्ये त्यांनी निष्काळजीपणा केला आहे हे सिध्द केले आहे काय असा मुद्दा उपस्थित होतो." पोलीसांनी केलेल्या चौकशीचे पेपर्स दाखल करण्यात आलेले आहेत. शव विच्छेदन अहवालावरुन असे दिसून येते की, तिच्या डोक्याच्या कवटीचे फ्रॅक्चर झाले होते. डोक्यात रक्तस्त्राव झाला होता व तिला ब-याच जखमा झाल्या होत्या, त्यामुळे ती मरण पावली. मयताच्या रुम मधील रुग्ण अंजली हिचा जबाब पोलीसांनी घेतला. तीच्या जबाबावरुन असे दिसून येते की, घटनेच्या वेळी तीचा बिछाना हलल्यामुळे ती जागी झाली व मयत राकेशा देवीला खिडकीत बसलेली पाहून ती ओरडली, त्यावेळी तेथील सिस्टर लगेच धावत आली. स्वाती पाटील ही स्टप नर्स, वनीता ही सिस्टर व डॉ.संजीवनी हे त्या रात्री डयुटीवर होते. स्वाती पाटीलच्या जबाबावरुन असे दिसून येते की, अंजलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्याने ते सर्व धावत आले परंतू राकेशा देवीला ते वाचवू शकले नाही. कारण तीने क्षणार्धात उडी मारली. तेथील तळ मजल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जबाबावरुन असे दिसून येते की, एक बाई ब्लंकेट गुंटाळून जमनीवर पडली होती. तिच्या पडण्याचा आवाज त्यांना आला होता. त्यांनी हॉस्पीटलमधील वार्डबॉयला ही घटना सांगीतली. व त्या सर्वानी तिला ताबडतोब ओ.पी.डी.मध्ये आणले. त्यानंतर तीला अति दक्षता विभागात भरती केले होते असे कागदपत्रावरुन दिसून येते. डॉक्टरांनी औषोधोपचार करुन तिला वाचविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. परंतु ती लगेच रात्री दिनांक 07/12/2005 रोजी 1.30 वाजता मरण पावली. तिच्या वडीलांचाही पोलीसांनी जबाब घेतला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचा कुणावरही संशय नाही असे त्यांनी सांगीतले. पोलीसांनी घेतलेले जबाब जरी खात्रीलायक पुरावा नसला तरी दोन्ही पक्षकारांनी ज्या परिस्थितीबाबत वाद केला नाही त्यासाठी हे जबाब विचारात घेण्यास हरकत नाही. 10. मयत राकेशा देवी हिला खूप ताप असल्यामुळे तिला त्या दिवशी दवाखान्यात भरती करुन घेण्यात आले होते. परंतू रुग्णालयात तिचा एकही नातेवाईक एवढेच नाही तर तीचे आई/वडील तिच्या जवळ थांबली नाहीत. मयत राकेशा देवी हिच्या नातेवाईकांसाठी दोन व्हिजिटर्स पासेस दिल्या होत्या. परंतु तक्रारदार किंवा त्यांचे कुटुंबीय, किंवा नातेवाईक कुणीही राकेशा देवी हीची काळजी घेण्यासाठी रात्री थांबले नाहीत. याउलट सामनेवाले रुग्णालयातील स्टाफ कर्मचारी जसे की, डॉक्टर, नर्स, इ. रात्री डयुटीवर हजर होते व घटना झाल्यानंतर ताबडतोब तेथे धावत गेले. घटना घडल्यानंतर त्यांनी ताबडतोब तिला अति दक्षता विभागात भरती केले व तिच्यावर योग्य तो औषोधोपचार करण्यात आला. मयत राकेशा देवी हिच्या रुम मध्ये अंजली ही दुसरी रुग्ण होती पण रात्रीचा वेळ असल्यामुळे तिने राकेशादेवी हिला खिडकीत जाताना पाहिले नसावे. मध्यरात्रीच्या वेळी रुग्णालयाच्या स्टाफने रुग्णाच्या रुममध्ये सतत थांबणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे अपेक्षित नाही किंवा शक्यही नाही. कारण त्यावेळी रुग्णाच्या आरामाची वेळ असते. फक्त काही समस्या असतील तर ते रुग्णाजवळ जातात व त्यांची समस्या दूर करतात. त्यामुळे सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर केली असे म्हणता येत नाही. या उलट तक्रारदार किंवा त्यांचे कुटुंबियानीच त्यांच्या रुग्णाकडे दुर्लक्ष केले किंवा योग्य ती काळजी घेतलेली नाही असे वाटते. 11. तक्रारदारांचा आरोप की, रुग्णालयाच्या खिडक्यांना ग्रील न लावणे ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. मात्र रुग्णालयाच्या खिडक्यांना ग्रील लावले पाहिजेत हे बंधनकारक आहे अशी कायद्याची तरतुद आहे असे तक्रारदाराने सांगीतले नाही/ सामनेवाले यांच्या उपविधीनुसार त्यांच्या खिडक्यांना ग्रील लावणे बंधनकारक होते असेही म्हटलेले नाही किंवा सिध्द केलेले नाही. त्यामुळे खिडक्यांना ग्रील न लावणे ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे असे म्हणता येत नाही. 12. तक्रारदाराने तक्रारीच्या परिच्छेद क्र.16 मध्ये असा आरोप केला आहे की, सामनेवाले यांनी त्यांच्या मुलीला योग्य औषोधोपचार केला नाही व वेळो वेळी योग्य ती इंजेक्शन्स दिली नाहीत. तिला औषधांची रिअक्शन होऊन तिच्या शरीरावर व मनावर विपरीत परीणाम झाला व ती मरण पावली. परंतु तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीच्या मनावर व शरीरावर औषोधोपचाराने किंवा इंजेक्शनने रिअक्शन आली या बद्दल काहीही कागदपत्रं दाखल केली नाहीत. तीला रिअक्शन आली होती तर कोणत्या औषधामुळे आली याबद्दल तक्रारदाराने काही पूरावा दिला नाही किंवा तक्रारीमध्ये कथन केलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांचा हा आरोपही अमान्य करण्यात येतो. 13. वरील विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराच्या मुलीचा मृत्यू सामनेवाले यांनी तीच्या औषोधोपचारात निष्काळजीपणा केला किंवा त्यांच्या सेवेत न्यूनता होती त्यामुळे झाला हे तक्रारदाराने सिध्द केले नाही. या तक्रारीत काही तथ्य नाही. ती रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून मंच खालील आदेश करत आहे. आदेश 1. तक्रार अर्ज क्रमांक 214/2006 रद्दबातल करण्यात येत आहे. 2. या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT | |