श्री. अतुल अळशी, मा. प्रभारी अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. वि.प.क्र. 1 हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे निर्माता असून वि.प.क्र. 2 हे त्यांचे अधिकृत विक्रेता आहे. तक्रारकर्त्याला वि.प.ने रेफ्रीजरेटर वारंटी कालावधीत असतांनाही दुरुस्त करुन न दिल्याने सदर सादर केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्याने वि.प.क्र. 2 कडून Model No. 19K173ZDZ/HL, Samsung निर्मित रेफ्रीजरेटर हा दि.16.10.2016 रोजी 10 वर्षाचे वारंटीसह खरेदी केला. दि.20.04.2018 रोजी तक्रारकर्त्याचा रेफ्रीजरेटमध्ये दोष निर्माण झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.च्या कस्टमर केयर सेंटरला कळविले. कस्टमर केयर सेंटरचे सर्वेशकुमार यांनी तक्रारकर्त्यला कॉम्प्रेसरचा दुरुस्ती खर्च देण्याकरीता सांगितले. तक्रारकर्त्याने ही बाब मान्य केली. दि.07.05.2018 रोजी सर्वेशकुमार यांनी रेफ्रीजरेटरच्या नादुरुस्तीबाबत माहिती ई-मेलद्वारे दिली. वारंवार मागणी करुनही तक्रारकर्त्याचा रेफ्रीजरेटर दुरुस्त करुन देण्यात आला नाही किंवा तो परत करुन बदलवून सुध्दा दिला नाही. तक्रारकर्त्याने वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली. वि.प.ने त्यास प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन रेफ्रीजरेटर दुरुस्त करण्याचे वि.प.ला निर्देश देण्यात यावे, मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई, खर्च इ. ची मागणी केलेली आहे.
3. आयोगाची नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 1 ने लेखी उत्तर दाखल करुन संपूर्ण रेफ्रीजरेटरवर वारंटी 10 वर्षाची नसून फक्त काम्प्रेसरवर असते. तसेच रेफ्रीजरेटर जर क्षतीग्रस्त झाले असते तर वारंटीमध्ये ते येत नाही. तक्रारकर्त्याकडील रेफ्रीजरेटरला खरेदी केल्यापासून दीड वर्षापर्यंत कुठलाही दोष नव्हता, त्यामुळे खरेदी करतांना तो सुस्थितीत होता. तक्रारकर्त्याने तक्रार केल्यानंतर त्यांचे सेवा केंद्राकडून आलेल्या इंजिनीयरने रेफ्रीजरेटर हा क्षतिग्रस्त असल्याची माहिती दिली. फ्रीजरचा भाग क्षतिग्रस्त असल्याने आतून लीकेज होत होते आणि तो दोष दुरुस्त होणारा नाही. सदर रेफ्रीजरेटरचा भाग हा वारंटीमध्ये येत नसल्याने आणि संपूर्ण रेफ्रीजरेटरला केवळ एक वर्षाची वारंटी असल्याने वि.प.क्र. 1 ला त्याबाबत दोषी धरता येणार नाही असे वि.प.क्र. 1 चे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला रेफ्रीजरेटर बदलवून मिळू शकत नाही. तक्रारकर्त्याचा दावा हा वारंटीच्या अटी व शर्तीच्या अधीन असल्याने सदर तक्रार ही खारीज करण्यायोग्य असल्याचे वि.प.क्र. 1 चे मत आहे.
4. सदर प्रकरणी तोंडी युक्तीवाद ऐकल्यानंतर आयोगाने उभय पक्षांमार्फत दाखल कथने, दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे आणि त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे काय ? आणि तक्रारकर्त्याचा वाद हा आयोगाचे कार्यक्षेत्रात येतो काय ? होय.
2) वि.प.ने सेवेत निष्काळजीपणा केला काय ? होय. 3) तक्रारकर्त्याचा रेफ्रिजरेटर दुरुस्त होण्यायोग्य होता काय ? होय.
4) तक्रारकर्ता कुठली दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 - तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडून Model No. 19K173ZDZ/HL, Samsung निर्मित रेफ्रीजरेटर हा दि.16.10.2016 रोजी 10 वर्षाचे वारंटीसह खरेदी केल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक ठरतो. तसेच वि.प.क्र. 1 निर्मित सदर रेफ्रिजरेटर वि.प.क्र. 2 कडून म्हणजेच आयोगाचे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या अधिकृत विक्रेत्याकडून तक्रारकर्त्याने विकत घेतला असल्याने व वादाचे कारण हे आयोगाच्या प्रादेशित अधिकारीतेत घडले असल्याने सदर वाद हा आयोगाचे कार्यक्षेत्रात येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकरार्थी नोंदविण्यात येतात.
6. मुद्दा क्र. 2 व 3 - तक्रारकर्त्याने रेफ्रिजरेटरमध्ये दि.20.04.2018 रोजी दोष निर्माण झाल्यावर वि.प.च्या अधिनस्थ चालणारे सेवा केंद्रामध्ये तक्रार केली. त्यांचे तंत्रज्ञांनी रेफ्रिजरेटरची तपासणी करुन तो क्षतिग्रस्त झालेला आहे आणि दुरुस्त होण्यायोग्य नाही असा अहवाल दिला. तसेच वि.प.च्या म्हणण्यानुसार दीड वर्षापर्यंत रेफ्रिजरेटर हा व्यवस्थित कार्य करीत होता. तक्रारकर्त्याकडून रेफ्रिजरेटर क्षतिग्रस्त झाल्यावर त्यामधून लिकेज होत होता आणि फ्रीजरचा भाग क्षतिग्रस्त झाल्याने आतून होणारा लीकेज हा दुरुस्त होण्यायोग्य नव्हता. वि.प.चे सदर म्हणणे तक्रारकर्त्याने रेफ्रिजरेटरची दुरुस्ती करुन खोडून काढलेले आहे. दि.30.07.2019 रोजी तक्रारकर्त्याने त्यांचा रेफ्रिजरेट दि.01.02.2019 रोजी दुरुस्त करुन त्याचे देयक सादर केले आहे. सदर देयकाचे अवलोकन केले असता कॉमप्रेसर, कंडेसर, कॅपलरी नविन लावून गॅस चार्जींग करुन घेतल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्याचा रेफ्रिजरेटर हा दुरुस्त होण्यायोग्य होता असे दिसून येते. वि.प.ने रेफ्रिजरेटर का दुरुस्त होऊ शकत नव्हता याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा अथवा तंत्रज्ञांचा अहवाल सादर केलेला नसल्याने वि.प.चे म्हणणे की, रेफ्रिजरेटर दुरुस्त होण्यायोग्य नव्हता हे खोटे ठरते. वि.प.ने रेफ्रिजरेटर दुरुस्त करण्याऐवजी विविध कारणे समोर आणून दुरुस्ती करण्याचे टाळले आहे. वि.प.क्र. 1 ची सदर कृती ही ग्राहकांना सेवा देण्यात निष्काळजीपणा करणारी असल्याचे दिसून येते. वि.प.चे म्हणण्यानुसार की, संपूर्ण रेफ्रिजरेटरला 10 वर्षाची वारंटी नसून ती फक्त कॉम्प्रेसरला असते. देयकामध्ये तक्रारकर्त्याने कॉम्प्रेसर आणि त्याच्याशी संबंधित दुरुस्त्या व त्याला जोडणा-या सुटया भागांचा समावेश असल्याचे दिसून येते. यावरुन वि.प. कॉम्प्रेसर वारंटी कालावधी असल्याने तक्रारकर्त्याला बदलवून देऊ शकत होता. तसेच वि.प.ने दाखल केलेल्या छायाचित्रावरुन रेफ्रिजरेटचा मागिल बाहेरचा भाग दर्शविण्यात आलेला आहे, परंतू आतमधील लीकेज होण्यास कारणीभूत असलेल्या भागांना दर्शविण्यात आलेले नाही. वि.प.च्या तंज्ञत्राने केवळ रेफ्रिजरेटर क्षतिग्रस्त झाल्याची बाब नमूद करुन कॉम्प्रेसर वारंटी कालावधी असतांनादेखील त्याची दुरुस्ती किंवा बदलवून देण्याचे हेतूपूरस्सरपणे टाळल्याचे दिसून येते. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 4 – तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दि.01.02.2019 च्या दुरुस्ती देयकावरुन त्याला नादुरुस्त रेफ्रिजरेटर दुरुस्त करण्याकरीता रु.6,450/- इतका खर्च आल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार वि.प.क्र. 1 ने रेफ्रिजरेटर दुरुस्त करुन न दिल्याने तक्रारकर्त्याला तो दुसरीकडून दुरुस्त करुन घ्यावा लागला, त्यामुळे तक्रारकर्ता हा दुरुस्तीचा खर्च रु.6,450/- परत मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्याचा रेफ्रिजरेटर दुरुस्त झाल्याने तो बदलवून देण्याची मागणी ही अमान्य करण्यात येते. तसेच तक्रारकर्त्याला वारंवार वि.प.सोबत नादुरुस्त रेफ्रिजरेटर चालू स्थितीत आणण्याकरीता संपर्क साधावा लागला. परंतू वि.प.क्र. 1 ने त्याला आवश्यक ती सेवा न पुरविल्याने त्याला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तसेच कायदेशीर नोटीसची बजावणी करावी लागली आणि पुढे आयोगासमोर तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे तक्रारकर्ता न्यायिक कार्यवाहीचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे. वि.प.क्र. 2 हे वि.प.क्र. 1 चे अधिकृत विक्रेता आहे. त्यांचा रेफ्रिजरेटर निर्मितीबाबत किंवा देण्यात येणा-या सेवा याबाबत संबंध दिसून येत नाही. म्हणून त्यांचेविरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
8. उपरोक्त निष्कर्षांवरुन आणि दाखल दस्तऐवजांवरुन सदर प्रकरणी आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.6,450/- ही रेफ्रिजरेटर दुरुस्ती खर्चाची रक्कम द्यावी.
2) मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाच्या नुकसान भरपाईदाखल वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याला रु.2,500/- आणि तक्रारीच्या खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
3) वि.प.क्र. 1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
5) तक्रारीच्या ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास पुरविण्यात याव्यात.
6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.