निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून राहत्या घरी वीज जोडणी घेतली असुन ती एप्रिल-मे 2006 पर्यंत वीज विद्युत कंपनीकडून प्राप्त झालेली देयके नियमित भरणा करीत होती. परंतु मे 2006 पासुन वीज वितरण कंपनीने तिला प्रत्यक्ष मीटर रिडींग न नोंदविता सरासरीनुसार अवाजवी देयके दिली. म्हणून तिने दिनांक 13/7/2006 रोजी योग्य देयके देण्याबाबत वीज वितरण कंपनीकडे अर्ज दिला होता. परंतु वीज वितरण कंपनीने तिच्या अर्जाची दखल घेतली नाही. त्यानंतर तिने वारंवार वीज वितरण कंपनीकडे भेट घेऊन देयक दुरुस्त करुन देण्याची मागणी केली परंतु त्यांनी देयक दुरुस्त केले नाही. म्हणून तिने पुन्हा जानेवारी 2007 मध्ये अर्ज देऊन योग्य देयक देण्याची मागणी केली परंतु त्यानंतर देखील वीज वितरण कंपनीने योग्य देयक दिले नाही . वीज वितरण कंपनीने त्यानंतर तिच्याकडील जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन मीटर बसविले. नवीन मीटर योग्य रिडींग दर्शवित होते. परंतु वीज वितरण कंपनीने त्यानंतर प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसार देयके न देता सरासरीनुसारच देयके दिली व मागील रक्कम देयकांमध्ये थकीत दर्शविली. मार्च 2009 मध्ये तिने पुन्हा वीज वितरण कंपनीला योग्य देयक दयावे अशी मागणी केली. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याने तिच्या मीटरची पाहणी केली आणि मागील देयके पाहून थकबाकी वजा करुन रिडींगप्रमाणे देयके द्यावीत असा शेरा पाहणी अहवालात नमुद केला. परंतु त्यानंतरही वीज वितरण कंपनीने थकबाकी कमी करुन योग्य देयके दिली नाही. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिच्या देयकामधून थकबाकी कमी करुन सुधारीत देयक देण्याबाबत वीज वितरण कंपनीला आदेश द्यावा व नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराला दिनांक 21/3/2005 रोजी वीज जोडणी देण्यात आली. तक्रारदाराने स्वत: हे मान्य केले आहे की तिने सन 2006 पर्यंतची देयके भरली परंतु त्यानंतर तिने देयके भरली नाहीत. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराची रिडींग न नोंदविता तिला ज्या काळात सरासरीनुसार देयके देण्यात आली होती त्या काळातील रक्कम रु 10,803/- तिच्या देयकातुन जून 2007 मध्ये कमी करण्यात आली होती. तक्रारदाराला नेहमीच प्रतयक्ष मीटर रिडींगनुसारच देयके दिलेली आहेत. परंतु तक्रारदाराने नियमितपणे देयके भरली नाहीत म्हणून तिच्या देयकामध्ये थकबाकी व त्यावरील व्याज दर्शविण्यात आले. तक्रारदाराला देण्यात आलेली देयके योग्य आहेत. तिला त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी, अशी मागणी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला चुकीची व नाही. अवाजवी देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय 2. आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदारातर्फे अड एच.एफ.पवार आणि वीज वितरण कंपनीतर्फे अड एस.एस.मेढेकर यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराला वीज वितरण कंपनीने दिनांक 10/7/2010 रोजी दिनांक 23/3/2010 ते 23/6/2010 या कालावधीसाठी दिलेल्या देयकामधील थकबाकीची रक्कम कमी करावी आणि प्रत्यक्ष मीटर रिडींगप्रमाणे देयके मिळावीत अशी तक्रारदाराची प्रमुख मागणी असल्याचे तिच्या तक्रारीवरुन दिसते. तक्रारदाराकडे दिनांक 10/7/2010 रोजी रु 44767.43 एवढी रक्कम थकीत होती. सदर रक्कम थकबाकी असल्याचे कारण असे आहे की, तक्रारदाराने वीज वितरण कंपनीकडे नियमितपणे देयके भरली नव्हती. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे सीपीएल दाखल केले आहे. सदर सीपीएल पाहता ही बाब स्पष्ट दिसुन येते की, तक्रारदाराने दिनांक 10/3/2006 रोजी देयकाचा भरणा केल्यानंतर थेट दिनांक 18/3/2009 रोजी वीज वितरण कंपनीकडे रु 10,000/- भरले. दिनांक 10/3/2006 ते 18/3/2009 या कालावधीत तक्रारदाराने कोणतीही रक्कम वीज वितरण कंपनीकडे भरली नाही. त्यामुळेच तिच्या कडील थकबाकी वाढली व त्यावर व्याज आकारण्यात आले. म्हणून वीज वितरण कंपनीने चुकीची थकबाकी दर्शविली असे म्हणता येणार नाही. युक्तीवादाच्या दरम्यान तक्रारदाराच्या वतीने आमच्या निदर्शनास वीज वितरण कंपनीने जून 2006 ते नोव्हेंबर 2006 आणि फेब्रूवारी 2007 ते जून 2007 या कालावधीमध्ये चुकीची रिडींग नोंदवून देयके देण्यात आल्याची बाब आणण्यात आली. परंतु जुन 2006 ते नोव्हेंबर 2006 आणि फेब्रूवारी 2007 ते जून 2007 या कालावधीमध्ये वितरण कंपनीने जर तक्रारदारास चुकीचे रिडींग नोंदवून किंवा चुकीच्या सरासरीनुसार देयके दिलेली असल्याचे तक्रारदारास वाटले होते तर तिने जून 2009 पूर्वीच त्याबद्दलची तक्रार या मंचाकडे दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने जूलै 2010 मधील देयक मिळेपर्यंत जून 2006 ते नोव्हेंबर 2006 आणि फेब्रूवारी ते जून 2007 या कालावधीतील देयकाबाबत वीज वितरण कंपनीकडे किंवा मंचाकडे कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे जर तक्रारदारास जून 2007 पूर्वीची देयके चुकीची होती असे म्हणावयाचे असेल तर सदर बाब मुदतबाहय ठरत असल्याने विचारात घेता येणार नाही आणि तक्रारदाराला दिनांक 10/7/2010 रोजी दिलेल्या देयकाचा विचार केला तर सदर देयक चुकीचे किंवा अवाजवी असल्याचे दिसत नाही कारण सदर देयक प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसारच देण्यात आलेले असून तक्रारदाराने दिनांक 10/3/2006 पासुन 18/3/2009 पर्यंत वीज वितरण कंपनीकडे कोणतीही रक्कम भरली नाही आणि दिनांक 18/3/2009 रोजी रु 10,000/- भरल्यानंतर पुन्हा आजपर्यंत कोणतीही रक्कम भरली नाही. त्यामुळे तकारदाराकडील थकबाकी वाढली. आमच्या मतानुसार तक्रारदाराला वीज वितरण कंपनीने दिलेली देयके योग्य असुन वीज वितरण कंपनीला तक्रारदाराकडे थकाबाकी मागण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 10/7/2010 रोजीचे देयक दिलेले आहे. सदर देयक योग्य आहे व वीज वितरण कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. म्हणून खालीलप्रयमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |