(घोषित दि. 20.09.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदार क्रमांक 2 यांनी सी.टी.एस.क्रमांक 343-50, प्रियदर्शनी कॉलनी येथील घर अर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून विकत घेतले आहे. गैरअर्जदार यांनी सदरील घराचे वाढीव वीज बिल आकारले. या बिला विरुध्द केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी देखल घेतली नाही, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तपणे मंचात तक्रार दाखल केली असून, अर्जदार क्रमांक 2 यांच्या तक्रारीनुसार त्यांनी अर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून सी.टी.एस.क्रमांक 343-50, प्रियदर्शनी कॉलनी, जालना येथील घर विकत घेतले आहे. या घराचे खरेदीखत दिनांक 19.12.2005 रोजी करण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांना याबाबत कळवूनही त्यांनी वीज बिलावरील नावात बदल केला नाही. त्यामुळे सदरील मीटर अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावावर आहे. अर्जदार क्रमांक 2 यांच्यामते सदरील घरात गैरअर्जदार यांनी त्यांचे जुने मीटर बदलून त्याजागी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर दर्शनी भागात बसविले. गैरअर्जदार यांनी त्यांना दिनांक 22.03.2011 ते 22.04.2011 या कालावधीचे 118 युनिट वीज वापराचे बिल दिले. ज्यात मागील थकबाकी म्हणून 1938.36 रुपये दाखविण्यात आले. गैरअर्जदार यांनी नंतर आर.एन.ए व डोअर लॉक म्हणून वीज बिल दिले. दिनांक 10.08.2011 रोजी अर्जदाराने वाढीव वीज बिलाची तक्रार गैरअर्जदार यांच्याकडे केली. वीजेचा वापर नसताना गैरअर्जदार यांनी चुकीची बिल आकारणी केलेली असून मीटरवर डिसप्ले नसताना गैरअर्जदार यांच्या मीटर रिडरने चुकीचे रिडींग घेतले असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. दिनांक 21.09.2011 रोजी अर्जदार गैरअर्जदार यांच्याकडे वीज बिलाबाबत तक्रार घेऊन गेले असता गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी बिल दुरुस्त न करता वाद घातला. पण नंतर 8,275/- रुपयापैकी 2,275/- रुपये कमी करुन दिले व 6,000/- रुपये भरण्यास सांगितले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या लाइनमनला तोंडी सूचना देऊन अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश दिल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी केलेली वीज बिल दुरुस्ती अर्जदारास मान्य नसल्यामुळे व गैरअर्जदार त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, गैरअर्जदार यांना दिलेली तक्रार, सी.पी.एल इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
अर्जदाराने, गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव व चुकीच्या वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत केलेला असून तो पुनर्रजोडणी करुन देण्याबाबत अंतरिम आदेश पारित करण्याचा अर्ज मंचात दाखल केला आहे.
अर्जदाराने, गैरअर्जदार यांनी दिनांक 22.08.2011 रोजी दिलेल्या 11,860/- रुपयाच्या वीज बिलाबाबत तक्रार केली आहे. गैरअर्जदार यांनी हे बिल दुरुस्त करुन अर्जदारास 9,580/- रुपयाचे सुधारीत वीज बिल दिले. अर्जदार यांना सदरील सुधारीत बिल मान्य नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले सुधारीत वीज बिल देयक 9,580/- पैकी 25 टक्के रक्कम भरल्यास गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी देण्याचा अंतरिम आदेश मंचाने पारीत केला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास मीटरवरील नोंदी प्रमाणे वीज बिल आकारणी केली आहे व अर्जदारास देण्यात आलेल्या वीज बिलात कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले. अर्जदाराचे बिल त्यांच्या विनंतीनुसार विभागून देण्यात आलेले आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे सी.पी.एल व इतर कागदपत्रे जवाबासोबत जोडली आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे असलेले सी.टी.एस नंबर 343-50, प्रियदर्शनी कॉलनी, जालना येथील घर विकत घेतले आहे. अर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या मालमत्ता पत्रक यात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे 02.08.1995 रोजी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा दिलेला असून त्याचा ग्राहक क्रमांक 510030269550 असा आहे. अर्जदार क्रमांक 2 यांनी वीज मीटर त्यांच्या नावे बदलून देण्याबाबत अर्ज केला असल्याचे म्हटले असले तरी याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरील मीटर आजही अर्जदार क्रमांक 1 यांच्या नावे असल्याचे दिसून येते. मे 2011 पर्यंत दोन्ही पक्षात वीज बिलाबाबत वाद नसल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी मे 2011 चे आर.एन.ए स्टेटस असलेले 473.18 रुपयाचे वीज बिल दिनांक 24.06.2011 रोजी भरले असल्याचे दिसून येते. जून 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 2168 व चालू रिडींग 3771 असे दर्शवून अर्जदारास दोन महिन्याच्या कालावधीचे 1603 युनिट वीज वापराचे 11567.49 रुपयाचे वीज बिल आकारले. अर्जदाराने या बिला विरुध्द गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 10.08.2011 रोजी तक्रार केली असल्याचे दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे निरीक्षण केल्यावर त्यास पॅरा क्रमांक 2 मध्ये सदरील घरात राजेश तिवारी हे राहत होते व त्यांच्याकडून दिनांक 30.05.2011 रोजी ते रिकामे करुन घेतले असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास जुलै 2011 व ऑगस्ट 2011 या महिन्याचे मूळ (Original) वीज बिल अर्जदाराने मंचात दाखल केले आहे. या दोन्ही बिलामध्ये वीज मीटरवर असणा-या फोटो मध्ये बिलाची रिडींग दिसत नाही व या बिलावर हस्ताक्षर टाकलेले रिडींग दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2011 ते जून 2011 या कालावधीत 1634 ते 3771 युनिट वीज वापराचे बिल विभागून देत अर्जदारास 2275.21 रुपयाचे क्रेडीट दिलेले दिसून येते. हे सुधारीत वीज बिल मान्य नसल्याची अर्जदाराची मूळ तक्रार आहे.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर जानेवारी 2011 ते एप्रिल 2011 या महिन्याचे नॉर्मल स्टेटस दाखवत मीटरवरील रिडींगनुसार बिल आकारणी केली असल्याचे दिसून येते. या चार महिन्याचा अर्जदाराचा सरासरी वीज वापर 134 युनिट प्रति माह असल्याचे स्पष्ट होते. मे 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी मीटर रिडींग न घेता अर्जदारास आर.एन.ए स्टेटस दर्शवीत 124 युनिट वीज वापराचे बिल दिलेले आहे. जून 2011 मध्ये मागील रिडींग 2168 व चालू रिडींग 3771 असे दर्शवित 1603 युनिट वीज वापराचे दोन महिन्याच्या (मे 2011 व जून 2011) कालावधीचे बिल आकारलेले दिसून येते. जानेवारी 2011 ते एप्रिल 2011 या महिन्याचे बिल मीटर रिडींग प्रमाणे असल्यामुळे त्यात दुरुस्ती करण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे मंचाचे मत आहे. मे 2011 जून 2011 या दोन महिन्याच्या कालावधीचे 1603 युनिटचे वीज बिल पाहता अर्जदाराचा वापर हा 801 युनिट असा असल्याचे दिसून येते. अर्जदाराचा मागील सरासरी वीज वापर (134 युनिट) पाहता मे 2011 व जून 2011 या काळातील वीज वापर अतिशय जास्त आकारला गेल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वीज बिलात देखील मीटरवरील रिडींग दिसून येत नसल्यामुळे व ती हस्ताक्षरात टाकलेली असल्यामुळे वीज बिलात संभ्रम निर्माण होतो. अर्जदाराचा जानेवारी 2011 च्या आधीच्या वीज बिलाचे निरीक्षण केल्यावर तो एवढया प्रमाणात कधीच नसल्याचे दिसून येते.
अर्जदाराने जून 2011 च्या वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारी नंतर अर्जदाराचे मीटर तपासणी करणे अपेक्षित होते. परंतू गैरअर्जदार यांनी मीटरची चाचणी केली नसल्यामुळे जून 2011 या महिन्याचे बिल अर्जदारास सरासरीवर आकरणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले वीज बिल रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी मे व जून 2011 या महिन्याचे 134 युनिटचे वीज बिल आकारावे व 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- खर्चा बद्दल आदेश नाही.