निकालपत्र :- (दि.19.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला संस्थेने त्यांच्या सभासदांकरिता सन 2001 मध्ये पेन्शन स्कीम ठेव योजना सुरु केली. त्या योजनेअंतर्गत 60 महिने महिन्याला ठराविक रक्कम सभासदांनी ठेव म्हणून भरलेनंतर त्या सभासदास ठेव रक्कम संस्थेत जमा असेपर्यन्त सभासदास महिन्याला भरलेल्या हप्त्याइतकी रक्कम सभासदांना दरमहा देणेची आहे. त्याप्रमाणे तक्रारदारांनी रक्कम रुपये 4,000/- प्रमाणे 60 महिन्याच्या कालावधीकरिता रक्कम रुपये 2,40,000/- इतकी रक्कम 05.02.2007 अखेर भरलेली आहे. सदर रक्कमेची मुल्यांकन रुपये 3,84,000/- इतकी होत आहे व असा शेरा 2007 व 2008 चे ऑडीट रिपोर्टमध्ये आलेला आहे. तक्रारदारांनी भरलेल्या रक्कमेपैकी रुपये 12,000/- या रक्कमेचा सामनेवाला क्र.5 यांनी अपहार केला. त्यामुळे तक्रारदारांनी संस्थेत पुन्हा रुपये 12,000/- भरले. अशी एकूण रक्कम रुपये 2,52,000/- सामनेवाला संस्थेत जमा केली आहे. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी सदर स्कीम बंद करणेस तक्रारदारास भाग पाडले व धमकी देवून तक्रारदारांना केवळ रुपये 2,88,000/- (मुळ रक्कम रुपये 2,40,000/- व वर फक्त रुपये 48,000/-) सामनेवाला संस्थेने तक्रारदारांना परत केले आहे व दबावाने रुपये 100/- च्या स्टॅम्पवर तक्रारदारांच्या सहया घेतलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांची रुपये 3,84,000/- इतकी रक्कम देणे भाग पडत आहे. सबब, सामनेवाला यांनी पेन्शन स्कीम योजनेनुसार होणारी रक्कम रुपये 3,84,000/-, सामनेवाला क्र.5 यांनी अपहार केलेली रक्कम रुपये 12,000/-, स्कीम बंद केल्याने एप्रिल 2009 ते जुलै 2009 चे व्याज रुपये 16,000/- अशी एकूण रक्कम रुपये 4,12,000/- त्यातून सामनेवाला संस्थेने अदा केलेली रक्कम रुपये 2,88,000/- वजा जाता सामनेवाला संस्थेने तक्रारदारांना रुपये 1,24,000/- देणेचे आदेश व्हावेत. तसेच, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 10,000/-, नुकसानीदाखल रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/-, नोटीस खर्च रुपये 2,000/- इत्यादी रक्कम व्याजासह देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी दि.04.09.2009 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांची उत्तरी नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी व 6 ते 15 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार हे सामनेवाला संस्थेकडे संचालक पदावर असताना दि.20.11.2000 च्या संचालक मंडळ सभेमध्ये ठराव केला. सदर ठरावास सुचक म्हणून तक्रारदार होते. सदर ठरावास कायद्याने मंजूरी घेणे आवश्यक होते. परंतु, तक्रारदारांच्याकडून कोणतीही कार्यवाही करणेत आलेली नाही. दरम्यानच्या काळात सदर पेन्शन योजनेत निव्वळ तक्रारदारांनी रक्कम गुंतविली व सदर योजनेत निव्वळ तक्रारदार हेच लाभार्थी होते. सदर पेन्शन योजनेअंतर्गत सामनेवाला संस्थेला तोटा सहन करावा लागत असल्याने दि.20.09.2008 रोजीच्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करुन सदर योजना बंद करणेत आली. त्यावेळेस तक्रारदार हे सामनेवाला संस्थेमध्ये प्रभारी व्यवस्थापक होते. तक्रारदारांनी सदर पेन्शन योजनेला प्रतिसाद नाही व सहकार खात्याची मंजूरी नाही याची जाणीव झाल्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे तडजोडीच्या भुमिकेतून स्वत:च्या हस्ताक्षर अर्ज देवून रक्कम रुपये 2,88,000/- देणेची विनंती केली. सदर विनंतीस मान देवून सदर रक्कम चेकद्वारे तक्रारदारांना अदा केली. त्यावेळेस रक्कम रुपये 100/- च्या स्टॅम्पवर दोन साक्षीदारांसमक्ष सदर स्विकारलेल्या रक्कमेबाबत तक्रारदारांनी त्यांची कोणतीही तक्रार नाही असे लिहून दिले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी व 6 ते 15 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांचे दि.13.04.09 रोजीचे पत्र, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.22.07.09 रोजी झालेला दस्त व पत्र, सामनेवाला संस्थेचा दि.06.01.01 व दि.20.09.08 रोजीचे ठराव, वार्षिक सभा प्रोसिडींग, ऑडीट रिपोर्टस्, सामनेवाला क्र.5 यांचेवर केलेला दावा इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला क्र.5 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रे, तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे यांचे अवलोकन केले आहे. तक्रारदार हे सामनेवाला संस्थेमध्ये संचालक या पदावर असताना पेन्शन स्कीम योजनेबाबतचा ठराव झालेला आहे. या वस्तुस्थितीकडे सामनेवाला यांनी या मंचाचे लक्ष वेधले आहे. तसेच, सदर योजनेस कायद्यानुसार मंजुरी नाही. तसेच, केवळ तक्रारदारांव्यतिरिक्त कोणीही पेन्शन योजनेत सहभागी झालेले नाही या वस्तुस्थितीकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक असताना दि.20.09.2008 रोजीच्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर योजनेत बंद करणेत आली ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिली. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदर योजनेअंतर्गत तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेत जमा केलेली रक्कम रुपये 2,88,000/- चेकद्वारे स्विकारलेली आहे, ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच, त्यांनी रक्कम रुपये 100/- च्या स्टँपवर याबाबत कोणतीही तक्रार नाही असेही लिहून दिले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये दहशतीने लिहून दिलेचे कथन केले आहे. परंतु, त्या अनुषंगाने तक्रारदारांनी पोलीसांच्याकडे एफ्.आय.आर.(खबर) दाखल करणे आवश्यक होते. परंतु, तसे झालेचे दिसून येत नाही. तसेच, संस्थेचे सभासद सुरेश फराक्टे यांनी शपथपत्र दाखल केले आहे व त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये तक्रारदारांनी लिहून दिलेल्या रुपये 100/- च्या स्टँपवर त्यांच्या समक्ष सही केली आहे व तडजोडीअंतर्गत रक्कम रुपये 2,88,000/- तक्रारदारांनी स्विकारलेली आहे असे शपथपत्रात नमूद केले आहे. तक्रारदारांनी तक्रार दाखल करणेपूर्वीच तडजोडीअंतर्गत पैसे स्विकारुन सदर पेन्शन योजनेबाबत त्यांची कोणतीही तक्रार राहिली नसल्याचे लिहून दिले आहे. याचा विचार करता प्रस्तुत तक्रारीस estoppel चा बाध येतो. सबब, तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |