नि.54 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 26/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.25/05/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.01/09/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या कु.कौस्तुभ चंद्रमोहन सावंत अ.पा.क वडील श्री.चंद्रमोहन ज. सावंत रा.715, चंद्रनिल, श्री महालक्ष्मी मंदिर समोर, कारवांची वाडी, पो. पोमेंडी बुद्रुक, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, 17, डॉ.आंबेडकर रोड, पुणे – 411 001. 2) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, रत्नागिरी. 3) मुख्याध्यापक, गंगाधर गोविंद पटवर्धन, इंग्रजी माध्यमिक प्रशाला, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए.शिंदे सामनेवाले क्र.1 : व्यक्तिशः सामनेवाले क्र.2 : व्यक्तिशः सामनेवाले क्र.3 तर्फे : विधिज्ञ श्री. मलुष्टे -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्य, श्रीमती स्मिता देसाई 1. तक्रारदाराने सदरची तक्रार त्याच्या माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणपत्रिकेतील त्रुटीमुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दाखल केली आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणे - तक्रारदार कौस्तुभ हा सामनेवाला क्र.3 यांच्या प्रशालेत शिक्षण घेत असून तो इयत्ता सातवीत शिकत असताना सामनेवाला क्र.1 यांच्या मार्फत घेण्यात येणा-या माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीच्या परिक्षेला बसला होता. सदर परिक्षेचा निकाल दि.23/07/2009 रोजी लागला व तक्रारदार हा अनुत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक तक्रारदारास मिळाले. तक्रारदार हा शालांत परिक्षेमध्ये उत्तम टक्केवारीने पास होत आला असल्याने व तो हमखास पास होणार अशी खात्री व विश्वास त्याच्या पालकांस वाटल्याने त्यांनी दि.30/07/2009 रोजी फेरतपासणीसाठी अर्ज पाठविला. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 बोर्डाने दि.27/10/2009 रोजी तक्रारदार यांच्या गुणामध्ये बदल झाला आहे व त्याप्रमाणे नापास झाल्याची गुणपत्रिका सामनेवाला क्र.2 यांच्याकडे जमा करुन सुधारीत गुणपत्रिका घ्यावी असे कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे अर्ज दिला व दि.17/11/2009 रोजी सुधारीत बदलाचे गुणपत्रक देण्यात आले. सदर गुणपत्रकामध्ये तक्रारदार हा सर्व विषयांत पास असूनही निकालाच्या रकान्यात अनुत्तीर्ण झाल्याचा शेरा असल्याचे दिसून आले. त्यावेळी संबंधीत कर्मचा-याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की तुम्ही बोर्डाकडे पुन्हा अर्ज करा तुम्हाला मार्कशीट बदलून मिळेल. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांना दि.17/11/2009 रोजी अर्ज पाठविला. सदर अर्जाबाबत सामनेवाला क्र.1 यांच्याकडून काहीच कळून न आल्याने परत स्मरणपत्र पाठविण्यात आले. त्यानंतर दि.08/01/2010 चे पत्राने सामनेवाला क्र.1 यांनी सुधारीत गुणपत्रिका सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविण्यात आली आहे ती त्यांच्याकडून घेण्यात यावी असे कळविले. सामनेवाला क्र.2 यांनी मात्र त्याबाबत काहीच लेखी कळविले नाही. या सर्व सामनेवाला यांच्या त्रुटीमुळे तक्रारदार यास खूप मोठया मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व त्याच्या बालमनावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत नुकसानभरपाई मिळण्यासाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांना कोणतीही तांत्रिक उणिव राहू नये म्हणून पक्षकार केले आहे. त्यांच्याविरुध्द तक्रारदारांची कोणतीही मागणी नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जासोबत नि.2 ला शपथपत्र व नि.3 चे यादीने एकूण चौदा कागद दाखल केले आहेत. 3. सामनेवाला क्र.1 यांनी नि.8 वर टपालातून उत्तर दाखल केले आहे. तक्रारदाराच्या गुणपत्रकामध्ये संगणकीय चूकीमुळे दोष निर्माण झाला. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षेसाठी राज्यातून 7,37,888 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सदर परिक्षेचे संगणकीय काम जाहीर निविदा पध्दतीने संगणक संस्थेस दिले होते. त्या संस्थेने केलेल्या संगणकीय चूका दुरुस्त करण्यास अधिक वेळ लागला. सदर संस्थेच्या कार्यपध्दतीबाबत, चूकांबाबत व झालेल्या विलंबाबाबत संबंधीत संगणकीय संस्थेवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या वस्तूस्थितीचा विचार करुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली करणेत यावा असे नमूद केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यासोबत दोन कागद दाखल केले आहेत. 4. सामनेवाला क्र.2 यांनी नि.9 ला आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांच्या गुणपत्रिकेतील शेरा दुरुस्त करणेसाठी गुणपत्रक सामनेवाला क्र.1 यांच्याकडे पाठविण्यात आले. सामनेवाला क्र.1 यांनी सुधारीत गुणपत्रक पाठविल्यानंतर तक्रारदार यांनी त्याचे गुणपत्रक प्राप्त करुन घेतले आहे. सदर परिक्षेबाबतचे निर्णय हे आयुक्त, परिक्षा परिषद यांच्याकडून घेतले जातात त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. सामनेवाला क्र.2 यांनी नि.10 ला आपले शपथपत्र दाखल केले आहे व नि.12 च्या यादीने एकूण सात कागद दाखल केले आहेत. 5. सामनेवाला क्र.3 यांनी नि.17 ला आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील मजकूर नाकारला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांना याकामी नाहक पक्षकार केल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.18 ला आपले शपथपत्र दाखल केले आहे. 6. तक्रारदार यांनी नि.20 ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व सामनेवाला यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. नि.21 ला प्रतिउत्तराच्या पृष्ठयर्थ आपले शपथपत्र दाखल केले आहे व नि.22 च्या यादीने एकूण 16 कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.29 वर कोणताही तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पूरशीस दाखल केली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नि.31 वर तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पूरशीस दाखल केली आहे. तक्रारदार यांनी नि.34 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नि.36 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.37 च्या यादीने निवाडे दाखल केले आहेत. 7. तक्रारदार यांनी प्रकरण युक्तिवादासाठी ठेवले असताना विधिज्ञामार्फत हजर होवून नि.42 वर दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केला. प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार याचे वडील चंद्रमोहन सावंत यांनी दाखल केला होता. तो कौस्तुभ चंद्रमोहन सावंत याच्यातर्फे अ.पा.क. वडील चंद्रमोहन सावंत अशी दुरुस्ती नि.1 मध्ये करण्यात यावी अशी विनंती तक्रारदारतर्फे करण्यात आली. सदरची विनंती मान्य करण्यात आली. 8. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? | नाही. | 2. | तक्रारदार यास सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली आहे काय ? | निष्कर्ष नोंदवला नाही. | 3. | तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | निष्कर्ष नोंदवला नाही. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 9. मुद्दा क्र.1 - दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता प्रस्तुत तक्रार अर्जामध्ये तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो का ? हा मुद्दा मंचासमोर निष्कर्षासाठी उपस्थित होतो. तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नि.37/1 वर सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखल केला आहे. तथापी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे 2009 (4) CPR 421 (SC) या Bihar School Examination Board V/s. Suresh Prasad Sinha या निवाडयाच्या कामी दिलेला निष्कर्ष विचारात घेता सदर निवाडयाबाबत तक्रारदार यांनी युक्तिवाद करावा व आपले म्हणणे देण्याबाबत या मंचाने संधी दिली होती. तक्रारदारातर्फे विधिज्ञांनी त्यानंतर सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचे निवाडे दाखल केले आहेत. तथापी वरील निवाडयाच्या कामी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने पुढील निष्कर्ष काढला आहे. “The fact that in the course of conduct of the examination or evolution of answer script or furnishing of mark-sheets or certificates, there may be some negligence, omissions or deficiency does not convert the Board into a service provider for a consideration nor convert the examinee into a consumer who can make a complaint under the Consumer Protection Act.” सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निष्कर्षाचे अवलोकन केले असता तक्रारदाराची तक्रार ही गुणपत्रिकेतील दोषाबाबतची असल्याने तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होणार नाही व तक्रारदार व सामनेवाला यांचेतील वाद हा ग्राहक वाद होणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. 10. मुद्दा क्र.2 व 3 एकत्रित - तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होत नाही असा निष्कर्ष या मंचाने वरील विवेचनात काढला असल्याने या मुद्दयाबाबत कोणताही उहापोह याकामी करणे उचित होणार नाही असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. रत्नागिरी दिनांक : 01/09/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |