-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-23 डिसेंबर, 2016)
01. तक्रारकर्तीची ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी, जर नगर भूमापन कार्यालय क्रं-1), सिव्हील लाईन्स नागपूर यांचे विरुध्द तिचे घराच्या मालमत्ते संदर्भात फेरफाराची नोंद न घेण्या बाबत दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे-
घर क्रं-671, सिटी सर्व्हे नंबर-173, शिट क्रं-116, क्षेत्रफळ-34.5 चौरस मीटर ही मालमत्ता भानखेडा, तहसिल व जिल्हा नागपूर येथे वॉर्ड नं.50, सर्कल नं.-17/23 मध्ये स्थित असून या मालमत्तेचे पूर्वीचे मालक श्री भक्तराज चुडामण उमरेडकर, श्रीमती पुनाबाई चुडामण उमरेडकर आणि श्री फुलचंद चुडामण उमरेडकर हे होते. या तिघानीं ही मालमत्ता श्रीमती निर्मलाबाई डोंगे अणि श्री गजराज डोंगे यांना नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे दिनांक-09/03/1999ला विकली. त्यानंतर श्रीमती निर्मलाबाई आणि श्री गजराज डोंगे यांनी त्यांचे आममुखत्यार श्रीमती सिंधुबाई पौनीकर मार्फत या मालमत्तेचा दक्षीणे कडील भाग तक्रारकर्तीला दिनांक-26.11.2009 रोजीच्या नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये विकला. तसेच मालमत्तेचा उर्वरीत उत्तरेकडील भाग त्याच दिवशी आममुखत्यारव्दारे तक्रारकर्तीचे भाऊ शेख रेहमान शेख सुलेमान यांना विकला. तक्रारकर्तीचे भाऊ यांचे नावाने नगर भूमापन कार्यालयातील अभिलेखा मध्ये उत्तरेकडील भागाच्या मालमत्तेची फेरफार नोंद घेण्यात आलेली आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तीने स्वतः विकत घेतलेल्या मालमत्ते मध्ये विक्रीपत्राचे नोंदणी दिनांका पासून राहत आहे व तो भाग तिचे ताब्यात आहे. तिने दिनांक-15/01/2013 रोजी विकत घेतलेल्या घराच्या दक्षीणे कडील भागाची फेरफार नोंद नगर भूमापन कार्यालयातील अभिलेखात होण्यासाठी विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी क्रं-1) नागपूर यांचे कार्यालयात अर्ज केला परंतु विरुध्दपक्ष नगर भूमापन कार्यालयाने कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या नावाची मालमत्ता पत्रकात फेरफार नोंद घेतलेली नाही. म्हणून तिने या तक्रारीव्दारे विनंती केली की, विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तिचे नावाच्या मालमत्तेची नगर भूमापन कार्यालयातील मालमत्ता पत्रकात/आखिव पत्रिकेत (Property Card) फेरफार (Mutation) नोंद घ्यावी. तसेच तिला झालेल्या त्रासासाठी आणि खर्चासाठी रुपये-15,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावेत.
03. विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी क्रं-1) तर्फे प्रतिज्ञालेखावर उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये असे नमुद केले की, तक्रारकर्तीने घरा संबधी मालकी हक्काचे कुठलेही दस्तऐवज सादर केले नाहीत. तसेच तक्रारीत ज्या मालमत्ते (घरा) संबधी विक्रीचे व्यवहार तक्रारकर्तीने नमुद केलेले आहेत, त्या संबधी पण कुठलेही दस्तऐवज तिने सादर केलेले नाहीत. घराचा दक्षीणे कडील भाग तिचे कब्ज्यात आहे हे तक्रारकर्तीचे म्हणणे नाकबुल करण्यात आले. तक्रारकर्तीने जे घर नोंदणीकृत विक्रीपत्रा व्दारे खरेदी केलेले आहे, त्यामध्ये आराजीचा पूर्णपणे कुठेही उल्लेख केलेला नाही.
विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालविण्यास योग्य नाही कारण हे पूर्णपणे क्षेत्रफळाच्या दुरुस्तीचे प्रकरण आहे. तक्रारकर्तीने सर्वप्रथम नगर भूमापन अधिकारी क्रं-1) यांच्या आदेशा विरुध्द अपिलीय अधिकारी, भूमी अभिलेख यांचेकडे दाद मागावी. जे आममुखत्यारपत्र तक्रारकर्तीने दाखल केलेले आहे, ते खोटे आहे कारण श्रीमती निर्मलाबाई डोंगे व श्री गजराज डोंगे यांना संपूर्ण मालमत्तेचे आममुख्यात्यारपत्र श्रीमती सिंधुबाई पौनीकर यांना देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. या सर्व कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षाव्दारे करण्यात आली.
04. उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत उल्लेख केल्या प्रमाणे विक्रीपत्राच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्यातील पहिला दस्तऐवज हा श्रीमती निर्मलाबाई मोहनलाल डोंगे आणि श्री गजराज मोहनलाल डोंगे यांनी, उमरेडकरां कडून मालमत्ता (घर) विकत घेतल्या बाबतचे नोंदणीकृत विक्रीपत्र आहे, या विक्रीपत्रात तक्रारीत दर्शविलेले घर क्रं-671 ही मालमत्ता सन-1999 ला डोंगे यांना विकल्याचा उल्लेख आहे.
06. दुसरा दस्तऐवज हे सुध्दा एक नोंदणीकृत विक्रीपत्र आहे, जे श्रीमती निर्मलाबाई आणि श्री गजराज डोंगे यांचे वतीने आममुखत्यार श्रीमती सिंधुबाई विनायक पौनीकर यांनी, तक्रारकर्तीला सदरहू मिळकत विकल्या संबधीचे आहे. या विक्रीपत्राव्दारे डोंगे यांनी जी मालमत्ता उमरेडकरां कडून विकत घेतली होती, ती तक्रारकर्तीला विकली.
07. या ठिकाणी हे लक्षात घ्यावे लागेल की, दोन्ही नोंदणीकृत विक्रीपत्रा मध्ये मालमत्तेच्या क्षेत्रफळा मध्ये फरक आहे. पहिल्या विक्रीपत्रा मध्ये मालमत्तेचे घर क्रं-671 चे एकूण क्षेत्रफळ आखीव पत्रिके प्रमाणे 34.5 चौरस मीटर दर्शविलेले आहे.
तर दुस-या विक्रीपत्रात हे क्षेत्रफळ 348.75 चौरसफूट (32.39 चौरसमीटर) दर्शविलेले आहे. परंतु नगर भूमापन कार्यालयाच्या आखिव पत्रिके/मालमत्ता पत्रका प्रमाणे हे क्षेत्रफळ 17.25 चौरस मीटर दर्शविलेले आहे. तसेच असेपण नमुद केलेले आहे की, या मालमत्ते वरील बांधकाम 32.39 चौरसमीटर इतके दर्शविलेले आहे.
अशाप्रकारे या घराच्या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळा बाबत दोन्ही विक्रीपत्रा मध्ये नमुद केलेल्या क्षेत्रा संदर्भात संभ्रम निर्माण होतो. तक्रारी मध्ये सुध्दा तक्रारकर्तीने विकत घेतलेल्या घराच्या दक्षीणे कडील भागाचे क्षेत्रफळ लिहिलेले नाही. डोंगे यांनी श्रीमती सिंधुबाई पौनीकर हिला करुन दिलेल्या आममुखत्यारपत्रात घर क्रं-671 चे एकूण क्षेत्रफळ 697.50 चौरसफूट इतके दर्शविलेले आहे, जे वर उल्लेखित दोन विक्रीपत्रात लिहिलेल्या क्षेत्रफळाशी एकदम भिन्न आहे.
08. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारकर्तीच्या विक्रीपत्रात असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही की, सदर्हू घर क्रं-671 चा दक्षीणे कडील भाग तिला विकण्यात आला होता तसेच त्या विक्रलेल्या भागाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे याचा पण उल्लेख नाही, सदर्हू घराच्या मालमत्तेचे जे वर्णन दिलेले आहे, ते संभ्रमातीत आहे. तक्रारकर्तीचे विक्रीपत्र वाचल्यावर असे दिसते की, घराच्या मालमत्तेचे जेवढे काही क्षेत्रफळ दर्शविलेले आहे, ती संपूर्ण मालमत्ता ही तक्ररकर्तीला विकण्यात आली. मालमत्तेच्या चतुःसीमे मध्ये उत्तरेकडे याच मिळकतीचा उरलेला भाग असे लिहिलेले आहे. जर संपूर्ण घराची मालमत्ता ही तक्रारकर्तीला विकण्यात आली होती, तर त्या मालमत्तेचा इतर कुठलाही भाग शिल्लक राहणे शक्य नव्हते. तिच्या विक्रीपत्रात हे पण स्पष्ट लिहिलेले आहे की, विकणा-याने म्हणजेच डोंगे यांनी संपूर्ण मिळकत व त्यावरील बांधकाम तक्रारकर्तीला विकले आहे, असे जर असेल तर, तक्रारकर्तीचे भाऊ यांनी या मालमत्तेचा कुठला उत्तरे कडील भाग विकत घेतला हे समजून येणे कठीण आहे.
09. उमरेडकर आणि डोंगे यांचे मध्ये झालेल्या विक्रीपत्रात ते केंव्हा झाले याची तारीख नाही. तसेच विक्रीपत्रात सर्व इसमांच्या/ साक्षीदारांच्या सहया नाहीत, त्यामुळे कायद्दा नुसार या विक्रीपत्राच्या वैधते बद्दल शंका निर्माण होते. या मालमत्तेच्या आखीव पत्रिकेत बापुराव हे एक नाव सुध्दा उमरेडकरां सोबत दिसून येते परंतु बापुरावची कुठल्याही विक्रीपत्रावर स्वाक्षरी नाही, त्यामुळे या सर्व संशयीत आणि खुलासा न केलेल्या बाबींमुळे विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी, नगर भूमापन कार्यालय क्रं-1) नागपूर यांना तक्रारकर्तीचे नावाची मालमत्ता पत्रकात फेरफार नोंद लावण्याचा निर्देश देता येणार नाही.
10. तक्रारकर्तीचे वकीलांनी आपल्या युक्तीवादात असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्षाला आममुखत्यारपत्र किंवा विक्रीपत्राला आव्हान देण्याचे अधिकार नाहीत कारण त्या मालमत्तेवर इतर कुठल्याही व्यक्तीने दावा केलेला नाही परंतु हा युक्तीवाद बरोबर नाही, जेंव्हा की, हे स्पष्टपणे दिसून येते की, त्या मालमत्तेच्या क्षेत्रफळा मध्ये एकसुत्रीपणा नाही, त्यामुळे कोणाचे नावाची नगर भूमापन कार्यालयीन अभिलेखामध्ये फेरफार नोंद होण्यापूर्वी सदर्हू मालमत्तेचे नेमके क्षेत्रफळ किती आहे, याचा खुलासा करुन दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
11. विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी क्रं-1) नागपूर यांनी आपल्या लेखी जबाबात योग्यपणे नमुद केलेले आहे की, हे प्रकरण क्षेत्रफळा विषयी दुरुस्तीचे प्रकरण आहे.
12. वरील सर्व कारणास्तव ठरविण्यात येते की, यामध्ये विरुध्दपक्षाची सेवेत कुठल्याही प्रकारची त्रृटी नाही आणि ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्ती श्रीमती तसलिमा अनवर बेग यांची, विरुध्दपक्ष नगर भूमापन अधिकारी, नगर भूमापन कार्यलय क्रं-1) नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.