श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 04 ऑक्टोबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता विनायक भावसागर यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉट क्र. 213, शिवाजी पार्क बिल्डींग, श्रीकृष्ण नगर, नागपूर स्थित घराचा विमा वि.प. न्यु इंडिया अॅशूरंस कं.लि. शाखा भंडारा यांचेकडे पॉलिसी क्र. 16030448130500000003 अन्वये 31.01.2014 ते 30.03.2015 या कालावधीसाठी आवश्यक विमा प्रव्याजी देऊन काढला होता.
तक्रारकर्ता नॅशनल इंशूरंस क.लि.च्या भंडारा शाखेत गेल्या दीड वर्षापासून शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याने आपले नागपूर येथील वरील घरास कुलूप लावून भंडारा येथे राहत आहे.
दि.25.12.2014 रोजी ख्रिसमसची सुट्टी असल्याने ते नागपूर येथील त्यांच्या वरील घरी गेले असता घराचे समोरीच दाराचे कुलूप तोडून घरातील अंदाजे रु.9,000/- किंमतीच्या चांदीच्या वस्तूंची चोरी झाल्याचे आढळून आले जे लाकडी कपाटात पेटीत ठेवले होते. याशिवाय, अन्य घरगुती सामानदेखिल गहाळ झाल्याचे दिसून आले. कोणीतरी दगड मारल्याने खिडक्यांच्या काचा देखिल फुटल्याचे दिसून आले. तक्रारकर्त्याने सदर चोरीची फिर्याद त्याचदिवशी पो.स्टे. नंदनवन, नागपूर येथे दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारकर्त्याच्या एकूण रु.15,000/- च्या वस्तूंची चोरी झाली. तसेच काचा फुटल्याने रु.2,240/- चे देखिल नुकसान झाले. सदर चोरी दि.23.12.2014 रोजी रात्री 1.00 वा. ते 3.30 वा.चे दरम्यान झालेली आहे.
तक्रारकर्त्याने सदर चोरीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून 29.12.2014 रोजी वि.प. विमा कंपनीच्या भंडारा शाखेकडे चोरी गेलेल्या वस्तूंची किंमत रु.15,000/- आणि कोणीतरी दगड मारल्याने खिडकीचे काच फुटल्याने झालेली नुकसान भरपाई रु.2,240/- मिळावी यासाठी विमा दावा सादर केला. वि.प.ने विमा दाव्याची रक्कम देण्याचे आश्वासन देत राहिले. परंतू प्रत्यक्षात मागणीची पूर्तता केली नाही.
तक्रारकर्त्याने कांच फुटून झालेल्या नुकसानीबाबत रु.2,240/- ची मागणी केली असतांना वि.प.ने धनादेश क्र. 117996 दि.21.07.2015 प्रमाणे केवळ रु.700/- दि.23.07.2015 च्या पत्रासोबत पाठविले. तक्रारकर्त्यास सदर रक्कम मान्य नसल्याने धनादेश वि.प.ला परत पाठविला. रु.15,000/- च्या नुकसान भरपाईबाबत तक्रार दाखल करेपर्यंत कोणतीही रक्कम मंजूर केलेली नाही. तक्रारकर्त्याने दि.17.07.2015 रोजी अधिवक्ता सौ. सुषमा सिंग यांचेमार्फत नोटीस पाठवून चांदीच्या व इतर वस्तुच्या चोरीबाबत नुकसान भरपाई रु.15,000/- आणि सेवेतील न्युनतेबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- ची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.क्र. 1 व 2 यांनी पूर्तता केली नाही, म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- चोरी गेलेल्या वस्तुंबाबत रु.15,000/- आणि कांच तुटून झालेल्या नुकसानीबाबत रु.2,240/- अशी एकूण नुकसान भरपाई रु.17,240/- देण्याचा वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि नोटीस खर्च रु.5,000/- मिळावा.
- तक्रार खर्च वि.प.वर बसवावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, नोटीस, पोस्टाच्या व कुरीयरच्या पावत्या, धनादेश, वि.प.चे पत्र व तक्रारकर्त्याचे पत्र अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 कडून त्यांच्या घराबाबत तक्रारीत नमूद विमा पॉलिसी काढल्याचे कबूल केले आहे. मात्र सदर घरात चोरी होऊन तक्रारकर्त्याच्या रु.15,000/- किंमतीच्या चांदीच्या वस्तु चोरीस गेल्या तसेच घराच्या काचा फुटून रु.2,240/- चे नुकसान झाल्याचे नाकबूल केले आहे. त्यांचे असे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने विमाकृत मालमत्तेच्या चोरी व नुकसानीबाबत वि.प.ला कळविल्यावर त्यांनी नुकसानीच्या मुल्यांकनासाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली होती. सर्व्हेयरने त्याबाबत दोन अहवाल दाखल केले होते. कांचेच्या फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत विमा दाव्याची योग्य रक्कम मंजूर करुन तक्रारकर्त्यास पाठविली असून रु.15,000/- चा विमा दावा मंजूरी संबंधाने तक्रारकर्त्याकडून अंतिम तपासणी अहवाल, लेटर ऑफ सब्रोगेशन, रु.9,000/- चे पेमेंट व्हाऊचर आणि रकमेचे भुगतान करण्यासाठी तक्रारकर्त्याच्या बँक खात्याची माहिती मागितलेली आहे. त्यासाठी 06.08.2015 रोजी पत्र आणि 13.10.2015 रोजी स्मरणपत्र देऊनही तक्रारकर्त्याने दस्तऐवजांची पूर्तता केली नाही. तक्रारकर्त्याने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत चोरी गेलेल्या वस्तुंचे मुल्य रु.9,000/- दर्शविले असतांना तक्रारीत चोरी गेलेल्या वस्तुचे मुल्यांकन वाढवून रु.15,000/- दाखविले आहे.
कांचेच्या फुटतुटींबाबत सर्व्हेयरने केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे दावा मंजूर करण्यांत आलेला आहे. तक्रारकर्त्याने सर्व्हेयरकडे तुटलेल्या कांचेचे मुल्य रु.720/- आणि पुटींग लावण्यासाठी रु.125/- एवढी नुकसान भरपाई सांगितली असतांना तक्रारीत रु.1,400/- फिटींग चार्जेसची अवास्तव मागणी केली आहे. सर्व्हेयरने तुटलेले कांच, पुटींग आणि फिटींग चार्जेसचे मुल्यांकन रु.1,245/- केले आहे. मात्र प्लेट ग्लासेसची किंमत रु.8,300/- असतांना तक्रारकर्त्याने त्यासाठी रु.5,000/- चा विमा (under insurance) काढला म्हणून सदर नुकसान भरपाईपैकी अंडर इंशुरंस 39.75 टक्के वजा करुन देय नुकसान भरपाई रु.700/- ठरविली व त्याप्रमाणे वि.प.ने सदर नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास पूर्ण व अंतिम भरपाई म्हणून पाठविली आहे. दुस-या रकमेची नुकसान भरपाई देण्यास देखिल वि.प. तयार असतांना तक्रारकर्त्याने दस्तऐवजांची पूर्तता केली नाही. म्हणून वि.प.कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
वि.प.ने आपल्या लेखी उत्तराचे पुष्टयर्थ सर्व्हे रीपोर्ट, पॉलिसी दस्त, क्राईम डिटेल फॉर्म इ. दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ घेतलेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) अंतिम आदेश ? तक्रार अंशतः मंजूर.
4. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प. कडे काढलेल्या गृहविमा पॉलिसीची प्रत वि.प.ने दाखल केली आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रु.2,041/- विमा प्रव्याजी देऊन त्याच्या घराचा आग आणि चोरीपासून होणा-या नुकसानीसाठी विमा काढला होता. त्यांत घरफोडीद्वारे होणा-या नुकसानीसाठी रु.73,000/- आणि प्लेट ग्लासच्या नुकसानीसाठीच्या रु.5,000/- चा समावेश होता. याशिवाय, इतर इतर शीर्षकाखाली दागिन्यांचा रु.1,68,000/- चा विमा काढला होता.
तक्रारकर्त्याचे घरी झालेल्या घरफोडीची तक्रार त्यांनी दि.25.12.2014 रोजी नंदनवन पो.स्टे. नागपूर येथे दिली, त्यांत चांदीचे भांडे आणि नाणे असा रु.9,000/- चा एैवज चोरुन नेल्याचे नमूद आहे. पोलिसांनी त्याचदिवशी तक्रारकर्त्याच्या घरी जाऊन घटनास्थळ पंचनामा केला आणि त्याची प्रत वि.प.ने दाखल केली आहे.
विमा दावा दाखल करतांना तक्रारकर्त्याने चांदीच्या चोरी गेलेल्या वस्तुंबाबत रु.15,000/- आणि तुटलेल्या प्लेट ग्लासबाबत रु.2,240/- ची नुकसान भरपाई मागणी केली. वि.प.ने श्री. संतोष कुळकर्णी यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या मुल्यमापनासाठी नियुक्त केल्यावर त्यांनी चांदीच्या चोरी गेलेल्या वस्तुबाबत तसेच तुटलेल्या प्लेट ग्लासबाबत असे स्वतंत्र दोन मुल्यांकन अहवाल सादर केले. त्या अहवालाच्या प्रती वि.प.ने दाखल केलेल्या आहेत.
चांदीच्या वस्तुंबाबतच्या अहवालात सर्व्हेयरने म्हटले आहे कि, सदर अहवालात नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने चांदीच्या 2 वाट्या, दोन चमचे आणि एक प्लेट, निरांजन, लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती मिळून रु.15,000/- किंमतीच्या वस्तू चोरी गेल्याचे सांगितले. पोलिसांकडे फिर्याद देतांना नक्की कोणत्या वस्तू चोरी गेल्या याची त्यास माहिती नव्हती. त्यांची पत्नी नागपूर येथे आल्यावर त्यांनी प्रत्यक्षात चोरी गेलेल्या वस्तुंची माहिती सांगितल्याने विमा कंपनीकडे केलेल्या विमा दाव्यात वरील वस्तुंची चोरी झाल्याचे दर्शवून रु.15,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु क्राईम डिटेल फॉर्ममध्ये केवळ चांदीचे भांडे चोरी गेल्याचा उल्लेख असल्याने केवळ 2 वाटया, 2 चमचे आणि एक प्लेट यांचीच चोरी झाल्याचे गृहित धरुन रु.9,000/- इतक्या नुकसान भरपाईचे मुल्यांकन केले आहे.
तक्रारकर्त्याने पो.स्टे.मध्ये तक्रार देतांना रु.9,000/- किंमतीचे चांदीचे भांडे व नाणे चोरी गेल्याचे नमूद केले आहे. त्यांत कोणत्या वस्तु होत्या हे सांगितलेले नाही. अशा परिस्थितीत विमा कंपनीकडे रु.15,000/- ची केलेली मागणी नंतर विचार करुन (after thought) असल्याचे दिसून येत असल्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीप्रमाणे चोरी गेलेल्या चांदीच्या भांडयाबाबत नुकसानीचे मुल्यांकन रु.9,000/- केलेले आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता सर्व्हेयरने केलेले मुल्यांकन निराधार किंवा चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही आणि तका्ररकर्त्याची रु.15,000/- ची मागणी समर्थनिय ठरत नाही.
दुस-या अहवालात सर्व्हेयरने नमूद केले आहे की, कोणीतरी दगड मारल्यामुळे खिडकीच्या कांचा फुटल्याने नुकसान झाल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले आणि कांचेची किंमत रु.720/-, पुटींग रु.125/-, फिटींग चार्जेस रु.1400/- अशी रु.2245/- ची मागणी केली. परंतू तक्रारकर्त्याने मागणी केलेले फिटींग चार्जेस अतिशय जास्त असून ते रु.400/- इतके गृहित धरुन नुकसान भरपाईचे मुल्यांकन रु.1,235/- इतके करण्यांत आले.
तक्रारकर्त्याच्या घरी खिडक्यांना लावलेल्या प्लेट ग्लासची एकूण किंमत रु.8,300/- असतांना त्यांनी केवळ रु.5,000/- चा म्हणजे 39.75 टक्के कमी रकमेचा विमा काढला. त्यामुळे झालेल्या नुकसानीपैकी अंडर इंशुरंसची 39.75 टक्के रक्कम कमी करुन रु.744/- इतके अनुज्ञेय नुकसानीचे मुल्यांकन करण्यांत आले.
सदर मुल्यांकनाबाबत असे म्हणता येईल कि, तक्रारकर्त्याने ग्लास फिटींग खर्च रु.1400/- ची मागणी केली असतांना सर्व्हेयरने कोणत्याही आधाराशिवाय ती रक्कम 400 इतकी म्हणजे मागणीच्या केवळ 28 टक्के इतकी शिफारस केली. अशा परिस्थितीत पुन्हा under insurance या सदरात 39.75 टक्के रक्कम कमी करणे योग्य वाटत नाही. म्हणून नुकसान भरपाईची सर्व्हेयरने काढलेली रक्कम रु.1245/- पुढील कोणत्याही वजावटीशिवाय मंजूर करणे न्याय्य झाले असते. मात्र वि.प.ने काच फुटण्याबाबत नुकसान भरपाईपोटी केवळ रु.700/- चा धनादेश क्र. 117996 दि.21.07.2015 चा तक्रारकर्त्यास पाठविल्याने तो त्यांनी न स्विकारता वि.प.ला परत केला. म्हणून कांच फुटीबाबत नुकसान भरपाईची रक्कम रु.1245/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.
वि.प.ने आपल्या लेखी जवाबाबत जरी तक्रारकर्त्यास चोरी गेलेल्या चांदीच्या भांड्याची नुकसान भरपाई रु.9,000/- देण्यासाठी आवश्यक दस्तऐवज सादर करण्यासाठी दि.06.08.2015 रोजी पत्र आणि दि.13.10.2015 रोजी स्मरणपत्र पाठविल्याचे म्हटले असले तरी अशा कोणत्याही पत्राची स्थळ प्रत व सदरचे पत्र तक्रारकर्त्यास प्राप्त झाल्याबाबतची पोच दाखल केलेली नाही, म्हणून वि.प. सर्व्हेयर मुल्यांकनाप्रमाणे रु.9,000/- नुकसान भरपाईची प्रतिपूर्ती करण्यास तयार होते, मात्र तक्रारकर्त्याने दस्तऐवजांची पूर्तता न केल्याने सदर रक्कम देता आली नाही हा वि.प.चा बचाव पश्चातबुध्दीचा (after thought) व निराधार असल्याचे अस्विकार्ह्य आहे.
वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होते की, सर्व्हेयर मुल्यांकनाप्रमाणे तक्रारकर्ता चोरी गेलेल्या चांदीच्या भांड्याबाबत नुकसान भरपाईपोटी विम्याची किमान रक्कम रु.9,000/- आणि कांच फुटल्याबाबत नुकसान भरपाई विम्याची रक्कम रु.1245/- मिळण्यास पात्र असतांना ती वेळीच अदा करण्यास वि.प.क्र. 1 व 2 यांनी कसूर केला असून सदरची बाब निश्चितच विमा ग्राहकांप्रती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील विवेचनात नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता चांदीच भांडयाच्या चोरीबाबत विमा दाव्याची रक्कम रु.9,000/- आणि कांच तुटुन झालेल्या नुकसानीबाबत विमा दाव्याची रक्कम रु.1245/- एकूण रु.10,245/- तक्रारकर्त्याने दि.29.12.2014 रोजी विमा दावा दाखल केल्यानंतर मंजूरीसाठी लागणारा जास्तीत जास्त 3 महिन्यांचा अवधी सोडून म्हणजे दि.01.04.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्च रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प. विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास विम्याची रक्कम रु.10,245/- ही रक्कम दि.29.12.2014 रोजी विमा दावा दाखल केल्यानंतर मंजूरीसाठी लागणारा जास्तीत जास्त 3 महिन्यांचा अवधी सोडून म्हणजे दि.01.04.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी.
2) वि.प.ने तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.2,000/- अदा करावे.
3) वि.प.ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.