रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 103/2008 तक्रार दाखल दि. – 17/10/08 निकालपत्र दि. – 7/11/08
जे. अँड जे. कन्सट्रक्शन्स तर्फे, प्रोप्रा. श्री. व्ही.डी.जोसेफ, रा. जॉय व्हिला, मंगलवाडी, रोहा, ता. रोहा, जि. रायगड. सध्या वास्तव्य – 202, फोसिल फर्न्स, रामनगर कॉलनी, पाषाण एन.डी.ए. रोड, बावधन, पुणे – 411021. ..... तक्रारदार
विरुध्द
मुख्य अधिकारी, रोहा नगरपरिषद, रोहा, ता. रोहा, जि. रायगड. ..... विरुध्दपक्ष उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री. बी.एम.कानिटकर, सदस्य
तक्रारदारांतर्फे – अँड. ए.डी.राऊत विरुध्दपक्षातर्फे – -: नि का ल प त्र :- द्वारा मा.सदस्य, श्री. कानिटकर तक्रारदार हे शासनमान्य ठेकेदार व अभियंता आहेत. तसेच तक्रारदार हे जे.अँड जे. कन्स्ट्रक्शन्स या व्यवसायाचे मालक आहेत. रोहा नगरपरिषद यांचेकडून टाऊन हॉल पासून ते एस.टी. स्टँड पर्यंतच्या रस्त्यावर पदपथ बांधायच्या कामाचा ठेका रक्कम रु. 14,38,125/- या रकमेस दि. 12/6/05 रोजी विरुध्दपक्षाकडून मंजूर करण्यात आला होता. हे काम त्यांना वर्क ऑर्डर क्रमांक 910 अन्वये दि. 19/7/05 रोजी देण्यात आले होते. तक्रारदारांनी दिलेल्या रकमेच्या 5 टक्के इतकी रक्कम विरुध्दपक्षाकडे हमी रक्कम म्हणून जमा ठेवण्यात आली होती त्यानंतर कराराच्या अटी व शर्तींप्रमाणे 5 टक्के जादा रक्कम सुध्दा बिलातून कापून घेण्यात आली होती. अशा त-हेने विरुध्दपक्षाकडे हमी रक्कम रु. 1,40,000/- जमा करण्यात आली होती. 2. तक्रारदार पुढे म्हणतात की, त्यांनी विहित मुदतीत म्हणजेच सुमारे 4 महिन्यांमध्ये बरेचसे काम पूर्ण केले होते. अगदी थोडे काम त्यांना पूर्ण करता आले नव्हते कारण त्या जागी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक जनित्र (Transformer) होते व काही यंत्रसामुग्री फूटपाथवर उभी असल्याने तसेच त्या थोडयाशा जागेत फूटपाथचे व ड्रेनेजचे काम करणे शक्य नव्हते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची सामुग्री हलविल्याशिवाय ते काम करणे शक्य नव्हते याची जाणीव तक्रारदारांनी विरुध्दपक्षाला वेळोवेळी दिली होती. 3. तक्रारदारांनी बिलाचे पैसे देखील माहे जून 2006 पर्यंत पुरे केले होते. त्यानुसार विरुध्दपक्षाकडे पडून असलेली हमी रक्कमेची त्यांनी विरुध्दपक्षाकडे मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने त्याची काहीही दखल घेतली नाही. उलट, विरुध्दपक्षाने तक्रारदारांना क्रमांक 432/07 अन्वये दि. 16/5/07 रोजी नोटीस पाठविली. त्या नोटीसीला तक्रारदारांनी दि. 29/5/07 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांची हमी रक्कम रु. 1,40,000/- ही दर साल दर शेकडा 18 टक्के दराने परत मिळण्याची विनंती केली. 4. तक्रारदारांची मंचाला विनंती की, विरुध्दपक्षाने त्यांना रु. 2,05,000/- ही रक्कम दर साल दर शेकडा 18 टक्के दराने व्याजासह देण्याचा हुकूम मंचाने विरुध्दपक्षाला द्यावा. तसेच मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- मिळावेत. नि. 1 अन्वये तक्रारदारांनी आपला तक्रार अर्ज दाखल केला आहे. नि. 2 अन्वये अँड. ए.डी.राऊत यांनी तक्रारदारांतर्फे आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 4 अन्वये त्यांनी विरुध्दपक्षाला पाठविलेल्या नोटीसीची प्रत व त्याची पोचपावती दाखल केली आहे. नि. 5 अन्वये तक्रारदारांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि. 6 अन्वये तक्रारदारांना मंचाने त्यांची 1. तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदी अंतर्गत कशी येते ? 2. तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचेमध्ये ग्राहक हे नाते कसे निर्माण होते ? 3. तसेच सदर तक्रार ही ग्राहक वाद कसा होईल ? याचा खुलासा करण्यासाठी नोटीस पाठविली. त्या नोटीसीची पोच नि. 7 अन्वये उपलब्ध आहे. 5. या कामी दि. 24/10/08 रोजी तारीख नेमण्यात आली होती. परंतु त्या दिवशी तक्रारदार अथवा त्यांचे वकील खुलासा करण्यासाठी मंचात हजर नव्हते. त्यामुळे त्यांना पुढील संधी देण्यासाठी दि. 7/11/08 रोजी तारीख नेमण्यात आली होती. त्या दिवशी तक्रारदार हजर होते परंतु त्यांचे वकील गैरहजर होते. नि. 8 अन्वये तक्रारदारांनी मुदतवाढीचा अर्ज केला. मंचाने सदर अर्ज नामंजूर केला. 6. एकंदरीत तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले असता तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होत नाहीत तसेच विरुध्दपक्षाने त्यांचेकडील हमी रक्कम त्यांना परत न केल्याने त्यांना मंचात ग्राहक संरक्षण कायद्याचे आधारे तक्रार दाखल केली आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार तक्रारदारांची तक्रार ही दोषपूर्ण सेवेशी संबंधित नसल्याने या कायद्याच्या आवाक्यात ही तक्रार बसत नसल्याचे मंचाचे मत आहे. तसेच याबाबत पुरेशी संधी देऊनही तक्रारदारांनी ते विरुध्दपक्षाचे ग्राहक कसे होतात तसेच त्यांची तक्रार हा ग्राहक वाद कसा होतो इत्यादी बाबत मंचापुढे खुलासा सादर केला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात यावी या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
7. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की,
- अंतिम आदेश - 1. तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येते. 2. या आदेशाच्या प्रती नियमाप्रमाणे उभयपक्षकारांना पाठविण्यात याव्यात. दिनांक – 7/11/08. ठिकाण – रायगड – अलिबाग.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Shri B.M.Kanitkar | |